श्रीगणेशाचे आगमन आता कांही दिवसांवर आल्याचे वातावरण पुणे शहरात गल्लोगल्ली दिसत आहे. रस्त्यांवर गणेश मंडळांचे मांडव पहिल्याच दिवशी सजावट पुर्ण करायच्या मागे आहेत.
आगदी दगडूशेठ गणपती मंडळही याला अपवाद नाही.
सजलेली बाजारपेठ आणि वातावरण पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
बाजारपेठ लखलखली ...
तारे, गोलाकार, जाळीदार अशा वैविध्यपूर्ण आणि रंगबिरंगी विद्युत दिव्यांच्या माळा, फोकस, समई अशा सजावटीच्या साहित्यांची दुकाने बाजारपेठेत लखलखू लागली आहेत. मात्र, या चमचमत्या रोषणाईतही बाजी मारली आहे, ती चायनीज विद्युत रोषणाईने!
बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिर परिसरात विद्युत रोषणाईच्या साहित्याची दुकाने सजली आहेत. मंडळाप्रमाणेच घरातील गणपतीसमोर आरास करण्यासाठी चायनीज वस्तूंना मागणी वाढली आहे. गेल्या सात वर्षांपासून ही मागणी वाढत असून आता तर बाजारपेठ चायनीज साहित्यांनीच काबीज केली आहे. स्वस्त, आकर्षक , वैविध्यपूर्ण अशा वैशिष्ट्यांमुळे "चायनामेड' माळा, फोकस अशा विविध साहित्यांना पसंती मिळत आहे.
प्रामुख्याने विजेच्या दिव्यांच्या माळांना सर्वाधिक मागणी असते. तारा, वर्तुळाकार, चंद्रकोर, कापडी फुले, छोट्या झुंबरामध्ये दिवे बसवून या माळा तयार केल्या जातात. त्यांचे शंभराहून अधिक प्रकार पाहण्यास मिळतात. जाळीदार माळ, ए एल डी दिव्यांच्या माळा, राईज बल्बच्या माळा असे प्रकार त्यात असतात. या माळांची किंमत त्यांच्या लांबीनुसार २५ रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत आहे.
"इको फ्रेंडली' वस्तूंना प्राधान्य
घरगुती आरास साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. थर्माकोलचे मंदिर, विद्युत रोषणाईच्या माळा, रेशीमकाठी आसने, छत्र, फेटा, मुकुट, कृत्रिम फुलांचे हार अशा आकर्षक सजावटीच्या वस्तूंना मागणी वाढली आहे.मंडई, तुळशीबाग, शनिपार; तसेच बोहरी आळी, रविवार पेठ या परिसरात सजावट साहित्यांची दुकाने मोठ्या संख्येने आहेत. या साहित्यांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
जाड कागदापासून तयार केलेले सुवर्णमंदिर, मीनाक्षी मंदिर, गणेश महाल, वनश्री आदी विविध प्रकारची मंदिरे विक्रीस आहेत. चौदा इंचांपासून एकवीस फुटांपर्यंतची मंदिरे उपलब्ध आहेत. समई, लामण दिवा, मकरध्वज, गणरायाची पूजा करणारे मूषक असे अनेक प्रकारचे सजावट साहित्य आहे. वापरण्यास सोपी व घडी करता येण्याजोगी मंदिरे असल्याने, या मंदिरांना वाढती मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.
No comments:
Post a Comment