Thursday, May 2, 2019

शब्दांतील भावना पोहचविणारा संगीतकार निखिल महामुनीमी गातो माझे गाणे...एक प्रतिभेचा बुलंद आविष्कार


नव्या संगीतकारांच्या यादित पुण्यातल्या कांही कलावंतांची नावे प्रकर्षानं घेतले जाणारे नाव आहे ते निखिल महामुनी यांचे. वादक ते संगीतकार हा प्रवास करताना त्यांनी अनेकविध स्तरांवर काम केले. त्यातून ते पारंगतपण आले. आपला वेगळा ठसा त्यांच्या गीतातून रसिकांच्या दरबारात दाखल झाला.

गेली अनेक वर्ष सतत त्यांच्या रचना ऐकताना त्यांच्या संगीतात केवळ स्वरांचे भान नाही तर काव्यातली भावना  शब्दातून व्यक्त झाली आहे .त्याची नेमकी जाण ओळखून तशी संगीतरचना करून ते गीत अधिक परिणामकारक कसे होईल याची दखल त्यांच्या संगीतामधून दिसत होती. म्हणूनच आता त्यांच्या आवाजातून गाण्यांची कशी रोषणाई होते ते पहाणे माझ्यासारख्या रसिकाला अधिक पसंत होते. आता तर ते आपले गाणे..जीवन गाणे..असे समजून
 मी गाते माझे गाणे..
या शिर्षकाखाली जाहिर कार्यक्रमच केला. त्याचा आस्वाद घेताना दिसली ती काही निरीक्षणे मी इथे नोंदविणार आहे.

केवळ वादक, संगीतकार यात न थांबता ते किती परिणामकारक गाणेही किती गावू शकतात तेही यातून सिध्द केले. त्यांचा आवाज सहजपणे षडज साधतो..तर तो तेवढाच तरलही असतो. वाद्यातील ठेक्याची नाळ पकडून गायनाची जाण आणि त्याचा आविष्कार करण्याची किमया त्यांना सहजसाध्य झाली आहे, असे म्हटले तर ते अधिक योग्य ठरेल.

त्यांच्या संगीतकारात स्वरांची भरमसाठ मांडणी नाही. तर कमीतकमी वाद्यात काव्यातील भावनेला रसिकांच्या मनात अधिक दृढ कसे करता येईल याची परिपक्व जाण दिसते.
त्यांचे गाणे अधिक परिणाम साधते जेव्हा ते तुम्ही डोळे बंद करून अनुभवता तेव्हा.
संतूर, सतार, बासरी,एकतारी या वाद्यांचा भास निर्माण करणारी त्यांची स्वरचित शैली आहे. त्यातून शब्दातील भावनांचा उद्रेक होतो आणि त्यातील आध्यात्मिकता, दाहकता आणि हळुवारपणा सहजी अंगावर रोमांच उभे करतात.


निखिल महामुनी या गुणी संगीतकारात उत्तम गायक दडलेला आहे हे तो प्रत्येक गाण्यात कृतितूून सांगत आहे. हा कार्यक्रम म्हणजे गायकाच्या आविष्काराचा प्रयोग आहे ,असे मी मानतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा देतो.

ते गीतांची निवड करताना..त्यातली गेयता न बघता त्यातला अर्थ पााहतात..शब्दाला अर्थाप्रमाणे सुरांचे गंध लावतात म्हणून तर गीत परिणामकारक बनते.

या कार्यक्रमात त्यांनी निवडेलेली गीते होती ती डॉ. सुनील काळे, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. माधुरी चव्हाण-जोशी, स्वाती शुक्ल, संतोष वाटपाडे, तुषार जोशी, निशिकांत देशपांडे, मंदार चोळकर, जेष्ठ कवी आरती प्रभू अशा दिग्गज प्रतिभा लाभलेल्या कवी आणि गीतकारांची.


यात महामुनी यांच्या जोडीला सहगायिका म्हणून रंगमंचावर होत्या हर्षला वैद्य- तोतडे ( ऑस्ट्रेलिया) . त्यांच्या आवाजात नादमाधुर्याबरोबर स्वरांचा लगाव होता. आणि गाताना भावनेप्रमाणे झोकून देणे होते.


निखिल महामुनी यांची कन्यका ऋचा महामुनी हिने मुलींच्या भ्रूण हत्येवरचे काव्य अतिशय तरल स्वरात उपस्थित रसिकांच्या हृदयात भारावलेल्या स्वरातून उतरविले. त्यालाही दाद द्यायला हवी.अभय गोखले यांनी निखिल महामुनी यांच्या गुणांना उलगडत त्यांच्याशी संवाद साधला. मोजक्या काव्यांच्या फैरी उडवत त्यांनी आपल्या उत्तम वाणीतून कार्यक्रमाला उंची प्राप्त करून दिली.
कवींच्या उत्तम शब्दांना संगीतकार गायकाने कसे फुलवित न्यावे ते ऐकण्याचे भाग्य तमाम मराठी जनांना मिळावे यासाठी हा कार्यक्रम गावोगावी व्हावा हिच अपेक्षा.


(खालील तीन लिंकमध्ये आपण त्यांची काही गाणी अनुभवू शकाल)सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

No comments: