Thursday, January 11, 2018

असा मित्र आता होणे नाही

आमचे मित्र शशिकांत भागवत यांच्यासह सुभाष नाईक, जयराम देसाई  सुरेशचंद्र पाध्ये, मी सारेच शुक्रवारी अरुणा ढेरे यांच्या कार्यक्रमाला होतो.. पण भागवत यांच्या मनात अशा आपल्या जीवनातील कहाणी मन भरून उमटत असेल असे क्षणभरही आले नाही..

आज ८ जानेवारी
. सकाळी शशिकांत भागवत गेल्याचे कळाले आणि  त्यांनी कालच लिहलेली सल शब्दरूपाने
अधिक भलभळत राहीली..
 आमचे मित्र सुभाष नाईक यांना ही सल भागवतांनी  पाठविली ..

 ती इथे देत आहे..

आज ते सगळ्यांना सोडून गेले..
पण ती पोरकेपणाची टोचणारी सल  मागे ठेऊन.. त्यांचा खरा चांगुलपणा हा होता की त्यांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या त्या दिवसांची वाच्यता कधीही केली नाही..
मात्र त्यांच्या मनातली ही सल अशी अगदी शेवटच्या दोन दिवसात बाहेर पडली..
मला आईकडे जायचे आहे..  आपल्या पत्नीला ते शनिवारपासून सांगत होते.. रविवारी ते आईवरचा लेख वाचूनही दाखविला..
पण ती तगमग थांबली नाही.. तेच दुःख त्यांच्या जिव्हारी लागले..

------------------–--------------

पीठ.......

आमचं गांव तसं लहानच. जेमतेम अडीचशे उंबऱ्याच गांव. सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यामधील विसापूर या आमच्या गावाचं हे रूप १९५०च्या दशकातलं. या खेड्यातील आमचं मोठ्या अंगणातील घर आणि त्यामधील आईचं रूप आठवणींच्या कप्प्यात घेऊन आजपर्यंत वाटचाल करत राहिलो, परंतु पाच जानेवारीच्या
संध्याकाळी या आठवणीला अश्रुंद्वारे वाट मोकळी झाली, ती 'मायलेकरं' या कार्यक्रमामुळे. डाॅ. रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे आयोजित या कार्यक्रमात माझ्या
आठवणीला उजाळा मिळाला, तो व्यंकटेश माडगूळरांच्या आईचं रूप मांडणाऱ्या गोष्टीमुळे.

 अभिवाचनाच्या या कार्यक्रमात प्रख्यात कवयित्री, डाॅ. अरुणा ढेरे यांनी त्या गोष्टीचं अभिवाचन केले, तेव्हा न पाहिलेली माझी आई आणि पीठ डोळ्यासमोर उभे राहिले. व्यंकटेश माडगूळकरांनी आईनं आपल्या आठ लेकरांना जेऊ घालण्यासाठी हलाखीच्या परिस्थितीत कसा धीर एकवटला आणि आईचा आपल्या मुलांशी कसा आंतरसंबंध असतो हे या गोष्टीतून मांडलं. गावात पीठ मागणारा माणूस जेव्हा त्यांच्या घरी येतो, तेव्हा माडगळूकरांची आई त्याला जोत्यावर बसायला सांगते. खरं तर त्याच्या झोळीत टाकण्यासाठी त्या माऊलीकडे पीठच नसते,
इतकेच नाही तर आपल्या आठ मुलांना खाऊ काय घालायचे, हाच प्रश्न त्यांच्यासमाोर उभा राहिलेला असतो. त्यावेळी माडगूळकरांचे वडील दीड महिन्यापासून बाहेरगावी गेलेले होते. या काळात त्या माऊलीनं कसबसा निर्वाह केलेला असतो. त्यामुळे त्या दिवशी त्या धीर एकवटून त्या माणसाला म्हणतात, तुझं लग्न झाले आहे
का. तो नाही म्हटल्यावर त्या म्हणातात, मग एवढ्या पीठाचं काय करतोस. त्यावर तो म्हणतो, स्वतःसाठी वापरल्यानंतर जे उरतं, ते वाण्याला विकतो. तेव्हा ती माऊली पुन्हा एकदा सगळं बळं एकवटून त्याला म्हणते, माझ्या मुलांना जेवूखाऊं घालण्यासाठी आज काहीच नाही. पीठ वाण्याला विकण्याऐवजी मला देतोस का? तो देखील
हेलावून जातो आणि पीठ आणून देते. इथेच माझ्या आईच्या रूपाची गोष्ट डाळ्यासमोर येते. योगायोगाने पीठ, आम्ही सात भावंड आणि आमची आई ही गोष्ट तशीच, परंतु जरा वेगळी.

साधारणतः १९५९चा तो सुमार. माझे वडील निधन पावलेले. सर्व कारभार चुलत्यांच्या हातात. गावांत आमचं एक देऊळ. देवाला रोज गावाचा नैवेद्य मिळावा म्हणून चार घरं तरी पीठ मागायचं अशी गावाची श्रद्धा. आमचे चुलते रोज पीठ मागून आणायचे आणि त्यातील थोडं पीठ आईला काढून द्यायचे. त्यातून भाकऱ्या करून आई आम्हाला जेवू घालायची. त्यावेळी माझं वय साडेतीन वर्षाचं. मोठी बहिण चौदा पंधरा वर्षांची असावी आणि सर्वांत धाकटी बहीण मांडीवरची. चुलत्यांनी दिलेल्या पीठाच्या भाकऱ्या करून  मुलांना खाऊ घातल्यावर आईसाठी काही उरायचं की नाही, हे आम्हाला कळायचंच नाही. माझं तर ते कळायचं वय नव्हतं. बऱ्याचदा
आईला काही उरलेलेच नसायचं. ती उपाशीच असायची.
असेच एक दिवस घर झाडत असताना तिचा पदर चुलीत कधी गेला हे तिला कळलंच नाही. पातळानं पेट घेतला. पोटात अन्न नसल्यानं तिच्यात ओरडण्याचेही त्राण नव्हते. घरात कुणीच नव्हतं. तिचं अंग पूर्ण पेटलं होते. मोठा भाऊ आला तेव्हा त्याला पेटलेली आई दिसली आणि तो जोरजोरात रडायला, ओरडायाला लागला. लोक आले. त्यांनी आईला बाहेरच्या खोलीत आणलं. झाडपाल्याचे काही उपचार केले. मी त्यावेळी अंगणात उभा
होतो. कळत तर काहीच नव्हतं. आईच्या अंगावर कोरफड लावली होती.
त्याच रूपातील आई मला आठवते. त्याच्याआधीची तिची मूर्ती मला आठवत नाही. माझ्या
मनांत तिचं दर्शन साठवलं गेलं ते, तिनं दिलेल्या प्राणांच्या आहुतीचंच.
माझ्यासाठी ते तिचं पहिलं दर्शन होतं.

आजही ते मनांत घर करून आहे. खरे तर ते तिचं पहिलं

आणि अंतिम दर्शनच होते. थोड्याशा पीठात आमच्यासाठी भाकऱ्या भाजणारी आई भाजून गेली आणि तीही उपाशीपोटी, परंतु मुलांचे पोट भरत गेलं या समाधानात तिनं आहुती दिली असं वाटतं. तिच्यानंतर मांडीवरची दूधपिती तिची सर्वांत धाकटी मुलगी गेली. माझ्यापेक्षा मोठी असलेली बहीणपण गेली. चार ते पाच महिन्यांत
वडीलांसह चार मृत्यू आमच्या घरात झाले, परंतु आईचं जाणं म्हणजे आमच्यासाठी आंतरसंबंधच संपण्यासारखे होते. गेली जवळजवळ साठ वर्षे नसलेली, न पाहिलेली आई आठवत राहिलो.
भाजून जमिनीवर पडलेली आईच सतत डोळ्यासमोर येते. आमच्यासाठी तिचे पीठाशी असलेले नाते त्या दिवशी संपलेले होते.

मी आठवती असताना आमच्या गावातील एका आजींनी की ज्यांनी माझा एक भाऊ सांभाळण्याची जबाबदारी घेतली होती, त्यांनी माझ्या आईची ही गोष्ट सांगितली.

'तुमच्यापुरत्या भाकऱ्या होतील, एवढच पीठ असायचं. त्यामुळे आनंदी म्हणजे तुझी आई दोन दोन दिवस पाण्यावरच असायची. तिच्यात काही शक्तीच नसायची, पण तुम्हाला जेवू घालण्यासाठी तिच्यात ताकद यायची.'
आजींनी कळत्या वयात मला हे जेव्हा सांगितलं, तेव्हा त्यातून मला बळ मिळालं. दुर्देवानं आम्हाला हलाखीच्या परिस्थिताचा सामना करावा लागला, तेव्हा उपाशी राहण्याची वेळ आली. त्यावेळी आईमुळे उपाशी राहून पुढे जात राहण्याचं बळ मिळालं. आजही पीठ पाहिलं की आईचं तेच रूप डोळ्यासमोर येतं. फक्त सांगता येत नाही, पण 'मायलेकरं' कार्यक्रमामुळे अश्रुंद्वारे सांगण्याची वाट मिळाली.

शशिकांत भागवत

No comments: