भावगीत गायिका मालती पांडे(बर्वे)यांचा स्मृती दिन
(२७ डिसेंबर,१९९७)
मैफलीत गाण्यासाठी अनुभव आणि सराव हवा. त्याकरता आधी आपल्याकडे गोड गळा आणि उत्तम गाणे सादर करण्याची क्षमता आहे हे स्वत:ला कळणे आवश्यक असते. गायन शिकायला सुरुवात करणे आणि मग त्यात आपला ठसा उमटवून त्याच क्षेत्रात गायक म्हणून कारकीर्द करणे ही आणखीन वेगळी गोष्ट आहे. त्यासाठी योग्य वयात उत्तम गुरू लाभणे, त्यायोगे आपल्या गाण्याला योग्य ती दिशा लाभणे, गाण्याचा कसून रियाज करणे, शिकलेले गाणे आत्मसात होणे, शास्त्राच्या कसोटीला ते उतरणे, गायनातील तंत्र-मंत्राचा अभ्यास अशा अनेक गोष्टींचा यामध्ये अंतर्भाव असतो . त्यामुळे गायक म्हणून क्षमता असेल तर गाण्यात नाव नक्की होईल, अशी खात्री असण्याचा तो काळ होता. अशा काळात भावगीताच्या दुनियेत मूळच्या विदर्भातील वर्ध्याच्या गायिकेने प्रवेश केला आणि आपल्या सुमधुर स्वरात पुढील काही वर्षे उत्तमोत्तम गाणी गायली आणि संगीतप्रेमींना अपार आनंद दिला. ही गायिका म्हणजे.. मालती पांडे-बर्वे.
छोटा पडदा आणि चित्रवाहिन्यांवरील गाण्याच्या स्पर्धाचा तो काळ नसूनसुद्धा आपल्या गायनामुळे मालती पांडे यांनी श्रोत्यांच्या मनात स्थान मिळवले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांचा आकाशवाणी मुंबई केंद्रावर सुगम गायनाचा पहिला कार्यक्रम झाला. ही गोष्टच खूप काही सांगून जाते.गायक-संगीतकार गजानन वाटवे यांनी कवी श्रीनिवास खारकर यांचे एक अंगाईगीत स्वरबद्ध केले आणि गायिका मालती पांडे यांच्याकडून प्रथम ते गाऊन घेतले. त्यानंतरच्या काळात मग अशी बरीच अंगाई गीते आली. वेगवेगळ्या संगीतकारांनी व गायक-गायिकांनी ती गायली. पण मालती पांडे यांनी गायलेल्या या पहिल्या अंगाईगीताचे महत्व विसरून चालणार नाही..‘कुणीही पाय नका वाजवू ,त्यांची रेकॉर्ड प्रसिद्ध झाली त्यातली एक कविता म्हणजे ‘कुणीही पाय नका वाजवू’ व दुसरी कविता ‘ऊठ जानकी, मंगल घटिका आली आनंदाची’! या ध्वनिमुद्रिकेमुळे मालतीबाईंचे खूप नाव झाले. पार्श्व गायिका म्हणून चाचणीसाठी मालतीबाई प्रभात कंपनीत आल्या होत्या. त्यावेळी गजाननराव वाटवे सुधीर फडके यांच्याबरोबर सहदिग्दर्शक म्हणून काम करीत असत . तिथेही मालतीबाईंनी हिंदी नाटकातील चाल म्हटली. भैरवी रागामधील ठुमरीसारखी ही चाल त्यांच्या कंठातून ऐकल्यावर फत्तेलाल लगेच म्हणाले, ‘वाटवे, आज एक रत्न तुम्ही आम्हाला दिलंत. असा आवाज आम्ही प्रथमच ऐकला.’’शास्त्रीय गायक पं. पद्माकर बर्वे यांच्याशी मालतीबाईंचा विवाह झाला. मालतीबाईंना शास्त्रीय गायनाची तालीम त्रिवेदी मास्तर, भास्करराव घोडके, विलायत हुसेन खाँ, भोलानाथजी घट्ट, पद्माकर बर्वे, जगन्नाथबुवा पुरोहित, हिराबाई बडोदेकर, विनायकबुवा पटवर्धन या गुरूंकडे मिळाली.मालती पांडे यांनी खूप गाणी गायली.
लडिवाळ आवाज हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य होते. आता त्यांनी गायलेल्या गाण्यांची यादी देतो,मला खात्री आहे प्रत्येक गाण्याची पहिली ओळ वाचल्यावर जुने जाणते रसिक लगेचच माना डोलवायला लागतील .
१).कुणीही पाय नका वाजवू.
२)उठ जानकी मंगल घटिका.
३)कशी रे तुला भेटू.
४)अपराध मीच केला,शिक्षा तुझ्या कपाळीं
५)खेड्यामधले घर कौलारू.
६)ते कसे ग ते कसे.
७)त्या तिथे पलीकडे तिकडे
८)मनोरथा चल त्या नगरीला .
९)या कातर वेळी पाहिजेस तू जवळी
१०)लपविलास तू हिरवा चाफा
ह्या आणि अश्या अनेक गाण्यांनी मालती पांडे हे नांव खूप मोठ्ठ होतं गेलं.त्या तिथे पलीकडे हे गाणे मालती पांडे यांच्याकडून गाऊन घेतले म्हणून आशा भोसले थोड्या खट्टू झाल्या होत्या ,कारण लाखाची गोष्ट या सिनेमातील बाकीची गाणी आशा भोसले यांनीच गायली होती,मात्र या गाण्यासाठी मालती पांडे यांची निवड करणारे सुधीर फडके देखील महानच.
"मालती-माधव" चित्रपटातील रेकॉर्डिंगसाठी लताबाई पुण्यात प्रभात कंपनीत आल्या होत्या, तेव्हां त्यांची ओळख झाली होती, नंतर मध्ये खूप गॅप पडली, त्या खूप मोठ्या आहेत, आता ओळखणारही नाहीत"…असे मालतीबाईंना वाटले.२४ एप्रिल १९८७ मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम होता,तिथे मालतीबाईंना बघितल्याबरोबर " वा वा मालतीबाई या या," असं म्हणून त्यांनी मालतीबाईंना आपल्याशेजारी बसवलं अन् पुढं बोलू लागल्या, "आपण खूप वर्षांनी भेटत आहोत, आपण प्रभात फिल्म कंपनीच्या, मालतीमाधवच्या रेकॉर्डिंगला भेटलो होतो, इतकंच काय, मी मुंबईला जाण्यापूर्वी तुमच्या रूमवर आले होते, आपण कॉफी घेतली होती …।" दीदी जुन्या आठवणीत रमल्या होत्या, बोलत होत्या आणि मालतीबाई आश्चर्यचकित होऊन ऐकत होत्या… "अहो, तुमची स्मरणशक्ती दांडगी आहे," मालतीबाई उत्तरल्या.
जुन्या जमान्यातल्या या महान गायिकेची गाणी आजही तेव्हडीच अवीट गोडीची आहेत.
मालती पांडे यांना विनम्र अभिवादन .
-प्रसाद जोग.सांगली.
९४२२०४११५०
श्रेय नामावली :
मालती बाईंविषयी माहिती गोळा करताना लोकसत्ता मध्ये त्यांच्या विषयी आलेला श्री.विनायक जोशी यांचा लेख आणि फेस बुक वर श्री.उपेंद्र चिंचोरे यांनी लिहिलेल्या माहितीचा खूप उपयोग झाला.दोघांनाही धन्यवाद