Thursday, February 13, 2014

'तुझ्याच आसपास मी' -स्वप्निल बांदोडकरांचा अल्बम

'व्हेलेन्टांईन डे' च्या पर्वावर निमित्ताने


'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप', मुंबई या भारतातील अग्रगण्य म्युझिक कंपनीद्वारे निर्मित स्वप्निल बांदोडकर यांच्या सुमधुर स्वरांतील 'तुझ्याच आसपास मी' या सुश्राव्य म्युझिक अल्बमचे लोकार्पण सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात संगीत प्रेमींच्या उपस्थितीत थाटामाटात करण्यात आले. 

या समारंभालाला मेघे समूहाच्या विश्वस्त शालिनी ताई मेघे, माजी आमदार सागर मेघे, गीतकार संजय इंगळे तिगावकर, संगीतकार अजय हेडाऊ, ख्यातनाम गायक अनिल खोब्रागडे, गायिका मधुरा कुळकर्णी, नाट्य दिग्दर्शक हरीश इथापे, सामाजिक कार्यकर्ते सुनील बुरांडे, संगीततज्ञ मुकुंद कुळकर्णी, संगीता इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

कवी संजय इंगळे तिगावकर यांच्या समर्पक आणि हृदयस्पर्शी शब्दांना अजय हेडाऊ यांच्या दर्जेदार संगीत नियोजनाने श्रवणीय केले असून नव्या पिढीचा लाडका गायक स्वप्निल बांदोडकर यांच्यासह अनिल खोब्रागडे आणि मधुरा कुळकर्णी यांनी गायलेल्या सर्व गीतरचना महाराष्ट्रात लोकप्रिय होतील, अशी सदिच्छा माजी आमदार सागर मेघे यांनी यावेळी व्यक्त केली. 

'व्हेलेन्टांईन डे' च्या पर्वावर दाखल झालेल्या या अल्बमचे नामकरण गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी केले असून युनिव्हर्सलचे विभागीय व्यवस्थापक राजन प्रभू यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे. या समारोहात अनिल खोब्रागडे, मधुरा कुळकर्णी आणि अजय हेडाऊ यांनी गीतरचना सादर करून रसिकांची उस्फूर्त दाद मिळविली. कार्यक्रमाचे संचालन एमगिरी रेडिओचे निवेदक सचिन घोडे यांनी केले. 

विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य आणि संगीत क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती. आयोजनात स्वरात युवा मंचाचे आकाश  राजूरकर, भगता फिल्सचे संदिप भगत, संजय जवादे, विद्यानंद हाडके, अंकुश कत्रोजवार, मिथिला पानसे आदींचे सहकार्य लाभले.