Friday, March 12, 2010

संगतकारांचा सार्थ सन्मान


उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना शुक्रवारी चिंब भिजवले. संध्याकाळी आलेल्या पावसाने जसा आनंद दिला तसाच तो काही दशके संगीत क्षेत्राला स्वतःच्या वादनकलेने तृप्त करणाऱ्या दोन वादकांनाही दिला. पावसाची उघडीप झाल्यावर या वादकांचे चाहते बाजीराव रोडवरच्या गांधर्व महावाद्यालयात दाखल झाले.
एक होते हार्मोनियमवादक नरेंद्र चिपळूणकर तर दुसरे तालवाद्य तरबेज राजेंद्र दूरकर.
दोघेही पदवीने डाॅक्टर पण त्यांचा सन्मान केला गेला तो त्यांच्या वादनक्षेत्रातल्या कामगिरीमुळे. अनेक गायकांना साथ करताना स्वतःचे कर्तृत्व सिध्द केलेले आजच्या वादनक्षेत्रातले दोन अढळपद कमावलेले दोन तारेच.

ज्येष्ठ भावगीत गायक अरूण दाते यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष दाजीकाका गाडगीळ यांच्याकडून संगतकाराचा पुरस्कार स्विकारताना पाहणे हेही भाग्य होते. गायकांना, संगीतकारांना, गीतकारांना पुरस्कार मिळतात पण जे हात गाण्य़ातला ठेका आणि सूर थेट तुमच्या मनापर्यंत पोचवितात अशा पट्टीच्या वादकांची आठवण यानिमित्ताने गांधर्व महाविद्यालयाला होते आणि ते त्यांचा सन्मान करतात यातच वादकांचे मोठेपण सिध्द होते.

यानिमित्त बोलताना अरूण दाते यांनी तर जाहिरपणे सांगून टाकले की मी जोपर्यंत गाण्याचे कार्यक्रम करत राहिन तोपर्यंत नरेंद्र चिपळूणकर हेच हार्मोनियमच्या साथीला असतील. यापेक्षा मोठा सन्मान वादकाला दुसरा कुठला असू शकेल.
राजेंद्र दूरकर यांनी आपल्या मनोगतातून या पुरस्काराबद्दल झालेला आनंद व्यक्त करताना गांधर्व महाविद्यालयाचा हा पुरस्कार म्हणजे आम्हाला मिळालेल्या पद्श्री पुरस्करासमानच आहे.
साथीदारांचा हा सन्मान म्हणजे संगातावर प्रेम करणाऱ्या सर्वांचा आहे.
यावेळी रसिकांना आपल्या कलेचा आस्वाद देण्यासाठी प्रज्ञा कुलकर्णी आणि संजिव मेंहेंदळे यांच्या सुगम गाण्याचा कार्यक्रम सादर केला गेला. याला साथ-संगत होती ती याच पुरस्कारप्राप्त साथीदारांचा. यानिमित्त अरूण दाते आणि अनुराधा मराठे यांनी एक युगलगीत सादर करून संगतकार पुरस्कार्थींना आगामी काळासाठी शुभेच्छा दिल्या.

साथीदारांसाठी दिल्य़ा जाणाऱ्या पुरस्काराने वाद्यवादन करणाऱ्या असंख्य कलावंतांनाही प्रेरणा लाभेल.



सुभाष इनामदार, पुणे.

email_subhashinamdar@gmail.com
mob. 9552596276

No comments: