
गुढी पाडवा. .चैत्र शुध्द एक. भारतीय नव्या वर्षाचा पहिला दिवस. देशात ही सार्वजनिक सुट्टी होती. हिंदू धर्मात या सणाचे महत्व मोठे आहे. नव्या कार्याचा आरंभ या दिवशी केला जातो. नवे संकल्प केले जातात. नव विचारांची, आचारांची सुरवात होते.
सामान्य वर्गात आपल्या ऐपती प्रमाणे गुढी उभारून गोड केले जाते. नवे कपडे घालून देवाला पाया पडायला जाण्याची प्रथा आहे. एकमेकांच्या घरी जावून नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात. असे कितीतरी.....
पण कालचा अनुभव पहाता. कालाय तस्मैन महाः .. काळ बदलला. विचार वेगळे होत चालले. संगणकाचे युग आले. एस एम एस वाजू लागला. सोवळ्याच्या जागी साधे कपडे आले. अंगणे गेली. दारे छोटी झाली. रांगोळी गायब होवून तिथे शहाबादी फरशीच्या उंबरठ्यावर तुळशी बागेतली कायमची अशी चिटकवलेली पट्टी आली. लवकर उठण्याची घाई नसल्याने टिव्ही पाहून सावकाश , पेपर वाचन झाल्यावर एकेकाच्या आंघोळी उरकून गाठीची माळ, सोबत तयार आणलेला हार आणि दोन रूपायला मिळालेली कडुनिंबाची काडी जोडून काठीवर वस्त्राला एकत्र करून गुढी जशी उभारली गेली. यात उत्साहापेक्षा परंपरा सांभाळणे इतकेच राहिले. घरी दुकानातून आयात केलेले गोड पदार्थ ताटात घेउन पोटावर हात फिरवत जेवणे उरकली गेली. तसाच सहजी हा सारा कार्यक्रम दिवसभरात यथावकाश पार पडला.
बाहेर गावात संस्कारासाठी निर्माण झालेल्या संस्थांची मिरवणूक नाचत होती. सणांचे ते जाहिर दशर्न होत असते. हिंदू म्हणून जन्म घेतलेते कांही निवडकच यात होते. इतर तमाम मंडळी जमेल तसा गुढी पाडव्याचा आनंद आपापल्यापरिने घरीच घेत असतात.
एस एम एस वर मात्र दिवसभर गुढी पाडव्याच्या शुभेच्छा येत असतात. पण ते कोरडे संदेश. त्यात भावनेपेक्षाही तांत्रिकता अधिक. संध्याकाळी एम पी एलच्या क्रिकेटसाठी टिव्ही समोर क्रिकेटप्रेमी सज्ज. ठराविक कार्य्रक्रमांना गर्दी. कांहीच मंडळी रस्त्यावर. बाकी आपापल्या करमणुकीत मग्न.
महागाईचा पर्वत उंचच होत चाललाय. रोजचे जिवन जगण्याचे प्रश्न आ वासून उभे. राजकारणाला भ्रष्टाचाराचा टिळा लागलेला. उद्याची भ्रात पडलेल्या सामान्य माणसांसाठी असे कित्येक सण येतात ते केवळ कॅलेंडरवर. तीथेच ते संपतात. केवळ सुट्टीचा आनंद घेत आरामत दिवस काढणे हेच महत्वाचे.माणसांची माणुसकी गोठत चालल्याचे प्रत्यय येत आहे. शेजा-यावर प्रेम करा ची संकल्पना बाजूला झालीय. शेजारी कोण आहे याची माहितीही नसते ही वस्तुस्थिती आहे.
अशातच मोबाईल, टीव्ही मालिका, आणि संगणकाने जगाला जवळ आणण्याचे यत्न होत असताना माणसाच्या संवेदना गळून पडताहेत. नजर बोथट झालीय. शरीर केवळ जगण्यासाठी धावते आहे. शिक्षणाखाली जुंपला गेलेला विद्यार्थी पुस्तकाची घोकंपट्टी करण्यात वेळ घालवतोय. यात कांही ठिकाणी मास्तरच कॉपी करणायत गुंतल्याची उदाहरणे घडताहेत. शिक्षणसम्राट धनदांडगे बनत चाललेत. नोकरीसाठी प्रयत्न करणा-याला रोज वेगळाच अनुभव मिळतोय.
कुठे चाललाय समाज. आणि आपण.
सण आणि संस्काराची नाती कुठवर बांधत ठेवायची.. हाच प्रश्न मला तरी आज पडलाय.तुम्हालाही तसेच वाटतेय ना.....मग माझ्या ब्लॉगवर आपणही प्रतिक्रया द्या...
सुभाष इनामदार, पुणे.
email- subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276..
No comments:
Post a Comment