Sunday, July 7, 2013

चुका सुधारायच्या होत्या पण उशीर झाला...



पुण्यात आपल्या वडीलांकडून म्हणजे जयंत तारे यांच्याकडे बालरंगभूमीपासून रंगमंच गाजवत असलेला खरचं हरहुन्नरी कलावंत... निमित्त होते..गॅंगरीनचे..
पण जसा तो मुंबईत रुजू लागला त्याला व्यसनाने गाठले..त्याच्यामुळे त्याच्या कारकीर्दीवरही परिणाम झाला..तरीही अखेरपर्यत ...त्याच्यातला नट कायम जिवंत होता..त्याच्या स्मृती कायम जीवंत रहातील ..चित्रपटातून,,सिरियलमधून..काही नाटकातून...


पण पूर्वी एक प्रसंग त्यांच्यावर आला होता..तेव्हा त्याच्यावर मी कांही टिपण केले होते...पण तरीही त्याचे सारे चालूच राहिले..अखेरीस सतीश तारे...अनंतात विलिन झाले...तेव्हाच काही धडा घेतला असता तर...


नाटक हे व्यसन असले तरी ते परवडले. पण नाटकातल्या नटाला व्यसन लागले तर त्याचा तर तोल जातोच पण व्यवसायाचा तालही बिघडतो. असे व्यसनाच्या आहारी गेलेल्या नटांचे असंख्य किस्से रंगवून सांगितले जातात. ऐकताना आपण हसतो . कारण त्यातून रंजन घडते. क्वचित पाहिले तर त्यावेळेला त्याची कीव येते. मात्र हा प्रकार मारक इतका ठरतो की एखाद्या नटाची करीयर उध्वस्त होते.



त्याच्या विषयी अनेक प्रकाराने बोलले जाते..होते...पण कांही गोष्टी घडून गेलेल्या असतात..आपण फक्त बघत रहायचे...दुसरे काय...त्याची तळमळ अखेरपर्यंत होती... तो तारा चमकला..पण कांहीसा अंधुकसा..त्याच्या पुण्यातल्या शेवटच्या प्रयोगाच्यावेळी नेमके काय घडले..त्यांने तो कसा केला..याविषयी त्याचे मित्र संदिप पारखे यांनी मला पत्र पाठविले ते देत आहे..




सुभाष सर सप्रेम नमस्कार,

सर ,सतीश खरचं हरहुन्नरी कलावंत होता पण सर तो जाण्यामागे खरोखरच निमित्त होते..गॅंगरीनचेच. त्याला व्यसनाने गाठले..त्याच्यामुळे त्याच्या कारकीर्दीवरही परिणाम झाला हे अगदी खरे आहे. परंतु त्याला त्याच्यातील चुकांची जाणिव झाली होतीतो जवळ जवळ वर्षापासून सर्व व्यसंनांपासून दूर होता  त्याच्यामुळे त्याच्या कारकीर्दीत परत फरक पडला होता त्याच्यातील कलाकार प्रगल्भ होत होता ,त्याची कला खुलत होती अखेरपर्यत ...त्याच्यातला नट कायम जिवंत होता..त्याच्या स्मृती कायम जीवंत रहातीलच.

२० तारखेला बालगंधर्वाच्या प्रयोगाला मी गेलो होतो.त्याला त्याच्या जखमेच्या प्रचंड वेदना सतावत होत्या ,त्याला खरेतर तोच प्रयोग करायला नको होता. त्याला त्या प्रयोगात त्यातला सतीश व्यक्त करताच येत नव्हता. त्याला प्रयोगापूर्वी गाडीतून उचलून स्टेजवर आणले होतेपायावर प्रचंड सूज होती . प्रचंड वेदना त्याला होत होत्या .त्याही अवस्थेत त्याने तो प्रयोग केला .

 `गोड गोजिरी` नाटकात सतीश तारे काय चीज आहे आणि सतीशकडे काय काय आहे हे दाखविण्याचा प्रयत्न होता .पण तो त्या प्रयोगात त्याला जमलाच नाही मी त्याला खूप वर्षे जवळून बघितल्यामुळे त्याला काय दाखवायचे होते ती तळमळ मला समजत होती. त्याचे पंचेस पाहिजे तसे बसत नव्हते. प्रयोग संपल्यानंतर त्याला भेटावयास गेलोतेव्हा विंगेतच बसला होता. पाय प्रयोगापूर्वी होता त्यापेक्षा दुपटीने सुजला होता. मला तर काय बोलावे सुचत नव्हते .त्याने मला नेहमीप्रमाणे विचारले..  

तो मला प्रत्येक नाटकानंतर कायम रिपोर्ट विचारायचा .त्यादिवशीही विचारला .मला तर काहीच सुचत नव्हते. मी त्याला एकाच शब्दात उत्तर दिले ...निशब्द !
सतीशची आई आणि बहिण आसावरी बरोबरच बसले होते. आम्ही सर्वच जण त्याला म्हणालो कि तू या अवस्थेत प्रयोग करायला नको होता .त्याची आई तर म्हणाली देखील .`तू आत्ता मुंबईला जाऊ नकोस तुला उपचारांची गरज आहे .महिन्याभराचे पूर्ण शेडूल रद्द कर .घरी चल .पूर्ण विश्रांती घे ..`
पण ऐकेल तो सतीश कसला त्याने ऎकले नाही परत मुंबईला जाऊन दोन प्रयोग केले .कारण त्याला परत एकदा भरारी घ्यायची होती. मलाही म्हणाला .`आपल्याला परत एकदा सुरवात करायची आहे..दोन नाटके डोक्यात आहेत ...`
पण हे त्याचे आमच्याशी बोलणे शेवटचेच. सर ,आम्हाला वाटले पण नाही कि हि आमची सतीशशी शेवटची भेट......  

सर तुम्ही सतीश गेला त्यादिवशी तुम्ही केलेल्या पोस्टला उत्तर त्यादिवशीच द्यायचे होते पण डोके चालतच नव्हते .माझ्याशी तो गेल्या तीन महिन्यात सारखे फोन वर फेसबुक ऑनलाईन बोलायचा. सर सतीश खरच बदलला होता. त्याने केलेल्या चुकांची जाणीव त्याला झाली होती .त्याच्या चुका सुधारायच्या होत्या ......पण उशीर झाला.....  

आम्ही मित्र रसिक एका सुंदर कलाकाराला मुकले हेच खरे. सतीश सर्वांना पोरके करून गेला हो. गेले चार दिवस त्याचे व्हिडीओ बघत बसलो आहे. काहीच सुचत नाहीये. सुभाष सर ,तुमच्यापाशी मन मोकळे करावे असे वाटले म्हणून हा पत्र प्रपंच.


                                                                                                                                            आपलाच,
                                                              संदीप पारखे





' सतीश तारे नावाच एक गारुड होत जे सहकलाकार आणि प्रेक्षक यांची मनोभूमी आणि रंगभूमी व्यापून टाकणार होत. तो आता परत दिसणार नाही ,त्याने लिहिलेले नाटक पुन्हा त्यानेच दिग्दर्शन केलेले पहायला मिळणार नाही ,तो आता आपल्याला सतत न थांबता भरभरून हसवणार नाही ,त्याच्या मधेच एखाद्या काळीज सुन्न करणा~या वाक्याने आपल्या डोळ्याच्या कडा पाणावणार नाहीत , त्यानेच लिहिलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी ऐकताच येणार नाहीत आणि त्यावर तालबद्ध रित्या थिरकणारी त्याची लयबद्ध आकृती आता दिसणारच नाही इतकेच काय वेतानेही थक्क व्हावे अशी लवचिकता आता पुन्हा रंगभूमीवर दिसणारच नाही, त्याच्या बरोबर रात्र, रात्र जागवणारे किस्से कथन आता होणारच नाही , हसून, हसून जीव गुदमरणारच नाही तर त्याच्या नसण्याने जीव गुदमरणार …. हे सारे ,सारे विचार मेंदू अगदी सुन्न करून टाकणारे आहेत … 
आमचा मित्र मिलिंद शिंत्रे याला तो म्हणाला होता कि "शिंत्रे गुरुजी आम्हाला स्टार होणे कधी जमले नाही बघा "!!… 'पण खर सतीश तू नावाप्रमाणे ताराच होतास … स्वयंभू ,स्वयंप्रकाशित … अरे तुझ्या आजूबाजूला तुझाच प्रकाश घेऊन आपण नट असल्याचा ग्रह करून फिरणारे किती पाषाण होते आणि आहेत …. आज केवळ तुझी नक्कल करून वरच्या पदाला पोहोचून पोट भरणारे दिसतात तेव्हा मनात एकच विचार येतो … 'ह्या कुठे सतीश आणि कुठे हे ' …. 
पण सतीश अरे काही गोष्टी कंट्रोल केल्या असत्यास तर याच सर्व लोकांना तुला पहाण्यासाठी आकाश दर्शनाची दुर्बीण सुद्धा कमी पडली असती अरे …. स्वत:च्या शरीरावर ,वाणीवर इतकेच काय चेह~यावरच्या प्रत्तेक पेशीवर ,तुझ्या चक्षुवर [तुझा एक डोळा स्थिर ठेऊन दुसरा गरागरा फिरवणे कसे विसरू अरे ??] पूर्णत; नियंत्रण असणारा तू …. काही,काही बाबतीत मनावर नियंत्रण ठेवले असतेस तर …. आजून कितीतरी वर्ष आम्ही दीपवणा~या अभिनयाचे सुख घेतले असते,असे नाही वाटले तुला ??? 
…. सतीश माझ्या सारख्या लेखकाच्या एखाद्या वाक्यात ,दिग्दर्शनात आणि अभिनयात कुठेतरी तू डोकावतोस … का नाही डोकावणार ??? अरे तू म्हणजे प्रपात होतास तुझ्या सानिध्यात असणा~या आमच्या सारख्यांवर काही तुषार उडणारच ना रे ???? खरच देव आता तरी तुझ्या अतृप्त आत्म्यास शांती देवो !! 
-सौरभ पारखे, पुणे

No comments: