माझ्या वैयक्तिक आयुष्यात ज्यांच्या आशीर्वादाची थाप सतत असायची असे हे
पाच जण गेल्या पंधरा दिवसात या जगातून नाहिसे झाले ते पुढच्या अनंताच्या प्रवासासाठी..
डॉ. अविनाश लाटकर
डॉ. वि. भा. देशपांडे
प्रमोद शिरगावकर
त्र्यंबक तथा नाना पांढरे
श्रीमती सुनंदा तांबे
असे एकामागेमाग वावटळ उठावी आणि कांही वटवृक्ष उन्मळून पडावे असे झाले आहे..
आता आपण एकटे राहिल्य़ाची जाणीव यामुळे अधिक होत आहे.
डॉ. अविनाश लाटकर.....
यांनी आमच्या उभयतांच्या आयुष्यात सतत आधाराचा धीर दिला..काही काळ त्यांच्या गंगा सोसायटी, सहकार नगरच्या बंगल्यातल्या तळघरातल्या दोन खोल्या आमच्या अडचणीच्या काळात देऊ केल्या होत्या..आमची दोनही मुले..सर्वेश आणि सुरभी डॉ. सविता लाटकरांच्या यशश्री हॉस्पीटलमधलीच..
त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सविता लाटकर, डॉ. नंदन आणि डॉ. असलेली सुनवाईही अजुनही नाते जोडून आहेत.
डॉ. वि. भा. देशपांडे......
यांचे संबंध अगदी तरूण भारत दैनिकापासून पुढे मीहि काहीकाळ नाट्यक्षेत्रात लुडबुड करू लागलो आणि थोडी समीक्षाही लिहू लागले तेव्हापासून ते आमचे गुरू..मार्गदर्शक बनले..माधव मनोहरांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात पहिला आणि अखेरचा नाट्य समीक्षक मेळावा भरला..त्याचे आघाडीचे निमंत्रक होते..विभा.
अरविंद देशपांडे, अमोल पालेकर, दामू केंकरे, प्रभाकर पणशीकर हे सारे त्यांच्या परिवारतले..त्यामुळे तेही आमच्या मनात घर करून गेले. त्याचे श्रेयही त्यांचेच.
नाट्यसृष्टीतून साहित्याच्या सहवासात आलेले विभा..अगदी साहित्य परिषदेचे कार्यवाहही बनले..आम्हाला त्याचा अभिमान असायचा..
अगदी डिसेंबर 15 ला माझ्या 61 समारंभालाही विभा आले..आमचे 96 वर्षांचे मा. कृ. पारधी यांचा सत्कारही केला..माझे गाणे ऐकले..व्हायोलिन गाते तेव्हा..हा चारूशीला गौसावी यांच्या कार्यक्रमालाही दाद दिली..आपल्याकडून अनिकेत आमटेच्या हातात चेकही दिला..आणि उभयता माझ्या आग्रहाखातर जेवायलाही आले..
एकटे पडल्यानंतर नुसता बोलू नकोस..घरी ये गप्पा मारू...म्हणाले..अगदी आपले पणाने..म्हणाले..
प्रमोद शिरगावकर ...
यांची ओळख झाली ती आमची मैत्रीण (चारुशीला गोसावी) हिच्यामुळे..प्रसाद शिरगावकारांच्या कवीतांच्या समारंभाला पुण्यात जायला मिळाले ते त्यांच्यामुळे..ते आणि त्यांच्या पत्नी पद्माताई पुढे आमच्याबरोबर सहलीतही एकरूप झाले..त्यांच्या राजर्षी शाहू सोसायटीतल्या बंगल्यात काही मिहने का होईना रहाता आले.तेव्हा त्यांच्या मनमोकळ्या स्वभावाचा अधीक परिचय झाला..पुढे नचिकेत मुळे तो अधिक वाढला..तो शेवटपर्यत..
त्र्यंबक तथा नाना पांढरे....
आमच्या सौ. ची मैत्रीण सौ. रोहिणी मोहगांवकर हिचे ते वडील...तिचे आणि सौ.चै नाते इयत्ता सातवी पासून आजपर्य़त..पुढे आमचे लग्न झाल्यावर नानांकडे हक्काने जाऊ लागलो..जावई या नात्याने ते आमच्यात सहज एकरूप होऊन जात.
योगासनांचा वर्ग ते अनेक वर्ष घेत आले..स्वत योग घरी करत..वयाच्या 92व्या वर्षी ते गेले..पण आधि काही काळ तीन वेळा दिनानाथमध्ये जाऊन डॉ. अतुल देशपांडे यांच्या औषधाने बरे होत घरी आले..पण घरात कुणी नसताना..ते पडले..तेच निमित्त झाले..त्यातच त्यांचा अंत झाला.. सुखी माणसाचा सदरा..अशा स्वरूपात आम्ही सारे त्यांच्याकडे पहात होतो..आता तेही गेले..
श्रीमती सुनंदा तांबे...
आमची स्नेही आणि एक उत्तम अभिनेत्री सौ. मानसी मागीकर हिची ती आई..आरंभीची विनया तांबे..आणि आता विजय मागिकर यांची पत्नी. तिच्या आईला मी 1974 पासून ओळखत होतो.. काही काळ त्यांनी भारत गायन समाजात गाण्याचे शिक्षणही घेतले होते..आमच्या शाकुंतल या भरतच्या नाटकात त्यांनी नटीची भूमिका केली होती..सुत्रधार असायचे भारत गायनचे श्रीराम वैद्य .
आपले पती गेल्यानंतर स्वबळावर त्यांनी स्वेटर तयार करायचा व्यवसायही केला..तीनही मुली त्यांच्या मागे होत्या..आहेत..त्यांच्या बळावर पुढे अनेक वर्ष त्यां उत्साही राहिल्या..गेले काही दिवस प्रकृती बिघडली..त्यातच त्यांचे निधन झाले.
माझ्यावर लोभ होता. आयुष्यातल्या चांगल्या गोष्टीत त्यांचा सहभागही होता..
आपल्या आयुष्यात कळत नकळत ज्यांच्य़ामुळे आपण घडत जातो..त्यांच्या जाण्याचे मन दुखावते...पण त्यातही मात करून पुढे जायचे असते..तेच सध्या सुरु आहे..
पण गेल्या पंधरा दिवसात अशा काही घटना घडल्या त्य़ाची ही नोंद आणि खंत..आणि त्यांना हि भावपूर्वक शब्दांजली
- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
8552596276
No comments:
Post a Comment