Thursday, May 5, 2011

शब्दातून व्यक्त -श्रीकांत आफळे


शब्दातून व्यक्त होणारे हे आमचे मित्र श्रीकांत आफळे शब्दातून व्यक्त. तशी आधी नोकरी केली CWPRS मध्ये.
पण नंतर सणक आली नोकरीत निवृत्ती स्वीकारली आणि छंदबध्द जीवन जगण्याचा मार्ग निवडला.
नोकरीत असतानाही पत्रिका करणे, भविष्य सांगण्याचा छंद होता. आता मात्र तोच छंद त्यांनी वाढविला. जोपासला.
आता इतरांच्या समस्यांना शब्दाचे माध्यमातून आत्मविश्वास देण्याचे काम करतात.
ते बोलतात जसे गोड तसे. शब्दांशी खेळण्याची कलाही जाणतात. कथाही रचतात.
असे हे मित्र अक्षयतृतियेच्या निमित्ताने तुमच्या भेटीला आणतोय.
तुम्हालाही काही प्रश्न असतील तर जरूर विचारू शकता.
त्यांच्या प्रेमळ वाणीचा स्पर्श तुम्हालाही घडेल..कळलं का?
===================================================

शब्द म्हणजे
भावनांची फुलं
फुलांना गंध असतो
तसा शब्दांना अर्थ असतो
फुल तेच असते
पण ते जेव्हा देवाला वाहतात
तेव्हा त्यात भक्ति आणि भाव असतो
जेव्हा गळ्यात माळतात
तेव्हा शृंगार, प्रेम व्यक्त होते
तेच फुल जेव्हा स्त्री केसात माळते
तेव्हा तिच्या सौंदर्यात भर पडते
शब्दांचे पण तसेच आहे
कवी वा लेखक शब्दांचा आधार घेतो
त्यांचं सौदर्य तेव्हा वेगळं असतं
शब्दांना भावना असतात
भावना जाणणा-यांनाच त्या कळतात
शब्द फक्त डोळ्यांनी पहाणे
म्हणजे जाणणं नव्हे
शब्दांच्या पाठीमागच्या भावनांचा शोध
सगळेच घेतात असे नाही
शब्द भावनेचं अभिव्यक्त रुप
शब्द असतात भावनांचं प्रतिबिंब
ते जेव्हा एकटे असतात
तेव्हा ते अधिक सुंदर वाटत नाहीत
त्यांना अर्थ असेल असे नाही
पण एखादा जेव्हा जवळ करतो
त्याची सुंगर गुंफण करतो
तेव्हा ते सुंदर दिसू लागतात
शब्दांना लय, सूर प्राप्त झाले की,
मग त्याचे गाणे होते
त्यातले सौंदर्य, भावना, अर्थ
कळणारालाच कळतो
समजणा-याच कळतो



श्रीकांत आफळे,
सी-१/६, गुरूराज सोसायटी, पद्मावती,
पुणे- ४११०३७
मोबा. ९८९०३४८८७७

'कथाकथनातून समाजसेवा'-शुभदा केसकर


संवेदनशील आणि तितकचं कणखर मन घडवणे ही या काळाची सगळ्यात मोठी गरज आहे आणि या दृष्टीने होत असलेल्या असंख्य प्रयत्नांमध्ये त्यांनी हा खारीचा पण महत्वाचा वाटा उचललेला आहे.


पुराणात सांगितलेल्या ६४ कलांमध्ये आजच्या काळानुसार अनेक नवीन कलांची भर पडत आहे. 'वक्तृत्व' ही त्यातलीच एक कला असे म्हणण्यास हरकत नाही. पण या आपल्यातील वक्तृत्वकौशल्याचा उपयोग समाजाचं देणं परत करण्यासाठी झटणारा माणूस विरळाच. पुण्याच्या सौ. शुभदा केसकर मात्र असेच एक विधायक कार्य अविरत करत आहेत. गेली अनेक वर्षे शुभदा केसकर 'कथाकथनातून समाजसेवा' हा अभिनव उपक्रम राबवितात. लहान मुलांपासून ते जेष्ठ नागारिकांपर्यंत सार्‍यांनाच आपल्या कथाकथनातून भुरळ घालणार्‍या शुभदाताई म्हणजे मूर्तीमंत आत्मविश्वास, कृतज्ञता, जिद्द आणि उत्साह!

गेली १३ वर्षे न थकता, न चुकता कार्यरत असलेल्या शुभदाताईंच्या कार्याची सुरूवात केवळ योगायोगाने झाली. त्या रहात असलेल्या कर्वेनगर येथील नटराज सोसायटीच्या क्रिडांगणावर लहान मुलांना गोष्टी सांगण्याचं आणि त्यांच्या संस्कारवर्गाचं काम त्यांच्या हाती आलं. वाचनाचा छंद लहानपणीच जोपासला गेल्याने हाती जे जे चांगले पडेल ते ते वाचण्याची सवय जडलेली. त्यातूनच काही निवडक कथा त्यांनी लहान मुलांना सांगण्यास सुरूवात केली. मुलांच्या तरल भावविश्वाचे सुप्त कंगोरे डोळसपणानी जपत त्याच बरोबरीने संस्कारक्षम व बोधप्रद कथा सांगत, त्यातील संस्कार मुलांच्या मनावर बिंबवणे आणि एका अर्थाने त्यांच्या निकोप भावी आयुष्याचा पाया घडविणे हे कार्य शुभदाताई आज अनेक वर्षे करीत आहेत.

कथाकथन हे एक कलेसोबतच एक शास्त्र आहे. या शास्त्राला स्वत:चे असे काही नियम आहेत. पुन्हा कथा कथन करायची म्हटली की त्यासाठी नाट्य, अभिनय, देहबोली हे सारं आलच. या सार्‍यांचा सखोल अभ्यास शुभदाताईंपाशी आहे. अभिनयाचं नैसर्गिक अंग असल्यामुळे पूर्वी त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील प्रवेशांचे एकपात्री प्रयोग अनेक प्रथितयश संस्थातून केलेले आहेत.

पुण्यातील नामवंत शाळा, बालरंजन केंद्र, भारती निवास, पुणे अशा संस्थांतून मुलांसाठी गोष्टींतून संस्कार, युनिवर्सिटी वूमेन्स कौंन्सिल, गोखलेनगर, पुणे अशा समाजसेवी संस्थांसाठी कथाकथन कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत. कर्वेनगर, पुणे येथील नटराज महिला कार्यकारिणीत नेहमीच त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. एकांकिका, पथनाट्य, नाट्यप्रवेश , वीरगीत गायन, अभिनय गीत यांचे मार्गदर्शन आणि सादरीकरण त्या उत्तम करतात.

साधारण ३ वर्षांपूर्वी माननीय सौ. सुधा मूर्ती यांच्या कथा त्यांच्या वाचनात आल्या आणि त्या भारावून गेल्या. कथा साध्याच असूनही शब्दांची नैसर्गिक गुंफण, गोष्टींमधील सहजता, प्रसंगातील सच्चेपणा, साधी पण प्रभावी लेखनशैली, त्यातून आपोआप साधला जाणारा स्वसंवाद आणि शेवटी हवा तो सकारात्मक परीणाम साधण्याची हातोटी ही सुधाताईंच्या लेखनातील वैशिष्ठ्ये त्यांना प्रकर्षानी जाणवली. या कथा अभिनयातून आणि कथाकथनातून मांडल्यास त्यांचा योग्य तो प्रभाव पडेल असंही वाटलं. समाजसेवेसाठी झटणार्‍या त्या स्त्रीच्या कथा वाचून त्यांना जाणवलं की लहान मुलांसोबतच महत्वाचे असे इतर असंख्य मुद्दे आहेत.

२०१० साली 'निवेदिता प्रतिष्ठान'तर्फे घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत त्यांना श्री. द.मा. मिरासदार यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक मिळाले. तेथून प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे 'मातोश्री' व 'आपलं घर' वृद्धाश्रम येथे कथाकथनाचे व भारूडांचे कार्यक्रम, 'परांजपे विद्यालयात' 'जिजाऊ प्रतिष्ठान'तर्फे बालवाडी शिक्षीकांना कथाकथनाचे प्रात्यक्षिक व प्रायोगिक मार्गदर्शन, एस.एन.डी.टी. पुणे येथे 'शिक्षक-पालक संबंध व त्यांचा पाल्यावर होणारा परिणाम' यावरील मार्गदर्शनपर व्याख्यान केले. बालरंजन, पुणे येथील 'सुजाण पालकत्व' या उपक्रमात त्यांनी सुधाताईंच्या अशाच काही कथा सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली आहे.

मुख्य म्हणजे या कथाकथनाला व्यावसायीक स्वरूप न देता, समाजाला काहीतरी चांगले द्यावे या इच्छेनी त्या हा उपक्रम राबवितात. त्यामुळेच यातून मिळणारे मानधन प्रवासखर्च वजा जाता समाजकार्यासाठी वापरण्यास त्या कटीबद्ध आहेत असे त्या आवर्जून सांगतात.

आज सर्वत्र अस्ताव्यस्त पसरलेली, विस्कटलेली समाजव्यवस्था, एका ठिकाणी मानसिक आणि भावनिक गुंता आणि घुसमट तर दुसर्‍या ठिकाणी विभक्त जीवनशैली, वाढत चाललेले ताणतणाव, त्यातून हरवत चाललेले नातेसंबंध, वृद्धांच्या समस्या, लहानांवरचे संस्कार या ज्वलंत प्रश्नांवर चपखल बसेल असा तोडगा कुणापाशिही नाही.


केदार केसकर यांची आई याही वयात कथाकथनाचे कार्यक्रम करतात ..त्याच हर्षभरित रितीने . लेखक आणि त्यांचा शब्द त्या अचूक रसिकंपर्यंत पोचवीतात. मी तो अनुभव घेतला आहे . मात्र हे लिहलेले आहे केदार केसकर यानीच ....तेच त्यांच्या भाषेत ...

Thursday, April 21, 2011

वेलकम इडियट्स -सचिन परब

आमच्या पत्रकार मित्राचे नेहमीच नवे विषय सारखे खुणावत असतात ...त्याचेच `माझे आभाळ` ब्लॉग वरचे हे लेखन माझ्याही माझ्या वाचकांना देत आहे ..अर्थात सचिन परब यांच्या सहकार्याने ....
गेल्या वीकेण्डला आंबाजोगाईला गेलो होतो. लातूरमधे महारुद्र मंगनाळेंच्या ‘बातमीमागची बातमी’ या साप्ताहिकाच्या बाराव्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम होता. तिथून अमरजींना म्हणजे अमर हबीबांना भेटण्यासाठी आंबाजोगाईला गेलो होतो. अमरजींबरोबर दोन तासदेखील घालवणं हा श्रीमंत करणारा अनुभव असतो. इथे तर अमरजी दोन दिवस सोबत होते. खूप मजा आली.



कसा काय आठवत नाही, पण चर्चेत ‘थ्री इडियट्स’चा संदर्भ आला. माझ्या डोक्यात विचार आला की समोर हा एक मोठा इडियटच उभा आहे. नोकरी न करता सामाजिक कामात आयुष्य घालवणारा हा माणूस. अनेक मोठमोठ्या लोकांसोबत मी फिरलोय. त्यांना लांबून जवळून बारकाईनं पाहणं हा कामाचाच भाग. पण अमरजींच्या तोलामोलाचा माणूस महाराष्ट्राभरात मला तरी आजघडीला माहीत नाही. यात अतिशयोक्ती बिलकूल नाही. त्यांना भेटलं की एक ओतप्रोत आनंद मिळतो. आपण स्वतःला मोठे मानणारे सगळ्याच बाबतीत किती छोटे आहोत, हे कळतं. पण त्यातून कोणताही इन्फिरॅरिटी कॉम्प्लेक्स येत नाही. उलट मोठं बनायची प्रेरणा मिळते.


अमरजींनी प्रस्थापित मोठेपणाचा वाराही चुकून लागू नये यासाठी डोळ्यात तेल टाकून दक्षता बाळगलीय. आपल्याला कुणी मोठं म्हणालं तर आभाळच कोसळेल की काय, असं ते साधेपणाने वागत राहिले. त्यांनी त्यांच्या सोबतच्या कितीतरी माणसांचं जगणं समृद्घ बनवलंय. अमरजींचं बोट पकडून विचार करायला शिकलेली माझ्यासारखी पत्रकार किंवा कार्यकर्त्यांची एक पिढीच महाराष्ट्रात आहे. त्यांना आज साठीच्या जवळ आलेलं असताना त्यांना आपण समाज म्हणून काय दिलं? अनेक खुज्यांच्या वाटेला सहजपणे जातो तो मानमराताब तरी. पण कधी त्याची अपेक्षाही केली नाही आणि न मिळाल्याचं वैषम्यही जवळपासही कधी भरकटलं नाही. निस्वार्थपणे जोडलेली माणसं मात्र जिवाला जीव देण्यासाठी सोबत आहेत. आणखी काय हवं.


‘थ्री इडियट्स’ जेव्हा कधी बघतो तेव्हा बस बघतच बसतो. दर वेळेला त्यात नव्यानं काहीतरी सापडतं. कामयाब नहीं काबिल बनना सीखों, कामयाबी तुम्हारे पीछे पीछे आयेगी, हा बाबा रणछोडदासचा मंत्र जगायलाच शिकवणारा. सिनेमा पहिल्यांदा बघितला तेव्हा भारावूनच गेलो होतो. त्याच भारावलेपणात विंडो सीटसाठी एक लेख लिहिला होता. वेलकम इडियट्स. त्याचा इण्ट्रो होता, ‘ आपल्याला २०२० पर्यंत महासत्ता बनायचंय. नव्या दशकाची पहिली दहा वर्ष तर हातची गेलीच. त्यामुळे फक्त 'थ्री इडियट्स' सिनेमाचं स्वागत करून भागणार नाही. आता तरी मुलखावेगळा विचार करणाऱ्या खऱ्याखुऱ्या 'इडियट्स'चं स्वागत करायला आपल्याकडे पर्याय नाही.’ रँचोच्याच वाटेवरून जाणारे ‘रॉकेट सिंग’ आणि ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हे दोन सिनेमे आले होते. जितक्यांदा बघावं तितक्यांदा नवे वाटणारे आणि नव्याने कळत जाणारे.


हा लेख लिहिला तेव्हा मीही मटाचा राजीनामा दिला होता. सगळं नीट चालत असताना मी केलेलं कृत्य म्हणजे सगळ्यांच्या मते मूर्खपणाच होता. पण आज वर्षभरात त्या मूर्खपणाचं एकदाही वाईट वाटलेलं नाही. खरेखुरे इडियट सोबत असताना तसं वाटेल तरी कसं? लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट.

या लेखाची एक गोष्ट लिहायची राहिली होती. ती आता नव्याने जोडतोय. हा लेख मटात छापून आल्यानंतर मला एका आईचा मेल आला होता. तिचा मुलगा इंजिनिअरिंग करत होता. पण त्याला इंग्रजीत लेखक म्हणून करियर करायचं होतं. त्यात आता आम्ही करावं, असा सल्ला विचारला होता. मी कळवलं, मी काय सांगणार. मी स्वतःच इंजिनीयर आहे आणि आता पत्रकारिता करतोय.


बोमन इराणी पहिल्या मुन्नाभाईमध्ये मेडिकल कॉलेजचा डीन होता. आता 'थ्री इडियट्स'मध्ये तो आयआयटीचा डायरेक्टर आहे. पहिल्याच दिवशी पिंजारलेल्या केसांनी तो होस्टेलमधल्या मुलांना ग्यान द्यायला पोचतो. कोणत्याही गुरुत्वाकर्षणात म्हणजे अवकाशातही वापरता येणारं पेन तो सगळ्या विद्यार्थ्यांना दाखवतो. लाखो रुपये खर्च करून बनवलेलं हे पेन त्याला बुद्धिमत्तेचं प्रतीक वाटत असतं. त्याला त्याच्या प्रोफेसरने ३० वर्षांपूर्वी दिलेलं हे पेन तो त्याचा वारस ठरू शकेल अशा हुशार विद्यार्थ्याला देण्याची घोषणा करतो. यंदाच्या बॅचमध्ये तो हुशार विद्यार्थी बनण्याची क्षमता कोणात आहे का, असं तो विचारतो. भारावलेली सगळी मुलं हात वर करतात.


फक्त रँचो म्हणजे अमीर खान नंतर हात उंच करतो. शंका विचारतो. अंतराळवीरांसाठी वेगळं पेन बनवायची गरजच काय, साधी पेन्सिल वापरली असती तर लाखो रुपये वाचले असते. तो 'इडियट' ठरतो. कुणीही 'पुंडलिका वरदे' म्हणाल्यावर 'हारि विठ्ठल' म्हणणारे आपण सगळे. डोकं असतंच सगळ्यांना. पण ते वापरायची तकलीफ आपण शहाणे करून घेत नाही. डोकं वापरायचं ते फक्त मार्क मिळवायला आणि त्यानंतर जास्तीत जास्त पैसे मिळवायला. त्याच्यापुढे आपल्याला फारसं माहीत नसतं. कारण त्या झापडापलीकडे फिरण्याचा मूर्खपणा ना कुठली शाळा शिकवत. ना कुठले आईबाप. मग जो कुणी घोकून घेतलेल्या चौकशीच्या बाहेर विचार करतो त्या इडियटला अतिरेकी ठरवून ठार केलं जातं किंवा खच्चीकरण करून व्यवस्थेचा नांगर खांद्यावर ठेवला जातो. एखादा यालाही बधला नाही तर इडियटचा महात्मा बनवून देव्हा-यात बसवण्याचा पर्याय असतोच असतो.


तरीही या सगळ्याला न जुमानता व्यवस्थेला आव्हान देणारे इडियट जन्माला येत असतात, हे आपलं नशीब. नशीबच म्हणायचं, कारण असे इडियट जन्माला येण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून किंवा समाज म्हणून काहीच कर्तृत्व करत नसतो. तरीही सतत छोटीमोठी बंड होतंच राहतात. त्या बंड करणाऱ्या इडियटचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. त्यांच्यामुळेच आपण माणूस म्हणून जगतो आहोत. प्रगतीच्या दिशेने धावतो आहोत. नाहीतर आपल्याला त्याच त्या नेमून दिलेल्या चाकोरीच्या बाहेर जाता आलं नसतं. आपण पुढे जातोय, असं आपलंच आपल्याला वाटत राहिलं असतं आणि आपण मात्र त्याच चाकोरीत फिरत राहिलो असतो.


आपल्या सगळ्या शहाण्यांना एका वर्तुळात चालवण्यासाठीच आपली शिक्षणव्यवस्था उभी राहिली. त्याचा पाया घालणा-या मेकॉले सायबाला काळ्या कातड्याचे इंग्रजांचे क्लोन उभे करायचे होते. आकडेमोड करत जगणारे आणि मरणारे बाबू तयार करायचे होते. ते काम त्यानं बरोबर केलं. पण विवेकानंदांपासून रवींदनाथांपर्यंत आणि टिळकांपासून गांधीजींपर्यंत अनेकांनी त्याला हादरे दिले. त्यामुळे काहीकाळ बहिष्कारापासून आश्रमांपर्यंत प्रयोग होत राहिले. पण स्वातंत्र्य मिळालं आणि बाबू बनवायच्या कारखान्यातलं प्रॉडक्शन पुन्हा निरंकुश सुरू झालं. त्यामुळे मेकॉलेला नाव ठेवायचं कारण उरलं नव्हतं. नवे मेकॉले दर दहा वर्षांनी नवे सिलॅबस काढत होते. नवी कॉलेजं सुरू करत होते. त्यांनी या शिक्षणव्यवसायाला आव्हान देणा-या प्रयोगांना कधीच व्यवसायाचा भाग बनवले. आम्हाला मेरिटहोल्डर बनवायचे नाहीत, माणूस घडवायचा आहे, असं म्हणणारेही मेरिट लिस्टमध्ये मुलं आणण्याच्या नादाला लागले. या स्पर्धेत इडियट्सना जागा नव्हतीच.


वर पहिल्या पॅऱेग्राफमधे आलेलं 'पुंडलिका वरदे' वाक्य पुलंचं. त्यांचं आणखी एक वाक्य आहे. फणसातले गरे फेकून द्यायचे आणि चारखंड चघळायला शिकवते ती आजची शिक्षणव्यवस्था. खरंच, आपण थोडा विचार केला तर आपण शिकताना हेच करत असतो. नवनवी बोर्ड आलीत. पण तेच चारखंड फक्त थोडं छान चांदीचा वर्ख लावून चघळायला दिला जातोय, तेवढंच. हे आपण सगळेच अनुभवत असतो. १५-१७ वर्षं शिकूनही आपल्या पदरात काहीच पडलेलं नसतं. तरीही आपल्या पोरापोरींना त्याच चौकटीत अडकवण्याशिवाय दुसरा मार्ग नसतो.


साधा विचार कसा करायचा, बोलायचं कसं, ऐकायचं कसं, वाचायचं कसं आणि शिकायचं कसं, हेही आपण शिकलेलो नसतो. मग कुठल्या तरी बाबाच्या मागे जगण्याची कला शिकत आपण फिरत राहतो. जगायचे जे फण्डे लहानपणीच स्पष्ट व्हायला पाहिजेत ते मरेपर्यंतही कळत नाहीत. प्रत्येक शहाणा आपले कपडे किती सुंदर तेच सांगतो. बाकीचेही शहाणे मग आपापले कपडे किती सुंदर ते सांगत बसतात. एकेमकांच्या सुंदर कपड्यांविषयी कौतुकाचे रकानेच्या रकाने भरले जातात. अशा वेळेस हे सगळे राजे नागडे आहेत. हे सांगणरे इडियटस नसतील, तर सगळं संपलंय.


आंधळ्यांच्या घरात डोळस जन्माला आला, तर घरातले आंधळे त्याला इडियट ठरवणारच. त्याचे डोळे फोडणारच. पण तरीही आंधळ्यांच्या घरातच डोळसांची गरज सर्वात जास्त असते. महाराष्ट्र नावाचं असंच एक घर आहे, आंधळ्यांचं. कधीकाळी डोळसांची गर्दी होती इथे, यावर विश्वास बसत नाही आता. आता डोळसांना इंडियट ठरवण्याचे प्रयत्न ठायीठायी सुरू आहेत. महाराष्ट्राच्या निमिर्तीनंतरच्या पन्नासात एखादा सचिन तेंडुलकर, एखाद्या लता मंगेशकर, एखादे बाबा आमटे आणि एखादे पांडुरंगशास्त्री आठवले. याच्यापुढे आपली यादी जात नाही. विनय हर्डिकरांनी 'सुमारांची सद्दी' या नेमक्या शब्दांमध्ये या परिस्थितीचं वर्णन केलंय. यातून बाहेर पडायचं तर महाराष्ट्राने आपली मध्यमवर्गीय चाकोरी सोडून थोडं इडियटस बनायला हवं. छोट्या मोठ्या इडियटसच्या मूर्खपणाला थोडा वाव मिळायला हवा. 'थ्री इडियटस' बघताना इडियटसचं स्वागत करायचं आपण शकायला हवं. किमान तसा विचार जरी आपण केला तरी खूप.



-सचिन परब
-http://parabsachin.blogspot.com/2011/04/blog-post_21.html

Thursday, April 14, 2011

दमां चा ८५ व वाढदिवस -नवे संकल्प



आज १४ अप्रैल द.मा . मिरासदार यांचा ८५ व वाढदिवस . त्याना शुभेच्छा देण्यासाठी घरी गेलो असताना नवे संकल्प मिरासदार सांगत होते . विनोदी साहित्य विषयी बोलणे निघाले . हा त्यातलाच कही भाग .....

-आज उत्तम विनोद दुर्मिळ झाला आहे .चिं. वि .जोशी, गडकरी , अत्रे , दत्तु बांदेकर असे उत्तम दर्जाचे विनोदी साहित्य दुर्मिळ झाले आहे .
विनोदी साहित्य लिहले जाते ..दिवाळी अंकातून हे लेखन होते पण ते वाचले तेर समाधान होत नाही .
उत्तम विनोदी लेखन करायला निरिक्षण शक्ति हवी. अवलोकन हवे आणि वाचन भरपूर असणे आवश्यक आहे .

अश्लीलतेकड़े विनोदी साहित्य झुकलेले दिसते .त्यातली चित्रही अश्लील असतात . आजचा तरुण वर्ग याकडे लगेच अक्रुष्ट होतो . हा विनोदाचा पराभव आहे असे माला वाटते .
चांगले विनोद निर्माण करता येत नाहीत असे त्याचा अर्थ होतो .
-अनेक उत्तम कथाकार . उदाहरण म्हणजे चिं. वि .जोशी , दी . बा . मोकाशी
उत्तम विनोदी कथा लिहायचे ..पण ते कथाकथन करू सकत नव्हते ..
कथाकाथनाला थोडेफार वक्तृत्व अंगी असले पाहिजे ..शब्दात नाट्य हवे ..
शाब्दिक अभिनय यायला हवा आहे .

-८४ संपून आज मी ८५ वर्षात पदार्पण केले . प्रकृति अद्याप चांगली आहे .
त्याचे श्रेय आई वडिलांना जाते .अजुन आवाज ठनठणित आहे .
माइक नसला तरी आवाज सर्वांपर्यंत पोचतो .
-एक उत्तम विनोदी नाटक लिहायचे आहे .
आणि मराठीत उत्तम विनोदी कादंबरी नाही ..
ती लिहावी असा संकल्प आहे .


सुभाष इनामदार , पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
www.culturalpune.blogspot.com
www.subhashinamdar.blogspot.com

Tuesday, April 12, 2011

स्वाक्षरी पुस्तिका -आगळी गुरूदक्षिणा


सुप्रसिध्द साहित्यिक, शिक्षणतज्ञ आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक डॉ. न.म.जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम केले गेले होते. यात एक विषेश उपक्रम त्यांच्या विद्यार्थ्यांनी-चाहत्यांनी केला..ते म्हणजे....
स्वाक्षरी संदेश...
काय आहे हा उपक्रम..
डॉ. न.म.जोशी यांच्यासारख्या लोकप्रिय साहित्यिकाची स्वाक्षरी घेण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमानंतर विद्यार्थी, रसिक चाहते गर्दी करीत असतात. मग कुणी वही पुढे करतात. तर कुणी एखादा चिठो-यासारख्या कागदावर सही घेतो. कुणी तर बस तिकिटाच्या मागेही स्वाक्षरी मागतो. देणारा स्वक्षरी देतो. घेणारा हौसेने घेतो. पण त्या स्वक्ष-या वा-यावर उडून जातात.
मग सुहास जोशी, प्रकाश जोशी, प्रकाश भोंडे, राहूल सोलापूरकर या विद्यार्थ्यांनी ठरवले की, जोशी सरांची स्वाक्षरी ही जीनवसंदेश देणारी स्वाक्षरी असली पाहिजे.
डॉ. न.म.जोशी सर म्हणजे बोधकथाकार ! कादंबरीकार , नाट्यलेखक ! त्यांच्या साहित्यातील अनेक सुविचार त्यांचेच विद्यार्थी डॉ. दिलीप गरूड यांनी संकलित केले.
आणि स्वाक्षरी-संदेश नावाची स्वाक्षरी पुस्तिकाच तयार केली गेली. मुखपृष्ठावर डॉ. जोशी यांचे छायाचित्र आणि स्वाक्षरी. आत छोटी-छोटी सुंदर पाने. तळाशी डॉ. न.म.जोशी यांच्या साहित्यातला सुविचार !
स्वाक्षरी साठी इतर पान कोरे..तिथे स्वाक्षरी घ्यावी...खाली छापलेला संदेशही तयार !
या शिवाय ही स्वाक्षरी पुस्तिका तयार करण्यामागची व्यापक कल्पना म्हणजे..
आपण लेखक, कवालंत, खेळाडू यांच्या स्वाक्ष-या घेतो. पण आपल्या घरातल्या रक्ताच्या नात्याच्या माणसांच्या स्वाक्ष-या तरी आपल्याजवळ कुठे असतात ?
आजी-आजोबांची स्वाक्षरी
काका-काकुंची स्वाक्षरी
मित्र-मैत्रीणींची स्वाक्षरी
परिचित-अपरिचितची स्वाक्षरी
सहप्रवाशांची-सहका-याची स्वाक्षरी
शिक्षक-मार्गदर्शकाची स्वाक्षरी
अशा स्वाक्ष-या लोकांनी गोळा कराव्यात. तो एक अमूल्य ठेवा असेल. तो एक ऐतिहासिक दस्तऐवज होईल. त्याला भावनिक ओलावा तर आहेच पण व्यावहारिक किंमतही आहे. कधी काळी सबळ पुरावा म्हणू हा हस्ताक्षत्राचा नमुना म्हणून या स्वाक्षरी-संदेश पुस्तिकेतील या स्वाक्षरीचा उपयोग होऊ शकेल.
अशी ही स्वाक्षरी-संदेश पुस्तिका !
त्या पुस्तिकेची किंमत आहे फक्त बारा रूपये.
डॉ. न.म.जोशी यांना ही आगळी-वेगळी गुरूदक्षिणा दिल्याबद्दल प्राख्यात समीक्षक डॉ. द.भि. कुलकर्णी यांनी डॉ.जोशी यांच्या अमृतमहोत्सवी सदस्यांचे भरभरून कोतूक केले आहे.

सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
www.culuralpune.blogspot.com
and
www.subhashinamdar.blogspot.com

Monday, April 11, 2011

ता-यांचे बेट..एक अनुभव





कथा ही अशी आहे...
मुंबईच्या धकाधकीपासून दूर कोकणातल्या एका सुंदर पण दुर्गम खेड्यामध्ये एक कुटुंब मोठ्या मजेत राहतं आहे.
श्रीधर सुर्वे हा ग्रामपंचायतीत सेवक आहे आणि बायको, दोन मुलं आणि आईसोबत तो आपल्या छोट्याशा घरात मोठ्या आनंदाने राहत आहे. मुलगा ‘ओंकार’ हा व्रात्य, अभ्यास न करणारा तर मुलगी मीरा हुशार आणि समजूतदार, आणि सुखा समाधानात संसार करणारी पत्नी इंदू असे हे सुखी कुटुंब आहे. गावातल्या गणपतीवर त्याची श्रद्धा आहे, दोस्तीचे नाते आहे.
लेले साहेब हे ग्रामसुधार मोहिमेवर आलेले सरकारी अधिकारी. त्यांच्या कामासाठी श्रीधरला अलीकडे सारखे मुंबईला जावे लागते.अशाच एका वारीला तो कुटुंबियांना आपल्याबरोबर मुंबईला नेण्याचा प्रस्ताव ठेवतो. मंडळी हरखून जातात. ओंकार मुंबईतल्या मौजेच्या स्वप्नांमध्ये रमून जातो.
पण मुंबईमध्ये ओंकारच्या पदरी निराशाच पडते कारण मुंबईच्या ह्या लखलखत्या जगातल्या बहुतेक गोष्टी त्याच्या वडिलांना न परवडणाऱ्या असतात.अशातच ओंकारला एक टोलेजंग इमारत दिसते,आजीच्या गोष्टीतल्या राजमहालाची आठवण करून देणारी. ते एक फाइव्ह स्टार हॉटेल आहे. ओंकारची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो वडलांना हॉटेलमध्ये जाण्याचा आग्रह धरतो. असह्य होऊन इंदू हात उगारते. मंडळी गावी परततात.
ओंकारच्या वर्तनावर नाराज झालेला श्रीधर “तू वर्गात पहिला येउन दाखव, मी तुला फाईव्हस्टार मधे राहायला घेऊन जाइन” अशी लेकाबरोबर पैज लावतो.
ओंकार पेटून उठतो आणि दिवस रात्र अभ्यास करू लागतो आणि प्रकरण मजेदार होऊन जाते. मुलाच्या वर्तनाने सुरवातीला आश्चर्यचकित झालेला श्रीधर नंतर ओंकारच्या ध्यासाने पुरता घाबरून जातो. खरोखरीच मुलगा पैज जिंकला तर? अस्वस्थ श्रीधर गणपतीला मुलाला परीक्षेत दुसरे आणण्याचे साकडेसुद्धा घालतो.
फक्त एका रात्रीसाठीसुध्दा झगमगणारे ते पाच तारे ह्या छोट्या कुटुंबाला परवडणारे नाहीत.
एक बाप मुलाला दिलेला शब्द पाळण्यासाठी अहोरात्र धडपडू करू लागतो, नाना मार्ग शोधू पाहतो आणि मजेदार प्रसंगाची मालिकाच आकार घेउ लागते.
दूर लखलखणाऱ्या मुंबई बेटाच्या स्वप्नानी आपल्या छोट्या विश्वात सुख मानणाऱ्या त्या कुटुंबात मोठी खळबळ माजते.

.....आता थोडे चित्रपटाविषयी
पंचतंत्रात जसा बोध देण्यासाठी किंवा कसे वागावे याचे धडे गिरविण्यासाठी कथेतून पात्रे बोलत रहातात. आणि त्यासा-यांचा शेवट एक उपदेश ठळकपणे पसरविला जातो. तसाच काहीसा प्रकार ह्या सत्त्याप्रयोगात ता-यांचे बेट मध्ये अनुभवायला मिळतो. मुंलांसाठी बाप म्हणून आजकालचे पालक किती खुजेपण अनुभवतात याचा प्रत्ययही या चित्रपटात प्रतिबिंबीत झाला आहे. आजीने नातीला सांगितलेल्या गोष्टीतूनच कोकणाच्या पार्श्वभूमिवर चित्रपट तुमच्याशी आणि त्या गणपती बाप्पाशी गुजगोष्टी करतो. सचोटिने जगणा-या श्रीधर सुर्वे दारूच्या आहारी जातो. मुलाला दिलेल्या शब्दाला पूर्ण करण्यासाठी लबाडीने पैसे कमवत रहातो. हे सारे मात्र त्या गणपतीच्या साक्षीने..कदाचित गणपती हे एका मनाचे प्रतिक असावे..कष्टाचे..जिद्दीचे फळ नक्की मिळते..ते यश भक्ताच्या झोळीत तो गजानन.. नक्कीच घालतो.
किरण यज्ञोपवित यांच्या दिग्दर्शनातून हे ता-यांचे बेट चमकले आहे. सचिन खेडेकर यांच्यासारखा सामान्यवर्गातला सत्शील माणूस कथेचा भार तोलून धरतो. त्याच्या भूमिकेत तो सहजपणे विरघळून जाताना पहाणे हे आनंदाचे काम रसिकांना करावे लागेल. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मुळे सामान्यांचा असामान्य प्रतिनिधी इथेही ही कथा सचिन घडवितो. कोकणाच्या निसर्गाने... त्यातल्या वस्तुंनी.. वातावरणातून...हे बेट सतत खुणावत रहाते.
त्याला माया आणि प्रसंगी कठोर धार देणारी इंदू ...अर्थात अश्विनी गिरी..
बोटीचे जीवन...मुंबापुरीतली चकाकणारी दुनिया..
मिळेल त्यात समाधान मानणारे कुटुंब.. मुलाशी लावलेल्या पैजेतून हादरून जाते... मग पैशाची दुनिया...भावनेला दुरावते..
सारेच चित्रपटात घडत रहाते.
चित्रिकरणात कोकणाचे वैभवशाली चित्रीकरण तर दिसतेच पण दिसते ...आजही जपून ठेवलेल्या त्या अस्सल परंपरेचे सालंकृत दर्शन. गावात नसेल पेशाची श्रीमंती. पण आहे वारसांनी कमावलेली संमृध्द परंपरा. चित्ररूपाने दृष्यातून ते कोकण डोकावत रहाते.. ता-यांचे बेट..म्हणतानाच कोकणचे आणि मुंबईचे सांस्कृतीक नातेही कुठे तुटत चालल्याचे स्पष्ट दिसते.
कोकणातली माणसे आता कोकणीच बोलत नाहीत..तर ती बोलतात पुणेरी मराठीत..क्वचित आजीच्या आणि बायकोच्या हेलात कोकणी सूरावट आढळते. पण माणूसकीची नाळ मात्र आजही तुटलेली नाही याची प्रचिती आणि तिही....आजच्या परिस्थितीची जाणीव या चित्रपटात ...नव्हे... विमा एजंट बनलेल्या किशोर कदम.. सुपारी घेणारा व्यापारी.. भजनाला ढोलकी वाजविणारा..परिस्थितीने गायही विकायची परिस्थिती येणारा...गावचे..घराचे वैभवी अवशेष विकणारा..शशांक शेंड्ये.. सारेच..
उलट मुंबापुरीत हापिसातला शिपाईदेखील फाईल पुढे रेटण्यासाठी घेत असलेली लाच..शेअरच्या पैशात भावनेला न थारा देणारा विनय आपटे. सारखा..व्यावसायिक...पंचतारांकित हॉटेलात चकाचक शोभिवंत मखमली मूर्ती..आणि इखाद्या इसमाची पैशाची पिशवी परत देण्याची भावनेतून माणूसपणाची..चांगूलपणाची जाणीव.. सारेच.
कोकणातले प्रेम गणपतीवर भारी..त्यातच चित्रपटातला नायक त्या गणपतीच्या मूर्तीशी मनातला संवाद करतो..आपली व्यथा त्याच्यासमोर प्रकट करतो..आणि आपल्या मुलाला दुसरा क्रमांक मिळावा यासाठी गणपतीलाच साकडे घालतो...
सारेच..द्ष्य..अदृष्यात व्यक्त होणारे, किरण यज्ञोपवित या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने हा संस्कार जपणारा..जुन्या परंपरेत काहीसा नवे रसायन गुंफून बनविवेला एक भाबडा पण प्रामाणिक आविष्कार घडविला आहे. इथे चित्राची फ्रेमही बोलते आणि माणसेही. वातावरणही...
ऑल्ट एंटरटेनमेंट आणि नीरज पांडे प्रस्तुत फ्रायडे फिल्मवर्क्स निर्मित हा चित्रपट म्हणजे या सुट्टीत मुलांसह पालकांनी आवर्जून पहावा असा आहे...त्यात तशी करमणूक नसली तरी तुम्ही सहजी या कथेत स्वतःली गुंफत जाता..आणि पुढे त्यातलेच एक तुम्ही बनत रहाता.
सचिन खेडेकर, अश्विनी गीरी यांच्या अभिनयातून साकारले गेलेले.. मध्यमवर्गीयांचे प्रतिनीधी बनून...चित्र तुम्हाला भावत रहाते... कधी बोचते..तर कधी दाद देण्यास भाग पाडते.
इशान तांबे आणि अस्मिता जोगळेकर या मुलांनी यात खरंच धमाल केली आहे... ते हसवतात तसे थोडे नाचवतातही.
विनय आपटे, शशांक शेंड्ये, किशोर कदम, शुंभांगी जोशी यांच्या भूमिका थोड्या हटके झाल्या आहेत. क्रेडिट गोज टू अर्थात किरण ..
मराठीत मालगुडी डेज सारखा चित्रातून संस्कृती आणि परंपरेचे बीज सांगणारा ता-यांचे बेट....मला तरी वाटते...अवश्य पहा...पण मुलांना घेऊन...


सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276
www.culturalpune.blogspot.com
www.subhashinamdar.blogspot.com

नवी सुरवात



नव्या स्वप्नाची
यंदाची ही नवी सुरवात


वर्षभर प्रतिसाद ,
हाच एक आशावाद



सुभाष इनामदार , पुणेsubhashinamdar@gmail.com
9552596276

Friday, April 8, 2011

पुलं आणि भीमराव पांचाळे




कधीतरी आपणच आपल्या नकळत लिहिलेलं एखादं वाक्य आपल्यालाच आवडून जातं. ‘भीमराव पांचाळे या चार नि तीन सात शब्दांत गझल मराठीत गाते,’ हे वाक्य त्यातलंच. भीमरावांच्या मुलाखतीच्या इण्ट्रोची सुरुवात अशी लिहिली होती. मुलाखत स्मरणिकेसाठी होती. स्मरणिका भीमरावांच्या साठीच्या कार्यक्रमासाठी.

कार्यक्रम छानच झाला. रवींद्र नाट्यमंदिर संपूर्ण भरून गेलं होतं. खाली आणि गॅलरी संपूर्ण. पासेस आधीच संपले होते. त्यामुळे लोकांनी आत शिरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. खुर्च्या भरल्या होत्या. घरीही कधीच खाली बसली नसतील अशी माणसं बायकापोरांसकट जमिनीवर बसली होती. गर्दी जशी भरगच्च तशीच त्यांची दादही. भीमरावांची प्रत्येक जागा दाद घेत होती. अगदी त्यांचं सत्कार समारंभातलं हसणंही दाद घेत होतं. भीमरावांचं कौतूक सुरू झालं की ते अंग चोरून ऐकायचे. कुणी कौतूक केलं की ते कान पकडून तौबा करायचे. हे सारं छान होतं. अगदी सुगंधी.


सत्कार समारंभ सुरू असताना माझं नाव घोषित झालं. स्मरणिकेचं प्रकाशन होत होतं. नेमका तेव्हाच भाषणं सुरू होती, म्हणून आमच्या रुद्रला सूसू करायला घेऊन बाहेर गेलो होतो. स्मरणिकेचा संपादकच गायब होता. मी आणि सुनील कुहीकरजी असे आम्ही दोघे स्मरणिकेचे संपादक. खरंतर विदर्भ लोकप्रतिष्ठानच्या मित्रमंडळींनी मला अतिथी संपादक बनवलं होतं. पण अतिथी वगैरे म्हटल्यावर मलाच तिथं परकं वाटू लागलं. म्हणून मग आग्रह करून संपादक बनलो.

कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच स्मरणिकेला दाद मिळाली. राजेंद्र हुंजे भेटला. भीमरावजींबरोबर निखिल वागळे लवकरच ग्रेट भेट करणार आहेत. त्यासाठी रेफरन्स म्हणून ही मुलाखत राजेंद्रला मेल केली होती. मुलाखत वाचून वागळे खुश झाले म्हणे. भीमरावजी खूपच मोठे आहेत. बाबासाहेबांचं नाव घेऊनही जे लोक करू शकत नाहीत. ते भीमरावजींनी किती शांतपणे केलंय, अशा आशयाची प्रतिक्रिया वागळेंनी व्यक्त केली. याचं पुस्तक व्हायला हवं, असं ते म्हणाले. वागळेंच्या संवाद साधण्याच्या आणि वाद घालण्याच्या स्टाईलविषयी आदर असला, तरी त्यांच्याशी सहमत असण्याचे मौके क्वचितच येतात. त्यातला हा एक दुर्मीळ मौका. स्मरणिकेतून भीमरावांचं मोठेपण लोकांपर्यंत पोचावं, अशी इच्छा होती. ती बहुतेक पुरी झालीय. त्याचं श्रेय अर्थातच सुनील तांबेला. मुलाखतीवर सुनील, प्रमोद आणि माझं नाव आहे. पण मुलाखतीची जी पाच सात सेशन्स झाली. त्यात मी अर्धा वेळ आणि प्रमोद पावपेक्षाही कमी हजर होता. यात जे काही चांगलं आहे ते सुनीलचंच.

स्मरणिकेचं अनेकांनी भेटून आणि फोन करून कौतूक केलं. पण तो त्यांच्या सौजन्याचा आणि सभ्यपणाचाच भाग आहे. त्यात अनेक चुका राहिल्यात. ले आऊट, कव्हर चांगलं झालेलं नाही. बहुतांश लेखांवर संपादकीय संस्कारच नाहीत. लेखांचं प्रयोजनच नीट कळत नाहीय. शुद्धलेखनाच्या चुका राहिल्यात. या सगळ्याची जबाबदारी केवळ माझी आहे. अडचणी खूप आल्या. पण आता त्या कशाला सांगायच्या? चुका राहिल्यात हे माहीत असूनही अंक प्रिंटिंगला सोडावा लागला. आम्ही दोघाही संपादकांनी लेख टायपिंगला सोडल्यानंतर थेट प्रकाशन झालेला अंकच बघितला.

स्मरणिका प्रकाशन झाल्याचं कळल्यावर बघायला स्टेजमागे गेलो. आमचा जुना दोस्त मनोज भोयर होता तिथे. त्याने खूप चुका राहिल्यात म्हणत आपलं परखड मत व्यक्त केलं. तो बोलला ते योग्यच होतं आणि माहीतही होतंच. मनोजला इतकी वर्षं ओळखत असल्यामुळे त्याला फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही, हेही माहीत होतं. पण उगाचच डिस्टर्ब झालो. थोड्या वेळाने स्मरणिका हातात आली. ती बघून तर आणखीनच डिस्टर्ब झालो. दोनेक गझला नीट ऐकताच आल्या नाहीत. मग सगळं डोक्यातून काढून टाकलं. शेवटचे चार दिवस मिळाले की ही रात्री जागवून हे काम चुटकीसरशी निपटून टाकू, असा माज होता. तो सगळा उतरला होता. काही ना काही कारणाने शेवटचे चार पाच दिवस कामाला हातच लावता आला नाही. सगळ डोळ्यासमोर जाताना दिसत होतं. काहीच करता आलं नाही. आमच्या धंद्यातल्या लोकांना चुका दिसल्या. पण सर्वसामान्यांना स्मरणिका आवडलीय. त्यात समाधान मानायला हवं.

दत्ता बाळसराफांनी नवा लेख दिला होता. पण स्मरणिकेत त्यांचा जुना लेखच लागला. गीतवहिनींचाही नवा लेख लिहायचा राहून गेला. त्यामुळे भीमरावांवर स्मरणिका काढण्यासाठी नवं निमित्त शोधून काढायलाच हवं. आणि पुन्हा एकदा भीमरावांची फर्माईशी मैफलही जुळवून आणायलाच हवीय, कारण माझी फर्माईश राहून गेलीय. मैफल सुरू होण्याआधीच मी निवेदक रवी वाडकरांकडे चिठ्ठी दिली. त्यावर फक्त दुष्यन्त एवढंच लिहिलं होतं.

भीमरावांनी दुष्यन्त कुमारची एक गझल बांधलीय, ‘ये ज़ुबाँ हमसे सी नहीं जाती’. ती त्यांनी पूर्वी एकदा कुठेतरी सादरही केलीय. पण मी अद्याप ऐकलेली नाही. विशेषतः त्यातले दोन शेर ऐकायचे होते.

एक आदतसी बन गई है तू
और आदत कभी नहीं जाती

आणि

मुझको ईसा बना दिया तुमने
अब शिकायत भी की नहीं जाती



पण ही फर्माईश सादरच झाली नाही. भीमरावांनी ही गझल घेतलीच नाही. शिवाय ए. के. शेखासाहेबांची ‘गरिबाच्या लग्नाला नवरी गोरी काय, काळी काय’ होत नाही म्हटल्यावर बसल्याजागी ओरडूनच फर्माईश केली. वेळेअभावी त्याचेही फक्त दोनच शेर झाले. त्यामुळे आता पुन्हा एकदा अशीच फर्माईशी मैफल भरवावी लागेलच. पर्यायच नाही. कदाचित एकसष्टी, काय माहीत?

हा साठीचा योग जुळून आला, यशस्वी झाला. त्याच्यामागे दोन माणसं. एक भीमरावजी आणि दुसरा आमचा प्रमोद चुंचूवार. मला जितकं माहीताय तितकं, हा सोहळा हे त्याचंच डोकं. विदर्भ लोक प्रतिष्ठानही त्याचंच ब्रेनचाईल्ड असावं, अशी मला खात्रीशीर शंका आहे. तरीही तो त्याचा कोणताही पदाधिकारी नाही. तो फक्त संस्थापक सदस्य आहे. सोहळ्याचा कर्ताधर्ता तोच, पण तो स्टेजवर नाहीच. कुणाहीपेक्षा उत्तम भाषण करू शकणारा प्रमोद नेहमीसारखा पडद्याआड. आणखी एक पडद्याआड शांतपणे धावणारा मोठा माणूस मला तिथे दिसला, तो म्हणजे धर्मेंद्र जोरे.

कार्यक्रम विदर्भाच्या नावाने झाला. त्यामुळे त्यात ओतप्रोत विदर्भ असणं स्वाभाविक होतं. पण भीमरावजी सातपुड्यातून कधीच सातासमुद्रापार गेलेत. त्यांना विदर्भात कशाला अडकवून ठेवायचं? भाषणांच्या आधी झालेल्या दोन गझला माणुसकीचं गाणं गात होत्या. त्या फक्त विदर्भाविषयी बोलणा-यांनी ऐकल्या असत्या तर बरं झालं असतं, असं माझ्या बायकोनं, मुक्तानं मला विचारलं. माझ्याकडे त्याचं उत्तर नव्हतं. शिवाय भीमरावांचा आजवर हवा तितका सन्मान झाला नाही, यासाठी बामणांना ठोकून काढण्यात आलं. तेही पटणारं नव्हतं. मुळात त्याची ही वेळही नव्हती. आणि भीमरावांच्या आजवरच्या यशात अनेक ब्राम्हणांचं आणि विदर्भाच्या बाहेरच्यांचं खूपच मोठं योगदान आहे. ते कसं नजरेआड करणार? आणि करायचं तरी कशाला?

पुलं आणि भीमराव हा ऋणानुबंध या सगळ्या संदर्भात महत्त्वाचा आहे. या विषयावरचा माझा एक लेख स्मरणिकेत आहे. पण तो तिथे आलाय तो डॉक्युमेंटेशनच्या स्वरूपात. म्हणून त्यातले संदर्भ घेऊन आणि विश्लेषणाची भर घालून नवशक्तितल्या कॉलमात लेख लिहिला. लेख मोठा झाला होता. म्हणून त्यातला महत्त्वाचा भाग कापला गेला. मूळ लेख सोबत कटपेस्ट केलाय.

४ मार्च १९८९ ला चंद्रपूरला पहिलं दलित साहित्य संमेलन झालं. संमेलनाचे उद्घाटक होते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे. ते या संमेलनाचं सर्वात मोठं आकर्षण होतं. उद्घाटनपर केलेल्या वैचारिक तरीही अत्यंत रसाळ अशा भाषणाने त्यांनी या संमेलनाला एका उंचीवर नेऊन बसवलं.

या संमेलनात पुलंनी एक कार्यक्रम खूप आग्रहाने करायला लावला. तो म्हणजे गझलनवाज भीमराव पांचाळेंची गजलमैफल. भीमराव तेव्हा गझलनवाज बनले नव्हते. त्यांना मुंबईत येऊन अवघी सहाच वर्षं झाली होती. संघर्ष सुरू होता. पण पुलंचा हट्टच होता. भीमराव चंद्रपूरच्या संमलनात पाहिजेच. कुणाला साक्षच काढायची असेल तर संमेलनाचे एक मुख्य आयोजक असलेले ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर आहेत. ते या सा-या घटनाक्रमाचे साक्षीदार आहेत.

संमेलनात भीमरावाची मैफल नेहमीप्रमाणेच रंगली. त्याला पुलं संपूर्ण वेळ आवर्जून उपस्थित राहिले. इतकंच नव्हे तर या मैफिलीचं प्रास्ताविक निवेदन त्यांनी स्वतःहून केलं. त्यात त्यांनी भीमराव, मराठी गजल यांचं खूप कौतूक केलं. तुम्ही विदर्भातले आहात, भीमराव विदर्भातले आहेत. पण भीमरावांची खरी कदर विदर्भाने नाही, तर आम्ही मुंबईकरांनी केली, असं त्यांनी वैदर्भीयांना आपल्या खुशखुशीत शैलीत सांगितलं. भीमरावांच्या गाण्यात शब्द आणि सूर एकमेकांना आलिंगन देऊन लयीत चालतात. असं भरभरून कौतूक करत त्यांनी भीमरावांना असंच गात राहा, असे आशीर्वाद दिले. सोबतचा फोटो त्याच कार्यक्रमातला. नागपूर आकाशवाणीकडे या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे.


पुलंची आणि भीमरावांचा ऋणानुबंध खूप जुना. पहिली भेट अकोल्यातली. पुलं अकोल्याला आले की त्यांचा किशोरदादा मोरेंकडे यायचे. किशोरदादा हे भीमरावांचे पालक. त्यामुळे त्याकाळातल्या अनेक मान्यवरांबरोबरच पुलंचाही सहवास भीमरावांना लाभला. एकदा बाबा आमटेंकडे आनंदवनात गेलेले असताना परतीच्या प्रवास पुलं अकोल्याला आले होते. त्यांच्यासोबत डॉ. अनिल अवचट होते. नारायण कुलकर्णी कवठेकर, मांडवगणे अशी अकोल्यातली साहित्यिक मंडळीही होती. किशोरदादांनी प्रत्येक जाणकारासमोर भीमरावांना जाणीवपूर्वक गायला सांगत. तेव्हा भीमरावांचं वय विशीच्या आसपास होतं. त्यांनी त्यांचं एक नवं कम्पोझिशन गाऊन दाखवलं. ती अर्थातच गजल होती. भीमूला पहिल्याच फटक्यात पुलंसारख्या दैवताकडून शाबासकीची थाप मिळाली.

१९८३ साली भीमराव विदर्भातून मुंबईत स्टेट बँकेत बदली घेऊन आले. नरिमन पॉइंटच्या हेड ऑफिसमधे पोस्टिंग होतं. तिथून अवघ्या दोन मिनिटांवर पुलंचं एनसीपीएचं ऑफिस होतं. पुलं तेव्हा एनसीपीएचे अध्यक्ष होते. तिथेच त्यांचं बि-हाडही होतं. पंधरा दिवस ते इथे राहत आणि पंधरा दिवस पुण्याला. तिथे पुलंसोबत काम करणा-या वृंदावन दंडवतेंच्या ओळखीनं भीमराव पुलंना भेटले. ८७ साल होतं ते. निमित्त होतं मुंबई आकाशवाणीने आपल्या हिरकमहोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या भीमरावांच्या मैफिलीचं निमंत्रण.

आकाशवाणीच्या मैफिलीला येणं पुलंना शक्य नव्हतं. पण त्याची सव्याज भरपाई त्यांनी एका क्षणात केली. त्यांनी भीमरावांना एक एनसीपीएच्या नावे एक पत्र द्यायला सांगितलं. मला माझी कला सादर करण्यास संधी द्यावं, असं पत्र त्यांनी तिथेच लिहून घेतलं आणि दंडवतेंकडे ठेवायला दिलं. अकोल्याला भीमरावांकडून ऐकलेलं गाणं पुलंच्या लक्षात होतंच. पण दूरदर्शनवरच्या मैफिलीही ऐकलेल्या होत्या. पेपरांत छापून येत होतंच. पुलंनी भीमरावांच्या गाण्याला आणि मराठी गजलला एनसीपीएसारखं जगात नावाजलं जाणारं व्यासपीठ मिळवून दिलं.

२९ जून १९८८ ला ही मैफल झाली. एनसीपीएत ब्लॅक बॉक्स नावाचं एक छोटं सभागृह आहे. त्याची रचनाच अशी वैशिष्ट्यपूर्ण आहे की मंचावर टाचणी जर पडली तरी माईकशिवाय शेवटच्या खुर्चीपर्यंत ती नीट ऐकू जाते. मुंबईतच्या उच्चभ्रू वर्तुळातल्या जाणकार आणि दर्दी लोकांसाठी तिथे निवडक मैफिली आयोजिल्या जातात. भीमरावांच्या सूरांनी एनसीपीए जिंकलं. अनेक मान्यवरांनी वृत्तपत्रातून भीमरावांचं कौतूक केलं. आजही एनसीपीएच्या लायब्ररीत कुणीही जाऊन या मैफिलीचं रेकॉर्डिंग ऐकू शकतं.

पहिल्याच भेटीपासून पुलंनी भीमरावांसाठी दोघांमधलं सगळं अंतर संपवून टाकलं होतं. त्यांना पुलंच्या ऑफिसात मुक्तद्वार होतं. दुपारी बँकेत लंचअवर झाला की भीमराव पळालेच एनसीपीएला. तिथे दंडवते, वामन केंद्रे, अशोक रानडे अशी मंडळी सोबत असायची. तासन्सान गप्पा चालायच्या. आणीबाणीपासून लोकगीतांपर्यंत अनेक विषयांवर या चर्चा सुरू असायच्या. त्यातून भीमराव कळत नकळत घडत होते. पुलंच्या परिवारातल्या अनेकांशी परिचय होत होता. पुलं अनेकदा भीमरावांना ऑफिसात फोन करत. ऑफिसमधल्यांनाही त्याचं अप्रुप होतं. आणि ऑफिसात काही महत्त्वाचं काम आलं आणि भीमराव ऑफिसात नसतील, तर ऑफिसातून पुलंच्या ऑफिसात फोन जायचा. सगळ्यांना माहीत होतं भीमराव एनसीपीएतच गेले असणार.

पुलं भीमरावांना आग्रहाने चंद्रपूरच्या दलित साहित्य संमेलनात घेऊन गेले. पण त्यामधे आलेली एक अडचणही त्यांनी दूर केली. संमेलनाच्या तारखा त्यांनी आकाशवाणी पोर्ट ब्लेअर केंद्राला आधीच दिल्या होत्या. त्यामुळे अंदमानात जाण्याची त्याकाळी दुर्मीळ असणारी संधी सोडावी लागणार होती. पुलंनी संमेलनात नाव सूचवल्यामुळे भीमरावांनी आकाशवाणीला नकार कळवण्याची तयारीही केली होती. पण पुलं दोन्ही कार्यक्रम व्हावेत म्हणून आग्रही होती. त्यांनी आकाशवाणीचे स्टेशन डायरेक्टर असणा-या मधुकर गायकवाडांची भेट घेतली आणि पोर्ट ब्लेअरचा कार्यक्रम पुढे ढकलायला लावला. भीमरावांच्या आग्रहावरून पुलं एनसीपीएच्या वतीनं वैदर्भीय लोकगीतांचा एक कार्यक्रम आयोजित करणार होते. पण विदर्भातले कलावंत आणि अभ्यासकांचा उत्साह मावळल्यामुळे दस्तावेजाच्या दृष्टीने महत्त्वाचा कार्यक्रम होऊ शकला नाही.

मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्य हा दोघांच्या कॉमन आवडीचा विषय. त्याविषयी भीमराव एक प्रसंग सांगतात, ‘माझी भीड तोपर्यंत बरीच चेपली होती. एक दिवस मी पुलंसारख्या साहित्यातल्या मेरुमणीलाच पुस्तकं सजेस्ट करण्याची हिंमत केली. माझी भूमिका प्रामाणिक होती की आपल्याला आवडलेल्या विनोदाबद्दल त्यांच्याशी बोलावं. एक श्रीलाल शुक्लंचं रागदरबारी. मी रागदरबारीचं नाव काढताच त्यांनी कानाला हातच लावला. त्यातल्या विनोदाचा व्यापक पट आणि अफाट दर्जा याविषयी त्यांनी भरभरून सांगितलं. दुसरं होतं, इटालियन लेखक गुयानी गुरेत्शी. मी म्हटलं, मला त्याचा नावाचा उच्चारही नाही माहीत, पण मला याचा विनोद खूपच भावलाय. पुलंनी लगेच म्हटलं ‘ द हाऊस दॅट निनो बिल्ट’वालाच ना? तू काय वाचलंयस त्याचं. मी गेली अनेक वर्षं शोधतोय. पण फक्त एकच पुस्तक मिळालंय. त्यानंतर माझ्या चेह-यावर आनंद पसरला. कारण अकोल्यावर मुंबईत आल्यावर मी जवळपास दोन वर्षं मुंबईचे सगळे फूटपाथ पालथे घालत गुरेत्शीची सगळी पुस्तकं शोधून काढली होती. मला देशील का रे वाचायला, भाई अगदी काकुळतीला येऊन बोलले. पंधरा दिवसात परत देईन. आणि मी पुस्तक दिल्यावर पंधरा दिवसात एका लिफाफ्यात नीट पॅक करून त्यांनी ती पुस्तकं परत दिलीही. सोबत पुलंनी एक आपलं एक पुस्तक सही करून दिलं, ‘पुलं एक साठवण’. ते असं पुस्तक असं कुणाला सहसा देत नसत. ती साठवण मी जिवाच्या पार जपून ठेवलीय. मी माझ्या गीतालाही त्याला हात लावायला देत नाही.’ इति भीमराव.

गीता म्हणजे भीमरावांच्या पत्नी. लग्नानंतर त्या पुलं आणि भीमरावांच्या गप्पांच्या मैफिलीत जोडल्या गेल्या. त्याही मूळ पुलंसारख्याच सारस्वत. त्यांनी जातीची बंधनं न भीमरावांशी लग्न केलं याचं याचा त्यांना खूप आनंद होता. सारस्वतांच्या स्वयंपाकाविषयी ते त्यांच्याशी नेहमी बोलत. तू चांगला गातोस, यापेक्षाही तुझी बायको गोव्याची आहे, याचा मला जास्त आनंद आहे, असं ते भीमरावांना गमतीनं सांगायचेही.

भीमरावांची गझलेची पहिली कॅसेट ‘एक जखम सुगंधी’ खूप गाजली. तिचं प्रकाशन पुलंच्याच हस्ते झालंय. यातली मराठी गझल एकूण मराठी गाण्यांना नवं वळण देणारी होतीच. रसिकांना ती आजही भुरळ घालतेय. ती इतकी गाजली कारण त्याचा सरस दर्जा होताच. पण पुलंचा लाभलेला परिसस्पर्शही याला कारणीभूत होता. पुलंनी आपली पुण्याई आणि लोकप्रियता भीमरावजींच्या नव्या प्रयोगाच्या पाठिशी उभी केली. पुलंच्याच या परिसस्पर्शामुळेच माध्यमांमधे आणि अभिजनांच्या वर्तुळात भीमरावांचा प्रवेश तुलनेने सोपा झाला. नाहीतर विदर्भाच्या एका छोट्याशा गावातून आलेल्या, कोणतीही शहरी सांस्कृतिकतेची पार्श्वभूमी नसलेल्या आणि छोट्या चणीच्या भीमरावांना मुंबईतल्या अभिजन वर्तुळाने स्वीकारणं सोपं नव्हतं.

भीमराव हे असं एकमेव उदाहऱण नाही. पुलंनी आजवर अनेक कलावंतांच्या पाठीवर असाच कौतुकाचा हात फिरवला आणि त्या कलावंतांचं सोनं केलं. त्यांनीच दादू इंदुरीकरांना शोधून ‘गाढवाचं लग्न’ महाराष्ट्रासमोर आणलं. मच्छिंद्र कांबळीचं ‘वस्त्रहरण’ मान टाकणारच होतं. पण पुलंची शाबासकी पेपरांत छापून आली आणि त्याने इतिहास घडवला. मराठी मातीतलं अस्सल बानवकशी जे काही गवसलं, त्याला पुलंनी आपल्या लोकप्रियतेची मदत घेऊन कोंदण मिळवून दिलं. महाराष्ट्रभर जे काही नवे प्रयोग होत होते, त्याच्या पाठिशी ते कायम उभे राहिले.

पुलंनी एका प्रगल्भ सामाजिक जाणिवेतून हे सातत्याने केलं. कितीही गुणवत्ता असली तरी सांस्कृतिक स्पर्धेत उतरणं सर्वसामान्य घरांमधून आलेल्या कलावंतांसाठी मुश्किल असतं. धावण्याच्या स्पर्धेची सुरुवात जिथे होते, तिथे पोहचण्यासाठीच त्यांना मैलोनमैल धावून यावं लागतं. अशावेळेस कुणीतरी पाठिशी ठामपणे उभं राहावं लागतं. पुलंनी गावागावातल्या धडपडणा-या प्रतिभांना कायम आधार दिला. चंद्रपूरच्या दलित संमेलनातल्या उद्घाटनाच्या भाषणात तर त्यांनी याविषयीचं आपलं जीवन तत्त्वज्ञानच मांडलंय. पण पुलंचा हा चेहरा क्वचितच समोर आणला गेला. भीमरावांसारख्या कलावंतांच्या पाठिशी उभे राहणारे पुलं आज आपल्याला ठावूकच नाहीत. पुलं म्हणजे विनोद, नॉस्टॅल्जिया, पुणं आणि पार्ले एवढंच मर्यादित ठेवण्यात आलं. तेच सा-यांच्या सोयीचं होतं. पण पुलंनी पेरलेलं आज बहराला आलंय. म्हणूच आज भीमरावांची साठी समाधानात आणि मोठ्या सन्मानाने साजरी होतेय. त्याचा पुलंना ते असतील तिथे खूप आनंद होत असेल.

सचिन परब,
क्रिएटिव पत्रकार,
मुंबई


http://parabsachin.blogspot.com/2011/04/blog-post_07.html

Tuesday, March 29, 2011

झलक..तीन दशकांची समाधानपूर्ती




महाविद्यालयामधून बाहेर पडल्यानंतर स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या तीव्र उर्मीतून झलक,पुणे या संस्थेची स्थापना झाली..आता त्याला तीन दशके झाली आहेत.
रसिका तुझ्याचसाठी.. गंगाधर महांबरे यांच्या शिर्षक गीताच्या नावाने संस्थेने पहिला कार्यक्रम झाला..आणि झलकची झलक रसिकांच्या टाळीला पसंत पडली. मौखिक परंपरेतील पारंपारिक गीते आणि अघुनिक गीते सादर करणे हा उद्देश.. झलकला आपल्या मातीतला आणि मनातला हा बहुश्रृततेचा धागा. परंपरेतील समृध्द वारसा या कार्यक्रमातून जपणे हे जास्त मोलाचे वाटले. ते त्यांनी तीन दशके सुरू ठेवले.

इलेक्ट्रॉनिक वाद्ये आणि इंटरनेटच्या युगातही प्रेक्षागृहातले रसिक आणि कलाकार एकमेकांसमोर असताना तालवाद्ये जुळविली जातात. सूर-लय-तालाच्या लडी उलगडल्या जातात. आणि बघता बघता त्या सर्वांचे अद्वैत तयार होते. झलक त्या सांगेतिक अनुभूतीचा परिणाम देण्यासाठी आजही सज्ज असते...पुढेही राहणार आहे.
मागच्या तीन दशकांमध्ये अनेक ज्येष्ठ कलाकारांबरोबरच सुधीर फडके, राम कदम, शांताबाई शेळके, प्रभाकर जोग, मंगेश पाडगावकर, सुधीर मोघे, प्रशांत दामले, सुधीर गाडगीळ, आशा भोसले, किशोरी आमोणकर यांनी झलकच्या स्वरमंचावर येवून कलाकारांना प्रोत्साहन दिले आहे.

स्वा. सावरकरांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या प्रचलित व अप्रचलित गीतांचा सागरा प्राण तळमळला हा कार्यक्रम राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेतून रंगत गेला. आज झलकचे तोच चंद्रमा, सूर तेची छेडिता, मधुघट, इंद्रधनू, गा मेरे मन, सारखे वेगळे कार्यक्रम रसिकांच्या पसंतीला उतरले आहेत. तर पावसाची गाणी आणि मन उधाण वा-याचे सारखे वेगळे कार्यक्रम आजही स्मरतात. २५०० प्रयोगांची या सा-या प्रयोगांची संख्या होईल.

पुण्यात स्थापन झालेली कलाकारांची ही संस्था गेली तीन दशके एकविचाराने, अभंगपणे आमि आपल्या भूमिकेशी ठाम पाहून आजही काम करत आहे....याचे श्रेय झलक परवारात सामिल झालेल्या विविध कलावंतांना तर जातेच पण त्याही पेक्षा अधिक जाते ते... अविनाश वैजापूरकरांच्या संघटनाकौशल्याकडे. यासा-यांना म्हणजे कलाकार आणि रसिक यांना बांधणारा सेतू निवेदनातून साधला तो उपेंद्र खरे यांनी....

झलकची ही तीन दशकांची तपपूर्ती साजरी झाली तीही आगळ्या पध्दतीने... आता ज्येष्ठ म्हटले पाहिजे.. ते सुधिर गाडगीळ यांच्या साठीच्या निमित्ताने त्यांना मानपत्र देउन...तर प्रमुख उपस्थितीत विक्रम गोखले झलकच्या कलावंतांना अधिक सुरात गा असा सुरात गा हा सल्ला द्यायला विरसले नाहीत. तीन दिवसांच्या ह्या सोहळ्याला पुणेकरांची दाद ही उपस्थितीने तर मिळालीच. पण ती गीतांना टाळ्यांनी साद घालून.

कितीही जमाना बदलला तरी त्या दिवसांची आठवण देणारे असे कार्यक्रमच संस्कृती टिकवून ठेवते.. गेलेले दिवस परत स्मरणात रहातात... ते पुढच्या पिढीपर्यंत पोचविते हे निश्चित....

सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
www.subhashinamdar.blogspot.com
www.culturalpune.blogspot.com
Mob- 9552596276

http://www.zalakpune.com/

Monday, March 28, 2011

अपप्रवृत्तीः माध्यमातल्या आणि समाजातल्या



टिकेकरांच्या पत्रकारितेचा गाभाच मुळी तारतम्यपूर्ण विचार कसा करावा आणि तो कसा मांडावा हा राहिला आहे. त्यामुळे टिकेकरांनी प्रसारमाध्यमे आणि मराठी समाजातल्या अपप्रवृतींवर बोट ठेवले आहे. काही राजकीय आणि सांस्कृतिक शक्तींनी मराठी समाजाला जो संकुचित आणि प्रतिगामी बनवण्याचा विडा उचलला आहे, त्यातले धोके टिकेकरांनी दाखवून दिले आहेत. याचबरोबर हा संग्रह आदर्श पत्रकारिता कशी करावी याचेही उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हे पुस्तक तरुण पत्रकारांनी आणि इतरांनी आवर्जून वाचावे असे आहे.

मराठी पत्रकारितेतल्या ज्या काही मोजक्या संपादकांकडे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उत्तमप्रकारे लेखन करण्याची हातोटी आहे, त्यात डॉ. अरुण टिकेकर आणि कुमार केतकर यांचा प्राधान्याने समावेश करावा लागेल. खरे तर या दोन संपादकांची मराठी वर्तमानपत्रातली कारकीर्द आणि त्यांची पत्रकारिता हा स्वतंत्र अभ्यासाचा आणि एका स्वतंत्र पुस्तकाचाही विषय आहे.


डॉ. अरुण टिकेकरांनी जवळपास दीड दशक मराठी वर्तमानपत्रांत संपादक म्हणून काम केले असले तरी त्यांचा मूळ पिंड हा अभ्यासक-संशोधकाचाच राहिला आहे. पत्रकारितेत येण्याआधी त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई’ आणि ‘अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेस, दिल्ली’ या दोन संस्थांमध्ये जवळजवळ दीड दशक काम केले होते. त्याही आधी त्यांनी इंग्रजी विषयाचे पाच वर्षे अध्यापनही केले. तर मागील पाच वर्षापासून टिकेकर ‘एशियाटिक लायब्ररी’ या तब्बल दोनशे वर्षाचा इतिहास असलेल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत.


टिकेकरांची आजवर मराठीमध्ये ‘जन-मन’, ‘स्थलकाल’, ‘कालमीमांसा’, ‘सारांश’, ‘अस्वस्थ महाराष्ट्र’, ‘ऐसा ज्ञानसागरू : बखर मुंबई विद्यापीठाची’ अशी बारा-तेरा पुस्तके प्रकाशित झाली आहेत; तर इंग्रजीमध्ये ‘द किंकेड-टू जनरेशन्स ऑफ अ ब्रिटन फॅमिली इन द इंडियन सिव्हिल सव्‍‌र्हिस’, ‘द क्लोस्टर्स पेल-अ बायोग्रफी ऑफ द यूनिव्हर्सिटी ऑफ मुंबई’, ‘रानडे : द रेनेसांस मॅन’ आणि ‘मुंबई डी-इंटेलेक्च्युलाईज्ड : राइज अँड डीक्लाईन ऑफ अ कल्चर ऑफ थिंकिंग’ ही चार इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत. नुकतेच त्यांचे पुण्याच्या रोहन प्रकाशनाने ‘पॉवर, पेन अँड पॅट्रोनेज : मीडिया, कल्चर अँड मराठी सोसायटी’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे.


गेल्या वीस वर्षात टिकेकरांनी केलेली भाषणे आणि इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये लिहिलेल्या लेखांचा या संग्रहात समावेश केला आहे. या पुस्तकाचे विषया- नुसार टिकेकरांनी चार विभाग केले आहेत. पहिल्या, ‘मीडिया’ या विभागात प्रसारमाध्यमांविषयीच्या दहा लेख-भाषणांचा समावेश आहे. आणि हा या पुस्तकातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे असेही म्हणायला हरकत नाही. अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमांविषयी बरीच उलटसुलट चर्चा होत आहे. वर्तमानपत्रांच्या विश्वासार्हतेला गालबोट लागावे, अशा घटना अलीकडच्या काळात वाढत चालल्या आहेत. पत्रकारितेची तत्त्वे आणि नीतिमूल्ये जपली जाणे लोकशाही असलेल्या देशात नितांत गरजेचे असते. कारण प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानली जातात. पण अलीकडच्या काळात वृत्तवाहिन्यांचा उच्छाद आणि काही पत्रकार-संपादकांची न्यायाधीश होण्याची महत्त्वाकांक्षा, पत्रकारितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. या पार्श्वभूमीवर टिकेकरांनी आपल्या लेखनातून राज्यकर्ते, पत्रकार, पत्रकारिता, समाज-संस्कृती अणि नीतिमूल्ये यांविषयी उपस्थित केलेले प्रश्न मूलभूत आणि विचारणीय आहेत.


दुस-या ‘कल्चर’ या विभागात महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयीचे सोळा लेख आहेत. त्यातील शेवटचे सहा लेख मुंबई विद्यापीठ आणि त्याविषयीच्या वादांचा समाचार घेणारे आहेत. 1857 साली स्थापन झालेले, भारतातले दुसरे विद्यापीठ असा मान असणाऱ्या आणि न्या. तेलंग यांच्यापासून न्या. पी. बी. गजेंद्रगडकर अशी वैभवशाली परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठामधला राजकारण्यांचा वाढता हस्तक्षेप, कुलगुरू निवडीचा घोळ, रोहिंग्टन मेस्त्रीच्या पुस्तकावरून सेनेने केले आकांडतांडव या घटनांचा टिकेकरांनी संयत पण परखडपणे समाचार घेतला आहे. ‘द डेथ ऑफ मुंबई यूनिव्हर्सिटी’ हा लेख तर आवर्जून वाचावा असा आहे. मुंबई विद्यापीठाचा अलीकडच्या काळात चाललेला खेळखंडोबा टिकेकरांनी अतिशय नेमकेपणाने या लेखांमधून टिपला आहे.


तिस-या विभागाचे नाव आहे, ‘द मराठी सोसायटी’. यात एकंदर बारा लेख आहेत. त्यातून राज ठाकरे, मराठी अस्मितेचे राजकारण, मुंबईची मिलकडून मॉलकडे झालेली वाटचाल आणि मराठा आरक्षणाची मागणी व त्यावरून केले जाणारे राजकारण यांचा आढावा घेतला आहे.
चौथ्या ‘फादर फीगर्स’ या विभागात जमशेटजी जीजीभाय, श्री. पु. भागवत, य. दि. फडके, बाबा आमटे, ग. प्र. प्रधान, गंगाधर गाडगीळ, विंदा करंदीकर, विजय तेंडुलकर, सुधीर फडके आणि टी. एन. शानभाग यांना आदरांजली वाहणारे लेख आहेत. हे लेख बहुधा आयत्यावेळची गरज म्हणून लिहिलेले असल्याने ते तीन ते पाच पानांचेच आहेत. पण त्यातूनही टिकेकरांनी संबंधित व्यक्तीच्या योगदानाविषयी अतिशय नेमकेपणाने लिहिले आहे. 29 मे 2010 रोजी ग. प्र. प्रधान यांचे निधन झाले. त्यानंतर पाच जूनच्या साधना साप्ताहिकात टिकेकरांनी प्रधान मास्तरांविषयी ‘साधुमुखे समाधान’ हा छोटासा लेख लिहिला होता. पण नंतर त्यांना मीनू मसानी यांच्या ‘फ्रीडम फर्स्ट’ या मासिकाच्या जुलैच्या अंकात प्रधान मास्तरांविषयी ‘द डेमॉक्रॅटिक सोशॅलिस्ट’ हा लेख लिहिला. तोच इथे पुनर्मुद्रित केला आहे. या लेखात ते म्हणतात, He was every inch a professor and loved his vocation till the end. Whether in the profession of teaching or in politics or as a public speaker or a social critic, he loved to educate.श्री. पु. भागवत, य. दि. फडके, विंदा करंदीकर यांच्याबद्दलचे लेखही असेच उत्तम झाले आहेत. तेंडुलकरांकडे कुठलीही फिलॉसफी नसली तरी ते उदारमतवादी होते आणि वेगवेगळ्या वेळी त्यांनी वेगवेगळ्या वैचारिक भूमिका घेतल्या म्हणून ते विचारवंत होते, हे टिकेकरांनी त्यांच्यावरच्या लेखात मांडले आहे, पण त्याचा अधिक विस्तार करायला हवा होता. कारण टिकेकरांचा मुद्दा बरोबर असला तरी त्याचे स्पष्टीकरण त्यांच्या लेखात मिळत नाही. पण ते स्पष्टीकरण त्यांनी तेंडुलकरांवर ‘सकाळ’मध्ये लिहिलेल्या ‘विचार-कलहांचा अग्रनायक’ या लेखात मिळते. असा थोडाफार फरक या विभागातील लेखांत झाला आहे.

थोडक्यात या पुस्तकात टिकेकरांनी प्रसारमाध्यमे आणि मराठी समाजातल्या अपप्रवृतींवर बोट ठेवले आहे. काही राजकीय आणि सांस्कृतिक शक्तींनी मराठी समाजाला जो संकुचित आणि प्रतिगामी बनवण्याचा विडा उचलला आहे, त्यातले धोके टिकेकरांनी दाखवून दिले आहेत. त्याचबरोबर हा संग्रह आदर्श पत्रकारिता कशी करावी याचेही उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे हे पुस्तक तरुण पत्रकारांनी आणि इतरांनी आवर्जून वाचावे असे आहे.
जाता जाता एक मुद्दा आवर्जून नोंदवायला हवा. तो म्हणजे टिकेकरांच्या पत्रकारितेचा गाभाच मुळी तारतम्यपूर्ण विचार कसा करावा आणि तो कसा मांडावा हा राहिला आहे. संयत भाषेतही आपले म्हणणे किती ठामपणे आणि बिनतोडपणे मांडता येते याचे अलीकडच्या काळातले उत्तम उदाहरण म्हणून टिकेकरांच्या लेखनाचा दाखला देता येईल. यादृष्टीने त्यांची ‘सारांश’, ‘तारतम्य-खंड 1 ते 5’ आणि ‘अस्वस्थ महाराष्ट्र-खंड 1 व 2’ ही पुस्तकेही अभ्यासण्यासारखी आहेत. विशेषत: समकालीन समाजाविषयीचे सात निबंध असलेले ‘सारांश’ आणि ‘अस्वस्थ महाराष्ट्र-खंड 1 व 2’ ही दोन पुस्तके बारकाईने समजून घेतल्याशिवाय टिकेकरांच्या विचारशैलीशी समरस होता येणार नाही.

--
Subhash Naik
Free lance journalist
Pune,Maharashtra,India.
Mobile : 91589 11450