Sunday, September 6, 2009

व्यथा पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिराची ...



  • (मराठी रंगभूमीवर स्वतःची प्रतिमा कोरलेल्या, स्वर्गीय आवाजाची जादू असलेल्या बालगंधर्वांच्या नावाने पु. ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी केली. मात्र आज तिथे होत असलेले मनोरंजन कार्यक्रम पाहून स्वतः बालगंधर्व काय म्हणत असावेत, याचे काल्पनिक शब्दचित्र...)

अरेरे, काय अवस्था केलीय या नाट्यमंदिराची. मायबापहो, तुम्ही तरी कसे सहन करता हे सारे. संगीत नाटकांसह मराठीतील चांगली नाटके मी आजपर्यंत इथे पाहत आलोय! आज संगीत नाटके इथे होतायत तरी कुठे. जी काही होताहेत तीही दोन-अडीच तासात संपताहेत. काटछाट केलेली नाटके मायबाप प्रेक्षक सहन करताहेत. ना नाटकाचा मजा, ना संगीताची लयलूट. वन्समोअरला तर संधीच नाही. पण कधीतरी ती मी अनुभवतो आहे. अजून तरी संगीत नाटक पुरते मृतप्राय झालेले नाही. "घाशीराम..'सारख्या नाटकांना संगीत नाटक म्हणण्याची रीत काही नाटकवाल्यांनी सुरू केली होती. पण आज ते तरी कुठे होतेय.मायबापहो, तर सांगत काय होतो, नाटकांसाठी माझ्या नावाचे थिएटर उभारले गेले. पण आज त्या रंगमंदिरात नाटकांपेक्षा लावण्यांची अधिक वर्णी लागलीय. त्यांचीही कला आहे. त्यातही संगीत आहे. पण त्यात संगीत कमी आणि सौंदर्य अधिक दिसतेय. आणि येणारा प्रेक्षक तरी कुठला? पान खाऊन बचाबचा थुंकणारा. शिट्ट्या मारून दाद देणारा. मलाही लोककलेबाबत आदर आहे. नव्हे, आमच्याही पदांच्या काही चाली तिथूनच संगीत नाटकात आल्यात. पण म्हणून माझ्या नावाच्या थिएटरमध्ये असे लावण्यांचे पेव मी पाहतो आहे. 'दादा ते आले ना' प्रमाणे मला म्हणावेसे वाटते, "दादा ते नको ना!' नाटकांचे प्रयोग कमी होताहेत. प्रेक्षक तुमच्या त्या चौकोनी खोक्‍यातले कार्यक्रम पाहत घरीच सुखावत चाललाय.

मायबाप कमी झालेत. मग नाटकांची संख्याही रोडावलेली दिसते. त्या मातब्बर नाटकसंस्थांचे प्रयोगही फारसे माझ्या रंगमंदिरात होत नाहीत. एकूणच नाटकांची अवस्थाही बिकट होत चाललेली दिसतेय. हाउसफुल्लची पाटी आणि त्याला घातलेला हार पाहण्याचे नशीब तर माझ्या वाटेला आता यापुढे दिसेल की नाही याबद्दल मलाच शंका आहे.म्हणून मग आर्यभूषणची जागा या माझ्या रंगमंचानं घ्यावी ना?. हाय रे दैवा. काय काळ आलाय!नाटके कमी आणि लावण्या अधिक मी अनुभवतोय. वैतागलोय आता.


माझे "नाव' तेही आता बदलून टाका एकदाचे!


सुभाष इनामदार, पुणे

1 comment:

Anonymous said...

उत्कृष्ठ लेख.

मध्यमवर्गियांची सवंग आवड हे सध्याच्या सांस्कृतिक दुःस्थितीचं एक मोठं कारण आहे.