पं. अजय चक्रवर्ती यांचे लालित्यपूर्ण सादरीकरण आणि पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर अतिशय मोजक्या वेळात छेडलेला "दुर्गा', ही सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या पहिल्या सत्राची वैशिष्ट्ये ठरली.
पहिल्या सत्राचा प्रारंभ तुकाराम दैठणकर यांच्या सनईवरील "भीमपलास'ने झाला. सनईवादनाच्या सलग चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे तुकाराम दैठणकर यांनी सनईच्या मंगल सुरांनी महोत्सवावरील सावट दूर तर केलेच; पण सुंदर लयकारीचे दर्शन घडवत रागमांडणी केली. विलंबित एकतालातील त्यांचे वादन "अब तो बडी बेर' या रचनेशी साम्य दर्शवणारे होते, तर त्रितालातील रचना "नैना रसीले जादूभरे' या रचनेसारखी वाटली. त्यांना मंगेश करमरकर यांनी तबल्याची उत्तम साथ केली. सीतलाप्रसाद (सनई), गणेश व अशोक दैठणकर (स्वरपेटी), नितीन दैठणकर (सुंद्री) हे त्यांचे अन्य साथीदार होते.
आश्वासक गायन युवा गायक कृष्णेंद्र वाडीकर यांनी या महोत्सवात प्रथमच गायन सादर केले. त्यांचे गुरू श्रीपती पाडेगार हे पं. भीमसेनजींचे ज्येष्ठ शिष्य होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली म्हणून वाडीकर यांच्या गायनाचे आयोजन केल्याचे या प्रसंगी श्रीनिवास जोशी म्हणाले. वाडीकर यांना अर्जुनसा नाकोड यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याचे, तर पाडेगार यांच्याकडून किराणा गायकीचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी "राग पटदीप'मध्ये "धन धन घडी' हा विलंबित एकतालातील ख्याल मांडला. त्यांचा आवाज उत्तम आहे; पण परिपक्वता आणि वजन येण्याची गरज आहे, असे जाणवले. "पटदीप'मध्ये शुद्ध निषादावर अपेक्षित असणारा न्यास, या गायनात दिसला नाही. मात्र लयकारी आणि बोलताना उत्तम होत्या. विशेषतः एक आवर्तन-अर्ध्या आवर्तनातील बंदिशीचे शब्द घेऊन आलेल्या बोलताना खास ग्वाल्हेर घराण्याच्या होत्या. त्यांनी "पिया नाही आये' ही बंदिश मांडली. ताना जोरकस असूनही वैविध्य कमी वाटले. "स्मरता नित्य हरी, मग ते माया काय करी' हे भजन आणि रसिकाग्रहास्तव एक कानडी भजनही त्यांनी ऐकवले. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) तसेच शिरीष कुलकर्णी आणि प्रशांत यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
तालमीचे गाणे ज्येष्ठ गायक, गुरू आणि रचनाकार पं. सी. आर. व्यास यांचे पुत्र आणि शिष्य सुहास व्यास यांनी पूर्वी रागाची मांडणी केली. त्यांनी निवडलेला राग अलीकडे फारसा गायला जात नाही, तसेच त्यांनी हा राग तिलवाड्यात (१६ मात्रा) मांडला. सुरवातीला तालाचे वजन लक्षात येण्यासही रसिकांना जरा वेळ लागला; पण ते लक्षात येताच गायनात रंग भरला. व्यास यांना वडिलांप्रमाणेच पं. के. जी. गिंडे यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे. "तालमीचे गाणे' असेच त्यांच्या सादरीकरणाचे वर्णन करावे लागेल. विशेषतः तार सप्तकातील गंधारावरचे काम त्यांनी चांगले केले. "बनत बनाओ बन नहीं आये' या द्रुत बंदिशीत ताना, लयकारीही उल्लेखनीय वाटली. व्यास यांचे स्वरलगाव, ठेहेराव त्यांच्या वडिलांची आठवण करून देत होते. याच रागातील एक तराणा त्यांनी एकतालात सादर केला आणि "एक सूर चराचर छायो' या भजनाने सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) आणि आदित्य व्यास व अनुजा देशपांडे यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
रंगतदार वादन पं. शिवकुमार शर्मा यांनी मोजक्या वेळेचे महत्त्व जाणून पाच स्वरांच्या "दुर्गा' रागाची निवड केली असावी. ते सिद्धहस्त कलाकार असल्याने थोड्या वेळातही त्यांच्या वादनाने रंग भरला. मोजक्या आलापात "दुर्गा'रूप दर्शवून अतिशय नेटके तरीही प्रभावी रागचित्र त्यांनी निर्माण केले. "झाला' मात्र त्यांनी आटोपता घेतला, असे वाटले. "दुर्गा' रागातील १३ मात्रांतील "जय' तालात (४-४-५ अशी मात्रा विभागणी) त्यांनी अप्रतिम सादरीकरण केले. तबलावादक योगेश सम्सी यांच्यासह द्रुत वादनातील रंगतही रसिकांची दाद मिळवून गेली. त्रितालातील एक रचना ऐकवून त्यांनी "पहाडी'मधील नवी रचना ऐकवली. डॉ. धनंजय दैठणकर यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
लालित्यपूर्ण गायन पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. अजय चक्रवर्ती यांच्या अत्यंत लालित्यपूर्ण गायनाने पहिल्या सत्राचा समारोप झाला. त्यांना योगेश सम्सी (तबला), अजय जोगळेकर (हार्मोनिअम) यांनी साथ केली. पं. ग्यानप्रकाश घोष यांचे मार्गदर्शन लाभलेल्या चक्रवर्ती यांच्या गायनात वैविध्य आणि भावपूर्णतेचा दुर्मिळ संगम होता. "खमाज'मधील "आय आयो पाहुना' ही पं. घोष यांचीच रचना त्यांनी मांडली. "खमाज' हा मांडणीचा राग म्हणून सहसा गायला जात नाही. बहुधा उपशास्त्रीय रचना त्यात सादर केल्या जातात; पण चक्रवर्ती यांनी शुद्ध खमाज मांडला आणि अन्य "मिश्रपणा'पासून खमाज अलिप्त ठेवला, हे आवर्जून नोंदवायला हवे. "काहे करत मोसे बरजोरी' ही त्यांची स्वतःची बंदिश झपतालात बांधली होती. बडे गुलाम अली खॉं यांची "मनमोहन शाम रसिया' ही त्रितालातील रचना, "कोयलियॉं कूँक सुनावे' (यातील कूँक या शब्दावरील नि सा या स्वरांचा न्यास अप्रतिम) "आज मोरी कलाई मुरकतली' ही रचना...असे वैविध्य त्यांच्या गायनात होते. मंद्र सप्तकापासून अतितार सप्तकातील स्वरांचे काम, आकारयुक्त गायन, दमसांस, भावपूर्णता, तिन्ही सप्तकांत फिरणारा आवाज, अप्रतिम सरगम, गमकी ताना, स्वरांचे लगाव, ठेहेराव आणि आंदोलने...अशा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असणारे हे गायन त्यातील विलक्षण सहजता आणि प्रसन्नतेमुळे रसिकप्रिय ठरले. "आवो भगवान' या भैरवीने चक्रवर्ती यांनी गायनाची सांगता केली.
No comments:
Post a Comment