-अजय-अतुल यांच्याबद्दल भास्कर चंदावरकरांचे मत
ज्येष्ठ संगीतकार , ज्येष्ठ सतारवादक आणि संगीताचे अभ्यासक पं. भास्कर चंदावरकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनामित्ताने आजचे आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांची मुलाखत होती..त्या प्रसंगी त्यांच्या पत्नी मीना चंदावरकरांनी आपल्या कलाकार पतीबद्दलचे मनोगत व्यक्त केले..त्यातून काही प्रमाणात चंदावरकर आणि त्यांचे कर्तृत्व कळेल..म्हणून मुद्दाम तेच त्यांचे विचार तुमच्यापर्य़त थेट पोचविण्याचा हा प्रयत्न...
ही पाचवी आणि शेवटची स्मृतीमाला आहे. हे वाचून काहीजणांना आश्चर्य आणि वाईट वाटेल. त्यांनी तसं मला पत्रानं किवा फोन करुन कळवलही. संगीताशी संबंधित असलेल्या आणि विशेषतः चंदावरकर यांना ज्यांचे संगीत फार प्रिय होत असा व्यक्तिंना बोलावण्याची ही संधी आम्हाला घालवायची नव्हती. त्यांना काही संगीतरचनाकार फार प्रिय होते. ते म्हणायचे संगीतरचनाकर आणि चाली पाडणारी माणसं यात जमीन आसमानचा फरक असते. कंपोजर आणि ट्यूनमेकर हे निराळेच असतात.
त्यांना अजय-अतुल यांच्या रचना अतिमनःपूर्वक आवडायच्या. त्या दोघांच्या सांगितिक प्रतिभेबद्दल आणि सर्जनशीलतेबद्दल त्यांना खूप कौतूक आणि आदर वाटत असे. ते आम्हाला माहित होतच. चंदावरकरांना आवडणारे संगीतकार म्हणजे सलील चौधरी, मदन मोहन, सी.रामचंद्र, पं. रवीशंकर, एस.डी.बर्मन, आर.डी.बर्मन तसेच मराठीतले वसंत पवार आणि राम कदम . संगीत सागरात अवगाहन करून सांगितिक विचारांची रत्न आपल्यापर्यंत पोचविणारे संगीतरचनाकार हा त्यांचा मानसिक, वैचारिक विसावा होता. एस. डी बर्मन आणि अजय-अतुल यांच्यामध्ये चंदावरकरांना एक साम्य आढळत असे. सहा वर्षाच्या मुलापासून ते साठी-सत्तरीच्या वृध्दांपर्यत सर्वांना बर्मनदांचं आणि अलीकडे अजय-अतुल यांचे संगीत त्यांच्या तालावर आणि नादावर डोलायला लावत असे.
याचा प्रत्यक्ष अनुभव मला आणि माझ्या सहकारी शिक्षकांनी चांगलाच आला. शेकोटीसाठी रात्रीच्या वेळी सहा वर्षांची दोनएकशे मुले शाळेत बोलावली होती. शेकोटी झाली. खाणं झालं. खेळ झाले. थोडसं झोपाळलेला एक मुलगा साधारण साडेदहा अकराच्या सुमारास अगदी ताला-सुरात म्हणाला...` टिचर, जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा...` मग काय इतरांनीही त्याच ठेक्यात सुरु केले....वाजले की बारा.. चंदावरकर जे म्हणत असत, त्याची प्रत्यक्ष प्रचिती आम्हा सर्वांना इथे आली.
अजय-अतुल यांच्या रचना ऐकल्यानंतर त्यातली सौदर्यस्थळं, पार्श्वसंगीतात वापरलेल्या साजांमधून, त्या रचनेला लाभलेलं वेगळं अस्तित्व आणि पुन्हा त्याचं त्या रचनेत मिसळून जाणं. काही खास जागा, काही अनवट संगीतक्षण. वाद्यांचा अचूक आणि परिणामकारक वापर आणि विशिष्ठ प्रकारे लावलेल्या स्वरांमधली जादू.. यातील संगीतसौदर्य़ चंदावरकर आम्हाला विश्लेषण करुन सांगत.त्यानं आमचही सांगितिक उन्नयन होत असे.
इथल्या मातीतला गंध..संगीतात आलाय..
ते म्हणायचं, ही पोरं संगीतातले खरे आणि अस्सल हिरे आहेत. इथल्या मातीतला गंध, मूलतत्वं आणि बाज त्यांच्या लोकसंगीतात मुरलेली आहेत. असं संगीत बांधणारे पहिले लोकसंगीतकार वसंत पवार. दुसरे आमचे रामभाऊ कदम. त्यांनंतरचे तिसरे म्हणजे अजय-अतुल. आपल्या ह्दयातून, भावभावनांमधून, जोशामधून, आवाजामधून आणि रचनाकौशल्यामनधून रसिकांच्या मनात शिरणारे आणि थेट ह्दयात घुसणारे आजय-अतुल. त्यांच्या संबंधात चंदावरकर म्हणत असत..बंदो मे है दम..!
रचनाकार हा बुध्दिमानच असतो अशी चंदावरकरांची खात्री होती. आपल्या देशात कित्येक वर्षे लोकसंगीत हे गावकुसाबाहेर, देवळा बाहेरच राहिलं आणि त्यामुळे हे साधक, शैक्षणिक परिघाबाहेर राहिले. दुर्दवाने त्यांची क्षमता इतर कुणाला फारशी लाभलीच नाही आणि या संगीतकारांना सामाजिक प्रतिष्ठाही लाभली नाही. त्यामुळे संगीतकार बुध्दिमान असतो, त्याचा सांगितिक स्वतंत्र विचार शब्दांनी नसेल, तर त्याच्या स्वरातून, रचनातून मांडू शकतो हे कळण्याची क्षमताच आपल्यातल्या असांगेतिकतेमुळे नष्ट झाली. पं. भीमसेन जोशी म्हणायचे, `गाणं हे माझे काम. ते विचार बिचार काय असेल ते तुम्ही बघून घ्या.`........ ते बुध्दीमान आणि विचारवंत नव्हते असं कोणी म्हणू तरी धजेल काय?
एकांडे शिलेदार
चंदावरकर जरा एकांडे शिलेदारच होते. त्यांनी लोकसंग्रह कधी केलाच नाही. ते त्यांना जास्त आवडतही नव्हतं किंवा जमलही नसेल. त्यांच्यात तो एक चांगला गुणच नसेल असं मी म्हणते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची गूढता, व्यासंगी वृत्ती आणि प्रखर बुध्दिवाद होता. त्यांचा गुरुबाजीवर आजिबात विश्वास नव्हता. लोकांनी त्यांच्या फार जवळ येणे त्यांना आवडत नसावं. त्यात दोन अपवाद... अरुण खोपकर आणि ऋषीतुल्य रामकृष्णबाब नाईक.
ब-याच लोकांनी तुम्ही आम्हाला..मला तुमच्याजवळ का येऊ देत नाही अशी तक्रार त्यांच्याजवळ किंवा कधी माझ्याकडेही केली होती. माझ्या मते त्यांचं कारण असं आपण किती संवेदनाशील आहोत ते कुणाला..म्हणजे कधीकधी आम्हालासुध्दा.. कळू नये अशी त्यांची तीव्र इच्छा असे.
आपलं शारीरिक आणि मानसिक दुःख कोणाजवळ बोलावं हे त्यांना मानवतच नसे. त्यांची तीव्र संवेदनशीलता emotionality लोकांपर्य़त पोचावी, त्यांना ती कळावी असं वाटणे म्हणजेच एक प्रकारचं मानसिक दौर्बल्य आहे असं त्यांना वाटे. मी काही त्याचं psychologsis करु मागत नाही . परंतु अशा वागण्यामुळे लोकांना ते शिष्ट, तुसडे किंवा अहंकारीसुध्दा वाटत. अर्थात ती सगळी मानसिकता, त्यांची सर्जनशीलता, आंतरिक तळमळ त्यांच्या कलेमधून रसिकांपर्य़त, निदान ब-याच रसिकांपर्य़ंत पोचली असे मला वाटतं.
एका बाजुला चंदावरकर, उत्तम रसिक, खूप आनंदी, सतत खळखळाची हास्य करणारे, इतरांना हसवणारे, स्वच्छंदी आणि तीक्ष्ण विनोदबुध्दीचे होते. परंतु त्यांचा गाभा सखोल बुध्दिमत्तेचा, सर्जनशीलतेचा, सतत वैचारिक सत्य धुंडाळण्याचा होता.
ते खेळकर होते. वाडीया कॉलेजच्या विजयी टीमचे कप्तान आणि Fast pace opening बोलर होते. टेबलटेनिसचे triple crown winner होते. ते नखचित्रं काढत. Paintings करीत आणि रोज रात्री सतारिचा रियाज करीत. त्यांनी सितारीते ४० दिवसांचे दोन चिल्ले केले होते. त्यांना केलेली दगडी आणि इतर शिल्पं आमच्या घरी आहेत
आमच्या घरासमोरचा शंभऱ फुटी रस्ता वयाची ७१ वर्ष पूर्ण होईपर्यंत रोज ते झाडत असत. ६५ वयापर्य़ंत घरातलं सगळ प्लबींग तेच करत. झाडांना रोज पाणी घालणं हा पुण्यात असताना त्यांचा सकाळचा उद्योग होता. आमच्या घरच्या चित्रासाठीच्या जवळजवळ सगळ्या लाकडी फ्रेम त्यांनी लाकूड विकत आणून स्वतःच्या हाताने बनविलेल्या आहेत. मणीपूर, केरळ, किरगीस्तान पर्य़ंत खाल्लेले पदार्थ घरी बनवून घरच्यांना किंवा खास पाहुण्यांना खाऊ घालायचा छंद त्यांना होता., या सगळ्यांच्यावर त्यांना गप्पा मारायची मोठी हौस होती. एकीकडे मी त्यांना एकांडा शिलेदार म्हणते आणि गप्पा मारण्याची होस होती असही म्हणते. माणसं अशीच असतात, विरोधाभासापूर्ण, या गप्पांमुळेच त्यांच्या हातून एकच ( आणि माझ्या हातूनही एकच) पुस्तक ( वाद्यवेध) लिहलं गेले. आमच्या गप्पांची गोष्ट तर अविश्वसनीय आहे..
त्यांच्या मोठ्या सांगितिक कामाबद्दल त्यांना recongnition मिळालं नाही किंवा ज्यांनवा opus work म्हणावं असा त्यांच्या संगीतरचना लोकांना ऐकायला मिळाल्या नाहीत याची मला खंत आहे. अर्थात सगळ्या लहान किंवा मोठ्या कलाकारांच्या बायकांना तशी ती असतेच. विशेष म्हणजे ती खंत त्यांना मुळीच नव्हती. त्यांचे संगीत कुणी उचलून वापरलं तर त्यांना काहीही वाटत नसे, म्हणायचे `ते चांगलें आहे असं वाटलं म्हणून ते आपल्या नावावर खपवतात, म्हणजे बरचं आहे ना.. निदान स्वतःच्या मनात तरी ते उचले तसं कबूल करत असतील.`
चंदावरकरांना आतून, मनातून स्वतःच्या रचनांबद्दल एक कलातम्क आत्मविश्वास वाटायचा. त्यांच्या काही उत्तमोत्तम रचना, मोठी कामं लोकांपर्य़त पोचली नाहीत किंवा पोचूनही कळली नाहीत याची खंत आम्हाला वाटायची. तेव्हा शांतपणे ते आम्हला म्हणायचे, `लोकांना आवडो न आवडो. तुम्हाला आवडली ना? मग झालं!` अशी कलंदर वृत्ती त्यांच्यात होती . ` यावेळी नाही माझ्या हातून चांगलं संगीत झालं..`असं म्हणायचा प्रांजळपणाही होता..
-मीना चंदावरकर, पुणे
1 comment:
तुमच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे.
Post a Comment