- आनंद देशमुख, पुणे
पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाशी कधी काळी संबंध येईल आणि त्या महोत्सवाचा एक महत्त्वाचा घटक आपण बनू, असे स्वप्नातही वाटले नव्हते. फर्ग्युसन महाविद्यालयात असताना श्रोता म्हणून मी "सवाई‘ला जात असे. शास्त्रीय संगीत कळत नव्हतं, तरी स्वरमंचावर दिग्गज कलाकारांना बघून आणि ऐकून आनंद व्हायचा. गर्दीचे, जाणकार रसिकांचे आणि एकूणच त्या वातावरणाचे अप्रूप वाटे. या महोत्सवाच्या सर्व सत्रांचे निवेदन करण्याचे हे माझे सलग पंचविसावे वर्ष. माझ्या दृष्टीने हा कृतार्थतेचा, अभिमानाचा क्षण आहे.
आकाशवाणीतील नोकरीमुळे मैफलींचे निवेदन आणि "सुप्रभात‘सारख्या कार्यक्रमांमुळे माझा आवाज घरोघरी पोचला होता. उत्तम निवेदकाचे निकष आणि जबाबदारी यांचे भान आकाशवाणीने दिले होते, तरीही "सवाई‘तील आपले नेमके स्थान काय, हा प्रश्न मला पहिल्याच दिवशी पडला होता. खूप विचार केला; आणि माझे स्थान व भूमिका मी पक्की केली. स्वरमंचावर एकामागोमाग सादर होणारे आंतराष्ट्रीय कीर्तीचे गायक, वादक आणि नर्तक व समोर बसलेले जाणकार, संगीतप्रेमी आणि अभ्यासू रसिक यांना जोडणारा आपण केवळ दुवा आहोत, हे मी निश्चित केले. ही टोके सांधताना मी कमी उंचीवर आहे; आणि त्या पवित्र स्वरमंचाशेजारीच जमिनीवर माझे स्थान आहे. ही माझी भूमिका आजही पंचवीस वर्षांनंतरही कायम आहे.
हा संगीत महोत्सव निवेदनावर केंद्रित नाही, हे तर स्पष्टच आहे. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना स्वरमंचावर सतत चालणारे निवेदन आश्वासक नसते; किंबहुना तशी गरजही नसते. त्यामुळे निवेदनाच्या मर्यादा आणि दर्जा या गोष्टी "वसा‘ घेतल्याप्रमाणे मी जाणीवपूर्वक सांभाळल्या. संयोजक, कलाकार आणि रसिक यांचे आशीर्वाद इतके दीर्घकाळ लाभणे हे त्यांना माझ्या निवेदनातून मिळत असणाऱ्या आनंदाचे द्योतक आहे, असे मी मानतो.
संगीताच्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांजवळ सामान्य माणसाला पोचताही येत नाही. मला मात्र त्यांच्याशी बोलण्याची, त्यांच्याबरोबर हास्य-विनोदात रमून जाण्याची संधी अनेकदा मिळाली.
या उत्सवातील माझ्या आठवणींना अनेक पदर आहेत. श्रोते, कलाकार, कार्यकर्ते, संगीत समीक्षक, प्रायोजक, मंडळाचे पदाधिकारी, स्टॉलधारक, सुरक्षा कर्मचारी या सर्वांबद्दलच्या आठवणी ही माझी "मर्मबंधातली ठेव‘ आहे. पु.लं.चा सत्कार, पं. फिरोज दस्तूर यांचा पंचाहत्तरीनिमित्त सन्मान, गंगूबाई हनगल यांचा सत्कार, छोटा गंधर्व यांचे गायन, पं. कुमार गंधर्व आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या "सवाई‘त अखेरच्या मैफली अशा हृदयस्पर्शी आठवणी अंतःकरणावर कोरल्या गेल्या आहेत. भीमसेन जोशी यांच्याविषयीच्या आठवणी आणि त्यांचा सहवास व्यक्त करायला माझ्याजवळ शब्दच नाहीत!
मला प्रश्न पडतो, की या क्षेत्रातील माझे गुरू कोण? उत्तर शोधताना आयुष्यात मागे डोकवावेसे वाटते.
वडील उत्तम हार्मोनियमवादक. नगर जिल्ह्यातील जामखेड हे माझे गाव. त्या गावात दर महिन्याला गाण्याची मैफल करायची, ही त्यांची खासीयत! त्यामुळे आपोआपच सुरांविषयी संवेदना जागृत झाल्या. अधू दृष्टीमुळे वडिलांना वाचता येत नव्हते. मी त्यांना उत्तमोत्तम पुस्तके, वर्तमानपत्रातील लेख वाचून दाखवीत असे. त्यामुळेच माझे उच्चार स्पष्ट झाले. आवाजावर संस्कार झाले. मोठ्याने वाचन करत असताना स्वल्पविराम, पूर्णविराम, प्रश्नार्थक आणि उद्गारवाचक चिन्हांचा अर्थ आवाजातून पोचवायला मी शिकलो. माझी आई अशिक्षित. त्यामुळे श्रावणातील कहाण्या तिच्या मैत्रिणींसमोर मला वाचून दाखवाव्या लागत. या दोन्ही गुरूंमुळे, म्हणजेच आई-वडिलांमुळे, माझा आवाज सुसंस्कारित झाला आणि वाणीला भावोत्कटता आली.
"सवाई‘तील निवेदनाच्या यंदाच्या रौप्यमहोत्सवाव्या वर्षी मी त्यांच्यापुढे तर नतमस्तक आहेच; पण त्याचबरोबर माझ्यावर प्रेम करणारे असंख्य श्रोते, कलाकार, कार्यकर्ते यांच्यापुढेही मी नतमस्तक आहे.
( हा लेख स्वतः आनंद देशमुख यांनी लिहली असून तो पुण्याच्या दैनिक सकाळ मध्ये ११ डिसेंबर २०१५ च्या अंकात प्रकाशित झाला आहे..तो त्यांच्या सौजन्याने इथे वापरत आहे..)