Sunday, November 14, 2021

शिवकाल मनामनात कोरणारा शिवशाहीर हरपला

आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमी इतिहास पुस्तके, कथा, आवाज आणि नाट्यमय पद्धतीने जगभर सांगणारा शिव शाहीर सोमवारी पहाटे आपल्यातून कायमचा निघून गेला.. त्यांची तेजस्वी प्रतिमा मराठी माणसाच्या मन मनावर कायमची करण्याचे काम निष्ठेने आणि अभ्यासपूर्वक आयुष्यभर करणारे बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे हे व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून कायमचे हिरावून घेतले.. सुमारे साठ वर्षांपूर्वी सातारच्या जलमंदिरात सुमित्राराजे भोसले यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांचा इतिहास आठ दिवस रोज ऐकताना बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रभावी वक्तृत्वाची साक्ष समक्ष घेता आली.. त्यांनी तो इतिहास ज्या पद्धतीने कथानकातून मांडला तो ऐकताना सारे सातारकर त्या अनुभूतीने भारून गेल्याचे अनुभवत होतो..आजही ते चित्र डोळ्यासमोर उभे रहाते.. पुण्यात आल्यावर त्यांचा परिचय आणि थोडा सहवासाही लाभला.. आयुष्य सारे देशाच्या राष्ट्रभक्तीने कसे वेचले ते ऐकले होते..आता प्रत्यक्ष ते पहात होतो.. गोवा मुक्तीसाठी त्यांचे योगदान होते.. त्यांची पुस्तके ऑडीओ स्वरूपात बाजारात आली.. मग पुढे जाणता राजा हे महानाट्य त्यांनी भव्य अशा स्वरूपात सादर केलेले रेणुका स्वरूप प्रशालेत केलेले अनुभवले.. नाटक, संगीत, साहित्य या तिन्ही क्षेत्रात त्यांची तळपती वाणी अनेकविध कार्यक्रमात समोर बसून ऐकली. हे बुद्धिमान तेजस्वी व्यक्तित्व स्वभावातून अधिक कोमल आणि वाणीतून जाज्वल्य अभिमानाचे असल्याचे स्पष्ट पाहिले.. त्यांची ती मुजरा करण्याची पद्धत आणि लहान असलेल्यालाही आदराने वागविण्याची सवय मनात कायमची कोरली गेली.. दिलेली वेळ पाळण्याची त्यांची शिस्त अनेकांना पचनी पडत नव्हती. बालगंधर्व, मास्टर दीनानाथ मंगेशकर, भालजी पेंढारकर हे त्यांचे आदर्श.. आपल्या बालपणी भावे प्राथमिक शाळेत शिक्षकांनी लावलेली इतिहासाची गोडी ते आजही जाणीवपूर्वक अभिमानाने सांगत असत. वयाची शंभरी गाठून ते सरस्वतीच्या दरबारात कायम नांदत असत.. आज त्यांच्या जाण्याने तो बहुमोल ठेवा मराठी माणसांना लाभला..त्याची जपणूक करून बाबासाहेबांचे काम कायमस्वरूपी इतिहास बनून राहील. बाबासाहेबांचं बहुमोल कार्य जगात भूषणावह ठरेल यात शंका नाही.. - सुभाष इनामदार..

Saturday, June 5, 2021

तरल प्रतिभेच्या शांताबाई शेळके







आनंदपर्व .. कॅसेटवर तयार करत असलेला दिवाळी अंक  १९९७ साली पुण्यात तयार  होत होता..फ्लॅश म्युझिकच्या वतीने फ्लॅश पब्लिसिटीच्या चारुदत्त गोखले यांच्यावतीने दोन भागात ही तयार होत होती.. सर्व लेखक आपल्या कथा, कविता आणि लेख यात वाचणार होते.. 

दिवाळीच्या वातावरणाचे दर्शन शब्दातून करणारी एकरचना मला हवी होती..मी तडक शांताबाई शेळके यांना फोन केला.. मला त्यांनी अतिशय सहजी बोलण्यातून ही संकल्पना समजून घेऊन दुपारीच घरी बोलावले ..येताना त्यांनी मला भेळ आणायची आठवण केली..ती घेऊनच मी सातारा रस्त्यावर असलेल्या त्यांच्या भावाच्या घरी हजर झालो..

आधी भेळेचा आस्वाद घेत त्यांनी ही कॅसेट कशी असेल.. त्यात कोण काय करेल ह्याची विचारणा करून सारा आराखडा समजून घेतला आणि चटकन कोरा कागद घेऊन एकेक शब्द त्यावर आपल्या उत्तम पेनातून माझ्यासमोर ठेवले..

जरा येई रे बाहेरी बघ आसपास

दाही दिशात दाटला आनंद उल्हास

अशा आशयाची पाच कडव्याची रचना केवळ पंधरा मिनिटात लिहून दिली.. तो  शब्दोत्सव मी पाहिला आणि चकितच झालो..त्यांच्या त्या प्रतिभेची  मला त्याक्षणी कल्पना आली.. 

बरे ती करूनही त्या  थांबल्या नाहीत मला म्हणाल्या ..सुभाष, यात तुला काही बदल हवा असेल तर सांग..ही नम्रताही अनुभवली..

खरोखर सरस्वतीच्या प्रतिभेचे दर्शन काही  यापेक्षा आगळे असेल काय..  रचनेत सोपेपण आणि तेही चित्रमय दर्शन त्यांच्या रचनेत असते ते मला  त्यातून अनुभवता आले..

सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या वागण्यातला आपलेपणा..आईची माया.. आणि सहजी बोलण्यातून त्या मनात कायमस्वरूपी साठून राहिल्या.

पुढेही अखेरपर्यंत हे नाते कायम राहिले.. एक उत्तम माणूस..खाण्याची उत्तम आवड आणि संवादात मोकळेपणा तेच शांताबाईंच्या वागण्यात होते..

तेच क्षण माझया मनात आजही जिवंत झाले..तो सुखद अनुभव पुन्हा झाल्याचा भास आत्ताही होत आहे..

त्यांच्या स्मृतीला  कायमचअभिवादन..



- सुभाष इनामदार, 

पुणे

subhashinamdar@gmail.com






Friday, January 8, 2021

कलंदर वृत्तीचा मनस्वी कलावंत डॉ. सत्यशील देशपांडे




पं. सत्यशील देशपांडे यांचा सर्जनशील कलाप्रवास


मी पहिली दुसरीत असेन तेव्हा लेकिन सिनेमा पाहिल्याचं आठवतंय.. मग त्याची cassette आणली गेली आणि गाणी ऐकली गेली.. त्यात एक 'निके घुंगरिया चाल चलत' असं गायलेला एक वेगळा आवाज , जो एरवी सिनेमातल्या गाण्यात ऐकायला मिळत नाही असा ऐकायला मिळाला.. हे गाणं फारच नादमधुर वाटलं.. 

सत्यशील काकांचे स्वर पहिल्यांदा कानावर तेव्हा पडले.. हीच त्यांची पहिली ओळख होती माझ्यासाठी. आम्ही आपले सहज जे समोर येईल तसं गाणं करत होतो, शिकत होतो. मग पं. कुमार गंधर्व, वीणा सहस्रबुद्धे अशांच्या रेकॉर्डस् घरी येत होत्या. अनेक कार्यक्रम जसजशी समज वाढत होती तसतसे ऐकत होतो.

          कुमार गंधर्व कधी 'राजन अब तो आ' अशा बंदीशीतून किंवा 'ऋणानुबंधाच्या' , 'उड जायेगा हंस अकेला' अशा गाण्यातून अधून मधून कुठे कुठे कानावर पडत होते, ओळखीचे होत होते. म्हणजे काही आवाज ऐकणे ही एक ritual होती आमच्या बालपणी. music carries memories.. आणि या अनेक आवाजांनी आपला पिंड पोसला जात होता, आत्मा संस्कारित होत होता. बालपणीच्या स्मृतींमध्ये या सर्व गोष्टी अढळ स्थान घेऊन बसलेल्या आहेत. पण या गायकीकडे कधी गांभिर्याने पाहायचा योग येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं.

         जनरल 'क्लास' मधून माझ्या गाण्याची जडण घडण होत होती. 'क्लास' मध्ये जे शिकवलं जातं ते 'क्लासिकल' ! वगैरे अगदी पुलंच्या व्याख्येत बसणारं नसलं तरी क्लास पद्धतीच्या शिक्षणाला मर्यादा आहेतच. वयोपरत्वे विशारद वगैरे पार पडलं. पुढे आमच्या बाईंनी जाणीवपूर्वक मोठ्या गुरूंकडे पाठवलं. मग अचानक कळायला लागलं की आपल्याला गाणं अजिबात येत नाहीये. संगीत वाटेवर दरमजल करत असताना अशाच एका वाटसरूने पत्ता दिल्यावर मी पं. डॉ. चंद्रशेखर म्हणजे बाबुराव रेळे (गुरुवर्य B.R . देवधर यांचे शिष्य आणि पं. कुमार गंधर्वांचे सहाध्यायी) यांच्याकडे जाऊन टपकले आणि ज्ञानाची एक आगळी वाट पाहून हरखून गेले. पण हाय दुर्दैव !! या गुरुमाऊलींची साऊली २ वर्षेच मिळू शकली. आजवरच्या समस्त शिष्यगणासमोर संगीतप्रात्यक्षिक दाखवत असताना, अत्यंत आनंदामध्ये असताना आणि त्यांच्या आवडीचं म्हणजे शिकवण्याचं काम करत असताना बाबुकाकांना देवाज्ञा झाली. त्यांच्या ज्ञानाचा मार्ग मला खुणावत होता. बाबुकाकांनी जाताना सुद्धा माझा मार्ग बंद होणार नाही याची तरतूद करून ठेवली असावी. कारण बाबुकाका जिथे ते शेवटचं संगीत प्रात्यक्षिक दाखवत होते, ते ठिकाण होतं पं. सत्यशील देशपांडे यांचं वाळकेश्वर येथील घर आणि संवाद फौंडेशन या नावाने सत्यशीलजींनी प्रस्थापित केलेलं ध्वनी संग्रहालय. मला पुढची वाट इथे सापडेल असा अंगुलीनिर्देशच केला होता जणू बाबुकाकांनी.

ज्या प्रचंड विद्वान संगीतज्ञाला बोलताना, गाताना मी आजवर फक्त TV वर पाहिलं होतं त्या पं. सत्यशील देशपांडे यांना मी प्रत्यक्ष पाहत होते ! मला खूप कुतूहल होतं.  मनातून खूप भारीही वाटलं की, आपण किती मोठ्या लोकांसोबत येऊन गाणं शिकतोय!

          पुढे मुंबई युनिव्हर्सिटीत गाण्यात मास्टर्स करताना फायनलला परीक्षक म्हणून पं. सत्यशीलजीच होते. बरोबरीचे सगळे विद्यार्थी जरा टरकूनच होते. दडपण मलाही होतंच पण मला वेगळंच समाधानही होतं. पं. सत्यशील देशपांडे जर आपली परीक्षा घेणार असतील तर आपल्या मास्टर्स होण्याला काहीतरी अर्थ आहे असं मला प्रकर्षाने वाटून गेलं. त्यांचं परीक्षा घेणं म्हणजे शिकवणंच आहे. एखाद्या  प्रश्नाचं उत्तर ते आमच्याकडून अशा पध्दतीने काढून घेत होते की उत्तर देता देता त्यातल्या आणखी चार गोष्टी आपल्याला कळाव्या. लौकिकापेक्षा त्यांचे विचार वेगळे होते. विचारांची जळमटं लख्ख धुवून काढणारे होते. विषयातलं नेमकं मर्म कळून घेण्याची धडपड आपल्यात निर्माण व्हावी असे होते. मला ते खूपच आवडलं. यथावकाश उत्तमरीत्या मास्टर्स पार पडलं.  बाबुकाकांनंतर 'आता काय ?' म्हणून खरंतर मी मास्टर्स करायला घेतलं होतं. तिथे गेल्यावर फक्त कॉलेजची lectures आणि शिकवणी पुरेशी नाही असं ध्यानात आलं. मग पुन्हा गुरुंची शोधाशोध! इथे मला शाल्मली ताई( विदुषी शाल्मली जोशी, पं. रत्नाकर पै बुवांच्या शिष्या, जयपूर घराणे) हा उत्तम पर्याय दिसला. म्हणून मी ताईंकडे मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली. किराणा घराण्याचे संस्कार असलेल्या मला बाबुकाकांडे ग्वाल्हेरची थोडी ओळख झाली होती. आता इथे ताईंकडे जयपूर घराण्याची तालीम..! परत शून्यापासून तयारी..! जयपूर गाणं फारच अवघड! पण ताईंनी माझ्यावर खूप धीर धरत माझी गाडी रुळावर आणून ठेवली. पण लगेचच लग्न ठरलं आणि मी आले पुण्याला..! 

      सुरुवातीचे एक वर्ष दर महिन्याला ८ दिवस माहेरी यायचं आणि आठही दिवस ताईंकडे शिकून परत पुण्याला जायचं असा माझा नेम होता. पण माझी आई गेल्यानंतर माझ्या पुणे- मुंबई-  फेऱ्यांमधलं अंतर खूप वाढायला लागलं. मधल्या कालावधीत मी बाबुकाकांनी शिकवलेली माझी चोपडी काढून बसत असे. मग वाटलं की 'हे काही खरं नाही'. मला बाबुकाकांनी सांगितलेल्या गोष्टी पुढे कशा नेता येतील? मग उत्तर सापडलं ते म्हणजे पं. सत्यशील देशपांडे हेच..!

           माझी फारशी ओळख नसताना केवळ एका फोन कॉलवर आणि कुरिअर केलेल्या पत्रिकेवर पुण्यात माझ्या लग्नाला आवर्जून सत्यशीलजी आले होते याचं मला परत एकदा खूप भारी वाटलं होतं. लग्नात आम्हा उभयतांना आशीर्वाद दिले आणि न विसरता माझ्या नवऱ्याला सांगितलं की "हिचं गाणं बंद पडू देऊ नकोस!" मला किती किती आनंद झाला होता तेव्हा! हे सगळं आठवून गाणं मी यांच्याकडे शिकायलाच हवं हे मी पक्क केलं.

         ताईंना याची रीतसर कल्पना दिली. मला ताईंकडेही जाणं सोडायचं नव्हतं पण ही वाट सुद्धा खुणावत होती. शाल्मली ताईंना सुरुवातीला ही गोष्ट फारशी रुचली नव्हती. कारणही तसं बरोबरच होतं ना. आधीच गाण्याचा धड एक संस्कार नसलेल्या मला त्यांनी ताळ्यावर आणलं होतं महत्प्रयासाने! किमान एका गुरूकडे १२ वर्षे सलग शिकणे गरजेचे असते तरच एखादी शैली गळ्यावर चढते, तिचा विचार मनात पक्का होतो. आणि मी जयपूर ची तालीम घेऊन २ वर्षे नाही झाली की सत्यशीलजींकडे जाण्याचा विचार करत होते.  




         एक दिवस फोन करून काकांना पुण्यातल्या त्यांच्या 'छंदोवती' या त्यांच्या सुंदरशा घरी भेटायला गेले. ते म्हणाले तुला नक्की काय शिकायचंय? What do you exactly expect from me?  मी खरं खरं काय ते सांगितलं. 

   'Ok सुरू करूया' म्हणाले. त्या दिवशी त्यांनी कल्याण घेतला. 'बनू रे बलैया' हा ख्याल. मी हरखून गेले. कारण मला त्याचं गाणं ऐकताना फार मजा येत होती, आनंद होत होता. त्यांनी त्या रागाची नुसती बंदिश नाही तर त्याचा संपूर्ण इतिहास, कल्याणच का? यमन का नाही? इथपासून सगळा त्यांच्या दादा गुरूंपासूनचा पटच उलगडून दाखवला होता. संगीतावर त्यांच्या इतकं ठोस, अधिकाराने , तर्कदृष्ट्या पटण्यासारखं , सौन्दर्यस्थळं दाखवत रसास्वाद घ्यायला शिकवणारं व्यक्तिमत्त्व विरळाच! प्रचंड चौफेर वाचन केलेली अभ्यासू बोली, मधूनच कोपरखळ्यांची, मार्मिक टोल्यांची हास्यकारंजी उडवणारी, एखाद्याची बेमालूम फिरकी घेण्याची किंवा मधूनच गझल आणि कवितांच्या ओळींचेही अगदी ओघवते दाखले देणारी ती सहज वाणी ऐकून मी प्रभावित झाले नसते तर नवलच होतं. त्यांचं विद्वात्तेबरोबर आलेलं हे लालित्य खरंच मोहवतं. हे सगळं मला किती हवंहवंसं होतं, मला असं व्हायचं होतं!

 सत्यशीलकाकांकडे फारच आवडून गेलं सगळं. हळू हळू  त्यांच्या घरातल्या सर्व सदस्यांची ओळख होत गेली. त्यांच्या पत्नी उषा काकू या मराठी नाहीत तर राजस्थानी आहेत.. landscape art garden designer असलेल्या अगत्यशील उषा काकू राजस्थानी लोकगीतं सुंदर गातात. मुलगा सृजन आणि सून पूजा माझ्याच वयाचे. सृजन आणि मी एकत्रच शिकायला बसायचो. त्यामुळे पं. सत्यशील देशपांडे वरून मी त्यांना 'सत्यशील काका' म्हणती झाले. माझ्यामधे आणि सृजनमधे कधीही आप-परभाव काका काकूंनी केल्याचं मला आठवत नाही. त्यांच्यामुळे मला उत्तम गुरुबंधू लाभले. सृजन, स्मित ही मंडळी अतिशय गुणी आणि नम्र आहेत. कधीही मदतीला तयार असतात. आपल्याकडचं हातचं न राखता देणं, share करणं ही तशी आजकाल दुर्मिळ होत चाललेली गोष्ट. विशेषतः शास्त्रीय संगीतात तर जास्तच ! पण ती मला इथे मिळते. 

काकांचं प्रथम दर्शन हे फार दरारा निर्माण करणारं असतं. मलाही हा दरारा नेहमीच वाटला आहे. पण काका अतिशय प्रेमाने शिकवतात. ते प्रेम आपल्या विषयावरचं असतं !  एखादी जागा खूप वेळा चुकीची गेली की लगेच वैतागतातही.. पण ती जागा बरोबर येईपर्यंत पाठपुरावा सोडत नाहीत. विशेष म्हणजे ते गुरू आहेत असा अहंभाव त्यांना कधीच नसतो. आपल्याला असलेलं ज्ञान share करणं, त्यावरचे त्यांचे विचार सखोल मांडणं हे त्यांना जास्त रुचतं. 

त्यांच्या तालमीचा तास झाला की मी निघताना नमस्कार करायला उठते. पण काकांना कुणीही नमस्कार केलेला नेहमीच अवघडल्यासारखं वाटत आलंय. 'असू दे ,असू दे 'म्हणतात. शेवटी मी एकदा काकांना म्हंटलं, 'काका मी नमस्कार करत जाणार आहे. तुम्ही 'असू दे' नका म्हणू' . मग आता काका 'god bless you!' म्हणतात. आणि नंतर सांगतात, 'ते सगळं ठिके , पण मी सांगितलेल्यावर घरी विचार कर आणि बसलं की फोन करून ये परत'. !

          काकांकडे regular ठराविक वेळी दर आठवड्याला ठरलेल्या दिवशी तालीम होतेच असे नाही पण काका माझ्यासाठी केव्हाही available राहू शकतात ही माझी खात्री आहे. जेव्हा जेव्हा मला मार्गदर्शन हवं असतं, तेव्हा काका दुसऱ्या शहरात असतील आणि फोनवर available असतील तर त्यावरूनही तालीम द्यायला, प्रसंगी whats app recording करून पाठवून द्यायला ते तयार असतात. आणि आत्ता pandamic मध्ये तर zoom call वर सर्वांनाच कित्येकदा एकत्र तालीम सेशन्स त्यांनी दिलीयत. एखादी बंदिश अडली किंवा आठवत नसेल तर काका त्यांच्या प्रचंड पुस्तक संग्रहातून नेमकं पुस्तक शोधून, संदर्भ शोधून शिकवतात. Notation बघून त्या नोटेशन मध्ये नसलेल्या 'between the lines' जागा सुद्धा काका दाखवतात ते त्यांच्यासारख्या नजर असलेल्या कालाकारालाच करू जमेल.      Archives च्या कामानिमित्त अनेक घराण्यांच्या गायकांची recordings त्यांनी करून घेतली.  अनेक घराण्यांचा त्यांचा तौलनिक अभ्यास आहे. एखाद्या घराण्याचा गायक येऊन गेल्यानंतर त्या गायकाने त्या गायकी बद्दल सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्या घराण्यातली वाटेल अशी बंदिश बांधण्याचा exercise काकांनी स्वतःला लावून घेतला होता. ती बंदीश ते त्या गायकाला ऐकवत. ती ऐकून गायक आश्चर्यचकित होऊन म्हणे, "अरे ये तो हमारे घरानेकीही बंदिश है.. आप को किसने दी?"!!  

  काकांनी अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवलेलं आहे आणि त्यांना त्यामध्ये उभं करण्यासाठी सर्वतोपरी मदत केलेली आहे. याचा कुठेही गवगवा त्यांनी केलेला नाही. मदत करण्याच्या बाबतीत त्यांचं सगळं कुटुंब सारखंच आहे.

नवीन पिढी बाबत त्यांना ममत्व आणि कौतुकही आहे. अनेक तरुण कलाकारांचं गाणं ते आवर्जून जाऊन ऐकतात. 'एकत्र येऊन एकमेकांना गाणं ऐकवत राहावं' ही गोष्ट आजच्या तरुण गायकांनी आवर्जून करत राहण्यासाठी त्यांचं नेहमीच प्रोत्साहन असतं. 'नवीन काही सुचलं की आपल्या मित्र गायकांना ऐकवणे' हा त्यांच्या काळातला शिरस्ता  अजूनही पाळतात. याने गाणं प्रवाही राहतं, समृद्ध होतं असं त्यांचं म्हणणं आहे. जिथे आपल्या गोष्टी राखून ठेवल्या जातात त्या शास्त्रीय संगीताच्या जगती त्यांचा हा गुण विशेष लक्षणीय वाटतो. 

     Nepotism हा शब्द अलीकडे किती गाजला. त्या बॅकग्राऊंड वर आपला मुलगा म्हणून सृजनला वेगळी treatment दिल्याचं मी पाहिलेलं नाही. सृजन आपली वाट स्वतः शोधतोय हे मलाही शिकण्यासारखे आहे. कुणी येऊन आपल्याला मदत करेल अशी आशा बाळगण्यामध्ये शिकण्याचे अनेक मार्ग आपण स्वतःच्या हाताने बंद करतो. याउलट आपली वाट आपण शोधण्यामध्ये आपण किती तयार होतो याची आपल्यालाही कल्पना नसते. सृजन याचं उत्तम उदाहरण आहे. याचं सारं श्रेय काकांच्या ज्ञानानुगामी स्वभावाला जातं.

काकांचे वडील वामनराव देशपांडे हे उत्तम गायक आणि संगीत समीक्षक. अगदी लहान वयापासून अनेक नामवंत, गुणवंत कलाकार घरी वास्तव्याला येत असत. त्यांचं गाणं आणि चर्चा ऐकून काकांचे कान तयार होत होते. त्यांनी कुमार गंधर्वांकडे गाणं शिकायची इच्छा व्यक्त केली. कुमारजींच्या गाण्याची मोहिनी होतीच पण इतर गायकांपेक्षा कुमारजी नेमकं काय वेगळं गातायत हे कळायला अवघड होतं म्हणून त्यांच्याकडे शिकायचं ठरवलं. जे कळत नाही ते शिकावं हे साधं logic त्यामागे होतं. सामान्यतः गळ्याची जात बघून गुरू निवडला जातो. समानधर्माचा गळा असेल तर ती ती शैली पटकन उचलता येते. पण इथे काकांचा गळा कुमारजींच्या गळ्या पेक्षा खूपच वेगळा! कुमारजींचा चढ्या पट्टीतला पातळ तर काकांचा अगदी बेसचा ढाल्या आवाज! कुमारजींच्या गळ्यातल्या गोष्टी जमवण्यासाठी काकांनी किती वेळा आपला गळा सुजवलाय याला सुमार नाही. काकांनी त्यांचे विचार घेतले आणि ठरवून आपली नवीन शैली बनवली. 

काकांचं वाचन, बहुश्रुतता, विविध संगीतातील म्हणजे; उत्तर हिंदुस्थानी, कर्नाटकी, गजल, सुगम, चित्रपट, नवीन- जुनं, नाट्य, उपशास्त्रीय, निर्गुण, सगुण, लोकसंगीत अशा अनेक विषयांवरचा दांडगा अभ्यास आणि  प्रेम , काव्यातील गती, कोणत्याही भाषेवरचं आणि composition वरचं मनापासून असलेलं प्रेम हे त्यांनी बांधलेल्या, अतिशय नाविन्यपूर्ण आशयघन विषय असलेल्या आणि नवीन नवीन सांगीतिक मूल्यांच्या वापराच्या शक्यता दाखवणाऱ्या  त्यांच्या बंदीशींवरून सहज लक्षात येतं. गजल मधला कमी शब्दात मोठी गोष्ट सांगून जाण्याचा गुण त्यांच्या बंदीशीत आहे. प्रसंगी नेमक्या भावना व्यक्त करण्यासाठी नवीन शब्द तयार करण्याचं विलक्षण कसबही त्यांच्यात आहे. प्रत्येक बंदीशनिर्मितीची काहीतरी एक कथा असते. ती गोष्टीवेल्हाळपणे सांगताना काकांना ऐकणं म्हणजे नुसती धमाल असते. त्यांच्याकडून या सर्व गोष्टी तितक्याच प्रेमाने शिकवल्या जाताना आपल्यात ते तितकंच सहज उतरतं.

          iTablaPro सारखं electronic वाद्यांमधल्या परम सुरेल वाद्यालाही ते आपल्या स्वराप्रमाणे सुरेल जुळवून घेतात. उत्तम जुळलेले तंबोरे आणि सुरेल लयदार साथ तयार करून घेणं सुद्धा काकांकडून शिकावं. 

         काकांची गायकी अनेकांना समजायला जड जाते कारण प्रचलित गायकीच्यापेक्षा ती वेगळी वाटते. 

प्रत्येक बंदिश ही तानेसाठी असणं गरजेचं आहे का? मग २ स्वरां मधल्या सुकोमल संगतीचे हिंदोळे कधी दाखवणार? बंदीशीच्या जिवापेक्षा जास्त तिला नटवू नये. अशा अनेक गोष्टी काकांची स्वतःची अशी एक जबरदस्त कहन सांगतात. ती त्यांच्या आजवरच्या केलेल्या सर्व अभ्यासातून, साधनेतून तयार झालेली आहे; जिला स्वतःचं असं एक मत आहे. कोणाचीही ती डोळे झाकून केलेली कॉपी नाहीये. अगदी स्वतःच्या गुरूंचीही..! आपल्या बुद्धीचा पूर्णपणे कस लागेल अशा गोष्टी करणंच काकांनी आजपर्यंत पसंत केलंय! सरधोपटपणा नेमकेपणाने टाळलाय आणि त्याबाबतीत ते नेहमीच स्पष्टपणे बोलत आलेले आहेत.

कालपरत्वे झालेल्या पाठभेदांमुळे अनेक बंदीशींचं  बदललेले रूप नेमकं काय असेल किंवा असायला हवं हे दाखवण्याचं काम काका वेळोवेळी करत असतात. त्यांच्या या एकूण सजगतेमुळे त्यांच्या प्रत्येक शिष्यामध्ये असलेली बंदिश फेक ही जागरूक आहे आणि उत्तम जाणती आहे. मला तर बंदिश बांधण्याचा नादच लागला! सृजनची बंदिशीतील शब्द फेक तर सुंदरच! कृष्ण भट उत्तम बंदिशी बांधतात तर स्मितला सुद्धा किती सुरेख जाण आहे !

         कदाचित त्यांच्या शिष्य मंडळीच्या गाण्यात प्रचलित गायकीसारखी ओळख न पटल्यामुळे ही गायकी बरीच वेगळी वाटू शकते. पण काकांची एक बंदिश आहे अहिर भैरवातली..

    निरख रंग निको

घोल निज घटको।

चढे तो रंग लाग्यो फिको

औरनके घटको।।

(स्वतःच्या रंगाने तू शोभशील.. दुसऱ्याचा रंग कितीही सुंदर वाटला तरी तुझ्यावर तो फिकाच वाटेल.. त्यामुळे स्वतःला ओळख आणि मिरव तुझा स्वतःचा वेगळा रंग, तो जास्त झळाळी देतो! ) या ओळीत म्हटल्याप्रमाणे स्वतःची वेगळी वाट शोधत जाण्याची ताकद त्यांच्या शिष्यांमध्ये त्यांनी नक्कीच निर्माण केली आहे. 

काकांच्या पु. ल. प्रेमाबद्दल काय सांगावं! आपण मराठी माणसं by default पु. ल. प्रेमी असतोच पण काकांबद्दल सांगायचं झालं तर  पु. ल. ही त्यांची वृत्ती आहे. आम्ही पु. ल. देशपांडे यांना प्रत्यक्ष पाहिलं नाही, कुमारजींना प्रत्यक्ष अनुभवलं नाही, पण आम्ही काकांना खूप जवळून पाहतोच आहोत. त्यांच्याकडून शिकण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आहे. अजून काय पाहिजे? 

असा हा कलंदर वृत्तीचा, काहीसा बंडखोर वाटणारा पण मुळात ज्ञानानुगामी असलेला मनस्वी आणि तपस्वी कलाकार आज सत्तरीत प्रवेश करतो आहे. असं व्यक्तिमत्त्व हे आपलं खरं वैभव आहे. त्यांच्यातल्या गुरुतत्वासमोर, त्यांच्या उत्तुंग सर्जनशीलतेसमोर मी कायमच नतमस्तकच राहीन. आज त्यांच्यासाठी मी वाढदिवसाच्या सुमंगल कामना करते. त्यांच्याकडून संगीताची अजून त्यांच्या मनासारखी खूप सेवा घडू दे आणि त्यांच्याकडून आम्हाला नेहमीच उत्तम उत्तम शिकायला मिळू दे. हे  होण्यासाठी त्यांना निकोप सुदीर्घ आयुष्य लाभू दे ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. प्रसिद्धीच्या प्रकाशझोतापेक्षाही आपलं बौद्धिक पोषण ज्यांच्यामुळे होतं त्या गुरूंचा सहवास निरंतर आपल्याला घडत रहावा असं कायमच मला सत्यशील काकांबद्दल वाटत आलं आहे. म्हणून मला सुचलेल्या अहिर भैरव च्याच बंदिशीतल्या या ओळी इथे मांडाव्याशा वाटतायत..

गुरू सन्मुख पाउं ज्ञान

वहीं तीरथ वहीं धाम।।

सेवा सतगुरु गुनीकी

तन मन धन कर अरपन

हर पल करुं धरुं जो ध्यान

तब ही जागे भाग मान।।




- पौलमी देशमुख


(त्यांच्याच face book वरून साभार सौजन्याने)