Friday, July 17, 2020

आठवणीत कायम कोरले एन डी आपटे ..गेले




अनेकांना घडविणारे एन डी आपटे सर..

कालच्या सकाळमध्ये आम्हा अनेकांना घडविणाऱ्या एन डी आपटे सर यांच्या निधनाची बातमी ऐकली आणि खूप काही शिकविणाऱ्या या गुरूंच्या आठवणीने मन हेलावून गेले..
पुण्याच्या माडीवले कॉलनीतील तळमजल्यावरचे घर समोर आले.. आणि त्यांच्या स प समोरच्या अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयातील त्यांच्या वर्गातील सारे चित्र स्पष्ट डोळ्यासमोर आले.. जिद्दीने आणि तळमळीने विद्यादान सढळ हाताने करणारे अतिशय प्रेमळ , हळुवार बोलणारे एन डी समोर उभे राहिले.. खरे तर त्यांच्या पाठीवर फिरलेल्या हातानेच तर मी पदवीधर बनलो.. कितीही शंका अगदी ती बारीक असली तरी सरांनी ती सविस्तरपणे निरसन केली आणि त्यामुळेच वाणिज्य शाखेतील अवघडलेले कोडे आयुष्यात सहजी सुटून गेले..
त्यांनी कधी फी मागितली असे आठवतच नाही.. किती मुलांनी त्यांची फी बुडविली याचे गणित त्यांनी कधी केलेच नाही..
बी एम सी सी महाविद्यालयातली प्राध्यापक पद सोडून ते आपल्या स्वतंत्र वर्गात ते रमून गेले.
पण त्यांचे खरे प्रभुत्व होते ते सहज सोपे इंग्रजी अधिक समजेल अशा भाषेत सांगण्याची लकब..तेच त्यांचे महत्व ओळखून  संपादक सदा डुंबरे यांनी त्यांना  साप्ताहिक सकाळ मध्ये त्याचे सदर सुरू केले..त्या निमित्ताने ते जेंव्हा सकाळमध्ये येत तेंव्हा मी ई सकाळचा वृत्तसंपादक म्हणून रुजू होतो..ते आवर्जून भेटत .. सविस्तर गप्पा मारत..
बोलणे , गप्पा मारणे आणि शिकविणे हे त्यांचे आवडते विषय..

पॅन्ट, साधा शर्ट , डोळ्यावर सतत खाली ओघळणारा चष्मा आणि हातात मोठी पिशवी घेऊन ते सहजपणे पाठीवर हात ठेऊन गप्पा मारत..

शेवटपर्यंत तो साधेपणा कधीही लोप पावला नाही..आणि ती समजवण्याची तळमळ कमी झाली नाही..

संगीत, क्रिकेट आणि बँकिंग अश्या विषयात त्यांचे सखोल विचार असत.. वक्तृत्वाची छाप नसली तरी विषय समजून सांगण्याची त्यांची हातोटी  विलक्षण होती..

माडीवाले कॉलनीतल्या वास्त्यव्यायानंतर कर्वे रस्ता परिसरात ते रहायला गेले आणि थोडा नेहमीचा दुरावा कमी झाला..

आपल्या स्वभावाने आणि शिकविण्याने त्यांनी अनेक मित्र जमविले.. त्यांच्यामुळे कितीतरी विद्यार्थी पदवीधर होण्याचे स्वप्न साकार करू शकले..

एन डी  आपटे यांच्यासारखे सालस, सरळ आणि हळवे व्यक्तिमत्व आता दिसणार नाही..याचे दुःख आहे..पण त्यांनी घडविलेल्या अनेक कर्तृत्ववान विद्यार्थ्यांच्या अनेक क्षेत्रातल्या मुशाफिरीने ते सतत समाजात कायम स्मरणात रहातील..

त्यांच्या कर्तुत्वाला आम्हा सगळ्यांचा अखेरचा सलाम..आणि आदरांजली..

-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail. com






No comments: