Friday, January 10, 2014

असे व्यक्तिमत्व होणे नाही..

दाजीकाका गाडगीळ...



व्यायामानंतर ज्वारीची भाकरी आणि दूध यांची न्याहरी करुन नेहमी शाकाहारी भोजन घेणारे दाजीकाका..नेहमी सांगत आरोग्य चांगले रहायचे असेल तर स्वतःच्या शरीरीची , मनाची अधिक चांगल्या पध्तीने जोपासना करायला हवी..माझ्या माहितीप्रमाणे व्यायाम आणि योगासने नियमीत करून आपले शरीर त्यांनी तंदुरुस्त ठेवले. व्यावसायाची धुरा मुलगा, मग नातू यांचेकडे सूपूर्त करुन ते स्वतः आनंदी आयुष्य जगत आले. 
सोन्यासारखी परंपरा असणारे अवघे ९८ वर्षांचे दाजीकाका गाडगीळ गेले..ही खरी न वाटणारी गोष्ट आहे...पु ना गाडगीळ ही पेढी पुण्यात घेऊन येभन तिची महती सा-या जगाला दाखविणारे पुण्याचे भूषण मह्णजे हे दाजीकाका होते. काळ्या मर्सीडीस मधून ठरलेल्या वेळी हजर राहून सर्वांना आशीर्वाद देताना कैतुकाची थाप देणारे...ते अधुनिक काळातले दानशूरच होते..
केवळ सोन्यासारखे शरीर एवढेच नव्हे तर ते कुठेही गेले तरी काहीना काही घेऊन..बक्षीसी देऊन वर खास भरपेट आशीशही देत...
काळा टोपी.तलम धोतर..आणि पांढ-या शर्टावर काळा कोट अशी प्रसन्न मुद्रा घेऊन ते वावरत..त्यांचे येणे म्हणजे मैफलीला, सभेला प्रसन्नचित्त करीत...


संगीत नाटक हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय..बालगंधर्वांची नाटके त्यांनी सांगलीला भरपूर पाहिली...पुण्यातही बालगंधर्वांवर जेव्हा सुबोध भावेंना घेभन नितिन चंद्रकांत  देसाई यांनी चित्रपट काढायचे ठरले..तेव्हाही मूहूर्ताच्या चित्रिकरणाला ते स्वतः आनंदाने सहभागी होऊन..आपण पाहिलेले बालगंधर्व याबद्दल सांगितले होते. शिलेदारांच्या मराठी रंगभूमीवरही तेवढाच जीव होता..
नाट्यसंगीत आणि संगीत नाटकांना ते जोपर्यत जाणे शक्य होते तोपर्यंत जात आणि शेवटपर्यंत निरागसपणे संगीत आकंठपणे पिऊन घेत..
व्यवसायावरही तेवढीच निष्ठा...आलेल्याग्राहकांशा आपुलकीने बोलून त्यांच्या पौटात शिरुन त्यांनी धंद्याचा जम बसविला..सचोटीने व्यवसाय करण्याचे ब्रीद त्यांनी आपल्या कुटुंबीयांना दिले..त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहूनच इतरांना खूप छान वाटे.

गेली पाच- सात वर्षं तर नियमित ते कुठेना कुठे दिसत...आमची मुलगी गोड आजोबा म्हणूनच त्यांचे नाव घेत होती...
नियमित आहार..नियमीत विश्रांती ...आणि सतत चांगल्या विचारांचे बीज पेरणारे हे व्यक्तिमत्व पुणेकरांचे लाडके झाले होते...आता ते दिसणार नाहीत...
त्यांच्या जाण्याने सुवर्णकाळ पुणेकरांवर पांघलेला ऊबदार ज्येष्ठ धीरोदात्त व्यक्तित्व हरविल्याची हूरहूर आहे.. त्यांच्या जाण्याने पुण्याचे भूषण निखळले..त्यांची स्मृती जतन करावी ती मनोमनी..

सा-या माध्यमांनी त्यांच्यावर अखेरचा लेख लिहून त्यांची दखल अतिशय उत्तम घेतली...आता असे व्यक्तिमत्व होणे नाही..हिच खंत..आणि हळहळ देखील..त्यांना हिच माझी शब्दांजली..






- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, December 30, 2013

गेलेले दिवस नाही जोडता येत

मित्रहो,
हे सारे वेगवेगळे विचार या एकात व्यक्त झाले आहेत..त्या प्रत्येकाचा स्वतंत्र विचार करा...बघा काही आपल्या  हाती लागते.... की निसटून जाते..

शोधू लागलो आहे सूख
जे आपल्याजवळच आहे
अलगद उचलून क्षणांना
मी मोहरत आहे



गेलेले दिवस उजळून
पुन्हा नाही जोडता येत
विस्तवासारखे शब्द
पुन्हा नाही निखारे होत

 







पुन्हा एकदा धावता येतं
नाती पुन्हा बांधता येतात
बंधने तुटत नसतात
ती दूर असल्यासारखी भासतात

पुढे मात्र सारे काही
मनासारखे करणार आहे
वाटणारे सारे भास
प्रत्यक्षात आणणार आहे

काटे मागे फिरताना
पहातो आहे
पुन्हा एकदा मशाली
पेट घेता आहेत

कुणा सांगावं तो दूरचा
जवळ येऊ पहातो आहे
नव्याने काही
मीही आता विणतो आहे





-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Saturday, December 28, 2013

मात- पहावा..तो इशा कोप्पीकर यांच्यासाठी


एखादी मराठी मुलगी परदेशात राहून परत आपल्या घरी आल्यावर जसे मराठी बोलेल तसाच काहीसा संवाद इशा कोप्पिकर हिच्यामार्फत मात या चित्रपटात ऐकावा लागेल. पण तीने काम मनापासून केले आहे.व्यवसायने मॉडेल अशी ती आणि तो स्ट्रक्चरल इंजीनिअर..दोघेही आदी प्रेमात मग लग्नाच्या चौकटीत अडकतात.पुढे एक मुलगी होते आणि ऐन दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या आवाजाचा मुलीवर काहीच परिणाम दिसत नाही..मग आई-वडीलांच्या लक्षात येते. ही कर्णबधीर आहे ते.



मात या चित्रपटाची कथा इथून सुरु होते..वडील..म्हणजे उच्चशिक्षीत असणारा समीर धर्माधिकारी ..हे सारे तुझ्या वडीलांमुळे घडल्याचे दुषण लावतो आणि या लॅव्हीश कुटुंबात मीठाच खडा पडतो...समीर पुढे करीयच्या मागे परदेशातच जातो..इकडे ती इशा आपले मॉडेलिंगचे करियर सोडून मुलीच्या प्रगतीसाठी पुढे सरसावते..त्याला तिच्या सासूबाईंची साथ मिळते..त्यातून हिला समजतेतीला बुध्दीबळाची जात्याच ओळख पटते आहे.मग ती एकेकाळच्या ग्रॅंड़ मास्टर असेलल्या सुहास पळशीकरकडे जातात..तिथे मिनी आता यातच गती घेणार हे दिसते..पुढे तेच होते..

खरं म्हणजे हि कथा आहे..त्या जिद्दी आई-मुलीच्या यशस्वी संघर्षाची आणि अशक्य वाटणारे सारे काही सहजपण घडू शकते जर तुमच्यात ती ताकद असेल..आत्मबऴ असेल आणि तुमच्या मागे खंबीर भूमिका घेणारे पालकांचा तेवढा सबळ आधार असेल तर...
बुध्दीबळासारखा खेळ असूनही त्यातल्या काही खेळी जर माहित असतील तर हा मध्येतरानंतर फारच बुद्दीबळाच्या खेळींनी व्यपलेला चित्रपट तुम्हाला आवडेल.नाहीतर थो़डे बोअर व्हाल..
बुध्दीबळ आवडणा-यांनी तर पहावाच..पण अंगातल्या गुणांचे चिज करणारे छत्र मिळाले तर काय होऊ शकते याचे ते एक उत्तम उदाहरण आहे.


आजच्या काळात घडणारा एक चकचकीत घरातला हा चित्रपट..वातावरणही ते तसेच...वरवर प्रेम असलेल्या कुटुंबीयासारखे.
आजही इतक्या हल्काय विटचारांचे लोक या सोकॉल्ड श्रीमंती घरात वावरतात..हे दाखविण्यात दिग्ददर्सकाबरोबर कॅमेराही तुम्हाला सांगेल..मराठी चित्रपटात का असू नये पॉश ..झगमगीत घर

समुद्र..ते किनारे...त्या गाड्यातल्या गाण्याच्यां जागा..सारे काही यात आहे...प्रथम हे सारे वरवरचे झपाटलेपण वाटते...पण जेवन्हा मीनीच्या बुध्दीबळाचे प्यादे जसे मात करु लागतात...सुहास पळशीकरांसारखा दमदार कलावंत जेव्हा सारे प्रसंग आपल्याकडे ओढत घेऊन जातात..तेव्हा ती कहाणी बनते त्या हुशार आणि जिद्दी मुलीच्या कर्तृत्वाची कहाणी..
-चित्रपट पहावासा वाटतो..तो इशा कोप्पीकर यांच्या बोलक्या चेह-यामुळे  आणि मीनीच्या हुशारीच्या चालीने..जी चाल शिकविणारे सुहास पळशीकरांच्या आत्मविश्वासात्मक संयमीत गुरुपदेशामुळे..-

-या विषयाचा पुरेसा गृहपाठ करुनच सरवणकरांनी चित्रपट वेगळा बनविला आहे..त्यांच्या दिग्दर्शनाला कलाकारांनी आणि मुख्यतः छायाकारांनी उत्तम दाद दिली आहे.

-व्यवसाय झाला तर तो कुणाला नको आहे..पण संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांच्या गीत- संगीतकाराच्या जोडीने त्यांचा बाज इथे जपला आणि जपला आहे..शब्दातील भावनांचा चित्रबध्द उत्तम केले ते पडद्यावर.
प्रत्येकाबाबत लिहले नाही तरी चालेल..पण इशा कोप्पिकरचे निवडणे हिच मोठी गोष्ट..तिची मॉडल म्हणून रुळलेली वाट इथे स्पष्ट दिसते..तशी आई आणि प्रेमळ पत्नीही...


-बुध्दीबळातील प्रभावीपणाचा उपयोग करुन जन्मतःच कर्णबधीर मुलींच्या मनात आणि त्यांच्या माता-पित्यांच्या मनाला उभारी देण्याचे एक चांगले काम इश्शा कोप्पीकर आणि समीर धर्माधिकारी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाने प्रभावीपणे केले आहे.
कलाकारांमध्ये उल्लेख झाला अनेकांचा पण जो राहून गेला पण आवश्यक होता तो मीनीची भूमिका पडद्यावर दाखविणा-या या बालकलाकाराचा..तेजश्री वालावलकर...रमाच्या भूमिकेचे सोने करुन तीच्या वाट्याला येतात ती सा-या भूमिकांना न्याय देते..इतेही तिची कणव आणि बुध्दीची चमक दिसते...यातले महत्वाचे म्हणजे आई-मुलीच्या खुणांच्या भाषेचे जे गुपित जमले आहे..तेही अनुभवायला हवे...आनंद अभ्यंकरांच्या छोट्या भूमिकेतही ती आनंदी वृत्ती चित्रपटाला सुसंगत असीच आहे..

मनोहर सरवणकर या दिग्दर्शकाचे या अवघड कामगीरीबद्दल मनापासून अभिनंदन.निर्माताही तेवढाच महत्वाचा अशा विषयावरचा चित्रपट इतक्या श्रीमंती थाटात तयार करुन आपली वेगळी प्रतिभाही त्यांनी दाखविली आहे..



-सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, December 16, 2013

छाप भीमसेन जोशींची उरतेच..


गेले चार दिवस पुणेकरांनी थंडीही अऩुभवली आणि स्वरांचे तारांगणही पाहिले...१२ ते १५ डिसेंबरच्या पाच सत्रातील स्वरांचा हा यज्ञ थांबला तो किराणा घराण्याच्या गायिका आणि गायनातील सौंदर्यस्थळाची ओळख करुन देणा-या डॉ. प्रभा अत्रे यांच्या स्वरमयी आवाजाच्या स्वराने.
वाद्य, नृत्य आणि कंठसंगीताने पुणेकरांना भीमसोन जोशी यांच्या स्मृतीचा वावर असावा असा तो मंच बहरत गेला..विविध कलावंतांनी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आपापली ताकद पणाला लावून शास्त्रीय संगीताचे हे व्यासपीठ नादवून सोडले. श्रोत्यांना तल्ली केले आणि सारा सूरांचा बहर थंडीच्या या मोसमात स्वरांच्या मखमली शालीने  पाघरून टाकला..इतका की बाहेरचा गारठा इथे केव्हाच स्वरमय होऊन वातावरण संगीतमय करुन गेला होता.. वाढलेल्या गर्दीमुळे यातील अनेकांना उबदार कपडे घालून स्वरमांडवाबाहेर उभे राहत या सोहळ्याचा आनंद घ्यावा लागला.तो रंगत गेला..पहिले दोन दिवस रात्री १० पर्यत आणि नंतर ११ शेवटी मध्यरात्रीपर्यंत हा सोहळा सुरु राहिला.


अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात अजय चक्रवर्ती यांच्या गायनाने रंगत अधिक वाढत गेली. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव हा केवळ संगीत महोत्सव नाही तर हे संगीताचे तीर्थस्थान असल्याची भावना ज्येष्ठ गायक पं. अजय चक्रवर्ती यांनी व्यक्त केली. पं. भीमसेन जोशी यांनी तीन तपे माझ्यावर पुत्रवत प्रेम केले. त्यांच्या आशीर्वादामुळे कोलकाता येथे मी १,२०० मुलांना संगीताचे शिक्षण देत आहे. माझी कन्या आणि शिष्या कौशिकी हिला पुणेकरांनी आशीर्वाद दिला. माझे १०-१२ विद्यार्थी आता स्वतंत्र मैफली करू लागले आहेत. त्यामुळे हे स्थान माझ्यासाठी तीर्थस्थानच आहे, असेही पं. चक्रवर्ती यांनी सांगितले.

तर शेवटच्या सत्रात कौशिकी चक्रवर्ती यांचे ढंगदार गायन रसिकांना अनुभवता आले. "सवाईच्या मंचावरून इतक्‍या रसिकांसमोर गाताना दडपण आले आहे,' असे सांगून त्यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनाने रसिकांची मने जिंकली. "याद पियाकी...', "ना करे चिंता' या रचनांना रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करीत अन्‌ "वन्समोअर' म्हणत खास दाद दिली. 
एकाच महोत्सवात पिता आणि कन्येचे गायन होण्याचा दुर्मिळ योग  साधला गेला आणि गुरू-शिष्या यांच्या गायनाने रसिकांना जणू अनोखी पर्वणी लाभली. 

खरं म्हणजे आनंदादायी अशा या स्वरयज्ञाची सांगता कोण करते यावर बरेच काही अवलंबून असते..ते नाव आधीच जाहिर झाल्यामुळे ते आकर्षण नव्हते..पण त्यांच्या गायनाला कीती वेळ मिळतोय हे महत्वाचे होते  पण शेवटच्या दिवसासाठी उशीराची परवानगी मिळाल्यामुळे डॉ. प्रभा अत्रे यां स्वरमंचावर रात्री १०च्या सुमारास आल्या तरी त्यांना गायनासाठी आणि रसिकांना एकण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला हे नक्की.

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांनी मारूबिहाग रागातील ' कल नही आए सावरे ' या बडा ख्यालाने गायनास सुरुवात केली. त्यांना माधव मोडक (तबला) , सुयोग कुंडलकर (हार्मोनियम) , अतींद्र सरवडीकर (स्वरमंडल) , आरती ठाकूर , चेतना बनावत आणि अश्विनी मोडक (तानपुरा) यांनी साथ केली. अत्रे यांच्या स्वरांनी भारलेल्या वातावरणात ६१व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सांगता झाली.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची पुरेपुर छाप असलेल्या या महोत्वसाला तोड नाही..हेच यातून सिध्द होते..मात्र त्यासाठी आता यापुढे का होईना संगीत रसिकांची पसंती मिळविलेले भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रावर अाजही अधाराज्या गाजविणारे कलावं आणि त्यांना पुरेसा वेळ देणे ही महत्वाची जबाबदारी अधिक कठीण आहे. ती विश्वस्त मंडळी लक्षात ठेवतील असा विश्वास वाटतो.







- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com

Saturday, December 14, 2013

तारसप्तकात फिरणा-या तांनाच्या जादूगार




शुक्रवारची दिवस विशेष लक्षात राहिला तो बेगम परवीन सुलताना यांच्या तारसप्तकात फिरणा-या तांनाच्या हुकमी जादुमयी तानांनी.
मारूबीहाग रागाच्या बंदीशीतले सारे काही नाजूक स्वरसमूह त्यांच्या आवाजात असे काही दाखल होत होते की जणू तो राग ती बंदीश त्यांच्यासाठीस रचली गेली असावी..
एकाच वेळी दोन स्वरातली तान त्यांच्या या गायनात फारच मोहक रित्या प्रस्तुत झाली.
वेळेचे बंधन होते नाहीतर त्यांनी रागाचा आविष्कार कितीही वेळ केला तरी तो मोहकपणा कमी झाला नसता..गुरूंकडून मिळालेली विद्या व त्यावर केलेल्या प्रचंड रियाजाच्या मिश्रणातून तयार झालेल्या खास परवीन शैलीत म्हणजे तीनही सप्तकांत सहज फिरणारा सुरेल गळा, अतितार सप्तकातून क्षणार्धात मंद्रात येण्याचे कसब, कधी बुलंद तर कधी मृदू, सादाला प्रतिसादाप्रमाणे येणाऱ्या स्वरावलीतून सादरीकरणाची रंगत उत्तरोत्तर वाढतच गेली.
पुन्हा एकदा मोठ्या कलाकालांना या स्वरमंचावर केवळ तास दीडतास गायची वेळ येते. रात्री दहा वाजता गायन थांबवावे लागते ही खंत पुन्हा एकदा परवीन सुलताना यांची जाहिर व्यक्त केली.
इतका चांगला ..योग्यवेळी योग्य अशी दादा देणारा रसिक फक्त याच महोत्वसात दिसतो..हे त्यांनी जाहिरपणे सर्वत्र सांगून त्यांची स्तुती केली. म्हणून तर खास `रसिका तुझ्यासाठी`च्या दोन कडव्यांची रचना अतिशय भावपूर्ण रित्या त्यानी तेवढ्याच तन्मयतेने सादर केली.
पं. मुकुंदराज देव व श्रीनिवास आचार्य यांनी तबला व हार्मोनिअमवरील संगत समर्पक अशीच होती.




- subhash inamdar, Pune
9552596276

Tuesday, December 10, 2013

गच्चीवर डुलणारी बाग


होती आवड. सवडही काढलीय..२००५ ला गच्चीवर हळुहळु एकेक रोपं लावायला सुरवात केली..आज तीच त्यांची बहरदार छबी मला आकर्षित करीत आहे..






नकळत लावलेल्या तुळशीच्या रोपट्यांचा बहर आता चहुकडे पसरला आहे..शिवाय ही कृष्ण तुळस आहे..त्यामुळे रुचीला उत्तम तशी ही आरोग्यालाही चांगली..आता त्यांच्या वासामुळेच मनही आनंदी वनून जात आहे.










अगदी नजर जाईल तिथे ही तुळस मनाला समृध्दी देते...









थोड्या वरुन ह्या तुळशीसमोरच्या कुंडीतही काही फुलांची झाडे डोलताहेत..त्यात कळीचे जास्वंद आणि पांढरी आणि तांबडी जास्वंद रोज देवासाठी उमलून येताहेत..








हिच ती अधिक जवळची छबी..आता त्यांना वर्षही बरीच झालीत..रोज कुठल्याही प्रकारची बाहेरची खते न घालता..केवळ घरातल्या ओल्या कच-यावर ती फुलली आहेत..




अगदी डाळींबाचे रोपही आनंदात डुलू लागले आहे..गणेश डाळींबाला आता फळही येत आहे..किती गोड ना..








आता हेच पहा ना..तुळशीच्या शेजारच्या वाफ्यात आलं आणि लसणाची पात किती झकास उभी आहे..आता ती पात काढायला आली आहे..तीरीही मंडइतल्या भाजीवाल्याकडून खास लसणीच्या पाकळ्या आणून सध्या तर रोज ही पात पंधरा दिवसात पुन्हा उभी रहात आहे...




उतारावर असलेल्या सिंमेटच्या छतावरही कुंड्या ठेऊन..उन्हात संरक्षण मिळते..पावसाची दाहकता कमी होते आणि नजरेला छान फुलांचा मोहरा दिसू लागतो...


असेच एखाद्या कुंडीत कुंदाचे फुलही कसे हळूच डोकावून आपली छबी इथे खास करुन दाखविते आहे..

कळीच्या जास्वंदीची फुलेही मधून डोकावून आपला लालचुटूक रंग खुलून फुललेला नजरेत भरुन येत आहे...

या गच्चीवरचा असाही एक कोपरा या कुंड्यांनी भरून गेला आहे..तरीही भरपूर जागा शिल्लक आहे.
.
मनात असलं आणि आवड असली तरी आपणही गच्चीवर असे काही आनंदाचे मळे फुलवू शकता..



- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276



Thursday, December 5, 2013

'जगण्याचा' थरार अनुभवण्याची पुणेकरांना

डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी प्रकल्पाचे छायाचित्र प्रदर्शन मृत्युच्या जबड्यात 'जगण्याचा' थरार अनुभवण्याची पुणेकरांना संधी मिळणार आहे..

क्षय रोगाने पोखरलेले देह, मेंदूच्या मलेरिया ने कोमात गेलेले रुग्ण, झाडावरून पडून हात पाय मोडलेले रोगी, जीवघेण्या विषारी सर्पांनी घेतलेले चावे, अस्वलांनी चावा घेऊन फाडलेले चेहरे घेऊन शे-दोनशे किलोमीटरचे जंगल तुडवत येणारे माडिया गोंड आदिवासी दवाखान्यात - अंगणात झाडाखाली जागा मिळेल तिथे त्यांच्यावर रात्रंदिवस चाललेले उपचार, कडेकपारीतील पाडे सोडून लिहिणं, वाचणं, जगणं शिकायला आलेल्या माडिया - गोंड मुला-मुलींना गजबजलेली आश्रमशाळा आणि बिबट्या, अस्वल, कोल्हे, साप, मगर, साळींदर, हरीण, मोर, लांडोरीपासून 'करीना' नावाच्या शुभ्र देखण्या गाढवी पर्यंत अनेकानेक अनाथ प्राण्याचं दुखलं - खुपलं पाहत त्यांना सुखाने एकत्र नांदावणार अनाथालय !

हे जग प्रत्यक्षात अस्तित्वात आहे…गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या गावात ! डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेली ४० वर्षे अखंड राबून उभी केलेली "लोक बिरादरी प्रकल्पातील" हि अनोखी दुनिया पुणेकरांसमोर खुली होत आहे एका छायाचित्र प्रदर्शनाच्या निमित्ताने. महारोगी सेवा समिती, वरोरा द्वारा संचालित लोक बिरादरी प्रकल्पातल्या गेल्या ४० वर्षातल्या वाटचालीचे काही थरारक क्षण जिवंत करणाऱ्या सुमारे १४० छायाचित्रांचे व बांबू क्राफ्टचे प्रदर्शन भारतरत्न पं. भीमसेन जोशी कलादालन, औंध, पुणे, दिनांक ६ ते १० डिसेंबर २०१३, वेळ सकाळी १० ते रात्री ८ येथे आयोजित करण्यात आले आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते श्री. गिरीश कुलकर्णी या प्रदर्शनाचे उद्घाटन करणार आहेत.

बांबू क्राफ्ट प्रदर्शन: छायाचित्रांबरोबरच प्रकल्पातील आदिवासी विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी बनविलेल्या बांबू हस्तकलेच्या वस्तूही या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. आदिवासी बांधवांना रोजगार मिळावा म्हणून लोक बिरादरी प्रकल्पा मार्फत बांबू क्राफ्ट प्रशिक्षण व विक्री केंद्र चालविल्या जाते.

पुस्तके व फिल्म: लोक बिरादरी प्रकल्पाच्या कार्यावर आधारित विडीओ फिल्म तसेच प्रकाशवाटा¸ समिधा¸ नेगल¸ रानमित्र¸ एका नक्षलवाद्याचा जन्म इत्यादी पुस्तके सुद्धा प्रदर्शनात उपलब्ध असणार आहेत.
महाराष्ट्राच्या एका टोकाला अतिशय दुर्गम भागात चालणाऱ्या या निरलस कार्याचा प्रारंभ स्व. बाबा आमटे व स्व. साधनाताई आमटे यांनी १९७३ मध्ये केला. त्यानंतर डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी अन्य कार्यकर्त्यान समवेत ही जबाबदारी उचलली. आज हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्यात दरवर्षी ३५ ते ४० हजार रुग्ण मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतात. लोक बिरादरी च्या आश्रमशाळेत सुमारे ६५० आदिवासी विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. तसेच जंगलतोड आणि शिकारीमुळे मरणाच्या तोंडाशी पोहोचलेल्या अनाथ वन्य जीवांना आमटेज् अनिमल आर्क (वन्यप्राणी अनाथालय) मध्ये अभय देण्याचे कार्य अविरत सुरु आहे.

लोक बिरादरी मित्रमंडळ, पुणे आयोजित या प्रदर्शनाच्या ठिकाणी लोक बिरादरी प्रकल्पाचा थरार पडद्यावर उलगडणारी "अरण्यातल्या प्रकाशवाटा" ही ध्वनीचित्रफित उपस्थितांना दाखविण्यात येणार आहे.
पुण्यातील सजाण-जागृत-संवेदनशील नागरिकांनी सह कुटुंब - सह परिवार या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि लोक बिरादरी प्रकल्पातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवावा असे आवाहन मित्रमंडळा तर्फे करण्यात येत आहे.
अधिक माहिती करिता श्री. सचिन मुक्कावर - ७५८८७७२८५८ यांच्याशी अथवा लोक बिरादरी मित्रमंडळ, पुणे च्या कार्यकर्त्या सौ. शिल्पा तांबे - ९८५०६६६७२९ यांच्याशी संपर्क करावा.

आर्थिक मदतीचे आव्हान: आदिवासी बांधवानकरिता विनामूल्य चालविण्यात येत असलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्याची जुनी इमारत मोडकळीस आली आहे. त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येत आहे. जवळपास रुपये ५ कोटी खर्च अपेक्षित आहे. ४ कोटी रुपये देणगी मिळविण्यात प्रकल्पाला यश आले आहे. अजूनही १ कोटी रुपये जमवायचे आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी देणगी स्वीकारण्यात येईल. नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी असे आव्हान करण्यात येत आहे.


ऑन लाईन देणगी पाठवावयाची असल्यास खाली दिलेल्या खात्यात देणगी जमा करता येते.

S.B. Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora S.B. Account No.: 20244238823 (Bank of Maharashtra, Bhamragad branch) IFSC: MAHB0001108


Tuesday, December 3, 2013

का सांधतो मी कुणाचे




का सांधतो मी कुणाचे
जे आपणास ठावे
कधी बांधीला दुरावा
तो दूर अंतरी दिसे

किती मोह पडावा याचा
अंर्तबाह्य रुपेरी
पडदा पाहून लपला
दूर चेहरा हासरा

का अनंदाचे डोह
पाहता उजळे माथा
किती किरणे नाचती समोर
चमकून मोहवी मजला

हा गोड लाघवी चेहरा
कधी हाती लागे मजला
त्यादिनी एक परंतू
अलगद टिपून गेला




-सुभाष इनामदार,पुणे

Monday, November 11, 2013

शिंत्रे यांचा हा परिवर्तनाचा प्रयत्न आहे

 
`पुष्पाचे प्राक्तन `कथेच्या पुस्तकाचे प्रकाशन
 
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने केवळ `प `या अक्षरातून मिलिंद शिंत्रे यांनी साकारलेल्या मराठीतल्या एकमेवाद्वितीय अशा `पुष्पाचे प्राक्तन `कथेच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातल्या प्रायोगिक समजल्या जाणा-या सुदर्शनच्या रंगमंचावर ज्येष्ठ समिक्षक आणि माजी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. द. बि. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशीत करण्यात आले.
मिलिंद शिंत्रे यांची गणती पुण्याच्या विक्षिप्त अशा माणसांच्या यादित करण्यात श्रीरंग गोडबोले विसरले नाहीत.. त्यांचा हा वेडेपणाच आणि इतरांपेक्षा काही वेगळा प्रयत्न यालाही त्यानी दाद दिली..
मराठी भाषेत अशा पध्दतीचा एक वेगळा प्रयत्न आपले मित्र मिलिंद शिंत्रे करीत असल्याबद्दल नाटककार चं.प्र. देशपांडे यांनी मराठी भाषेची राज्याकडून होत असलेली हेळसांड आणि इतर राज्यांच्या मानाने भाषेच्या संवर्धनासाठी माणशी १ रुपया आणि अस्थापनासाठी त्यातलेच ५० पैसेच खर्च होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली..आता भाषा टिकविणे हे आपल्याच भाषिक लोकांच्या हाती असल्याने असा वेगळ्या पुस्तकानिमित्ताने पुन्हा मराठी भाषेला जागतिक स्वरुपात कोंदण लाभले असल्याचे अभिमानाने सांगितले.
तर बरोबर उलट मत द.भिं. कुलकर्णी यांनी मांडले..ते म्हणाले की भाषा बुडत चालल्याची ओरड मला मान्य नाही..मराठी भाषा कधीच बुडणारी नाही...ती विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी म्हटल्याप्रमाणे मराटी भाषेला काहीही झालेले नाही..तीची नाडी व्यवस्थित सुरु आहे...मराठी भाषेत परिवर्तन होत आहे..शिंत्रे यांचा हा परिवर्तनाचा एक खास प्रयत्न आहे..त्यांचे अभिनंदन..

प्रकाशनाच्यानंतर याच कथेच्या अबिवाचनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला..तो दिली यात स्वत लेखक शिंत्रे, शर्वरी जेमिनीसःफाटक, धीरेश जोशी, गोरी लागू इत्यादिंचा... समावेश होता...केवळ` प` वरून गीत करुन आणि पपपप पपप करुन सनईची वाजंत्री वाजवून ओंकार केळकर यांनी या अभिवाचनाला संगीत दिले होते..
एकूणच हा मराठी भाषेतला
पुस्तक प्रकाशनाचा प्रकर्षाने पचविलेला प्रकार पुन्हा पुन्हा प्रकट प्रवाहा प्रमाणे पराकोटीने पूर्ण पावावा..
 
 
-subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, October 7, 2013

माणसात असूनही स्वतःलाच शोधतोय मी

 
 
गर्दीत हरवेलेला चेहरा शोधतो आहे कधीचा
न्याहळतो आहे माझाच चेहरा मी कधीचा

माणसात राहून स्वतःचा चेहराच हरवलोय मी
दूर जाऊन एकांतात म्हणतो पाहीन मी
किती दिवस झाले मी मलाच ओळखले नाही
चेहरा हरविलेला माणूस होत आहे मी

नव्याने माणूसपण शोधण्याची वेळ आली आहे
एकमेकांना आधार शोधतोय मी
लख्ख प्रकाशातही पाहता येत नाही
डोळे दिपवून टाकणारे भोवताल पाहतो आहे मी

उजळून इतरांना मीच हरवत आहे..
माणसात असूनही स्वतःलाच शोधतोय मी
 
-subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com
9552596276