Friday, January 13, 2012

उदयन काळे- आठवणीतील साठवण

उदयन काळे या संगीत रंगभूमिवरच्या उमद्या गायक अभिनेत्याचे ३० डिसेंबरला पुण्यात अचानक निधन झाले. त्याला श्रध्दांजली म्हणून रविवारी..१५ जानेवारीला `संगीत सौभद्र ` या नाटकाचा प्रयोग आयोजित केला आहे.. त्यानिमित्त त्यांच्याबरोबर काम केलेले
सुभाष इनामदार यांनी त्यांना वाहिलेली ही शब्दांजली....






संगीत रंगभूमीवर पहिली एंट्री `संगीत शाकुंतल` या नाटकात दुष्यंताची घेताना मनात धाकधुक होत होती. तरीही आपल्या आवाजात गायलेल्या पदांनी त्याने रसिकांना मोहवून टाकले. साथीला शकुंतलेच्या भूमिकेत होती..क्षमा वैद्य. भरत नाट्य संशोधन मंदिराच्या त्या रंगभूमीवर नाट्यतपस्वी बाबुराव विजापुरे तालमी घेत. बाबूराव त्या पौराणीक कथानकातला नेमके भाव येण्यासाठी संवाद घटवून घेत. पण पहिल्यांदाच पाऊल टाकलेल्या उदयन काळे यांना त्यासाठी मेहनत घ्यावी लागली. त्याने ती घेतलीही...पुढे तीच मेहनत कामी आली. .अनेक नाटकातून त्यांने विविध संगीत भूमिकांना न्याय दिला.
आज जेव्हा वयाच्या अवघ्या ५२ व्या वर्षी त्याच्या अचानक जाण्याने मन गलबलून उठते. आठवणी येतात त्या त्याच्यासोबत `शांकुतल` नाटकात काम करताना घालविल्या दिवसांच्या.


दिसायला गोरा-गोमटा...गोल चेहरा..कोकणातून आल्याने आवाजात ती कोकणस्थी खास शैली.. त्यातही नाजुकता... पाठांतराला थोडे कष्टही पडत... फारसे गंभीर न होता जेवढे जमेल तेवढे मनापासून करण्याचा त्याचा स्वभाव...मात्र एक नक्की...तो गायला लागला की सुरांशी एकरूप झालेला आवाज..अभिनयाकडे कमी पडल्याचे मग कुणालाच जाणवित नसे..अगदी स्पर्धतही ...नाटकाला प्रथम तर उदयनला वैयक्तिक रोप्यपदक जाहिर झाले. एका त्या शाकुंतल नाटकाने उदयन काळे हे नाव पुण्यतल्या आणि संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात ओळखू यायला लागले.

तसा हळवा आणि काहीसा लाजरा त्याचा स्वभाव...बोलायलाही मितभाषी आणि मृदु. काही काळ तो बिबवेवाडीतल्या त्याच्या भावाच्या घरी तो रहात...तेव्हा मी जात असे...चंद्रकांत काळे उदयनचा थोरला भाऊ. बेतास-बात शिक्षण घेतल्यामुळे थोडा आत्मविश्वास कमी पडायचा...तरीही त्यांने जिद्द सोडली नाही...संगीतातल्या लयकारी आणि गाणे नटविण्याची त्याची शैली त्याला पुढे अनेक भुमिका मिळविण्यासाठी उपयोगी पडली. काही काळ छोटा गंधर्व आणि नंतर जितेंद्र अभिषेकींकडे संगीताचे शिक्षण त्याने घेतले.

`लावणी भुलली अभंगाला` मधल्या वेगळ्या भूमिकेने त्याला एक वेगळा रसिक मिळाला. यातली `निळोबाची` भूमिका त्यांनी सुमारे दोन हजार प्रयोगांमध्ये केली . जीवनात स्थेर्य आले...मात्र नट म्हणून करीयर घडविण्याचा मनसुबा काही त्याला पूर्ण करता आला नाही.

अखेरीस `आकाशवाणी`च्या दप्तरी `तंबोरा वादक` म्हणून तो चाकरी करु लागला. आणि संगीत नाटकात काम करण्याची संधी मिळत गेली..नव्हे ती त्याच्याकडे चालून आली.. . शिलेदार कुटुंबीयांच्या "मराठी रंगभूमीद्वारे' त्यांनी अनेक नाटकात सहभाग घेतला. . संगीत सौभद्र व स्वयंवरमधील कृष्ण, मानापमानमधील धैर्यधर, मत्सगंधामधील पराशर आणि संशयकल्लोळ मधील अश्वीनशेठ हे काही वानगीदाखल सांगता येईल.

तसा सन्मान आणि कीर्ती फारशी नव्हे अपुरीच मिळाली..मा. दिनानाथ मंगेशकरांच्या नावाने असलेला नाट्य परिषदेचा आणि छोटा गंधर्व यांच्या नावाने कोरेगाव (सातारा) इथला स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार उदयन यांना मिळाला..
ऐन उमदीच्या काळात अचानक त्याचे या जगातून नाहीसे होणे ही सर्वांच्या दृष्टीने धक्कादायक घटना.. त्याच्या जाण्याने संगीत नाटकात रुपाने देखणा आणि पदांना खुलविणारा एक मनमोकळा दिलदार अभिनेता नाहिसा झाला....त्याच्या कुटुंबियांना बळ आणि भविष्यकाळासाठी यथायोग्य शक्ती मिळावी हिच मनोकामना......त्याची स्मृती रसिकांच्या ठायी सदैव रहावी हिच अपेक्षा..




सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


No comments: