Saturday, July 10, 2010

पोएट बोरकर....


शब्दांच्या वैभवाने नटलेल्या झाडासारखे विस्तिर्ण मन. त्यात रसिला प्रेमळता झिरपणारी. तेवढाच भावनांचा आविष्कार..मखमली शब्दांनीच फुलावणारी ती तर एक वरवरची नाही तर खोलवर रूतणारी .
गोवा हा तर त्यांच्या कविमनाला भूर घालणारा.. पुण्या-मुंबईत असले तरी माडांच्या स्वप्नांची दाटी येते ती त्या गोव्यातल्या भूमितली.
पुण्यातला एखादा माड पाहिला की त्यांना त्याची कीव यायाची.
माडा-पोफळीच्या धुंदीत विसावलेला. पावसाच्या सरींचे दर्शन देणारा हा कवी सॉरी पोएट बोरकर....
आकाशवाणीच्या चार भिंतीतही स्वतःचे अस्तित्व कायम ठेऊन आपल्याच मस्तीत आणि गुंगीत जगणारे बा भ. बोरकर.
त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुरूवारी ८ जुलै २०१० या 'बाकीबाब' च्या जुन्या आठवांना उजाळा देतानाच त्यांच्या प्रतिभेला सलाम करावा आणि त्या स्मृती उजळ कराव्यात म्हणून आम्ही गोयंकर, विवेक व्यासपीठ आणि संवाद या संस्थांनी ' जिणे गंगौघाचे पाणी' या कार्यक्रमातून विस्मरणात गेलेल्या काव्याला . गीतांना आणि शब्दांना बाहेर काढले. पुन्हा एकदा त्या शब्दांवर बा. भ बोरकरांची मोहोर कायम केली.
नाट्यासंमेलनाचे अध्यक्ष रामदास कामत यांची पदे. निशा पारसनीसांचे अभंग. अरूणा ढेरेंची बोरकर उलगडून सांगणारी शब्दमैफल. साराच योग जुळून आला.
त्यातही बोरकरांच्या ' ज्ञानदेव गेले तेव्हा ` कवीतेमधून चित्रकार सुहास बहुलकरांना काय जाणवले यांचे रंगमंचावर उजळ केलेले चित्रही एक वेगळा आविष्कार घडवून गेला.
उत्तरा मोने आणि प्रमोद बापट यांनी निवेदनातून बोरकरांच्या प्रतिभेचे एकेक पैलू उलगडत, बिंबवत नेले.

संदीप खरेंनी बोरकरांच्या तीन कवीतांचे सादरीकरण करताना बोरकरांच्या प्रतिभेला हॅट्स् ऑफ केले.
सलील कुलकर्णींच्या सूरांनी बोरकर काव्य ऐकण्यातली मजा आणखी चाखायची मदत केली. अनुराधा मराठेच्या आवाजाची जादूही त्यातूनच अनुभवता आली.

सारेच त्या एका महान कवीसाठी .....बा.भ. बोरकर...



-सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: