Saturday, August 25, 2018

काकतकरांचा बहुमूल्य ठेवा आता फर्ग्युसनमध्ये खुला

मित्रहो,
मुंबई दूरदर्शन च्या एका माजी अधिकाऱ्यानं, दूरदर्शन कडं, मी निर्मित केलेल्या, आणि माझ्याकडं असलेल्या (पण दूरदर्शन कडं नसलेल्या) आणि मी गेल्या ३० पेक्षाही कधिक वर्षं जिवापाड जपलेल्या off t'cast मुद्रित संग्रहित कार्यक्रमांच्या प्रतींच्या स्वामित्व हक्कांबद्दल प्रष्ण उपस्थित केल्यामुळं, 'बासन- एक चित्रकथी' हा उपक्रम रद्द करावा लागंत आहे.
या कार्यक्रमांपासून तुम्हाला यापुढं वंचित राहावं लागेल याची बोच माझ्या काळजाला मी हयांत असे पर्यंत सतत यातना देत राहील.

- अरुण काकतकर.



एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या अनेक उत्तमोत्तम साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांचा, आपल्या खाजगी संग्रहात असलेला दस्तावेज अरुण काकतकर यांनी नुकताच फर्ग्युसन महाविद्यालयाकडे सोपवलाय. रसिकांसाठी खुल्या झालेल्या या सांस्कृतिक ठेव्याविषयी...

...

'कोन्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग' खुद्द ग. दि. माडगूळकर आपली 'जोगिया' ही प्रसिद्ध कविता वाचून दाखवत आहेत, डॉ. वसंतराव देशपांडे फर्मास किस्से सांगत आपली नाट्यगीतं पेश करत आहेत, खुद्द कुसुमाग्रज आपल्या कवितांचं वाचन करत आहेत, इतकंच काय महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व भाई, म्हणजेच पु. ल. देशपांडे बाकिबाब बोरकरांना बोलतं करत आहेत, लता मंगेशकर मालकंसमधली बंदिश ऐकवत आहेत... असं तुम्हाला याचि देही याचि डोळा पाहायला-ऐकायला मिळालं तर...! खात्रीने तुम्ही म्हणाल- असं झालं, तर ते आमच्यासाठी स्वर्गसुखच आणि माझी खात्री आहे की, केवळ जुनी पिढीच नाही, तर नवी पिढीही असंच म्हणेल. कारण हा जो सांस्कृतिक ठेवा आहे, तो कालातीत आहे. तो विशिष्ट काळाबरोबर संपून जाणारा नाही. किंबहुना पिढ्यान् पिढ्या पुरुन उरेल, असं हे सांस्कृतिक संचित आहे.

कदाचित आजची पिढी या संचितापासून वंचित राहण्याची शक्यता होती...

पण आता तसं होणार नाही. जे पन्नाशीच्या पुढे आहेत, त्यांना स्मरणरंजनाबरोबरच पुनर्प्रत्ययाचा आनंद देणारी आणि नवागतांना नवनवोन्मेषशाली प्रतिभेचं थेटच दर्शन घडवण्याची संधी आता उपलब्ध झाली आहे. हा सुवर्णयोग घडवण्याचं सारं श्रेय मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरुण काकतकर यांना द्यायला हवं. त्यांनी संग्रहीत केलेल्या या वैभवशाली चित्रफिती आणि श्राव्यफिती, त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालय प्रतिष्ठानकडे सुपूर्द केल्या आहेत आणि हा खजिना सप्टेंबरपासून रसिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

काळाच्या पडद्याआड गेलेल्या हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, ज्योत्स्नाबाई भोळे, जितेंद्र अभिषेकी आणि यंदाच ज्यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे ते सुधीर फडके (बाबूजी), पुलं यांना अनुभवण्याची संधी या सांस्कृतिक ठेव्यामुळे रसिकांना मिळणार आहे. विशेषत: या नामवंतांना प्रत्यक्ष पाहिलेले जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना फर्ग्युसनच्या अॅम्फी थिएटरमध्ये शांतपणे बसून या नॉस्टेल्जियाचा आनंद घेता येईल.

हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, मोगुबाई कुर्डीकर, ज्योत्स्ना भोळे अशा मातब्बर गायिकांनी गप्पातून जागवलेल्या आठवणी आणि खुलवलेली गाणी. मंगेशकर परिवाराचे शब्द-सूर, बाकीबाब, कुसुमाग्रज, सुरेश भट, शांता शेळके अशा ज्येष्ठ कवींचं मनोगत. अभिषेकीबुवा, बाबूजी म्हणजे सुधीर फडके ते श्रीधर फडके अशा संगीतकारांची सांगीतिक वाटचाल, असा सारा शब्द-सुरांचा दुर्मीळ खजाना आता रसिकांना सहजतेने अनुभवता येणार आहे.

तीस-चाळीस वर्षांपूर्वी त्या त्या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या या मान्यवरांना मुंबई दूरदर्शनच्या माध्यमातून सादर करताना काहींचं खाजगी रेकॉर्डिंग करून ते जपण्याचं बहुमोल काम अरुण काकतकरांनी केलेलं आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर अशा अवघ्या मंगेशकर परिवाराला गाता-गाता, बोलता-बोलता दृश्यबद्ध करण्याचा 'योग' काकतकरांनी घडवला आहे. यामुळे आता पुढच्या पिढीलाही हे सारे वंदनीय कलाकार अनुभवता-पाहता येणार आहेत.

या मैफलींची काही खास वैशिष्ट्ये आहेत. हिराबाईंची त्यांच्या घरी, मोगुबाईंची कुर्डी (गोवा) आणि मुंबई इथल्या त्यांच्या तिथल्या वास्तव्यात वामनराव देशपांडेंनी मुलाखत घेतलेली आहे, ज्यात किशोरीताई आमोणकर सहभागी झालेल्या आहेत. अभिषेकीबुवा, माणिक वर्मांना वीणा देवांनी बोलतं केलंय. माणिकताईंची भावगीतं ऐकता येतील आणि प्रभाकर कारेकर, शैला दातार, आनंद भाटेसह 'नाट्यगीतां'ची रंगत अनुभवता येईल.

नाटककार सुरेश खरेंनी डॉ. वसंतराव देशपांडेंना प्रश्नातून खुलवत शाकुंतल-ते-मानापमान या प्रवासाचा पट मांडत, वसंतराव आणि आशाताई खाडिलकरांकडून गाणी गाऊन सादर केली आहेत. १९८४ सालात गोविंदराव पटवर्धनांनी वाजवलेली पेटी (हार्मोनियम) अर्धा तास ऐकण्याचा आनंद रसिक घेऊ शकतील. तर 'गीतरामायणा'मधलं 'पराधीन आहे जगती' हे फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये १९८० साली चित्रीत केलेलं गाणं अनुभवता येईल.

आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकरांचा गप्पा-गाण्यांचा मीच (सुधीर गाडगीळ) सूत्रसंचालन केलेला, 'शब्दांच्या पलीकडले' (१९८२-८४) कार्यक्रम पाहण्याची संधी या संग्राह्य ठेव्यामुळे शक्य झाली आहे. यात रंजना जोगळेकर, उत्तरा केळकर, श्रीकांत पारगावकर, देवकी पंडित यांना ऐकता येणार आहे. तसंच हृदयनाथ-लतादीदी-वाडकरांचा बंदिशी ते सुगम संगीत असा गानप्रवासही ऐकता येणार आहे.

स्मिता पाटीलने निवेदन केलेला लतादीदींचा 'आरोही' कार्यक्रम यात आहे. ज्याची संहिता पं. नरेंद्र शर्मा यांची आणि संगीत पं. हृदयनाथ मंगेशकरांचं आहे. मीना खडीकरांच्या 'शब्दांच्या पलीकडले'मध्ये खुद्द लतादीदींशी सुधीर पुन्हा 'मीच' संवाद साधलाय, तर पारगावकर, वाडकर, उषाताई गायलेत.

१९५२ मध्ये लता मंगेशकरांनी हातात तानपुरा घेऊन म्हटलेली 'मालकंस'मधली 'बंदिश' पाहाणं, हा या संगीत ठेव्यामधला सर्वोच्च आनंददायी दुर्मीळ क्षण.

अजित कडकडे, राजा काळे, आरती अंकलीकर, आशा खाडिलकर आणि खुद्द अभिषेकीबुवांनी सादर केलेला 'मत्स्यगंधा ते महानंदा' (१९७७), रंजना जोगळेकर, शैला दातार, उपेंद्र भट, राजन उंब्रेकर, अनुराधा मराठे, अरुण आपटे या गायकांनी १९८३ मध्ये टीव्हीवर सादर केलेलं 'चैत्रबन', विनय आपटेनी घेतलेली आनंद गंधर्व (भाटे)ची मुलाखत, अशोक रानडेंनी खुलवलेले पं. भीमसेन जोशी, सुधीर-श्रीकांत मोघेंनी काव्यचर्चा-वाचन करत पेश केलेले रॉय किणीकर, ज्यात अमृता-अजित सातभाई, वीणा-मृणाल देव, राहुल घोरपडे, अंजली माहुलीकर सहभागी आहेत, तसंच सुरेश नाडकर्णींनी घेतलेली सुरेश भट यांची मुलाखत... असे अनेक निवडक शो काकतकरांनी प्रतिष्ठानला दिले आहेत.

पु. ल. देशपांडेंनी पेश केलेले 'आनंदयात्री' बा. भ. बोरकर, वासंती मुजूमदारांनी बोलतं केलेल्या इंदिरा संत, हृदयनाथ-दीदींबद्दल ग्रेस, मंजिरी धामणकरांनी घेतलेली कुसुमाग्रजांची मुलाखत, त्यांचा नाशिकमधला सत्कार, त्यावेळचं वसंतराव कानेटकरांचं मनोगत, खुद्द कुसुमाग्रजांनी ऐकवलेल्या ६ कविता, अरुण काकतकरांनी दृश्यांकन केलेला 'जोगिया', ज्यात स्वत: ग. दि. माडगूळकरांनी 'जोगिया' म्हटलीय. रजनी चव्हाण, रवी मंकणी ज्यात सहभागी आहेत. राम शेवाळकरांनी मांडलेला रामायणातील 'राम', गदिमांच्या ३ कवितांच्या वाचनाच्या पार्श्वभूमीवर सुरेश वाडकर, रंजना पेठेंनी टीव्हीसाठी प्रथमच गायलेली गाणी, सुधीर मोघेंनी निरुपण केलेला 'अमृताची फळे', रवी साठे, माधुरी पुरंदरे, रंजना, श्रीकांत, अरुण आपटेंनी गायलेला, आनंद मोडकचं संगीत असलेला, १९८०चा खानोलकरांवरचा 'गेले द्यायचे राहून' डॉ. वसंतराव पटवर्धनांनी रूपांतरित केलेला, वसंतराव देशपांडे, आशा खाडिलकरांनी गायलेला, सुरेश देवळेंनी संगीत दिलेला 'गीतमेघ', अशा अनेक आगळ्या कार्यक्रमांनी हा 'ठेवा' सजलाय. १९७२ पूर्वी अरविंद मंगरुळकरांनी घेतलेली कुमार गंधर्वांची मुलाखत, बंदिशी-गाणं, मोगुबाई-किशोरीताईंचा 'हे तो कौतुक संचिताचे' आणि 'नादपुत्र भीमसेन जोशी' हे दुर्मीळ क्षणही त्यात आहेत.



अलीकडच्या काळात अप्राप्य झालेल्या या साऱ्या ज्येष्ठ कलावंतांचे 'क्षण' टिपणारे आणि आता ही संग्रहीत फितींची भेट फर्ग्युसनला देऊन, सामान्यांना या क्षणाचं दर्शन घडवण्यास कारणीभूत ठरलेले अरुण काकतकर हे अगदी मुंबई दूरदर्शनच्या (१९७२) नमनापासूनचे साक्षी आहेत. ज्येष्ठांना अर्काईव्ह करता करता, अगदी नव्या पिढीतल्या बहुतेकांना १९७४ पासून छोट्या पडद्यावर आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मुळगावकर फाऊंडेशन, स्टेट बँक, एनडीएत न अडकता अरुण काकतकर टीव्हीकडे वळले. साऱ्या कलावंतांना पेश करण्यात पुढाकार घेतला आणि आता निरपेक्षपणे त्यांनी आपल्याकडचा हा ठेवा फर्ग्युसनच्या हवाली केलाय. दूरदर्शनच्या सोनेरी दिवसांचा हा दरवळ अनुभवताना रसिक त्यांना दुवाच देतील!



-सुधीर गाडगीळ, पुणे


( अरूण काकतकर यांनी त्यांच्या फेसबुकवर प्रकाशित केलेला हा सुधीर गाडगीळ यांनी लिहलेला हा लेख मी त्यांच्या न कळत इथे काकतकरांचे हे मोठे काम माहित व्हावे यासाठी इथे वापरत आहे..मला वाटते त्यात मी काही गैर केलेले नाही. )

No comments: