Monday, March 23, 2026

मोबाईल कलाकारांना अडथळा बनत आहे..!

 अनेक दिवस एक गोष्ट बोलेन म्हणते. आज बोलते.. 

संवेदनशील मनाने समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर बरं वाटेल. 

कलाकारांचा आणि श्रोत्यांचा ध्यानभंग करणारी एक गोष्ट आज सर्वांच्या हातात आहे, ती म्हणजे मोबाईल. फोटो काढणे, क्लिप्स बनवणे, रेकॉर्डिंग करणे… या सगळ्यामुळे कलाकाराला रागाच्या भावावस्थेत शिरताना मोठा अडथळा निर्माण होतो. इतकं सोपं असतं का रागगायन करणं? एखादा राग खुलवण्यासाठी जे पोषक, एकाग्र वातावरण आवश्यक असतं, ते आम्हाला अनेकदा समोरून मिळत नाही हो. 

 

अनेकदा प्रसिद्धी पेक्षा महत्वाचं असतं समाधान. राग उत्तम रंगला, शांत चित्ताने मांडता आला की होतं- ते समाधान. 

आमच्या गाण्याचे तीस सेकंदांचे, एक मिनिटाचे रील्स बनवून इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर शेअर करणे, ही आमची अपेक्षा नाही. त्यापेक्षा तुम्ही शांत बसून, पूर्ण लक्ष देऊन गाणं ऐकलंत, तर ते आमच्यासाठी अधिक समाधानकारक आहे. कारण अशा कृतीतून ना कलाकाराला खरी समाधानाची अनुभूती मिळते, ना श्रोत्याला. मान्य आहे तुमच्या व्हिडिओ शूट करण्यामागे प्रेम आहे. त्याची नोंद आणि कृतज्ञ भाव आम्हा कलाकारांच्या मनात असतो. पण ती कृती आमच्या बांधणीत बाधा आणते हो. 


म्हणूनच एक प्रश्न पडतो, ..प्रेक्षागृहात मोबाईल निषिद्ध का नसावा? असा नियम का नसावा? आपण पाहिलं आहे की काही देवस्थानांमध्ये मोबाईल वापरण्यावर पूर्ण निर्बंध असतात. मग इथे का नको. 

परवा आस्ताद चा व्हिडिओ पाहिला. त्या पाठीमागची कलाकाराची तळमळ समजून घ्या. परफॉर्मिंग आर्ट.. म्हणजे मंचावरचा प्रत्येक क्षण पूर्ण अनुभूतीने जगणं. तिथे पूर्वनियोजित काहीही नसतं. त्या क्षणाला जी उपज येते तीच कलाकृती..  रागाचं भावविश्व गवसणं इतकं सोपं असतं का? राग मूर्त स्वरूपात उभा करत असताना जे पोषक वातावरण हवं आहे ते अनेकदा आम्हाला मिळत नाही.. 


आणि हे मान्य आहे की आजच्या काळात प्रसिद्धी महत्त्वाची आहे. गाण्याचं सोशल मीडियावर असलेलं अस्तित्व……रील्स, व्हिडिओज, यूट्यूबवरचे फुल-लेंथ व्हिडिओज, हे सगळं आवश्यकच आहे. पण त्यासाठी प्रत्येकाने हातात मोबाईल घेऊन शूट करणं अजिबात गरजेचं नाही. त्या कामाकरता नेमलेल्या दोन- तीन व्यक्ती उत्तम दर्जाचे फुल-लेंग्थ व्हिडिओ किंवा शॉर्ट रील्स तयार करू शकतात. फोटोज काढू शकतात. ते पुरेसं आहे. पण जर संपूर्ण प्रेक्षागृहात सतत स्क्रीनचं चकाकणं सुरू असेल, तर तो इतका मोठा ध्यानभंग होतो की कलाकाराने मग नेमकं गायचं कसं. राग नीट रंगला नाही तर त्या बिचाऱ्या कलाकारावर टीका ही होतेच. एक शांत स्वच्छ कॅनव्हास हवा आहे, तर चित्र देखणं सुबक चितारता येईल. इतकी माफक अपेक्षा गैर आहे का?


प्रेक्षागृहात मोबाईल वापरण्यावर बंदी हवी असे माझे मत आहे. यामुळे किमान तीन तास मोबाईलशिवाय राहण्याची एक साधना तरी घडेल. गाणं नेमकं कसं ऐकायचं, त्यातलं सूक्ष्म काय आहे, हे जाणून घेण्याची सवय लागेल. सतत स्क्रीनकडे पाहत राहून आपण खरंच राग ऐकतो आहोत का? की फक्त काहीतरी पार्श्वभूमीला चालू आहे? चित्तवृत्ती एका ठिकाणी पूर्णपणे स्थिर होणं, हेच खरं श्रवणाचं तत्त्व आहे. श्रोत्याचं आणि कलाकाराचं मन एकरूप होणं आवश्यक आहे. आणि त्या अवकाशात मोबाईल हा फार मोठा अडथळा ठरतो आहे.


हा अडथळा आपण कधी दूर करणार?”


आणि हा अडथळा ज्या क्षणी दूर होईल, त्या क्षणी मी पैज लावून सांगते.. असे श्रोते घडतील की एक तास काय, दीड तास काय, पूर्ण तीन तासांची मैफल अत्यंत एकाग्रतेने आणि सुरेखपणे ऐकतील. तसेच, त्या उंचीचे कलाकारही अधिक खुलून येतील, आणि तितक्याच जाणिवेने ऐकणारे श्रोते तयार होतील, याबद्दल मी अत्यंत ठाम आहे.


आजही आपण आपल्या ज्येष्ठांकडून ऐकतो ‘काय रंगली होती ती मैफल!’ आणि ते सांगताना त्यांच्या अंगावर शहारे येतात. स्वरागणिक आठवणी त्यांच्या मनात जिवंत असतात. जुन्या पिढीचं कशाला.. मी स्वतः सांगू शकते की लहानपणी अनुभवलेल्या बहुतेक मैफिली आजही जशाच्या तशा माझ्या स्मरणात आहेत. केवळ नोंदी म्हणून नाही, तर त्या वेळी अनुभवलेल्या आनंदासकट, त्या भावावस्थेसकट


मला आठवतं मी लहान असताना उस्ताद विलायत खाँ साहेब 

यांची सतार ऐकण्याचा योग आला होता, सवाई गंधर्व चा मंच. हजारो श्रोते, एकच कलाकार….पण संपूर्ण मंडपात एकच मन. जणू कलाकाराने आपल्या मनात सर्वांना सामावून घेतलंय. जणू तो अवलिया सर्वाना एका प्रवासाला घेऊन निघालाय. सगळे एकाच नावेत, एकाच भावविश्वात, सगळे सहप्रवासी!! तो अनुभव शब्दांत मांडणं कठीण आहे, पण वातावरणात एक अद्भुत जादू होती.


काहींच्या डोळ्यात अश्रू होते, काही कृतज्ञतेने भरून गेले होते… प्रत्येकजण त्या रागरसात पूर्णपणे बुडून गेला होता. ती काय अवस्था होती, हे सांगणं कठीण आहे, पण ते अनुभवणं मात्र अमोल होतं.


आणि मग प्रश्न पडतो, आज असं का घडत नाही?


कलाकारांचा दर्जा खालावला आहे, असं अजिबात नाही. उलट, आजही अत्यंत समर्थ आणि प्रतिभावान कलाकार आहेत. पण त्यांना जो‘अवकाश’ आवश्यक आहे, जी शांतता आवश्यक आहे ती मिळत नाही. आणि हे आपण प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे.


-


श्रुती विश्वकर्मा..मराठे..

ठाणे..