Thursday, January 25, 2024
राजदत्त तथा दत्ता मायाळू याना पद्मभूषण
राजा परांजपे यांचेकडून धडे गिरवून ज्यांनी आपल्या उत्तम चित्रपटांनी समाज मनावर उत्तम संस्काराचे बीज रोवले त्या कलावांतच्या उतरत्या वयात या मराठी व्यक्तीचा असा सन्मान केला याचा आम्हा सर्व रसिक..वाचकांना अभिमान वाटतो..
स्वतःचा आगळा ठसा ठेवणारा हा मोठा धेय्यावेडा , तपस्वी माणूस..आपल्या वागण्यातून बोलण्यातून मराठी रसिकांवर छाप पाडत गेला..
त्यांचे चित्रपट आदर्श झाले आणि त्यातून नवे कलावंत..चित्रपट सृष्टीला लाभले..
तंत्राच्या आहारी न जाता अधिकाधिक उत्तम रित्या कथा ताकदीने पोचविण्याचा त्यानी सचोटीने प्रयत्न केला..
अनेक राष्ट्रीय पारितोषिके त्यांच्या चित्रपटांना लाभली..आता पद्मभूषण मिळून त्यांच्या या कारकिर्दीला नवे वलय लाभले आहे..
त्यांना उत्तम आरोग्यपूर्ण आयुष्य यापुढेही लाभावे आणि त्यानी आपले उत्तम शिष्य निर्माण करावेत..हीच आम्हा रसिकांची इच्छा..!
राजदत याना आम मानाचा मुजरा..!
जय हिंद..जय महाराष्ट्र...!
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
राजदत्त जीवन परिचय
मूळ नाव दत्तात्रय अंबादास मायाळू, चित्रपटासाठीचे नाव राजदत्त. चित्रपट क्षेत्रातील त्यांचे गुरू राजा परांजपे यांच्या नावातील 'राज 'आणि स्वतःच्या नावातील 'दत्ता' घेऊन राजदत्त झाले .
अमरावती जिल्ह्यातील धामणंगाव इथे त्यांचा जन्म झाला. वर्धा येथे जी.एस. कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये बी. कॉम. पर्यंत शिक्षण घेतले. शिशु अवस्थेपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत जात. तृतीय वर्ष शिक्षित स्वयंसेवक संघ बंदीच्या काळात २ महिने १८ दिवस कैद भोगली. सत्याग्रहात भाग घेऊन लहानपणा पासून गणेश उत्सव,मेळा,शाळा व कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये नाटकात भूमिका केल्या. त्यांच्या कुसुमाग्रजांचे 'दूरचे दिवे ',आचार्य अत्रे यांचे 'उद्याचा संसार ','साष्टांग नमस्कार'मधील भूमिका चांगल्या झाल्या. विशेषतः 'साष्टांग नमस्कर' मधली कवीची भूमिका खूप छान जमली होती. शिवाय बाळ कोल्हटकरांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी' मध्येही काम केले .
सदुभाऊ डांगे नावाचे केरळमधले संघाचे प्रचारक होते. ते नाटिका लिहीत. त्यांच्या सगळ्या नाटिकांमधून राजदत्तांनी भूमिका केल्या. प्रत्यक्ष राजाभाऊ परांजपे यांच्या हस्ते त्यांना पारितोषिकही मिळाले. महाविद्यालयात असतांना दर रविवारी सेवाग्राम जवळच्या गोपुरीतील कृष्ठधाम केंद्रात शुश्रूषा पथकांत सहभागी होत. समाजसेवेची आस आजही त्यांच्या कलाकृतीतून दिसते. सुप्रसिद्ध लेखक ग.त्र्य माडखोलकर यांच्या प्रोत्साहनाने दैनिक तरुण भारत नागपूर येथील 'युनिव्हर्सिटी 'सदरात लिखाण सुरू केले.त्यांच्यातील पत्रकारितेचा हा श्रीगणेशा होता.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील दैनिक भारत या वृत्तपत्रात नोकरी केली.त्यानंतर मद्रास इथल्या चांदोबा या मुलांच्या मासिकांत संपादकीय विभागात दोन वर्ष काम केले. त्यांची मुलगी भक्ती मायाळू प्रसिद्ध मालिका संकलक आहेत.
चित्रपट कारकीर्द
मद्रास इथला कालखंड त्यांच्या जीवनाची दिशा ठरवणारा होता. राजाभाऊ परांजपे मद्रासला चित्रपटासाठी आले असतांना त्यांच्या ओळखींमुळे इथल्या AVMच्या स्टुडिओतून राजदत्त यांना मनसोक्त फिरता आले आणि चित्रपट या क्षेत्राशी त्यांचे नाते जोडले गेले. राजाभाऊ परांजपे यांच्याकडे AVMच्या 'बाप बेटे' चित्रपटादरम्यान उमेदवारी सुरू झाली. जवळ जवळ १३ चित्रपटांसाठी राजाभाऊंचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यात प्रामुख्याने 'देवघर','जगाच्या पाठीवर','आधी कळस मग पाया ','हा माझा मार्ग एकाला','पाठलाग','पडछाया' इ. चित्रपटांचा उल्लेख करता येईल. १९६७ मध्ये स्वतंत्रपणे चित्रपट दिग्दर्शनाला सुरुवात केली. पहिला चित्रपट 'मधुचंद्र' आणि या पदार्पणातच यांनी एक यशस्वी प्रयोग केला; हिंदीत संगीतकार असलेले एन.दत्ता यांना मराठी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन करायला लावले.
पहिला चित्रपट झाल्यानंतर पुन्हा काहीच काम नाही. अशावेळी भालजी पेंढारकर व लता मंगेशकर यांनी मदत केली आणि चित्रपट तयार झाला - 'घरची राणी'. राजदत्त यांनी या मदतीचे चीज केले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आणि मग राजदत्त यांनी मागे वळून पाहिलेच नाही.१९६९ साली 'अपराध'चित्रपटाला पुन्हा एकदा 'राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार'मिळाला. त्यानंतर सतत २८ चित्रपटाचे दिग्दर्शन केले [२]त्यापैकी ९ चित्रपटांना प्रथम, ३ चित्रपटांना द्वितीय, २ चित्रपटांना तृतीय आणि एका चित्रपटाला विशेष असे राज्य शासनाचे एकूण १४ पुरस्कार मिळाले आहेत. एवढे पुरस्कार मिळवणारे मराठीतले 'राजदत्त' हे एकमेव दिग्दर्शक आहेत.
राष्ट्रीय पातळीवरही राजदत्त यांची कामगिरी अशीच आहे. त्यांच्या 'शापित','पुढचं पाऊल' आणि 'सर्जा' या तीन चित्रपटांना 'रजतकमळ'मिळालंय . चित्रपटसृष्टीतला मानाचा फिल्मफेर पुरस्कारही राजदत्त यांना मिळाला.
राजदत्त यांनी प्रामुख्याने राष्ट्रभक्ती, सामाजिक प्रश्नांची तळमळ आणि चिंतनाला चालना देणारे चित्रपट दिग्दर्शित केले म्हणूनच अनेक विषय प्रेक्षकांपर्यंत पोहचले.
संत गाडगेबाबा यांच्या जीवनावरचा 'देवकी नंदन गोपाला' हा चित्रपट महाराष्ट्रबरोबर कर्नाटक, तामिळनाडू मध्येही प्रदर्शित झाला. इतकेच नव्हे तर इंग्लंड आणि अमेरिकेतही प्रदर्शित झाला.ताश्कंद फेस्टिव्हलमध्येही तो दाखवण्यात आला.'शापित' चित्रपटासाठी रशियन कौन्सिलने त्यांचा सत्कार केला. राजदत्त यांच्या तीन चित्रपटांना ताश्कंद, व्हेनिस आणि कॉर्क फेस्टिव्हलमध्ये स्थान मिळाले. राजदत्त यांनी 'इरिया' हा हिंदी चित्रपटही केला. त्यात शर्मिला टागोर, मार्क जुबेर यांच्या भूमिका होत्या .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment