Sunday, November 14, 2021
शिवकाल मनामनात कोरणारा शिवशाहीर हरपला
आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रमी इतिहास पुस्तके, कथा, आवाज आणि नाट्यमय पद्धतीने जगभर सांगणारा शिव शाहीर सोमवारी पहाटे आपल्यातून कायमचा निघून गेला..
त्यांची तेजस्वी प्रतिमा मराठी माणसाच्या मन मनावर कायमची करण्याचे काम निष्ठेने आणि अभ्यासपूर्वक आयुष्यभर करणारे बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे हे व्यक्तीमत्व काळाने आपल्यातून कायमचे हिरावून घेतले..
सुमारे साठ वर्षांपूर्वी सातारच्या जलमंदिरात सुमित्राराजे भोसले यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांचा इतिहास आठ दिवस रोज ऐकताना बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रभावी वक्तृत्वाची साक्ष समक्ष घेता आली.. त्यांनी तो इतिहास ज्या पद्धतीने कथानकातून मांडला तो ऐकताना सारे सातारकर त्या अनुभूतीने भारून गेल्याचे अनुभवत होतो..आजही ते चित्र डोळ्यासमोर उभे रहाते..
पुण्यात आल्यावर त्यांचा परिचय आणि थोडा सहवासाही लाभला..
आयुष्य सारे देशाच्या राष्ट्रभक्तीने कसे वेचले ते ऐकले होते..आता प्रत्यक्ष ते पहात होतो.. गोवा मुक्तीसाठी त्यांचे योगदान होते.. त्यांची पुस्तके ऑडीओ स्वरूपात बाजारात आली.. मग पुढे जाणता राजा हे महानाट्य त्यांनी भव्य अशा स्वरूपात सादर केलेले रेणुका स्वरूप प्रशालेत केलेले अनुभवले..
नाटक, संगीत, साहित्य या तिन्ही क्षेत्रात त्यांची तळपती वाणी अनेकविध कार्यक्रमात समोर बसून ऐकली.
हे बुद्धिमान तेजस्वी व्यक्तित्व स्वभावातून अधिक कोमल आणि वाणीतून जाज्वल्य अभिमानाचे असल्याचे स्पष्ट पाहिले..
त्यांची ती मुजरा करण्याची पद्धत आणि लहान असलेल्यालाही आदराने वागविण्याची सवय मनात कायमची कोरली गेली..
दिलेली वेळ पाळण्याची त्यांची शिस्त अनेकांना पचनी पडत नव्हती.
बालगंधर्व, मास्टर दीनानाथ मंगेशकर, भालजी पेंढारकर हे त्यांचे आदर्श..
आपल्या बालपणी भावे प्राथमिक शाळेत शिक्षकांनी लावलेली इतिहासाची गोडी ते आजही जाणीवपूर्वक अभिमानाने सांगत असत.
वयाची शंभरी गाठून ते सरस्वतीच्या दरबारात कायम नांदत असत..
आज त्यांच्या जाण्याने तो बहुमोल ठेवा मराठी माणसांना लाभला..त्याची जपणूक करून बाबासाहेबांचे काम कायमस्वरूपी इतिहास बनून राहील.
बाबासाहेबांचं बहुमोल कार्य जगात भूषणावह ठरेल यात शंका नाही..
- सुभाष इनामदार..
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment