सात दिवस भूतानमध्ये फिरून आल्यानंतर तिथल्या अनुभवलेल्या गोष्टी आजही डोक्यातून बाहेर जात नाहीत. जयगांव (पश्चिम बंगालचे शेवटचे गाव) मधून फुतशोलिंग (भूतानची हद्द येथून सुरू होते) शहरात केवळ एका भिंतीमधून पलीकडे भूतान मध्ये शिरलो गाडीचा हॉर्न पूर्ण बंद झाला. धुम्रपान बंदी आणि खूप काळ चालतील असे पक्के रस्ते.. आणि सर्वात महत्वाचे मोठमोठ्या वृक्षराजीने बहरलेला आणि डोंगरद-यांनी सजलेला निसर्ग.
ओडीसी हॉलिडेज या पुणेस्थित कंपनीच्या प्रतिक घैसास या तरूण संचालकाबरोबर आम्ही आठजण भूतानची मजा अनुभवली. पुणे ते कोलकत्ता..तिथून बागडोगरा.. विमानाने.आणि तिथून आरामदायी गाडीने फुंतशोलिंग..येताना फुंतशोलिग ते बागडोगरा पुन्हा गाडीने. मग बागडोगरा ते नवी दिल्ली..आणि नवी दिल्ली ते पुणे..विमानाने.. त्यातली हा काही निरीक्षणे.
संपूर्ण प्रवासात महिलांची व्यवसायात असलेली महत्वाची भागीदारी दिसते..दुकाने त्याच चालवितात.. लहान काय किंवा थ्री स्टार काय हॉटेलात त्यांचा सहभाग नजरेत भरतो.. तुमच्या मोठमोठ्या बॅगा देखील त्या उचलतात..तेव्हा त्यांची कीव येते..पण त्या ते काम हसत हसत करीत असतात. एका हॉटेलात तर लहानग्याला झोळीत बांधून त्याची आई अगत्याने सेवा करीत होती...तेंव्हा त्यांच्याविषयी आदर दुणावतो..
आम्ही फुतशोलिंग, थिंपू, पुनाखा आणि पारो एवढयाच भागात फिरलो..पण त्यातूनच एकूण भूतानच्या परिस्थितीविषयीचे आकलन होते. भूतानचे खरे सौंदर्य..त्या शेकडो मैल विखुरलेल्या डोंगर द-यातच आहे..तिथला भूभाग अणि स्वच्छ मोकळी हवा..
दाटलेले धुके..आणि त्यावर मधुनच टपकणारी..सोनेरी सूर्याची किरणे मन आणि शरिराला प्रसन्न करते..असंख्य रंगांची उधळण करणारा एक वेगळाच निसर्ग तुम्हाला खुणावतो. एका बाजुला रौद्र आणि दुसरीकडे शांतपणे पसरलेली आणि उंचच उंच बहरलेली वृक्षराजी पुन्हा पुन्हा हविहविशी वाटते.
रस्त्यांवर टपरी दिसत नाहीत की भिकारी. बाजारपेठांसाठी वेगळी मुबलक जागा दिला आहे..तिथेच व्यापार चालतो.. एकच दाम. त्यात घासाघीस नाही. मात्र काही ठिकाणी तुम्ही भारतीय म्हणून किमतीत मात्र दुप्पट दाम वसूल केला जातो. सफरचंद गोड आणि भरपूर मिळतात. १०० ते १२० रुपये किलोने., आक्रोड मिळतात. पण सुकामेवा फारच कमी. गाजर, मोठमोठे मुळे. काकडी, तमालपत्र, पांढरा लसून, हिरवा घेवडा, लांबलजक वांगी, टोमॅटो..तुम्हाला भाजीच्या दुकानात सहजी दिसून येतील.
बाजारात काही दुकानात तांबड्या मिरच्यांची माळ लटकलेली दिसते. त्या वाळविण्यासाठी अडकविलेल्या असतात. हिरव्या, हिरव्या -तांबड्या, आणि लाल भडक पण मोठ्या मिरच्या सर्वत्र आढळतात. थंडी भरपूर असल्याने ते सारे लोक मिरचीची भाजी करतात. भात पण तोही पाणी काढलेला फडफडीत असतो. चवही वेगळीच असते. थोडा पित्तकारच. बटाटा रस्सा. जि-याची फोडणी घातलेली बटाटा भाजी फार रूचकर करतात. त्या बटाट्याला एक स्वाद आहे. काही ठिकाणी..फुलके मिळोले..पण तेही ३५ रूपयाला एक याप्रमाणे. बटाटे घातलेला परोठा सर्वत्र मिळतो. शाकाहारी मेडळींचे फारसे आडत नाही.. आम्ही एका रस्तावर कणीसहि भाजून खाल्ली.
रस्त्यातून अगदी डोंगरावरही महिला, मुली बिनदीक्कत फिरताना दिसतील, एकूणच नागरिक सुरक्षीत आणि काळजी घेणारे आहेत. गुन्हेगारी फारशी आढळत नाही.. बाजारूपणा कमी आणि खुशाली अधिक दिसते. हॉटेलमध्येही पैशाची कुणीही मागणी करत नाही..त्यांची ती अपेक्षाही दिसत नाही. चेह-यावर सतत हास्य आणि सेवेत प्रसन्नता असणारी ही मंडळी तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी झटत असतात.. एखादी गोष्ट पटली नसेल तरी ते नाराजी दाखवत नाहीत.
धार्मिकता एकीकडे आणि राजा राणीविषयीची आत्मियता दुसरीकडे.. प्रत्येक ठिकाणी राजा राणी आणि त्यांचा लहानगा मुलगा यांची छायाचित्रे अग्रभागी लावलेली असतात.. अगदी मंदिर, मॉनेस्ट्री, दुकाने, हॉटेलातही.
भूतानचे चवथे राजे जिगमे सिंग्ये वांगचुक हे पर्यावरण प्रेमी आहेत. भुतानचा ६० टक्के भाग वनांनी युक्त हवा असे बंधन आहे.. म्हणून राजांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त जागतिक पर्यावरणाचे दिवशी एका तासात १०० लोकांनी एकत्र येऊन ४०८८५ झाडे लावली..याचा भूतानच्या सर्वसाधारण नागरिकाला अभिमान आहे..
राजाही आपल्या वाढदिवसादिवशी नागरिकांना भेट देतो.. मागील वर्षी त्याने त्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दर ५० रुपये करून वेगळीच भेट दिली..
राजा- राणीला इथे आगळाच मान आहे.. घराघरात त्यांच्या तसबिरी पूजल्या जातात..
राजाचा जनतेवर अंकुश असल्याचे इथे दिसते..
बुध्दीझमवर विश्वास आणि भारताविषयी अपार प्रेम सतत वागण्यातुन पाझरत असते. पारंपारिक भव्य किल्ल्यांना ते झॉंंग म्हणतात.. पावित्र्य जपणे आणि ते कटाक्षाने इतरांनी पाळावे असा त्यांचा व्यवहार असतो.
डोंगराच्या भूभागावरची बर्फाच्या प्रदेशातली घरेही..उतरती तिन छपरांसारखी रेखीव असतात. त्यांची रचनाही एकसारखी..बाहेरून ती एकसारखी दिसावी असा दंडकच आहे..आत काहीही सुधारणा करा..पण ती एकसारखी असतात. सुबक आणि कलाकुसरीने युक्त. डोंगराच्या उतरणीवर वसलेली शहरे पाहताना आपण हारखून जातो.
शांतता. थंड हवा. प्रदुषण मुक्त फिरणे आणि मनमुराद आनंद देणारा भूतान आम्ही अनुभवला.. मनाला आनंद देणारा आणि कमालीचा स्वच्छ. पारो आणि पुनाखा नदीचे भव्य. पात्र आणि त्यातून वाहणारे नितळ पाणी.. भव्यता आणि सुंदरता यांचा संगम असलेला हा भूतान तुम्हालाही नक्की पहावासा वाटेल
- सुभाष इनामदार, पुणे.
subhashinamdar@gmail.com
6 comments:
खूप सुंदर हुबेहूब वर्णन. वाचून व फोटो पाहून त्या प्रदेशात जाऊन आल्याचा सुखद अनुभव आला.
अभिनंदन.
धन्यवाद, आपला अभिप्राय स्वीकारला आहे, आपले नाव कृपया सांगावे
सुंदर वर्णन. भूतान हा हसऱ्या लोकांचा प्रदेश आहे. राजा आणि निसर्गावर अपरंपार प्रेम असलेले लोक आहेत. भारतीयांचं मनःपूर्वक स्वागत करतात.
आपला अभिप्राय खरोखरच छान वाटला..आनंदी निसर्ग आणि आनंदी माणसे पर्यटकांना आपलेसे करून टाकतात..भूतान मनात घर करतो..
उत्सुकता निर्माण करणारा लेख!छान वर्णन केले आहे
डिटेल्स मुळे माहिती मिळते आणि नव्या पर्यटकांना उत्साह येतो.
आपण जे अनुभवले ते शब्दात पकडने अवघड.. थोडा प्रयत्न केला आहे..आपल्या अभिप्रायामुळे बळ वाढते..धन्यवाद
Post a Comment