Sunday, July 12, 2020

गच्चीवरील बागेतून स्वप्नं साकार...






छान सुंदर घर असावं. घराभोवती बाग असावी. बागेत रंगीबेरंगी फुले फुलवीत.



एक कोपरा असा आसावा, की नव्या रचना इथे घडाव्यात. नवे प्रयोग इथे दिसावेत.



घराला लागणारा भाजीपाला. काही प्रमाणात फळेही यावीत.



घराच्या बगीच्यात बसून मस्त गप्पा छाटाव्यात. सहचारिणी सोबत असावी.



मुलांनीही खेळून धुडगूस घालावा.असे स्वप्नातले घर दिसणे आता कठीण.






घरांच्या किमती परवडेनाशा झाल्यात. बंगला आता विसरा, चांगला फ्लॅटही चालेल. जमलीच तर बाल्कनी असावी. मिळालीच जर टेरेस तर उत्तमच. कुठेही राहिलात तरी निसर्गाला जवळ करण्यासाठी चार-पाच कुंड्यांतली झाडे तरी हवीतच. अशाच स्वप्नांचा पाठपुरावा करताना भेटले एक रो-हाऊस. पुढे-मागे जागा. तीन टेरेस आणि वर झेड आकाराची का असेना स्वतःच्या मालकीची गच्ची.






अशी फुलवली बाग



ःबागेसाठी जागा मिळाली याच्या आनंदात ती फुलविण्याचे कसबही आपणच करावेत, अशा निश्चयातून माती आणली. रोपे निवडली. कुंड्यांची रचना सर्व बाजूंनी चांगली दिसावी म्हणून तिरक्या विटाही लावल्या. गुलाब, पारिजात, तगर, नारळ, मोगरा, जाई लावली. वर्षभरात फुले दिसू लागली. ती किती येतात, यापेक्षा "आपल्या बागेतली' याचा आनंद अधिक मिळाला.कुठलेही खत घालता पाण्याच्या योग्य नियोजनातून बागेतली हिरवळ वाढू लागली.



नारळ, चिकू यांनी अजून दर्शन दिले नसले तरी रामफळाच्या आगमनाने छान वाटले.



आडनाव इनामदार पण कुळ कायद्याने शेतीच्या सात-बारात नाव राहिले. एकरात शेती करण्याची संधी स्क्वे.फुटात घेतोय, असो. रो-हाऊसची संकल्पित सोसायटी काळाला मान्य नव्हती. शेजारी आणि मागे फ्लॅट आले. परिणामी बागेला मिळणारे ऊन गायब झाले. आजही झाडे आहेत, पण ती सकाळच्या वा दुपारच्या उन्हामुळे नाहीत, तर संध्याकाळी येणाऱ्या उन्हाच्या प्रकाशाने. बागेच्या नियोजनानुसार घराच्या परिसरातील राडारोडा काढून त्यावर पोयटा माती टाकून रोपे लावली. सिमेंटच्या जंगलात हिरवळ साकारली. पहिला उत्साह इतका होता, की रोपांमध्ये अंतर कमी झाले. त्यामुळे झाडांना उसासा घेण्यासही जागा उरली नाही; मात्र रोपांच्यासाठी लागणाऱ्या खताचे उत्पादन स्वतःच करायचे ठरविले होते. यासाठी चार वर्षे घरातल्या निवडलेल्या भाज्यांची देठे, पालापाचोळा, देवाचे निर्माल्य सारेच जिरविण्यासाठी बाजूच्या मातीचा उपयोग केला. त्यातले सिमेंटचे-विटांचे तुकडे, साराच भार कमी करून मातीचा अंश वाढवला. त्यावर पाण्याचा फवारा देऊन खताची निर्मिती केली. गांडुळे सोडता खत तयार झाले. बागेतल्या झाडांना ते घातले. त्यातून रोपांची वाढ जोमाने झाली. इतकी की मधुमालतीचा, जाईचा वेल घरावर चढला. तीस-पस्तीस फुटांवर बहरत राहिला आहे. गुलाबी जास्वंद आणि पारिजातकाने इतके बहरणे, वाढणे थांबवावे असे वाटले. अखेरीस छाटणीचा मार्ग निवडावा लागला.












वारंवार रोपांभावती आळे करणे चालूच होते. बागेतल्या पानांतून निर्माण होणाऱ्या नैसर्गिक खतानेही झाडांचा बहर वाढविला. काही झाडे काढून सोसायटीच्या बागेत हलवली. काही कुणाला देऊन टाकली. आता दर्शनी भागातली हिरवळच सांगते की आता पुरे. मग काय गच्चीवर कुंड्यांतून रोपे लावायची कल्पना आली.






गच्चीवरील बाग






ःरो-हाऊसच्या बाजूच्या भागात फरशी घालताना तयार झालेली खताची माती सहा बाय चारच्या जागेवर गच्चीवर टाकली. त्या खाली प्लॅस्टिकचे कापड अंथरले. त्या बेडवर शेतीसारखे भाजीचे बी टोकले. आज कोथिंबीर, पालक आणि मेथी एकत्रित नांदत आहेत. भाज्यांवरोबर लसणाच्या कुड्याही लावल्यात. त्यातूनही हिरवे अंकुर डोकावू लागलेत. सहा मोठ्या सिमेंटच्या कुंड्यांतून गुलाब, लिंबू आणि डाळिंबाची रोपे लावली. कुंडी लावताना खाली थोडा विटांच्या भुग्याचा थर त्यावर माती, मातीवर ओला कचरा असे करत कुंडी भरली. गुलाब फुललाय. मात्र लिंबे आणि डाळिंबाची वाट पाहतोय.निशिगंध, मोगरा, चार-प्रकारची जास्वंद. कोरफड, गुलाब, शेवंती, जाई, बह्मकमळ आणि छोट्या कुंड्यांतून मनी प्लॅंट, पुदिना वाढतोय. कुंड्यांत मात्र वारंवार माती उकरावी लागते नवी माती भरावी लागते. कधी काही कुंड्यांतली माती कमी करून बागेतला पानांचा थर देऊन त्यावर माती पसरली जाते. पाणीही सतत घेता कधी भांडभर तर कधी पूर्णपणे झाडावर पाण्याचा फवारा करतो.मध्यंतरी बायोकल्चर वापरून कुंडी कशी भरावी ते पाहिले. कुंडीमध्ये खाली विटांच्या तुकड्यांचा थर, नंतर भाजीपाल्याचा ओला कचरा, वर बायोकल्चर, परत ओला कचरा अशी कुंडी भरून त्यात रोप लावले. आता त्याला महिना पुरा होतोय. फुले भरभर उमलतात. गुलाबाच्या रोपांची पाने वाढताहेत. जास्वंदीच्या फांदीची वाढ होतेय. सारेच आनंदाचे. वाढत्या बहरलेल्या झाडांचे.






येत्या काही दिवसांत बाकीच्या गच्चीत मातीचे बेड करून त्यात भाजीपाल्याची लागवड करायची आहे. घरची पालेभाजी खाण्यातल्या आनंद काही वेगळाच आहे. हे सर्व करताना एक पथ्य पाळलंय, की रासायनिक खत वापरायचे नाही. लागलेच तर शेण खत घालायचे. हे सारे जपण्याचा छंद लागलाय. त्यात वेळ कसा जातो ते कळत नाही. मातीच्या कुपीतून बाहेर येणाऱ्या या हिरवळीची मजा चाखल्याशिवाय कळणार नाही






सुभाष इनामदार, पुणे-



९८८१८९९०५६

No comments: