Friday, December 16, 2016

रमेश भिडे यांची स्वगतं..एकदा रसिकांनी अनुभवावीच...



 प्रत्येक नटाला नटसम्राट होता येत नाही. तो त्या नायकाच्या भोवती किरकोळ कामे करत वावरत असतो..त्याची एंट्री केव्हा होते..केव्हा तो विंगेत जातो. कधी त्या रसिकांना कळतही नाही..पण तो नसला तर नाटक अपुरे रहाते..त्या नटाभोवती ..किंवा नाटकाच्या सभोवताली त्याचे अस्तित्व असते..तो नट असतो..तो त्यांची अभिनयाचा शैली पहातो..अनुभवतो..त्यांच्यासारखे आपणही बनावे यांसारखी स्वप्ने पहात कित्येक वर्ष प्रयोगातून आपली भूमिका पार पडतो..मिळेल ती नाईच स्विकारतो..पुन्हा पुढच्या प्रयोगाकडे वाटचाला त्याची सुरूच असते.

अशा नाटकातून छोट्या भूमिका करून रंगभूमिशी एकरूप झालेले नाव म्हणजे रमेश भिडे..
आता नव्या भूमिकेच्या शोधात नटाला स्वतःचे मार्केटिंग करावे लागते..मिळेल ते काम स्विकारावे लागते..मनाला मुरड घालून पोटासाठी जुळवून घेऊन काम स्विकारावे लागते..थोडक्यात तडजोड करून आपली झोळी भरून घ्यावी लागते..

गेली ४० वर्षे नाट्यसंपदासारख्या संस्थेत नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांच्यावरोबर अनेक नाटकात छोट्या भूमिका करत नट म्हणून अंधारतल्या विंगेत ते वावरले..तीथून नाटक अनुभवले..कधी तरी आपणही मोठा नट बनू या जिद्दीने भूमिका करत राहिले..पण ते नशीबात नव्हते..म्हणा किंवा या नव्या तडजोडिच्या नव्या जगात त्यांना स्वतःचे अस्तित्व विसरून कामे शोधता आली नाहीत..म्हणून ते घरातच त्या जुन्या आठवणीत स्वतः रंगभूमिवरच्या जुन्या नाटकातली स्वगते घरातच रंगवित आपल्या मनात बंद करून ठेवलेली स्वप्ने प्रत्यक्षात खरी करून पाहू लागले..

घराच्यांनी कित्येक वेळा सांगून पाहिले..बाबा..घर म्हणजे रंगभूमि नाही..तुम्ही आठवणींना कुरवाळत किती काळ बसणार आहात..सांगून पाहिले..

पण मन मरत नाही...जीवाची घालमेल होते..म्हणून ती जुनी स्वगते अंधारातल्या त्या घराच्या चारभिंतीत
साभिनय म्हणू लागले..त्यातच रंगू लागले..वेळेचे..काळाचे भान हरपून ते बनत..कधी विद्यानंद..तर कधी आप्पासाहेब बेलवकर..

प्रसंगी त्यांना सोबत आठवू लागतात ती संगीत नाटकातली पदे..अगदी त्या पात्रांच्या स्वगतांना साजेल अशी..
मग तुम्हीही काही काळ त्यांच्याबरोबर त्यानाटकाच्या दृष्यात एकरूप होऊन जाता..

अंधारातील स्वगते..या तशा एकपात्री कार्यक्रमात नेमके रमेश भिडे हेच करतात..त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातल्या ह्या  प्रवासाचे ते नाटक बनवितात..आणि दीड तासाचे रसिकरंजन करत असतात..
त्यांच्या अभिनयात कस आहे..वाणीत श्रवणीयता आहे..चेह-यावर भाव ऊमटतात..अंगात ती मस्ती आहे..शरीरात बळ आहे..ते पुन्हा पुन्हा ते पात्र रंगमंचावर साकारतात..स्वतःमधला नट पुन्हा जीवंत करतात..तुम्हालाही त्यांत्यासमवेत ते घेऊन जातात..

ही संकल्पना संहिता आणि प्रत्यक्षात अवतरली ती त्यांच्या मुलाने..डॉ. प्रसाद भिडे यांनी....
आपल्या वडीलांची ही तयारी पाहून त्यांनी ही स्वगते अंधारातून प्रकाशाकडे आणली..त्याला अतिशय योग्य असे दोन संगीत नाटकातली पदे रंगविणारे कलावंत अनुराधा केळकर आणि धवल भागवत सोबतीला आणले. आणि नुसत्या शब्दातून रंगणारी ही स्वगते सुरेल केली ती दोघ्यांच्या नाट्यपदातून.
पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात १० डिसेंबर १६ ला प्रवीण बर्वे यांच्या सहकार्याने झालेल्या या प्रयोगाचा मी अनुभव घेतला..खरं म्हणजे याचे प्रयोग...आता फारशी न होणारी..तरीही नाट्यइतिहासात कोरून ठेवावी अशा नाटकातल्या स्वगतांनी पुन्हा एकदा रसिकांना पहायला आवडेल अशीच आहेत.
ते पाहणारे रसिकही तसेच आजोबाटाईप असले तरी भावना त्याच आहेत..

रंमेश भिडे य़ांना काही काळ पुन्हा त्या नाटकात जगू दिले याबद्दल प्रसादचे कौतूक करावे तेवढे थोडे..
त्यांच्या मते मराठी नाटकातील गाजलेली स्वगतं आणि नाट्यगीतं यांचं हे रिइंटरप्रिटेशन आहे.


अश्रुंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते, एकच प्याला, नटसम्राट, पुण्यप्रभाव या गाजलेल्या नाटकातील काही स्वगतं आणि  मर्मबंधातली ठेव ही, कशी या त्यजु पदाला, देवाघरचे ज्ञात कुणाला, मी मानापमाना, कैवल्याच्या चांदण्याला यासारख्या श्रुतीमधुर नाट्यपदांचा  आनंद या प्रयोगाच्या माध्यमातून रसिकांना घेता येतो.

एकूणच प्रयोगात सुधांशू घारपुरे हे पेटीवर साथ करतात..तर तबला संगत करतात ते साईनाथ घुरे्..
प्रकाशयोजनेची बाजु सांभाळली ती हेमेत कुलकर्णी यांनी..तर सुखदा भावे-दाबके यांनी पार्श्वसंगीत तयार केले आहे..सुबोध गुरूजींनी थोडक्यात पण कुठेही नेता येईल असा सुटसुटीत सेट तयार केला आहे..

नटाची वेदना आणि त्याची घालमेल व्यक्त होणारे हे स्वगत तुम्हा प्रकाशातल्या रंगमंचावर जरूर पहावे..


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

-        

5 comments:

Anonymous said...

खरंच हा जिवंत अनुभव एकदा घ्यायलाच हवा. अगदी कालच रमेशजींशी गप्पा झाल्या. रंगभूमीशी नाळ जुळलेली ही ग्रेट माणसं. धन्यवाद इनामदारजी.

Anonymous said...

मी आणि डॉ काशिनाथ घाणेकर

ज्येष्ठ रंगकर्मी, लेखक, सडेतोड स्वभावाचा सरळ मनाचा माणूस आणि उत्कट कलाप्रेमी श्री रमेश भिडे यांची माझी दूरध्वनी ओळख अगदी आता, म्हणजे गेल्या पाच सहा महिन्यांतली , आणि ती सुध्दा त्यांनीच आवर्जून फोन केल्यामुळे झालेली. मी लेखन करतो, ते किती चांगलं असतं, वाचकांना किती भावतं नाही सांगता येणार पण या लेखनामुळे माझा अनेक मोठ्या.... मोठ्या म्हणजे वयासोबत व्यासंग, प्रतिभा, स्वभाव, कीर्ती, माणूसपण इ. अनेक गोष्टींनी मोठ्या असलेल्या व्यक्तींशी गाढ परिचय मात्र झाला. असो,
त्यानंतर मात्र मधून मधून आमच्या दूरध्वनी गजाली होऊ लागल्या. अर्थात ओळख होण्यापूर्वी रमेश भिडे या व्यक्तीमत्त्वाबद्दल, ते सादर करत असलेल्या "मी आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर" या एकपात्री रंगावृत्ती बद्दल थोडीफार कल्पना होती, परंतु याच शीर्षकाने प्रसिद्ध झालेलं त्यांचं पुस्तक आणि रंगावृत्ती वाचण्याचा पहाण्याचा योग आला नव्हता. काही दिवसांपूर्वी त्यांचा गावाहून म्हणजे मुटाटहून फोन आला. म्हणाले,
"बाहेर आल्यामुळे रेंज मिळाली म्हणून फोन केला, घरात रेंज मिळत नाही."
बोलताना पुस्तकाचा संदर्भ आला, आणि मी, पुस्तक मला कुरियर करण्याबद्दल त्यांना सांगितलं. रमेशजीनीही मुंबईत येताच आठवणीने पुस्तक पाठवलं जे १५ जुलैला माझ्या हातात आलं. वेळ न दवडता, कुरियर उघडलं आणि सुबक बांधणीचं, सुंदर कव्हरपेजने सजलेलं पुस्तक त्यातून बाहेर आलं. फारसा वेळ न घालवता, पुस्तक उघडून वाचायला सुरवातही केली, आणि मध्ये फक्त जेवणासाठी ब्रेक घेऊन रात्री बारा वाजेपर्यंत वाचून पूर्ण केलं. या वाक्याचा अर्थ, पूर्ण केलं एकदाचं असा मात्र अजिबात नाही, अगदी मनापासून सांगायचं तर मिटून खाली ठेवावं असं वाटलंच नाही.
ज्ञानदा असा ज्यांचा मी ज्यांचा उल्लेख मी माझ्या लेखांमधून करतो त्या धनश्री लेले यांची अप्रतिम प्रस्तावना आणि रमेशजींचं मनापासून सविस्तर उमटलेलं मनोगत वाचताना किती सुहृदांचे निरपेक्ष हात या पुस्तकाला लाभले याची जाणीव होत असताना हे ही लक्षात आलं की रमेश भिडे यांच्याशी किती माणसं जोडली गेेली आहेत.
सर्वप्रथम या पुस्तकाने मला रामचंद्र वर्दे या आजवर, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा या आम्ही जातो अमुच्या गावा या चित्रपटातील गीताने स्मरणात राहिलेल्या ज्येष्ठ अभिनेत्याबद्दल खूप काही समजलं, आणि king maker गुरू कसे असतात हे रमेशजींच्या शब्दांमधून समजून गेलं.
"मी आणि डॉ.काशिनाथ घाणेकर" हा एका उच्चविद्याविभूषित, रुबाबदार, देखण्या, बेदरकार,
अभिनयसंपन्न त्याचबरोबर कलंदर, काहीसे एककल्ली, जीवन उधळून टाकणाऱ्या पण माणूसपण ल्यालेल्या व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास आहे, जो त्यांच्यातील संपूर्ण गुण दोषांसहित रमेशजींच्या शब्दांमधून उलगडत जातो, कारण तो त्यांनी जवळून पाहिलेला आहे.

Anonymous said...

मित्र म्हटलं की तो जसा आहे तसा त्याला स्वीकारायचं आणि आपल्या परीने त्याच्यासाठी जेवढं करता येईल ते करायचं हे तत्त्व रमेशजींनी पाळलं (पृ.८२-८३)
डॉक्टरांच्या दिलखुलास बेधडक वृत्तीचं वर्णन करताना रमेशजी म्हणतात, चिखलात उगवलेलं कमळ बायकोच्या केसात माळायचं म्हटल्यावर, चिखलाने हात, कपडे बरबटण्याची पर्वा न करता कमळ खुडायचं आणि तो आनंद घ्यायचा ही त्यांची मनोवृत्ती होती.(पृ.३३).
मोठं होताना दुसऱ्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं त्यांना मान्य नव्हतं. डॉक्टरांच्या सोबत मनसोक्त व्यसनाचा आनंद घेऊन दुसऱ्या दिवशी व्यसनी म्हणून त्यांच्या नावाने ओरड करणाऱ्या जगाची डॉक्टरांनी मात्र पर्वा केली नाही. हा प्रवास सुरू असताना रमेशजींची लेखणी अगदी सहजपणे जीवनाचं सारही सांगून जाते (पृ.३६-३९)
डॉक्टरांचं नाटक सुरू होण्यापूर्वी पात्रपरीचयाचं वर्णन वाचताना आपल्याला, त्यांच्या जनमानसातील प्रतिमेचा अनुभव अगदी सहज येऊन जातो. रमेशजी म्हणतात, पडदा उघडून ज्याचं अजून दर्शनही झालेलं नाही, त्या अभिनेत्याचं फक्त नाव ऐकल्यावर एव्हढ्या टाळ्या वाजतात, ज्या ऐकल्यावर बाजूने हजारो सैनिकांचा मार्च चाललाय असं वाटावं. मग रंगमंचावर ती व्यक्ती आल्यावर प्रेक्षकांचं काय होत असेल ?(पृ.४२)
डॉक्टरांच्या रंगमंचीय आविष्काराचं पुलंनी केलेलं अप्रतिम वर्णन रमेशजी देतात, पुलं म्हणतात,
"त्यांच्या एंट्रीने घाणेकररुपी झुंबर उजळून निघतं, आणि त्या प्रकाशात संपूर्ण रंगमंच उजळला जातो, आणि अभावितपणे प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात(पृ.४३) हे वर्णन डॉक्टरांची अभिनय प्रतिभा आणि त्यांची आभा जाणून घेण्यासाठी पुरेसं आहे.
डॉक्टरांना घडवणारे त्यांचे गुरू रामचंद्र वर्दे स्वतः कसे होते, हे ही रमेशजी आपल्याला सांगून जातात. कलाकारामधली अभिनयक्षमता नेमकेपणाने जाणून, त्याच्या व्यक्तिमत्त्वात, अभिनयात काय आहे काय नाही हे याची त्याला कल्पना देऊन आणि त्याच्यातल्या सकारात्मक अभिनय गुणांना घासून पुसून रसिकांपुढे आणून, त्या कलाकारामधून एक उत्कृष्ट अभिनेता घडवण्याची, त्यांच्या ठायी असलेली गुणग्राहकता, हातोटी आणि अफाट क्षमता, रमेशजींच्या शब्दांमधून आणि जागोजागी दिलेल्या उदाहरणांमधून सविस्तरपणे समजून येते. आणि हे सगळं निःसंग निरपेक्ष भावनेने. डॉक्टरांचं आपल्या या गुरुंशी प्रेमाचं नातं किती उत्कट आणि निरागस होतं, हे डॉक्टरांच्या प्रत्येक वाढदिवशी घडणाऱ्या लाडाच्या प्रसंगांमधून आपल्यासमोर येतं.(पृ.७७)
व्यसनाधीन होऊनही माणूसपण न विसरणारा तो एक अवलिया कलाकार होता हे या प्रवासातून आपल्या लक्षात येतं. एखाद्याला आपलं मानलं की त्याच्यासाठी काहीही करायला तयार असणारे, खोट्या मोठेपणाचा तिटकारा असणारे, माणसांची प्रचंड असोशी असणारे, संगीताचा आनंद घेण्यासाठी माडी चढणारे पण त्या गायिकेचा शरीराला स्पर्शही न करणारे, आपल्याविषयी कंड्या पिकवणाऱ्या हितशत्रूंना जराही किंमत न देणारे , रसिकांनी त्यांच्यावर केलेलं प्रेम आपल्या बावनकशी अभिनयाने फेडून टाकणारे, आपल्याला घडवणाऱ्या गुरूच्या जाण्याने वेडेपिसे होणारे आणि अगदी प्रत्येक क्षणी साथ देणाऱ्या पत्नीला व्यसनाच्या कैफात, तू जाऊ शकतेस मला कुणाची गरज नाही असं म्हणून (पृ८०-८१), एकटे पडणारे डॉक्टर काशिनाथ घाणेकर रमेशजींच्या शब्दांतून आपल्यासमोर येत जातात.
या अवलिया कलाकारावर रसिकांनी अलोट प्रेम केलं. त्यांना त्यांच्या व्यसनासहित स्वीकारलं आणि डॉक्टरांनीही रंगभूमीला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून दिलं.
अखेर शांतपणे मृत्यूच्या स्वाधीन झालेल्या डॉक्टरांनी या जगाचा, नाट्यसृष्टीचा निरोप घेतला, आणि रमेशजींच्या गुरूंची वाणी "तुझा शेवट हाऊसफुल्ल असेल" खरी ठरली.
डॉक्टरांचा रमेशजीनी अनुभवलेला हा संपूर्ण जीवनप्रवास, "मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" या पुस्तकातून त्यांच्याच प्रवाही शब्दांतून आपल्याला अनुभवायला मिळतो, आणि वाटून जातं, ही कुणीतरी देवलोकीची शापित मंडळी पृथ्वीवर जन्म घेतात, काही काळ आपलं आयुष्य आनंदमय करण्यासाठी, आणि निघून जातात पुन्हा आपल्या स्थानी.
एंट्री एक्झीट ला टाळ्यांचा कडकडाट घेणाऱ्या या नटसम्राटाला रायगडाला....मधल्या संभाजीच्या प्रतीमेने पहिल्या प्रयोगात घातलेली कवळ डॉक्टरांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांच्यासोबत वावरत होती हेच खरं.
आता एकच इच्छा आहे, लवकरात लवकर "मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" याची रंगावृत्ती जी रमेश भिडे एकपात्री प्रयोगामधून सादर करतात ती पाहण्याचा योग लवकर येवो.
रमेशजी आपली ओळख झालीच आहे पण या पुस्तकामधून जी मिळाली त्याला खरंच तोड नाही.
मनपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी.




प्रासादिक said...

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी, ९७६९०८९४१२

प्रासादिक said...

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0Mm86DNioARNaxCn7P5hp5ScYYCCqqY487yqL6Ug5DydU5Mca4ufJzkfwNc3oB8vWl&id=100080171065965&mibextid=Nif5oz