‘गंगालहरी’
आज ५ मार्च २०१८. आजच्या त्यांच्या १०५ व्या जन्मदिन
पद्मविभूषण डॉ. श्रीमती गंगुबाई हनगळ यांच्या अनेक मैफ़लीत मी त्यांच्या भावमुद्रा टिपल्या. प्रत्येक वेळी त्यांचा मृदू स्वभाव, त्याचं आतिथ्य हे आठवत राहिलं. डावा हात कानावर, उजवा हात पुढे आलेला व डोळे मिटलेल्या स्वरमग्न गंगुबाईंची भावमुद्रा माझ्या मनावर कायमची कोरली गेलेली आहे.
- सतीश पाकणीकर
हुबळीच्या देशपांडेनगर येथील ‘गंगालहरी’ या बंगलीच्या अंगणात मी फोटो काढत होतो. समोर माझे मॉडेल होते पद्मभूषण श्रीमती गंगुबाई हनगळ ! पुण्यातील ‘सवाई गंधर्व’ या तीन दिवसांच्या महोत्सवात एका सत्राचा समारोप त्यांच्या गाण्यानं होत असे. त्या प्रत्येकवेळी त्यांच्या गातानाच्या भावमुद्रा मी आतापर्यंत टिपल्या होत्या. पण आज माझ्यावर एक वेगळीच जबाबदारी आलेली होती. श्रीमती गंगुबाई या पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करणार होत्या. त्यानिमित्ताने एक मोठा कार्यक्रम हुबळी मुक्कामी होणार होता. त्या कार्यक्रमाचा एक भाग असणार होता तो म्हणजे ‘किराणा घराणे’ हे माझे प्रकाशचित्र प्रदर्शन. या प्रदर्शनामध्येच श्रीमती गंगुबाईंच्या प्रकाशचित्रांचे एक दालन असणार होते.
माझ्या प्रकाशचित्रणाच्या व्यवसायाला सुरुवात होऊन फक्त तीन वर्षे झाली होती. जून १९८६ मध्ये माझे भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या भावमुद्रा असलेले ‘स्वरचित्रांच्या काठावरती ’ हे प्रदर्शन पुण्यात झाले. संगीत रसिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर काहीच दिवसात मला हुबळीहून एक पत्र आले. हुबळी येथील सुप्रसिद्ध अशा डॉ. एस.एस. गोरे यांच्याकडून आलेले ते पत्र ‘ अॅकेडमी ऑफ परफोर्मिंग आर्ट्स , हुबळी’ च्या लेटरहेडवर होते. गंगुबाईंची पंच्याहत्तरी, त्यानिमित्त असणारे विविध सांगीतिक कार्यक्रम व प्रकाशचित्र प्रदर्शन याविषयी त्यात माहिती होती. व प्रकाशचित्र प्रदर्शन मी करावे असे त्यात सुचवलेले होते. मी लगेचच माझा होकार कळवला व त्या प्रदर्शनाच्या कामाला लागलो. सहा महिन्यात मला ‘किराणा घराणे’ व त्यातीलच एक भाग ‘गंगुबाई- भावमुद्रा’ असे प्रदर्शन साकारायचे होते. त्याचाच भाग म्हणून मी ‘गंगालहरी’ बंगलीत पोहोचलो होतो.
माझ्या समोर असलेल्या मॉडेलचा उत्साह पाहून त्यांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे अशी शंका पण मनात येत नव्हती . इतक्या नामांकित व मोठ्या कलाकार असूनही त्यांचा साधेपणा मनाला भावणारा तर होताच पण माझे तेथे वावरण्याचे दडपण नाहीसे करणाराही होता. मी फ्लॅश वापरत नसल्याने मला उपलब्ध प्रकाशात फोटो टिपणे आवश्यक होते. मनावरचे दडपण नाहीसे झाल्यावर त्या अंगणात म्हणा किंवा त्यांच्या त्या बंगल्यात, वेगवेगळ्या ठिकाणी श्रीमती गंगुबाईंना मला पाहिजे तशा कोनात उभे करणे किंवा बसवणे व हवी तशी ‘पोझ’ सांगणे मला फारसे अवघड गेले नाही. जणू काही मी माझ्या आजीचेच फोटो काढत आहे. अतिशय सहजसुंदर, अनुभव समृद्ध व प्रसन्न भावमुद्रा ! कुटुंबीयांबरोबरही त्यांचे फोटो काढून झाले. मग भरपेट आदरातिथ्य ! किराणा घराण्याच्या मी जमवलेल्या जुन्या फोटोमधील कलाकारांची नावे जाणून घेण्याचा कार्यक्रम संध्याकाळी पार पडला. कलाकारांची नुसती नावेच नाही तर त्यांच्या दुर्मिळ अशा आठवणी सांगताना हळुवार व भावुक झालेला गंगुबाईंचा चेहरा पहाताना तेथे असलेले आम्ही सर्वच जण जणू त्या काळाची सफर करून आलो. माझ्या तीन दिवसांच्या हुबळीच्या मुक्कामात मी डॉ. गोरे यांच्याच घरी राहिलो असल्याने त्यांच्याही कुटुंबीयांशी माझी छान ओळख झाली.
अमृत महोत्सावाचाच एक भाग म्हणून श्रीमती गंगुबाईंवर एक गौरव ग्रंथ व पाच दशकातील त्यांच्या गायनाच्या पाच कॅसेट्सचा एक संचही प्रकाशित होणार होता. त्याच्या डिझाईनसकट सर्व काम मुंबईच्या आय आय टी मधील कीर्ती त्रिवेदी हे गृहस्थ करणार होते. मी डॉ. गोरे यांच्या घरी असताना तिसऱ्या दिवशी मुंबईहून कीर्ती त्रिवेदी यांचा फोन आला. पाच कॅसेट्सपैकी एका कॅसेटच्या रेकॉर्डिंगमध्ये काही दोष निर्माण झाला होता. सर्व कॅसेट्सची कव्हर्स छापून तयार होती. आता काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. डॉ. गोरे यांनी त्रिवेदींकडे चौकशी केली –
“ कोणत्या रागाच्या रेकॉर्डिंग मध्ये दोष आहे?”
त्रिवेदींचे उत्तर आले – “ राग दुर्गा. ”
पुढच्याच क्षणी डॉ. गोरे यांनी त्यांना उत्तर दिले –
“ ठीक आहे. मी गंगुबाईंना सांगतो. आजच आम्ही दुर्गा राग रेकॉर्ड करतो व तो स्पूल तुम्हाला उद्या मिळेल. ” किती सहज व आत्मविश्वास असणारे उत्तर !
डॉ. गोरे यांनी पुढचाच फोन गंगुबाईंना लावला व म्हणाले “ मुंबईला पाठवलेल्या एका रेकॉर्डिंगमध्ये काहीतरी गडबड आहे. आपण दुपारी तीन वाजता रेकॉर्डिंग करू. मी सर्व व्यवस्था करतो. तुम्ही सवाई गंधर्व कला मंदिरात या.”
आपल्या पुण्यात जसे बालगंधर्व रंग मंदिर आहे तसे हुबळीत सवाई गंधर्व कला मंदिर आहे.
दुपारी अडीच वाजता डॉ. गोरे व मी त्यांच्या स्पूल रेकॉर्डरसह सवाई गंधर्व कला मंदिर येथे पोहोचलो. रेकॉर्डिंगची तयारी करण्यात थोडा वेळ गेला. ठरलेल्या वेळी तीन वाजता श्रीमती गंगुबाई, त्यांच्या कन्या कृष्णाबाई , तबलजी असलेले बंधू शेषगिरी हनगळ , शिष्य नागनाथ व्होडेयार व एक हार्मोनिम वादक हे पोहोचले. स्टेजवरील तयारी झाली. गंगुबाईंनी तानपुरे जुळवले. तबला व हार्मोनियमचीही जुळवाजुळव झाली. मी सर्व उत्सुकतेनी अनुभवत होतो. इतक्यात श्रीमती गंगुबाई मला म्हणाल्या -
“ तू माझे एक काम करशील का?”
त्यांचे माझ्याकडे काय काम असणार असा विचार क्षणभर मनात चमकला. त्या मला फोटो काढायला सांगणार.... पण ते तर मी काढणारच होतो की ! माझ्या त्या क्षणभराच्या विचाराला भेद देत गंगुबाई म्हणाल्या – “ मोजून फक्त अर्धा तासाचे रेकॉर्डिंग करायचे आहे असे मला डॉक्टरांनी सांगितले आहे. एरवी रेकॉर्डिंगला समोर घड्याळ असते. आज समोर ऑडिटोरीयम आहे. तेंव्हा मला वेळ सांगण्यासाठी ऑडिटोरीयममध्ये माझ्या बरोबर समोरच्या खुर्चीत तू बैस. पंचवीस मिनिटे झाल्यावर हात वर करून मला तशी खूण कर. शेवटी हाताच्या पाच बोटांनी एक एक बोट बंद करत मला खूण कर म्हणजे बरोबर तिसाव्या मिनिटाला मी गाणे थांबवेन.”
मी हो म्हणण्यासाठी लगेचच मान हलवली. आणि मला साक्षात्कार झाला की त्या भव्य अशा सवाई गंधर्व कला मंदिरातील खुर्च्यांमध्ये मी एकटाच श्रोता असणार आहे. अंगावर सरसरून काटा आला. मी माझ्याही नकळत समोरच्या खुर्चीत जावून बसलो. आता माझ्यावर एक वेगळीच जबाबदारी असल्याने कॅमेरा बॅगबाहेर काढण्याचा प्रश्नच नव्हता. काम अवघड नव्हते पण मनात धडधड होत होती.
थोड्य्याच वेळात डॉ. गोरे यांनी सूचना दिली. विंगेत बसून व कानाला हेडफोन लावून डॉ. गोरे यांनी रेकॉर्डिंगचे काम सुरू केले. पद्मभूषण श्रीमती गंगुबाई हनगळ यांच्या भारदस्त आवाजात दुर्गा रागाच्या स्वरांनी सवाई गंधर्व कला मंदिर ही वास्तू भरून गेली. समोर एकमेव श्रोता असलेला मी एका दिव्य अनुभवाचा साक्षीदार होत होतो. बरोबर तीस मिनिटात त्या थोर विदुषीने दुर्गा रागाचे जे दर्शन घडवले ते केवळ अवर्णनीयच ! माझ्या आयुष्यातील एक कधीही न विसरता येईल असा प्रसंग.
रेकार्डिंग संपल्यावर ते कसे झाले आहे याची उत्सुकता सर्वांनाच होती. तशीच ती गंगुबाईंनाही होती. लगेचच डॉ. गोरे यांनी त्यांना हेडफोन दिले. गंगुबाईंनीही ते ऐकत आनंद घेतला. मग चहापान.
दुसऱ्या दिवशी पहाटेच ते स्पूल घेवून मी हुबळीहून थेट मुंबईला आय आय टी त पोहोचलो. डॉ. गोरेंनी दिलेला शब्द काटेकोरपणे पाळल्याने खुश होण्याची पाळी होती कीर्ती त्रिवेदी यांची.
अर्थात नंतर ५, ६ व ७ फेब्रुवारी १९८८ या तीन दिवसात जो स्वरोत्सव साजरा झाला तो ही असाच अविस्मरणीय होता. माझ्या त्यातील प्रदर्शनाचे उद्घाटन केले ते सुप्रसिद्ध कन्नड लेखक शिवराम कारंथ व पंडित भीमसेन जोशी यांनी. श्रीमती गंगुबाईंनी वैयक्तिकरित्या माझे कौतुक केले ते एक सुंदरसा डिनर सेट मला भेट देऊन.
मला शास्त्रीय संगीत कळते असे धाडसाचे विधान मी आज तीस वर्षांनीही करणार नाही. पण कधीतरी दुर्गा रागाचे स्वर कानावर पडले तर मात्र एका क्षणात मी ही तीस वर्षे विसरून थेट सवाई गंधर्व कला मंदिरातील पहिल्या रांगेतील मधल्या खुर्चीवर बसल्याचा अनुभव घेतो हे त्या स्वरांची ताकद !
नंतरच्या काळात पद्मविभूषण डॉ. श्रीमती गंगुबाई हनगळ यांच्या अनेक मैफ़लीत मी त्यांच्या भावमुद्रा टिपल्या. प्रत्येक वेळी त्यांचा मृदू स्वभाव, त्याचं आतिथ्य हे आठवत राहिलं. डावा हात कानावर, उजवा हात पुढे आलेला व डोळे मिटलेल्या स्वरमग्न गंगुबाईंची भावमुद्रा माझ्या मनावर कायमची कोरली गेलेली आहे. गंगुबाईंची मी टिपलेली ही भावमुद्रा भारतीय टपाल खात्याने त्यांच्या सन्मानार्थ प्रकाशित केलेल्या टपाल तिकिटावर जेंव्हा अवतरली तेंव्हा समस्त गानरसिकांच्या मनांवरही ती कोरली गेली असणार हे नक्की !
गंगुबाईंसारख्या कलाकाराला माझ्या कलेच्या माध्यमातून ही छोटीशी आदरांजली मला वाहता आली हेच आयुष्याचं संचित !!
आज ५ मार्च २०१८. आजच्या त्यांच्या १०५ व्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन!!
( आमचे मित्र आणि उत्तम छायाचित्रकार आणि लेखक सतीश पाकणीकर यांनी आजच फेसबुकवर प्रकाशित केलेला हा लेख मी त्यांच्या सौजन्याने इथे पुन्हा आपल्यासाठी देत आहे.)
- सतीश पाकणीकर ,
पुणे
९८२३० ३०३२०

1 comment:
लेख मस्तच आहे!
मूळ दुवा मिळेल? त्यांचे संकेतस्थळ पाहिले. पण facebook दुवा सहज सापडला नाही...
धन्यवाद!
-मिलींद.
Post a Comment