Thursday, January 5, 2017

माणसांची श्रीमंती असणारी..गोडबोले आळी...


दापोलीतुन हर्णै रोड वरून जाताना डाव्या बाजूलागोडबोले आळीकडेअस लिहिलेला एक लहानसा बोर्ड तुम्हाला दिसेल.. साधारण ३०-३५ कुटुंब ह्या आळीत सामावलेली आहेत.. काही पिढ्यानपिढ्या इथेच राहतात.. काही बाहेरच्या गावातून व्यवसाय-नोकरी निमित्त इथे आले आणि इथलेच रहिवासी झाले.. सर्व आमचीच वस्ती आहे.. काही मुंबई-पुण्यात रहात असले तरीहि ते गोडबोले आळीतलेच आहेत आणि बाहेरच्या लोकांना ३०-३५ कुटुंब दिसत असली तरी आम्ही एकाच कुटुंबात राहतो.. आमच्यासाठी आम्ही सगळे फक्तगोडबोले आळीकरआहोत आणि ह्या सगळ्या कुटुंबाना एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे आमचगणपतीच देऊळ’.. हा हा!

किती सहज म्हणून गेले मी कि आमच देऊळ.! खरतर ह्या देऊळाचे खरे मालक गोडबोलेच.. पण आम्ही मालक आहोत किंवा आमच्या देऊळात अस करा अस करू नका अस सांगत अधिकार गाजवण वगैरे त्यांनी कधी केलच नाही. त्यामुळेत्याचंदेऊळआमचकधी झाल हे कळलच नाही..! साधारण २५० वार्षांपुर्वी ह्या देउळाची स्थापना झालेली आहे..



- वर्षांपूर्वीच देऊळ नवीन बांधण्यात आल.. गणपतीची मूर्ती संगमरवराची असून, उजव्या सोंडेचा गणपती आहे.. गणपतीच्या देऊळाला लागुनच हनुमानाचे मंदिर आहे.. माघ महिन्यातगणेश जयंतीलादेऊळात उत्सव साजरा करतो.. 


साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरु होणाऱ्या नाटकाच्या तालमे पासून उत्सवाच्या तयारीला सुरवात होते.. सुरवातीचे काही दिवस नाटक कोणत करायचं हे ठरवण्यात जातात.. एकदा नाटक ठरलं कि नाटकातील पात्रांची निवड.. आणि मग नाटकाच वाचन वगैरे सुरु होऊन हळू हळू नाटक उभ राहत.. सगळे आळीतलेच हौशी कलाकार.. पण उत्सवी नाटक म्हणून काहीतरी सादर करायच अस कधीच कोणी केलेलं नाही.. दिवसभर आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून रात्री च्या ठोक्याला सगळे देऊळाशी तालमेसाठी हजर होतात आणि तन,मन,धन, अर्पून काम करतात.. प्रोफेशनल कलाकारांना लाजवतील असे एकसो एक नाटकांचे प्रयोग आळीतल्या कलाकारांनी सादर केले आहेत.. जस आळीतल्या मोठ्या लोकांच नाटक उत्सवात सादर होत तसच लहान मुलांचं नाटक, नृत्य, गाण्याचे कार्यक्रम देखील तितक्याच हौशीने सादर होतात.. 

जशी नाटकाची तयारी जोरदार सुरु असते तसच एकीकडे देऊळ देऊळाच्या परिसराची साफसफाई सुरु होते.. उत्सव पाच दिवसांवर येऊन ठेपला कि देऊळाच्या सजावटीला सुरुवात होते.. छत बांधणे, देव सजवणे, रंगीबेरंगी लाईटच्या माळा लावणे, रांगोळ्या काढणे स्टेजवर नाटकाचा सेट उभारणे तसच प्रत्येक घरी उत्सवात पाहुणी येतात त्यामुळे घराची साफसफाई पण सुरवात होते.. मी मगाशी म्हणाले त्या प्रमाणे आळी एक कुटुंब आहे त्यामुळे आम्ही स्वतःच्या घरात ज्या हक्काने वावरतो तितक्याच हक्काने आळीतील सगळ्या घरातून फिरत असतो.. उत्सवात सगळ्या घरातून सगळे येऊन-जाऊन असतात त्यामुळे प्रत्येकाच्या घरातून विविध पदार्थांचे वास येत असतात.. चिवडा,लाडू, वड्या असे विविध पदार्थ घरोघरी बनवले जातात.. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे साखर,चहापुड आणि दुध घरात मुबलक प्रमाणात आहे कि नाही हे बघणे.. एकवेळ चिवडा वगैरे नसला तरी चालेल पण चहा हवाच!!


चहाहा गोडबोले आळीकरांसाठीअमृतआहे. कोणत्याही प्रहरी, कितीही वेळा चहा पिऊ शकतो आणि ठिकाण? चहा प्यावा अस मनात येताच समोर जे घर दिसेल त्या घरी चहा प्यायला जायचं.. आळीत फिरायला वेळेच बंधन नाही. दुपारचे १२ असुदेत किंवा रात्रीचे वाजुदेत तितक्याच हक्काने आम्ही एकमेकांच्या घरात वावरतो.. आणि हो अत्यंत महत्वाचा मुद्दाआम्हीम्हणजे फक्त आम्ही मुली मैत्रिणीकडे जातो अस नसत.. आमच्या आळीतलेमुलगेआणि मुली आम्ही एकत्र असतो.. आम्ही रात्रभर देऊळाशी गप्पा मारत बसतो.. सर्व मुलींच्या आई-बाबांना खात्री असते कि माझी मुलगी देऊळाशी ह्या मुलग्यांच्या बरोबर आहे म्हणजे ती सुरक्षित आहे. आणि पहाटेचे वाजले तरीही माझ्या मुलीला व्यवस्थित घरी सोडल्या शिवाय आळीतला एकही मुलगा घरी जाणार नाही हा विश्वास पालकांना असतो... 

कस असत बघा ना एखादी वाईट गोष्ट पटकन समोर येते आणि त्यावर चर्चा होते.. आणि चांगुलपणावर अलगद पडदा टाकला जातो.. पण मी अभिमानाने सांगेन कि आळीतला माझ्या बरोबरीचा मुलगा असुदे किंवा कोणी काका असुदेत कोणाहीबरोबर असलो तरी आम्ही मुली सुरक्षित आहोत.. सध्याच्या काळात स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांमुळे समाजातील प्रत्येक पुरुषाकडे एकाच चौकटीतून पाहिलं जातंय.. ती चौकट मोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी हा मुद्दा इथे मांडला. असो! पुन्हा आपण उत्सवाकडे वळुयात.. 


बघता बघता उत्सवाचा पहिला दिवस उजाडतो.. देऊळामध्ये सनई-चौघडा वाजतो आणि खऱ्या अर्थी उत्सव सुरु होतो.. उत्सवातील लहान मुलांपासून सर्व आजी-आजोबां पर्यंत सगळ्यांचा आवडीचा कार्यक्रम म्हणजे रात्री देऊळात होणारीआरती”.... टाळ, तबला घेऊन विविध आरत्या देऊळात म्हंटल्या जातात.. ज्यांना सगळ्या आरत्या व्यवस्थित पाठ आहेत ते माईक समोर उभे राहतात.. आरतीच्या ओळी गुणगुणल्या सारखे म्हणार्यांचा आवाजजय देव जय देवम्हणताना वरच्यासापर्यंत पोहोचतो.. आरती नंतर मोरया हो बप्पा मोरया हो अस म्हणत सभामंडपामध्ये फेर धरला जातो.. ते १० वाजेपर्यंत आरती झाल्यावर १० वाजता कीर्तनाला सुरवात होते.. मग सगळे वर्षभर ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस उजाडतोगणेश जयंतीम्हणजेच जन्माचा दिवस..

सकाळी १० वाजता कीर्तन उभ रहात.. सर्व गणेशभक्त देऊळाच्या सभामंडपात जमलेले असतात.. देऊळाच्या बाजूच्या घरी भालदार-चोपदार यांना तयार करायला सुरवात होते.. भालदार-चोपदार म्हणजे आमच्याच इथली लहान मुल असतात.. त्यांचा मेकअप, फेटा बांधणे वगैरे तयारी जोरदार सुरु असते.. जन्माची वेळ जवळ येताच. “दौलत जादा मेहरबान नजर रखो महाराजअस ओरडत भालदार-चोपदाराना मानाने देऊळा पर्यंत आणल जात.. त्यांनतर भालदार-चोपदारदोहेम्हणतात. मग नटून आलेल्या इटुकल्याशा मुली एका रांगेत पाळणा ओढायला उभ्या राहतात.. पाळणा म्हंटला जातो.. जन्म होताच पाळण्यावर फुल उधळली जातात .. फटाक्यांची माळ लावली जाते आणि अतिशय जल्लोषात गणेश जन्म पार पडतो..








जन्मा इतकाच महत्वाचा प्रोग्राम म्हणजेजेवणावळ’.. जिलबी हे पक्वान्न असत.. जेवणावळीला सर्व मुलगे कमीत कमी २५/३० जिलब्या खातातच.. जास्तीत जास्त किती हे सांगू शकत नाही.. एक मेकांना जिलब्यांचा आग्रह करत जेवणावळ पार पडते.. मग रात्री नाटक सादर होत.. आणि नाटकानंतरलळीताचकीर्तन होऊन उत्सवाची सांगता होते.. पुढचा उत्सव लवकर येउदे अस म्हणत सर्वजण आपापल्या कामाला लागतात..

 
अशी ही सुंदर उत्सवाची परंपरा असलेली आमची आळी.. आळी बद्दलच्या आठवणी इतक्या आहेत कि त्या एका लेखात लिहीण अशक्यच होत. पण तरी सगळ्या आठवणी एकत्र बांधायचा मी प्रयत्न केला..

सुखी राहण्यासाठी काय गरजेच असत? पैसे? धान्य? नाही.. पैसे आणि धान्य आपण केव्हाही कमवू शकतो.. पण माणसांची श्रीमंती ही नशिबातच असावी लागते अस मला वाटत.. धन-धान्या बरोबरच आमची आळी माणसांनी श्रीमंत आहे. म्हणून आम्ही सगळे सुखी आहोत.. 

सुखात हक्काने चहा प्यायला येणारे आणि दुःखात आपल्या पाठीशी उभी राहणारी सोन्यासारखी माणस मला देवाच्या कृपेने मिळाली त्या बद्दल मी मनापासून देवाची आभारी आहे.. 




-
अदिती वैशंपायन ,
दापोली (कोकण)



Saturday, December 24, 2016

आनंद कभी मरता नही..




आनंदरंग कार्यक्रमातून आनंद अभ्यंकर यांची स्मृती जपली...

आपल्या अभिनयाचा सुगंध मागे ठेऊन आनंद अभ्यंकर चार वर्षांनंतरही स्मरणात आहे,.हे पुण्यातल्या आनंदरंग कार्यक्रमाला पत्रकार संघात उपस्थित झालेल्या रसिकांच्या साक्षीने पटले. आनंद अभ्यंकर यांचे कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्या मार्फत आनंद ला आठविताना आजही अनेकांचे डोळे पाणावलेले पाहिले..
विशेषतः गेली ४० हून अधिक वर्षे पडद्यामागे राहून प्रकाशातल्या कलावंतांना सहाय्य करणारा भरत नाट्य मंदिराचा कलाकार..विठ्ठल नामदेव हुलावळे यांना या वर्षींचा आनंदरंग पुरस्कार लोकप्रिय अभिनेत्री नीना कुलकर्णी यांच्या हस्ते दिला गेला.

प्रकाशात असलेल्या कलावंतांने पडद्याआडच्या कालवंतांचे असे पुरस्कार दैऊन कौतूक करावे हा विरळा योग यानिमित्ताने जुळून आला.

शुक्रवारी २४ डिसेंबर २०१६वा संध्याकाळी पुण्यातले पत्रकार संघाचे सभागृह तुडूंब भरले होते..तो या आनंदरंगच्या कार्यक्रमासाठी..



आनंदची आई आहिल्यादेवी अभ्यंकर आणि आनंदची पत्नी अंजली अभ्यंकर, मुलगी,मुलगा आणि आप्तेष्ट तसेच त्याचा खूपसा मित्रपरिवार मुद्दाम या कार्यक्रमात अग्रेसर होते.


यावेळी त्यांच्या आठवणी पुन्हा जागविल्या गेल्या.आनंदच्या वाटचालीचा ओघवता आढावा घेऊन त्याचे वेगळेपण सांगणारी अनंत कान्हो , राजेंद्र देशपांडे आणि अभ्यंकर यांचेबरोबर काम केलेले एक सहकारी यांनी घेतला.

विशेषतः वाहतूकीची शिस्त पाळली नाही तर किती दुर्दैवी घटना घडू शकते यांचे आनंद आणि त्यांच्यासह अक्षय पेंडसे यांच्या चार वर्षीपूर्वी एक्सप्रेस हायवेवर झालेल्या घटनेतून समाजाला कळेल..यासाठी वाहतूक चालविताना नियम पाळणे किती महत्वाचे आहे..याची जाणीवही एका चित्रफितीतून नगसेविका सौ. माधुरी कुलकर्णी यांनी एका चित्रफीतीतून सांगितले.

नीना कुलकर्णी यांनी आपला आणि आनंदचा कसा जवळचा स्नंह होता.हे सांगून त्याच्या काही आठवणीही सांगितल्या..
विनिता पिंपळखरे यांनी नीना कुलकर्णी यांच्या रंगभूमि, दूरदर्शन मालिका आणि चित्रपट या तिहेरी प्रवासाची ओळख रसिकांना करून देणारी मुलाखत यावेळी घेतली.

सत्यदेव दुबे आणि डॉ. विजया मेहता या दोन गुरूंकडून आपल्याला मिळालेल्या अभिनयाच्या धड्याविषयी त्या मोकळेपणाने बोलल्याआपल्या नाटका दरम्यानच्या आठवणींनाही त्यानी उजाळा दिला.
अभिनय हे कुणी सहजीपणे करण्याची गोष्ट नाही.त्यासाठी तुमची पुरेशी तयारी हवी..चांगला मार्गदर्शक हवा..आणि तुम्हाला इतरांच्या भूमिकेत जावून तीचे अंतरंग समजून घेण्याची कुवत हवी..असे मत व्यक्त केले..

तासभऱ चाललेल्या मुलाखतीत आपण दिग्दर्शकाची अभिनेत्री असून अत्ता कुठे आपल्याला अभिनयातले बारकावे कळाले लागले आहेत.. हे ही नम्रपणे नीना कुलकर्णी यांनी सांगीतले.
आज दुबे आणि विजया मेहता यांच्यासारखे गुरू नाहीत .ही खंतही त्यांनी व्यक्त केली.




















- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gnail.com

9552596276

Wednesday, December 21, 2016

`आनंदरंग` पुरस्काराचा मानकरी विठ्ठल हुलावळे




नाट्यसृष्टीची गेली ४० वर्ष करणारे भरत नाट्य मंदिराचे पडद्यामागचे कलावंत विठ्ठल नामदेव हुलावळे यांना शुक्रवारी २३ डिसेंबरला दिवंगत अभिनेते आनंद अभ्यकंर यांच्या नावाने दिला जाणारा आनंदरंग पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकलाकार नीना कुलकर्णी यांच्या हस्ते पुण्यात पत्रकार संघात एका कार्यक्रमात दिला जाणार आहे..त्यानिमित्ताने

कट्यार काळजात घुसली या नाटकाचे नेपथ्य़ नाट्यसंपदा सारख्या संस्थेचे होते..रंगमंचावर प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर केला गेला होता.. त्याबरहुकूम नेपथ्य़ पुण्यात भरत नाट्यमंदिरात तयार केले गेले..योग्य वेळी तो फिरता रंगमंच हालायलाच हवा..ते काम पदड्यामागे समर्थमणे सामंभाळणारे जे काही पदड्यामागचे कलाकार होते..त्यात विठ्ठल हुलावळे हे आघाडीवर होते...नाट्यतपस्वी बाबुराव विजापुरे यांच्या चाणाक्ष नजरेतून आणि .मु वैद्य यांच्या मार्गदर्शनाने ती करामत आमचे त्यावेळचे सारेचजण चोख बजावत.,.
हा काळ सुमारे १९७७ असावा..त्यापूर्वी म्हणजे शांकुंतल आणि शारदा या नाटकाच्यावेळी पडद्यामागे हा विठ्ठल सतत झटत असायचा..उत्साह तसाच..उमेद आणि जिद्द या त्रिगुणी स्वभावाने भारलेला बॅकस्टेज कलाकार आणि भरत नाटय् मंदिर यांचे समीकरण १९७४च्या आधीपासून जमलेले..

खरे म्हणाल तर भरतचे नाटक  अगदी आजही विठ्ठलच्या हातभाराशिवाय पूर्ण होत नाही..ही अतिशयोक्तिची गोष्ट नाही..

अनेक लोकांची नावे माहिती असतात..पण तो कुठला, काय करतो, घरगूती परिस्थिती कशी यांची अनेक कलावंतांना वार्ताही नसते..त्यातलाच तो एक..विठ्ठल.. त्याला त्याच नावाने सारे लोक हाक मारित... पुढे पुढे दत्तोबा मिस्त्री, विठ्ठल हुलावळे ही त्यांची पूर्ण नावे कानावर आली..पण ती सतत वापरली जात नव्हती आजही नाहीत.

नेपथ्याची मांडामांड कशी करायची ते कोणते नेपथ्य तुम्हाला योग्य शोभेल यांची माहिती` विठ्ठल` शिवाय भरत मध्ये दुसरा फारसा कुणी जाणकार नसायचा..ही जाणकारी इतकी वाढत गेली की स्पर्धेच्या नाटकांपासून ते अगदी पुरूषोत्तम करंडकाच्या एकांकिका पर्य़ंत या पदड्यामागच्या कलावंताचे नाव सर्व कलाकारांच्या तोंडी झाले..आजही आहे...पुरुषोत्तम आणि स्पर्धेच्या नाटकात काम करणारे कलावंत हौशी त्यांची पुढे नाटकातली एंट्री कमी होत गेली..पण मोठमोठ्या हुद्यावर काम करणारे अनेक कलावंत आजही या कलावंतांना स्मरणात ठेऊन आहेत..हे विशेष.






विठ्ठलला कालवंत म्हणायचे यासाठी की तो केवळ पडद्यामागचा भाग सांभाळतो असे नाही तर कांही नाटकात तर तो छोट्या भूमिकाही करतो.. मला आठवते ती कट्यार मधला बद्रिप्रसाद..आणि इतरही..











तसा हा विठ्ठल मूळचा पिरंगूटजवळच्या गावचा...तिथे त्याची शेतीही आहे..नांगरणी,पेरणीसाठी तो आजही घरी जातो..त्याला पगार तो कीती..त्यात कसे भागायचे..म्हणून त्यांने महापालिकेतले माजी अधिकारी आणि पीडीएचे जुने कलावंत श्रीपाद आडकर यांच्या प्रभात रस्त्यावरच्या घरातली दोन चाफ्याची झाडे वार्षिक करार करून मिळविली..आणि आणि गेली २५ वर्षे  आज आडकर नसले तरी त्यांच्या मुलाच्या काळातही पहाटे ऊठून झाडावरीची फुले काढून भरतच्या समोर ती विकायचा जोड उद्योग त्याने सुरु ठेवली आहे..
त्याला काही काळ त्याच्या मुलानेही हातभार लावला..पण तोही आता आपल्या स्वतंत्र उद्योगाला लागला आहे.



पत्नीच्या अकाली निधनानंतर तसा तो एकाकी पडला..मुलीच्या लग्नानंतर मुलाचा आणि आपला प्रपंच तो उत्तम सांभाळतो..जावयांची साथही त्याला चांगली मिळाली..
पण स्वावलंबी स्वभाव. कष्टाची सवय आणि प्रामाणिक वृत्ती यामुळे आजही भरतच्या पगारावर त्यांची गुजराण सुरू आहे..

अनेक कलावंतांच्या तोंडात त्याचे नाव आजही असते..ते त्याच्या या उत्तम वर्तनाने. नाटकाचा सेट लावाय़ला आजही तो तेवढ्याच उत्साहाने पुढे असतो..भरत नाट्य मंदिराचे प्रयोग जिथे जिथे होतील तिथे हा विठ्ठल कायम कटेवर हात ठेऊन कामासाठी ऊभा दिसेल..


आपली खासगी नोकरी सांभाळून त्याने संस्थेच्या अनेक पदाधिका-यांचा विश्वास संपादन केला आहे..अनेकांच्या अडचणीला धावूनही गेला आहे.त्याची ही निष्ठा आणि कार्यतप्तरता पाहून नाटयपरिषद( मुंबई), सिंबयोसिस आणि बारामतीच्या नाट्यसंमेलनातही विठ्ठल नामदेव हुलावळे यांचा सत्कार केला गेला.
आज आनंद अभ्यंकरच्या नावाचा पुरस्कार मिळून तो अधिक समाधानी झाला आहे..


अशी अनेक अंधारात वावरणारी माणसे आहेत..जी उजेडात दिसणा-या कलावंतांच्यामागे सावलीसारखी उभी असतात..खरं तर असा असंख्य कलावंतांचा प्रातिनिधि म्हणूनच या विठ्ठल नामदेव हुलावळे यांना पुरस्कार प्रकाशात स्विकारताना
साठीच्या आसपास असलेल्या त्याला आपण सारे त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊ या.





- सुभाष इनामदार पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276