Saturday, March 29, 2008

नाणकशास्त्रातील विदुषी

डॉ.सौ. शोभना गोखले यांच्या साध्या स्वभावातच त्यांचा मोठेपणा दडलेला आहे.शिलालेखांचे संशोधन अणि प्राचिन नाण्यांवर केलेल्या कार्यामुळे त्यांचे नाव संशोधनाच्या या क्षेत्रात गाजले.आज त्या ऐंशा वर्षाच्या आहेत.आदिवासी भागातल्या स्त्रीयांशी संशोधनाच्या निमित्ताने त्यांचा संपर्क आला.प्रत्येक ठिकाणी त्यांना विचारले जायचे तुम्हाला नवऱ्याने सोडलेय का? पतीशी पटत नाही काय?गावोगावी जावून नाण्यांच्या संशोधनाची कामगीरी पार पाडताना त्यांना आलेल्या अनुभवातून त्यांची मुलाखत रंगत गेली.
साठपेक्षा अधिक काळ त्यांनी डेक्कन कॉलेजच्या प्राच्यविद्दया विभागात विविध नविन संशोधनात आयुष्य घालविले.
याही वयात त्यांची उमेद,जिद्द कायम आहे.
त्यांच्या मुलाखतीतून ते तुम्हालाही जाणवेल!
मुलाखत पाहण्यासाठी येथे क्‍लिक करा......

Thursday, March 27, 2008

मराठी रंगभूमीचे आसन डळमळीत होऊ घातलय

नवे विचार नव्या तऱ्हेने रंगमंचावर मांडणारा लेखक घडायला हवा
जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने मुलाखतीतून घडलेले विचारमंथन
पुणे-मराठी प्रेक्षक रोडावत चाललाय. थिएटरकडे वळणारा प्रेक्षक घरातल्या छोट्या पडद्याकडे अधिकाधिक ओढला गेलाय. टीव्ही मालिकांत काम मिळायला लागल्यापासून थिएटर करण्याकडे कलावंतांचाही मूड नाही. नाट्य व्यवसायाला बरे दिवस यावेत यासाठी सरकारने अनुदान जाहीर केलेय. थिएटर भाडे वाढलेय. मायबाप प्रेक्षकालाही तिकिटाचे दर परवडेनासे झालेत. प्रायोगिक-समांतर रंगभूमीवर होणाऱ्या नव्या प्रायोगिक नाटकांची संख्या रोडावली आहे. एकूणच मराठी रंगभूमीचे आसन डळमळीत होऊ घातलय. राजाश्रय मिळतोय, पण लोकाश्रय कमी होत चाललाय.नाटक हे समाज प्रबोधनाचे साधन आहे.पण आज ते घडतयं काय असा सवाल करून ज्येष्ठ कलावंत चित्तरंजन कोल्हटकरांनी नवी नाटके,नवे विचार नव्या तऱ्हेने मांडणारा लेखक घडण्याची आवशक्‍यता असल्याचे मत व्यक्त केले.

मार्च २७ च्या जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीच्या आजच्या स्थितीचे हेच वर्णन करावे लागेल. ई-सकाळसाठी काही निवडकांच्या मुलाखतींतून साधारण हाच सूर होता.
चित्तरंजन कोल्हटकर, डॉ.न. म. जोशी. माधव अभ्यंकर, सुनील गोडबोले, अमोल बावडेकर, अपर्णा अपराजित, वसंत अवसरीकर, सिद्धेश्वर झाडबुके, विनायक कुलकर्णी, मधुसूदन साठे, प्रदीप कांबळेअशा कांही रंगमंचावर वावरणाऱ्या मंडळींशी चर्चा करून घेतला गेलेला हा आढावा. प्रेक्षकांनी रंगभूमीकडे पाठ केलीय, असेही काहीना जाणवतंय. नवे नाटककार फार नाहीत. तेही व्यावसायिक दृष्टीतूनच नाटकाची मांडणी करताहेत. अभ्यास म्हणून नाटकाकडे पाहणारा वर्ग कमी होत चाललाय.
छबिलदासची चळवळ केव्हाच बंद पडलीय. समांतर रंगभूमीवर पुण्याच्या समन्वयचे प्रयोग सुरू आहेत. पण तेही चित्रपट-सिरियल करण्यात गुंतलेत. गंभीरपणे नाटकाकडे पाहणारा अभ्यासू वर्ग आता काळाआड दडून गेलाय.
संगीत रंगभूमीवर तर नव्या नाटकांचीच वानवा आहे. मुंबईचा साहित्य संघ आणि पुण्याच्या शिलेदार मंडळींची झुंज सुरू आहे. काही प्रमाणात भरत नाट्य संशोधन मंदिर प्रयत्नात आहे. पण तीही जुन्याच नाटकांची रंगावृत्ती करून.नवा नटसंच घेऊन जुनीच नाटके दोन-अडीच तासांत बसवायचा घाट घातला जातोय. त्यातले अती संगीत मारक ठरत होते ते कमी केले जातेय. संगीत नाटके जपायला एवढंच पुरेसं नाही. त्याही पारंपरिक कलेचा वारसा जोपासणारे नवे तजेला आणणारे नाटक घडायला हवे.
घरच्या छोट्या पडद्याला दूर सारून रंगभूमीकडे वळविण्यासाठी रंगकर्मी-नाट्य संस्था आणि अभ्यासकांनी आता याचा विचार करायला हवा. जागतिक रंगभूमी दिनाच्या निमित्तानं साऱ्यांनीच गंभीर होण्याची गरज आहे.

भाग एक

भाग दुसरा

Wednesday, March 5, 2008

संगीत चैती या नाटकाची ध्वनीचित्रफित

कलापिनी या तळेगाव-दाभाडेच्या संस्थेने नुकत्याच नव्याने रंगमंचावर आणलेल्या संगीत चैती या नाटकाची ध्वनीचित्रफित पाहण्यासाठी
भाग एक इथे क्‍लिक
भाग दुसरा इथे क्‍लिक

Saturday, March 1, 2008

नवे संगीत नाटक- संगीत चैती

नवे संगीत नाटक करणे हेच आज शिवधनुष्य उचलण्यासारखे आहे. कलापिनी संस्थेने ते उचलेलेच नाही तर ते पेललेही. योगिनी जोगळेकरांच्या "चैती' या कादंबरीचे शरद जोशी यांनी केलेले हे नाट्यरूपांतर. संगीत कलेचे चाहते आणि संगीताला राजाश्रय देणाऱ्या बिंदापूर संस्थानात घडलेली ही कथा. संगीत नाटक आवर्जून पाहणाऱ्या रसिकांना "चैती' नक्कीच आनंद देईल. कलावंतांत व्यावसायिक सफाई नसली तरी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने ते नाटक रंगमंचावर सादर करतात. संगीत नाटकांची परंपरा जपणाऱ्या कलापिनीचे खास आभिनंदन.
संगीततज्ज्ञ रघुनाथबुवा अवचट, त्यांची मुलगी चैती यांच्या संगीतमय आयुष्यावरची ही कथा. बिंदापूर संस्थानचे राजगायकपद भूषविलेल्या राजगायकाच्या जिद्दीची ही संगीतमय कहाणी. जिद्दी, तापट आणि अहंकारी गायकाच्या जीवनाची फरफट जोगळेकरांच्या कादंबरीत आहे. अवचटबुवांची मुलगी भर दरबारात चैती गाऊन राजेसाहेबांच्या मर्जीत बसते. तिचे गाणे वाढावे यासाठी ते संस्थानात तिला आश्रय देतात. तिचे गाणे बहरते. मात्र राजांच्या दरबारी आलेल्या पाहुण्यांच्या संगीतातल्या खोट्या फुशारकीने अवचटबुवा संतापतात आणि राजगायकपदाला लाथाडून निघून जातात. या प्रसंगानंतर चैती आणि अवचटबुवांची होणारी ताटातूट आणि चित्राने गायलेल्या "आयी ऋत बसंत' या गायनामधून सांधली गेलेली नाती यांचा संगीतमय अनुभव नाटकात सजवला गेला आहे.
कादंबरीतला विषय नाटकात आणताना संगीताकडे आधिक प्राधान्य दिले गेले आहे. त्यातले नाट्य यामुळे झाकोळले जाते आणि हे नाटक म्हणजे संगीताची रंगमंचीय मैफलच होऊन जाते. अर्थात ती श्रवणीय आहेच; तितकी देखणीही आहे. दरबारात घडलेल्या अपमानाचा प्रसंग. बुवांचे स्मशानातले वावरणे आणि चित्राची प्रेक्षकातून एंट्री या ठळक प्रसंगांची नोंद करावी लागेल. आजकाल विसरत चाललेल्या संगीत नाटकाला पुन्हा एकदा रंगमंचावर विराजमान करताना काळानुरूप बदल न करता रंगावृत्ती तयार केली आहे. शरद जोशी यांनी त्यातल्या संगीताच्या जागा नेमक्‍या निवडल्या आहेत आणि उपलब्ध कलावंतांकडून त्या नटविण्याचा प्रयत्न केला आहे.
दिग्दर्शक मकरंद जोशी यांनी नाटकाची जातकुळी आणि संगीत नाटकाला योग्य असा नटसंच तयार करून नाटकातले प्रसंग खुलविले आहेत. नेपथ्य-प्रकाशाच्या साहाय्याने प्रयोग खुलविला आहे.
मात्र संगीताचा थोडा भाग कमी करून नाट्य खुलविणाऱ्या प्रसंगावर भर दिला तर नाटकाचा बॅलन्स साधेल. अन्यथा संगीतात नाटक असल्याचा भास कायम राहील.
संपदा थिटे यांच्या भूमिकेत संयमी आभिनेत्री सतत डोके वर काढते. मात्र तिचे संगीतातले यश वादातीत आहे. भूमिकेला साजेसा अभिनय करून "चित्रा'च्या पदांना त्या सहजगत्या खुलवतात. उच्चार आणि संगीतातला सच्चा सूर मनाची पकड घेतो. सर्वच पदे लक्षात राहतात, पण उल्लेख करावा "आयी ऋतू बसंत' या पदाचा. अवचटबुवांच्या भूमिकेत रवींद्र कुलकर्णी शोभतात. पदांना आणि ख्यालगायकीला ते न्याय देतात. भूमिकेतल्या संवादाला ते न्याय देण्यास कमी पडतात. नाटकात नाट्य फुलविणारे अनेक प्रसंग आहेत, मात्र त्याचा पुरेसा लाभ प्रेक्षकांना घेता येत नाही. विनायक लिमयेंचा नागनाथ प्रभावहीन वाटतो. संगीताची जाण हीच त्यांची ताकद आहे. राजीव कुमठेकर, विनायक भालेराव, केदार तापीकर, डॉ.सुहास कानिटकर, शरद जोशी आणि मकरंद जोशी यांच्याही भूमिका उल्लेखनीय झाल्या आहेत.
डॉ. अ. शं. परांजपे यांची नाटकात भूमिका आहे, पण कलापिनीकडून हे नाटक रंगमंचावर आणण्याची खरी ताकद त्यांची आहे. प्रयोग अजून सफाईदार होण्याकडे लक्ष देऊन संगीताच्या भागाकडे नाटक म्हणून पाहिल्यास "संगीत चैती' संगीतरसिकांना अधिक भावेल, असे जाणवते.


सुभाष इनामदार,
subhashinamdar@esakal.com

(या नाटकाची ध्वनिचित्रफीत दोन भागांत www.esakal.com वर पाहता येईल.)

Thursday, February 28, 2008

अडीच तास हसण्याची हमी

दिवसा तू, रात्री मी
---------------

अडीच तास हसण्याची हमी

रंगमंचावर कलाकारांच्या उत्स्फूर्त आविष्काराने सजलेले नाटक म्हणजे संतोष पवारांचे "दिवसा तू-रात्री मी'. "सुयोग'निर्मित "रसिकरंजन' प्रकाशित या नाटकाचा प्रयोग लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण या तिन्ही दृष्टीने रंगतदार होतो.
मूळ संकल्पना हरिकिशन दवे याची. नाटकाचे कथासूत्र तसे छोटे. मुंबईतल्या 1993च्या बॉंबस्फोटात "प्लाझा'त चित्रपट पाहायला गेलेल्या कुटुंबातील पत्नी जागीच मरण पावते. पण स्फोटाच्या आवाजाने पतीची स्मरणशक्ती जाते. मुलीला आंधळेपणा येतो. (रात्री सातनंतर दिसते!) मोठ्या मुलाला बहिरेपणा येतो. धाकट्याची बोलती आई गेल्याच्या धक्‍क्‍यानेच बंद झालेली. आंधळ्या मुलीला पाहायला मुलगा येतो आणि सारे कुटुंबच आपले व्यंग झाकण्यासाठी एक एक क्‍लृप्त्या करून मुलाच्या आई-वडलांना समजावण्याचा प्रयत्न करतात. त्यातही गंमत म्हणजे बघायला येणाऱ्या मुलाला सकाळी दिसत असते रात्री आंधळेपणा.संतोष पवार गंभीर कथेला विनोदाच्या अंगाने इतके छान मढविले आहे की ते शब्दात सांगणेही अवघड आहे.वास्तविक लिखीत नाटक अर्ध्या तासाचे होते संतोष पवारांनी त्यात पात्रांकडून उर्स्फूत आविष्कार करत ते नाटक घडविले.थोड्याफार फरकाने ऑल दि बेस्टची आठवण यावी.
प्रदीप पाटलांच्या नेपथातून नाटक वेगवेगळ्या पातळीवर घडते.साधा पण प्रसंगाला आवश्‍यक अशा सेटींगमुळे रंगत खुलत जाते.संतोष पवारांच्या स्टाईलची आणि विनोदाची उणीव भासणार नाही याची खात्री देत किशोर रावराणेंनी बाजा सादर केलाय.सहजपणा अणि शारीरीक आविष्करातून भाषेविना साधलेला संवाद नाटक सळसळत ठेवते.शलाका पवारांची वहिनीही तेवढीच बाजी मारून जाते.खरे तर समीर चौघूले(दादा)स्मिता तांबे(नयना)संदेश उपशाम(बाबा)मंगेश साळवी(त्रिलोचन)दिगंबर नाईक(मुकेश)सर्वांचा वेगळा उल्लेख करण्याती गरज नाही. त्रिलोचनचे माता-पिता भरत सावले आणि वर्षा पांडे यांच्या भुमिकाही नाटकालची गती कायम ठेवायला मदतच करतात.नयना अणि त्रिलोचन यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंग खास उल्लेख करावा असा घडतो.
पात्रांच्या व्यंगातून नाटक फुलत जाते..प्रेक्षकही घडणाऱ्या प्रत्येक क्षणांची इतका छान आनंद घेतात की प्रेक्षक आणि कलावंत यांची गट्टीच जमते.
संतोष पवारने नाटक इतके गतीमान ठेवले आहे तुम्ही पात्रांगणीक आणि प्रसंग-प्रसंगातू नवीन धक्के खातच प्रयोगात रंगून जाता.प्रत्येक कलावंताला स्वतःच्या इतक्‍या लकबी दिल्या आहेत की पहाताना त्यातील उस्फूर्तता टाळ्या मिळविते. थोड्या हिंदी लोकप्रिय गाण्यांचा आधार घेऊन नाटकात पात्रे नाचतात पण तो रसभंग वाटत नाही.प्रकाश आणि संगीत दोन्हीमुळेही नाटकाच्या रंगतदारपणात वाढच होते
नाटकाच्या नावाचे अर्थ वेगवेगळे होत असले तरीही नाटकातली थिम नावाचा नेमका अर्थ बाहेर आणते.विनोदी नाटकाच्या परंपरेत संतोष पवार लिखित-दिग्दर्शित नाटकाला नक्कीच स्थान मिळे.

Sunday, February 17, 2008

......भिंतीनाही भावना कळते

भिंतीनाही भावना कळते
मी आलो होतो. पण अगदी दरवाजापासून बसलेल्या कोचापर्यंत कुठेही स्वस्थता दिसत नाही. कुठेतरी फ्लॅटमध्ये असमाधान अंगावर येत होते.
खिडक्‍यांचे पडदे बरेच दिवसांत न धुतलेले. ट्यूबांवर धुळीने स्वतःचे अस्तित्व गडद करत रंग बदललेला. काचांनाही रंग असतो हे दाखवून दिलेले. एकूणच सुस्तावलेल्या गृहिणीची मळकट मुद्राच समोर येत होती.
घर सांगत होते, इथे फार वेळ बसू नकोस. तुझ्या बोलण्याने शांतता हरवेल. नाद अनामिक होईल.
नुकतीच एका घरात पंधरा मिनिटे घालविली. गृहिणी सतत आत जाऊन सासऱ्यांना काही तरी देत होती. मी आपला वाट पाहत बोलण्याची लिंक जुळवत होतो. प्रत्येक वेळी तार जुळवायचा प्रयत्न करत होतो. धागा मागचा पकडून विचारत होतो. तुटणारा धागा सांधत सांधत पुन्हा पुन्हा संवाद करत होतो. मात्र त्यात एकसंधता नव्हती. एकवाक्‍यता येत नव्हती.
आत गेल्यावर मी शोधत होतो घरातील अव्यवस्था आणि रंगांचे पोपडे गेलेल्या भिंती. मन अस्वस्थ. पुन्हा केव्हा बाहेर पडेन असे. वातावरण बाहेर बोलवत होते. मोकळ्या हवेचे महत्त्व पटत होते.
जळमटं, धुळीचे साम्राज्य, आणि घर भरल्यासारखे वाटणारी आळसटलेली दाटी. सारंच नको नकोसं. आधीच बेल शोधायला लागलेला वेळ. आतून येणारा संथ प्रतिसाद.
बोलता बोलता जाणवलेली उदासीनता. मागितल्यानंतर हाती येणारा पाण्याचा ग्लास. येताना असलेला उत्साह नकळतच विरून गेलेला.
... आणि ही भिंत !
तर दुसरीकडे येण्याआधीच तुमचीच वाट पाहत होतो म्हणणारी गृहिणी दार उघडून स्वागताला तयार असते. सारीकडे स्वच्छतेचा आभास. टापटीप. साधीच पण व्यवस्थित लपेटलेली साडी. पाण्याचा ग्लास देताना "काय हे, केवढा वेळ!' ऐकूनच आपली प्रतीक्षा किती होती ते सांगणारे कानावर येणारे शब्द.
आत देवघरातून दरवळणारा मंद सुगंध. देवावर लटकलेला तो मंद हास्य दाखविणारा प्रकाशाचा गोळा. टी पॉयवर आजची वर्तमानपत्रे, काही मासिके आणि लगबगीने पण स्वतःच्याच विचारात असलेली त्यांची छकुली हसत हसत पाहत आईला कानात विचारून धूम ठोकते.
कामाचे बोलून निघतानाही "असंच केव्हाही यायचं 'आश्वासन घेताना खरेच येण्याचे वचन आपण पाळावे, असे मनात वाटावे असे ते स्वागतमय घर.
भिंती त्याच. पण त्यावरचे रंग, प्रकाश, पडदे यातून घराचे दर्शन घडविणारे माणसांचे अंतरंग.
भिंती सांगतात तुम्हाला त्यांचे वय. त्यांचे समाधान.
चार भिंतींच्या रंगाने सांगितले माणसांचे सौंदर्य.
त्यात लपलेले त्यांचे
कर्तृत्व दडलेले
आहे तरी त्यांना इतरांचे कौतुक नाही
येत कधी त्यांच्या ओठावर.
जुळताना तुटतात तारा.
मन होते स्वैर भैर
वेध घेत असते मन
माणसांच्या कंगोऱ्याचे
कशाला यावे कधी निघायचे
सारेच सांगताना भांबावलेले
निघताना तर वाटावे.
परतून नाही फिरायचे.

e-mail: subhashinamdar@gmail.com

Thursday, February 14, 2008

वसंतोत्सव २००८

वसंतोत्सव २००८ कट्यार काळजात घुसली या पुरूषोत्तम दारव्हेकरांच्या नाटकातल्या खॉंसाहेव आफताफ हुसेन यांच्या भुमिकेला अजरामर केलेल्या वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानने पुण्यात तीन दिवसांचा महोत्सव आयोजित केलेला होता. वसंतराव देशपांडे यांचा नातू राहूल देशपांडे आणि त्याच्या जोडीला खंबीरपणे उभा होता नाना पाटेकर.निवेदनाची साधी पण सहज अशी शैली घेऊन नानांनी पुण्यातल्या श्रोत्यांच्या मनात स्वतःचे स्थान अढळ केले. किशोरी अमोणकर,बेगम अबिदा परविन,गुलाम अली आणि झाकिर हुसेन-शिवमणी यांनी बहार आणली. साऱ्याचे दर्शन इथे घडेल.

ऐका आणि आनंद घ्या.

Wednesday, February 6, 2008

स्पर्शातली जादू कुणाजवळ असेल ?

खरच. स्पर्शातली जादू कुणाजवळ असेल ?
उत्तर एकच... आई !
ममता,माया आणि खरा आपलेपणा
ओलाव्याचा तो स्पर्श
अनेक समस्यांवरचा तो एकच उपाय
आईचा मायेचा स्पर्श !
आईशी भांडलो.. अबोला धरला
पोट बरोबर नव्हते तेव्हा आईने पोट चोळण्यासाठी हात फिरवला
आणि काय आश्‍चर्य इतके छान वाटले की बरे वाटायला लागले.
वय झाले .आकाराने वाढलो.
नोकरीत पद मिळाले
तरी आईच्या त्या हातातील जादूई स्पर्शाने ती किमया घडविली.
लहान होतो पण वजनही भरपूर होते.
सतत कुठेतरी पडायचो.
हाताला,पायाला जखम व्हायची.
एकदा तर रोज दवाखान्यात न्यावे लागायचे.
आईच्या कमरेवर स्वार होउन पट्टी करायसाठी जावे लागायचे.
त्या आठवणी आजही ताज्या होतात.
पुरणपोळी,बेसनाचे लाडू,करंज्या खाव्या तर आईच्या हातच्याच

पदार्थात काय किती घातले
यापेक्षा मन आणि आपलेपणाचे तिखट-मिठ आणि साखर जी आईने त्यात मळली त्याला
तोड नाही.
आजही तीची आठवण होते
मन जाते भूतकाळात,रमतो मी स्पर्शात.
आईच्या त्या आठवतातून काळ उमटतो.
गरीबी दिसते पण टोचत नाही.
मिलोची भाकरी आणि पातळ आमटीत निवडून घ्यावेत अशीच डाळ असायची
पण त्या भाकरी-आमटीची चव कशालाच येणार नाही.
हे घडते त्याची किमयागार म्हणजे आई.
त्या मातेला वंदन,तीच्या आठवांची सोबत आणि तीच्या स्पर्शाची महती
सारेच आनंददायी आणि अगणतीत असेच.
आई,आज नाही.पण मनात ..घराघराच्या चराचरात भरून राहिली आहे.
माते तुझ्या कुशीत मी धन्य झालो.

subhashinamdar@gmail.com

Monday, February 4, 2008

तू फक्त लढ म्हण..

दिलास एक मुद्दा आणि लावलास एक ठोका
परप्रांतियांना झोंबला आणि झाला एकच ठेका
दगड उचलले ,काचा फुटल्या
हाताला काम,पोलिसांचा घाम
थोडी दहशत, थोडा हंगामा
झोबलेल्यांचा झाला,एकच गलका
वाहतूक रखडली,थोडी ठप्प
सगळीकडेच झाले सारे चिडीचूप्प
कधीतरी जागा होणारा वाघ होता
का वाघाचे रूपात आलेला एक भास होता
कांही झाले तरी गडबड मात्र झाली
पहाता पहाता तांरांबळही झाली
मराठी माणूस आता तरी जागा झाला
उप्रत थंडी पण मुंबईत तो लढता झाला
झाले आता ते पुरे झाले
नाही तरी आता होणार काय म्हणाले ?


सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com

Wednesday, January 30, 2008

वारा वाहिल तिकडे....


वारा वाहिल तिकडे वहायाचे नाही
वारा जाईल तिकडे पहायाचे नाही
वाहणारा वारा झोंबू लागला ग आता
थोपवू पहाणारा आता झेपावू लागला
दिशा बदलताना तोही आता सांगतही नाही
आशा माझी झाकोळली तरी पाहतही नाही
दार उघडले आता वारा येईल ग आता
दार मिटले तरीही नाही थांबायचा आता
फटीतून छळतो ग मला सोसवत नाही
बंद करितो फटीला तरी हटतच नाही
जरा विचारी मनाला काय करू ग आता
शिळ घालूनी वाऱ्याला ये म्हणू मी ग आता
दिसा दिसाने वारा वाढत ग गेला
माझ्यामागे ग त्याने तंबूच ठोकला


सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com