Saturday, September 3, 2011

यांना शांततेचे महत्व कधी कळणार..


गायक आपले गाणे खुलवित होता. उपस्थित वर्ग त्याच्या त्या शास्त्रीय गाण्यात तल्लीन होऊन माना डोलावित होता. अस्वादकाचे विविध अनुभव घेत मीही मधुनच त्यांच्या चिजेच्या समेवर तालात सम पकडण्याचा प्रयत्न माझ्या देहबोलीतून करीत होतो. एकूणच एक गायक स्वरांची विविध आंदोलने विविध अंगाने नटवित होता. स्वरांचे आविष्कार किती पध्दतीने होऊ शकतात.. दाद देणारा जाणकार तारीफ करून वाहवाची पसंती अगदी खुल्या मनाने देत तल्लीन होऊन स्वरांचा आस्वाद घेत होता.
किती विलोभनिय गोष्ट. इथे शांतता भंग करणारा एक आणि त्याला तालाची आणि स्वरांची संगत करणारा पेटीवादक बस्स..एवढेच..बाकी सारा वर्ग ते सारे निशःब्दपणे साठवून ठेवीत....
भारतीय परंपरेचा हा थाट..भारतीय संस्कृतीतही आहे. मग गणेशोत्सवासारख्या सार्वजनिक ठिकाणी....केवळ प्रकाशात शांतपणे विराजमान झालेली गणेशमूर्ती तुम्हालाही आकर्षित करते ना...
गोंगाटाच्या आणि स्पीकरच्या भिंतीतून ह्दय भेदून टाकणारा आवाज तुमच्या कानी ठसत जातो.. तेव्हा कुठेतरी असा मनोहारी आणि नयनमनोहर मंडळाच्या पावित्र्याचे आणि मांगल्याचे तुम्ही कौतूक कराल ना...मला खात्री आहे..तुम्हालाही ते आवडते....
पण.... हा पण भारी खट्याळ...कधी मध्ये येईल काही सांगता येत नाही...
आज आपण सारेजण या गोंगाटाच्या अधिन झाले आहोत. नव्हे...तो सहन केल्याशिवाय पर्याय नाही... तोंड बाधून बुक्क्यांचा मारच जणू.

म्हणून अशा शांत..निवांत आणि तरीही प्रसन्न अशा गणपती मंडळांची माहिती करून द्यायला मला आवडेल.
आजच पुण्याच्या टिळक रस्त्य़ावरच्या सदाशिवपेठेचा भाग असलेल्या चिमणबाग गणेशोत्सव मंडळात डोकावले. इथली मूर्ती..शोभिवंत. प्रकाश..मूर्तीला उठाव आणेल एवढा.. मंडपात मूर्ती..एक कार्यकर्ता आणि तिचे सुंदर रूप..
कुठे स्पीकरवर गाणी नाहीत की, कुठलाही संदेश देणारी सजावट नाही. इथे आवाज येतो..आणि स्पीकर तोंड उघडतो तो फक्त आरतीच्यावेळी..
बाकी सारी प्रसन्न तरीही भारून राहिलेली शांतता. वर्गणी मागतानाही कुणी कितीही देवो..ती स्विकारली जाते. हुज्जत घातली जात नाही. सारा खर्च तेवढ्याच वर्गणीतून होतो...
तुम्हालाही असे मंडळ दिसले..तर मला मेल करा.. जमेल तर माहिती कळवा..शांततेतही सुख आणि मन रमते..फुलते आणि क्वचित नादावतेही...


सुभाष इनामदार,पुणे
9552596276
subhashinamdar@gmail.com



Thursday, September 1, 2011

मंगल दिन आयो



श्री गणरायाच्या आगमनाच्या दिवशी मनातले नाना संकल्प पूर्ण होतील याची खात्री वाटते. मंगलमय वातावरणात नव्या विषयांची गुंजी घालणे सुरू आहे.
आपले ते धन
विचाराने फळा यावे
धरूनिया सिध्द व्हावे
विचारांती....
प्रेरणेला कर्तव्याची जोड मिळाली आणि त्याची सिध्दी झाली तरच या गोष्टी पूर्णाशांने अंतिम टप्पा गाठणार आहेत.
गणपती..बुध्दीची देवता..
आपली शक्ति तीही नवे विचार कागदावर उमटवून ते शक्य तेवढ्या त्वरीत कार्यवाहित आणणे...
ठेविले अनंते..न राहता... काहीतरी नवे करण्याची क्षमता आणि त्यासाठी लागणारे चिंतन करायला..आजचा दिवस..नव्हे तसा प्रत्येक दिवस चांगला आहे.

दूरवरचा उगवतीचा प्रकाश अंधुकसा का होईना.. तुम्ही उघड्या डोळ्यानी पाहू शकत असलात तरच उद्याचा हा नवा प्रकाश तुम्हाला नवी द्ष्टी नक्की प्राप्त करून देईल. यावर माझी श्रध्दा आहे.
क्षितीजाच्या पलिकडे ...
पाहतो तिथे ..
क्षितीजाकडे
अंधुकसा प्रकाश
भास होई..
नकळे केव्हा
भासतूनी आस
राहून विश्वास
आस मनीची
पूरी होई...
करू किती चिंता
भजतो आता
तुही अंती
तुझे रूप अनंत
तुझे चित्त शुध्द
राखोनी अनेकांची
दारी येई..
असा भास नव्हे आभासाचे..सत्त्यात रूपांतर व्हावे..आसक्तीसाठीचा उल्हसितपणा देही फुलावा.. आसंमतात भारून राहिलेला..विविधतेते नटलेला...एकवटूनी यावा..अशी प्रार्थना करून ..नवी प्रेरणादायी चिंतन करतानाचा हाच ते क्षण...
चित्तवृत्ती भारून टाकते
विचारचक्राला दिशा येते
भासमयतेचा पडदा दूर होतो
अवकाशातल्या आसमंतात.. विरून गेलेली शांतता.. बाजूने कितीही ढोल-ताशांचा गजर होत असला तरी माझी विचार दालने कुठल्याही बाधेला न जुमानता आपली दिशा ठरविण्यासाठी आता सिध्द होत आहेत...
पाहूया यातून काय साध्य होते आणि काय सिध्द होते ते........



सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com


Monday, August 29, 2011

थोडी धास्ती थोडी खंत

काळाबरोबर धावताना पावले अजून डगमगतात. जरी आता नसली चणचण तरी कमावत्या त्या आपल्या माणसांकडून आर्थक लाभ करून घेताना खंत वाटते. गेली ३२ वर्ष नोकरी करूनही आता मी पूर्ण समाधानी नाही. खरं तर माझी कुवत कोणती. मला नेमके काय येते. याची ओळख करून घेताच मला चाकरीत घेतले गेले. मात्र एक नक्की झाले. माझी आवड मला जोपासता आली. चांगली व्यसने वाढविण्यास त्यामुळे मदत मिळाली.
आज मी छंद जपतो आहे. घरातल्यांविरूध्द जावून माझी म्हणून जी आवडीची ठिकाणे आहेत..तिथे रमत जात आहे. कधी यातून थोडी कमाई हाती येत आहे. पण खरचं आता मला दिशा ठरविण्याची गरज दिसते आहे.
भरकटत जातानाही भान जागेवर राहिल. घरापेक्षा मी मला सतत कार्यरत ठेवण्यासाठी काही ठोस काम रोज करायची गरज जाणवते आहे.
विचार सुरू आहे. भानावर आहे. मला दिशा निवडणा-या मंडळी-मित्रांकडून पुन्हा चाचपणी करावी लागणार आहे. अनेक आश्वासने मिळत आहेत. ती त्या त्या वेळी पार केली जाताहेत. पण त्यातले सापडणे हे तात्पुरते आहे. दिशा नक्की करायला हवी. विचार पक्का करायला हवा.


subhash inamdar
9552596276

Tuesday, August 23, 2011

सीडीमुळे पारंपारिक गान प्रकारांना उजाळा


-
-पतंजली मादुस्कर
पुणे- राग गायनाचे विविध प्रकारांची ओळख आज शास्त्रीय संगीताच्या परिक्षांपुरर्ती राहिली आहे. या सीडीच्या निमित्ताने राग गायनाच्या विविध शैलीदार परंपराचे दर्शन घडले आहे. हे लोप पावत चाललेले रागप्रकार कलाकार प्रत्यक्षपणे आपल्या गायनातून सादर करतील आशी अपेक्षा आकाशवाणी पुणे केंद्राचे संचालक पतंजली मादुस्कर यांनी केली.
यशकमल प्रस्तुत, स्वरगंगा निर्मित-डॉ. नीता भाभे यांच्या देती साद-स्वर नाद या सीडीचे प्रकाशन मादुस्कर यांच्या हस्ते शनिवारी ( २७ ऑगस्ट), गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात झाले त्यावेळी ते बोलत होते. शास्त्रीय संगीत सादर करण्यासाठी विविध रागांची निर्मिती झाली. ते सादर करण्यासाठी विविध फॉर्म तयार झाले. त्यातलीच राग गायनाची ही पारंपारिक परंपरा आज काळाबरोबर नष्ट होत चालाली आहे. निता भाभे यांच्या या सीडीद्वारे पुन्हा एकदा त्याला नव्याने उजाळा मिळाला असल्याचा उल्लेख मादुस्करांनी आवर्जून केला.
याचवेळी ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका रेवा नातू यांना कै. नानासाहेब आपटे स्मृती ललकार पुरस्कार ज्येष्ठ संगीततज्ञ सुनिताबाई खाडिलकर यांच्या हस्ते दिला गेला. यावेळी रेवा नातू यांच्या संगीत कारकीर्दीला भरघोस यश लाभावे अशी इच्छा प्रकट करताना खाडिलकरांनी अखंड संगीतात वाहून घेतलेल्या निता भाभे यांचे संगीतविषयक विचार आणि राग गानप्रकारांची माहिती असणारी सीडी निर्माण झाल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि संगीत शिकणा-यांसाठी ती अत्यंत उपयुक्त असून यामुळे विद्यार्थी आपल्या अभ्यासात याचा उपयोग नक्कीच करतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.
याप्रसंगी नुकतेच ९७ वर्षात पदार्पण करणारे दाजीकाका गाडगीळ समारंभाला कलावंताना शाबासकी देण्यासाठी उपस्थित होते.
डॉ, नीता भाभेयांच्यासह त्यांच्या शिष्या संगीता कुलकर्णी, विनिता सुमंत, स्नेहल खानवेलकर यांनी अष्टपदी, कैवाड प्रबंध, चतरंग आणि चतरंगमधील भैरवीतून रागांच्या विविध अंगाचे ,त्यांच्या मधुरतेचे दर्शन घडविले. त्यांच्या या अभ्यासपूर्ण रागप्रकारांच्या सादरीकरणात विनित तिकोनकर, अभिजित जायदे (तबला), अविनाश तिकोनकर( पखवाज) आणि संवादिनीची साथ जयंत साने यांनी केली.



सुभाष इनामदार, पुणे
मोबा. – ९५५२५९६२७६
E_mail- subhashinamdar@gmail.com


मन ..अद्ष्य शक्ति


मन ..अद्ष्य शक्ति

शरीरात असून दिसत नाही ते..मन
विचार देते पण दिसत नाही ते मन
बोलताना जाणवते पण भासत नाही ते मन
चिंता करते .. शरीर झीजवते ते मन
शब्द सुचविते.. कृती करण्यासाठी भरीस पाडते ते मन
संवेदना उमटते.. गोष्टींना अकार देते ते मन
रागावते.. सोसते.. रूसते..लाडिकपणे बोलते ते मन
प्रेरणा देते. घडविण्याचा सल्ला देते ते मन
कधी आनंदाची साद घालते ते मन
कधी दुखः वाटून घेते ते मन
शरीर थकूनही विचार कायम ठेवते ते मन
झोपेतून प्रसन्न सकाळी जागे करते तेही मनच
गाढ झोपेतही स्वप्न दाखविते तेही मनच
मनाचे वर्णन करताना विचाराशी संघर्ष करते ते मन
स्पर्श..संवेदना..जाणीवा जागृत ठेवते ते मन
प्रेम देता देता राखून ठेवते ते ही मनच
राग, लोभ, यांचा, त्यांचा...सर्वांची जागृती घडविते ते मन
शरीराच्या अखेरपर्यत श्श्वासासह सोबत करते ते मन
सारे करूनही सतत दूरवरही भेटत नाही ते मन
संगणकाची कळ दाबते.. शब्द सुचविते तेही मनच



सुभाष इनामदार, पुणे9552596276
subhashinamdar@gmail.com

हे प्रेम असेच राहू द्या


- नाथराव नेरळकर
(औरंगाबाद)

संसार सांभाळणारी पत्नी व मला सांभाळणारे तुम्ही रसिक मिळाल्याने शिस्त लागली. चांगले शिष्य मिळाले म्हणून निर्मिती करता आली; अन्यथा मी झीरोच आहे, असे भावोत्कट उद्गार ज्येष्ठ स्वरयात्री नाथराव नेरळकर यांनी काढले.

डॉ. मंगला वैष्णव संपादित ‘स्वरयात्री नाथ नेरळकर’ गौरवग्रंथाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार व उद्योगपती मोरेश्वर सावे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी प्रमुख पाहुणो म्हणून प्रसिद्ध गायक पं. सत्यशील देशपांडे, सेवानिवृत्त आयुक्त व गायक सुधाकरराव जोशी आणि अमरावतीचे शिक्षण सहसंचालक डॉ. भोजराज चौधरी व प्रतिभा प्रकाशनचे प्रफुल्ल देशपांडे यांची उपस्थिती होती.

यानिमित्त करण्यात आलेल्या सत्काराला भावुक होत या स्वर तपस्वीने उपरोक्त उत्तर दिले. ते म्हणाले, गुरूने दिलेले गाणो बायकोमुळेच सांभाळता आले. शिष्यांकडून रियाज करून घेताना माझाही रियाज झाला. त्यातून नवनिर्मितीची प्रेरणा मिळाली व काही तरी निर्मिती झाली. हे प्रेम असेच राहू द्या.

विविधांगी, सदैव प्रसन्न, मनस्वी संगीताचा तपस्वी असलेले नाथराव स्वप्नाळू, परंतु झपाटलेला, दिलदार माणूस आहे. माझी व त्यांची मैत्री 6क् वर्षे जुनी आहे. त्यामुळे त्यांना घडताना आणि त्यांनी घडविलेले संगीताचे गुरुकुल मी जवळून पाहिले आहे. त्यांच्यामागे त्यांच्या पत्नी सुशीलाबाई, म्हणजेच अम्माई उभ्या राहिल्यामुळेच त्यांना संगीताचा संसार चांगल्या पद्धतीने करता आला, असे मत यावेळी मोरेश्वर सावे यांनी व्यक्त केले.

या पुस्तकावर भाष्य करताना पं. सत्यशील देशपांडे म्हणाले, जो हे पुस्तक वाचेल तो या नाथ संप्रदायाचा सदस्य बनून राहतो. भावनेचे सादरीकरण कसे करावे, मैफल कशी रंगवावी हे नाथरावांकडूनच शिकावे, असे मत सुधाकर जोशी यांनी मांडले. हा ग्रंथ म्हणजे नाथरावांच्या गायकीचा इतिहास असून, तो वहिनीचे स्वप्नदेखील आहे, असे मनोगत ग्रंथाच्या संपादिका डॉ. मंगला वैष्णव यांनी मांडले.

हेमा उपासनी-नेरळकर यांनी प्रास्ताविक केले. सीमा बोठे यांनी या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन केले.

(लोकमत दि. २२ .८.२०११ च्या औरंगाबाद अंकातून साभार )

Monday, August 22, 2011

शब्द झाले मायबाप!


कवी वैभव जोशी यांच्या कविता-गीत-गझलांची "संपूच नये असं वाटणारी" मैफल टिळक स्मारक मंदिरात सादर झाली ती मायबोलीकर किरण सामंत, आनंद आणि कौतुक शिरोडकर यांच्या 'सृजन थिएटर्स' निर्मित "शब्द झाले मायबाप" या कार्यक्रमाच्या औचित्याने. मायबोली हे संकेतस्थळ(www.maayboli.com) मराठी साहित्याला वाहिलेल्या अनेक संकेतस्थळांपैकी सर्वात अग्रेसर. स्वत: वैभवने लिहायला सुरूवात केली ती याच संकेतस्थळावर. आपण काहीतरी दर्जेदार लिहू शकतो हा आत्मविश्वास मिळाल्यानंतर वैभवचा कविता क्षेत्रातला प्रवास तिथून जो सुरू झाला तो आज "११ मराठी आल्बम्स, ३ आणि नवीन येणा-या ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिकां या सा-यांमधून गेल्या ३ वर्षांत जवळजवळ १५०हून अधिक गाणी" ही जणु काही एक अजून एका मोठ्या पल्ल्याची सुरूवातच आहे इथपर्यंत!

पडदा उघडल्यानंतर स्टेजवर फक्त वैभव आणि सुरूवात ह्या कवितेने "सूर झाला ईश्वर, शब्द झाले मायबाप" हे म्हणजे भारत पाकिस्तानची मॅच असावी आणि सचिनने ओपनिंगलाच फटकेबाजी सुरू करावी! आजपर्यंत तरी अशा मैफली पाहिल्या आहेत की ज्या रंगात यायला किमान काही वेळ जावा लागतो. परंतु आज मात्र पहिल्या क्षणापासून ते औपचारिक शेवटापर्यंत ही मैफल रसिकांच्या हृदयात आरपार घुसली होती हे तिथे उपस्थित असलेला कुणीही नाकारू शकणार नाही. मिलींद कुलकर्णी यांच्या संयत आणि चपखल निवेदनालाही दाद दिलीच पाहिजे. कमलेश भडकमकर यांच्या संगीतयोजनेसोबत वैशाली सामंत, राहूल देशपांडे, अमृता नातू, रघुनंदन पणशीकर, मधुरा दातार, दत्तप्रसाद रानडे, जयदीप बागवडकर, जान्हवी अरोरा अशा ख्यातनाम गायकांनी मराठी आल्बम आणि चित्रपटांमधून प्रसिद्ध झालेल्या व होत असलेल्या वैभवच्या गाण्यांचे जोरदार सादरीकरण केले.मैफल अजून रंगात आली ती कवी सौमित्र आणि वैभव यांनी सादर केलेल्या वैभवच्या कविता आणि गझलांनी! सौमित्र वैभवची एक गझल सादर करताना थांबून 'व्वा' म्हणाला तेव्हा हे अधोरेखित झालं की आज तिथे जमलेले श्रोतेच नव्हे तर वैभवसकट इतर सारे कलाकार स्वत: एक "श्रोता" झाले होते! सादर करणारा जेव्हा श्रोता होतो, तेव्हा ती मैफल तिच्या अत्त्युच्य बिंदूवर असते. मी जितके काही कार्यक्रम पाहिले आहेत त्यात गायक येतात आणि गाऊन जातात. पण आज प्रत्येक गायकाला वैभवबद्दल काहीतरी जिव्हाळ्याचं बोलायचं होतं. त्याची गझल, गीत सादर करताना प्रत्येकाने प्राण ओतला होता हे सांगण्यात जर्राही अभिनिवेशीपणा नाही. एखाद्या चांगल्या गझलेत जसा प्रत्येक शेर ही एक अर्थपूर्ण कविता असते त्याप्रमाणेच आजच्या कार्यक्रमातला प्रत्येक परफॉर्मन्स ही एक स्वतंत्र आणि विलोभनीय अशी एक मैफिल होती आणि या सगळ्यांना जोडून ठेवणारा धागा म्हणजे वैभव जोशी!

इतका नितांतसुंदर आणि दर्जेदार मराठी कार्यक्रम रसिकांना दिल्याबद्दल प्रायोजक श्री रामचंद्र चिंचलीकर आणि एलिगंट केअरटेकर संस्था यांचे जितके कौतुक करावे, आभार मानावे तितके कमीच आहे.

टीप: सदर कार्यक्रमात सहभागी असलेले पण या लेखात नाव न येऊ शकलेले अजूनही काही दिग्गज कलाकार असतील तर ते केवळ लेखकाचे अज्ञान समजावे.


-विनायक खांबाते
vinayak khambayat

Wednesday, August 17, 2011

अभिजित कुंभार-सांगीतिक प्रवास


सकाळी सकाळी ऐकलेले गाणे दिवसभर मनात बसते. मग तेच गाणे गुणगुणत बसणे हे तर अगदीच रुटीन. परंतु केवळ अशी गाणी गुणगुणत बसण्यापेक्षा स्वतः रचलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी गुणगुणायला किती आनंद मिळतो, या कल्पनेतूनच सॉफ्टवेअर क्षेत्रात करिअर करताना इचलकरंजी ते कॅलिफोर्निया असा पल्ला गाठणाऱ्या अभिजित कुंभारने चक्क स्वरचित गीतांचा एक म्युझिक अल्बमच तयार केला आणि तोही त्याच्या आयटी क्षेत्रातली टिपिकल ऑफशोअर ऑपरेशन्सची कल्पना वापरून! अभिजितने आपल्यासारख्या अनेकांना, ज्यांना इच्छा असून वेळ काढता येत नाही किंवा पायरसीच्या भीतीमुळे त्यांची कल्पना कल्पनेतच विरते अशांना एक वाट खुली करून दिली आहे.

"मी प्रेमिका' या अभिजितच्या म्युझिक अल्बमने समस्त तरुण वर्गाचा विकपॉइंट असलेले "प्रेम' आणखी एकदा गाण्यातून सादर केलेय. "जी मिळे ती नजर..', "चहू ओर पाहता...', "नवा नवा श्‍वास हा...' अशा एकूण आठ गाण्यांच्या या अल्बमचे गीत आणि संगीतकार अभिजित, संगीत संयोजक मिलिंद गुणे आणि गायिका कस्तुरी पायगुडे-राणे हे तीन मुख्य आधारस्तंभ. अभिजितने गीते रचली, त्यांना चाली लावल्या आणि ती कस्तुरी यांच्याकडे पाठवली. त्यानंतर मिलिंद गुणेंनी त्यावर काम केले. गीत-संगीतकार कॅलिफोर्नियात आणि संगीत संयोजक व गायिका पुण्यात असे ऑफशोअर ऑपरेशन सुरू असताना फोनवर खूप चर्चा झाल्या, टिप्स दिल्या-घेतल्या गेल्या.

संगीताचे शिक्षण घेता आले नसले तरी चाली रचण्याचा छंद पूर्वीपासून होता. अभिजितवर प्रभाव आहे तो हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, आर. डी. बर्मन आणि एस. डी. बर्मन यांचा! रोजच्या रहाटगाडग्यातून समाधान मिळेल अशी रचना करण्याच्या तीव्र इच्छेने "प्रेमिका'ची संकल्पना सत्यात आल्याचे अभिजित सांगतो. नव्या संगीतकारांसाठी या क्षेत्रात पाय रोवणे किती कठीण आहे हे आपल्याला या अल्बमच्या निमित्ताने कळले, असे सांगतानाच अभिजितने जगभरातल्या मराठी कलावंतांना विश्‍वासाने एकत्र येण्यासाठी एखादे व्यासपीठ नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. अल्बम पूर्ण करण्याच्या ऊर्मीतून अडचणींवर मात करण्याची इच्छाशक्ती मिळत गेली आणि पुढे जात राहिलो, असे सांगतानाच पत्नी मानसीची साथदेखील यात महत्त्वाची असल्याचे त्याने आवर्जून सांगितले.

परदेशात स्थायिक असल्यामुळे तिकडच्या मराठी रसिकांपर्यंत हा अल्बम बऱ्याच प्रमाणात पोचला आहे. भारतातून विदेशात गेल्यानंतर मातृभूमी, मातृभाषेचे महत्त्व लक्षात आले आणि त्यातूनच प्रेरणा मिळाली. करिअरच्या मागे धावताना आपले छंद, आवडी जोपासणे सोपे नाही; पण परदेशात राहूनही आपली सांस्कृतिक मूल्ये जपत असताना कलेची आवड जोपासणाऱ्या गुणवंतांची संख्याही कमी नाही. या आवडीपोटी असे धाडस हे कलावंत करू धजतात, असे अभिजितला वाटते.

http://www.esakal.com/esakal/20110818/5341174800411566553.htm

Tuesday, August 16, 2011

युसुफभाई मिरजकरांचे अपघाती निधन




' संगीतातील वाद्ये ज्यांच्याशी चक्क बोलतात ' अशे ज्यांचे वर्णन केलेल जाते ते ज्येष्ठ वाद्यनिर्माते युसुफभाई मिरजकर यांचे येथे अपघाती निधन झाले. ते ६४ वर्षाचे होते. आज पहाटे चालण्याच्या व्यायामासाठी बाहेर पडले असता वारजे पुलाजवळ एका कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.

पं. भीमसेन जोशी, किशोरीताई आमोणकर, उस्तान सुलतान खाँ, उस्ताद रईस खाँ यांच्यासारख्या अनेक दिग्गजांसाठी त्यांनी वाद्ये घडवली आणि त्यांची जपणूकही केली. संगीतक्षेत्रामध्ये त्यांना फार मोठा मान होता. पुण्यातल्या मानाच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला होता.



सतार-तंबोरा आदी तंतूवाद्ये बनवण्यात युसुफभाईंची खास ओळख होती. सतारीचे नादसूर जुळवताना जव्हारीचे सर्वात अवघड काम युसुफभाईंनी वडील इस्माईल शमशुद्दीन यांच्याकडून शिकून घेतले होते. त्यांची वाद्ये आजही जगभरात सुरेलच गातात , अशा शब्दात सतारवादक उस्मानखाँ यांनी त्यांचा गोरव केला होता.

सात पिढ्यांपासून वाद्यनिर्मितीशी जोडल्या गेलेल्या युसुफभाईंचे आजोबा शमसुद्दिन मिरजकर प्रभात सिनेमात कामासाठी म्हणून पुण्यात आले. त्यानंतर पुण्यातच आपल्या वाद्यनिर्मितीच्या ध्येयाला व्यावसायिक आकार दिला

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9632335.cms

Monday, August 15, 2011

तो राजहंस एक...च्या निमित्ताने



नटसम्राट बालगंधर्व...
आपल्या स्वर्गीय गायनाने अबालवृध्दांना भारून टाकणारा जादूगार.


युवा पिढीचे आश्वासक गायक श्री. अतुल खांडेकर गंधर्वगायकीच्या श्रवणाने मंत्रमुग्ध झाले. त्यांना मातुलगृहाकडून संगीताचा वारसा मिळाला आहे. आजी श्रीमती माणिक भट आणि आई सौ.मानसी खांडेकर दोघींनीहा नाट्यसंगीताचा विशेष अभ्यास केला आहे. अतुल यांनी लहानपणी आईकडून संगीताचे धडे गिरवायला सुरवात केली.
नंतर विदुषी डॉ. वीणा सहस्त्रबुध्दे यांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले आणि शास्त्रीय संगीतात ते रममाण झाले. योगायोगाने श्रीमती जयमाला शिलेदार यांचा सहवास लाभला आणि गंधर्वगायकीचे विराट दर्शन घडले. बालगंधर्वांची अनेक दुर्मिळ पदे त्यांच्याकडून शिकायला मिळाली. कीर्ति शिलेदार यांच्या मार्गदर्शनामुळे गंधर्व गायकीकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन सापडला. गुरूंकडून मिळालेला हा ठेवा रसिकांसमोर सादर करावा अशी इच्छा होत होती.

नू.म.वि. हायस्कूलमधील विद्यार्थीप्रिय शिक्षक संपत इंगळे गुरूजींचा अतुलवर विशेष लोभ. त्यांनीच अतुल यांच्या अनेक मैफली घडवून आणल्या होत्या. बालगंधर्वांच्या पदांचा कार्यक्रम अतुल यांनी करावा अशी त्यांची मनापासून इच्छा होती.
ती त्यांची इच्छा त्यांनीच बोलून दाखविली आणि कांही दिवसातच त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
म्हणूनच इंगळे गुरूजींच्या स्मृतींना भावांजली अपर्ण करण्यासाठी हा कार्यक्रम करण्यात येत आहे.

बालगंधर्वांच्या सांगितिक कारकिर्दिचा मागोवा घेणारा हा कार्यक्रम कलाद्वयी संस्थेमार्फत सादर होत आहे.
बालगंधर्वांच्या गायकीचे दर्शन घडविणे हे सर्वथा अशक्य आहे. त्यांच्या गायनाची नक्कल करणे चूकच आहे.
ते दुरापास्तही आहे. फक्त या थोर गायकाने जे ब्रह्मांड उभे केले आहे, त्यापुढे नतमस्तक व्हावं असे प्रत्येक
निष्ठावान गायक कलावंतांना वाटते. पं. भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव
अशा अनेक प्रतिभावंत संगीत दिग्दर्शकांनी नाट्यसंगीताचा जो अनुपम खजिना निर्माण केला आहे
त्याची छोटीशी झलक तरी रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येणार आहे.

असा बालगंधर्व आता न होणे... हे तर सर्वश्रुत आहे. हेच विधान त्यांच्या गायकीबाबतही करता येईल. त्यामुळे हे गंधर्वगायकीचे दर्शन नाही..तर गंधर्वगायकीतली सौंदर्यस्थळे शोधण्याचा हा प्रयत्न करावा. विस्मयकारक करणा-या या गायकीला दंडवत घालावा. आणि या गायकीचा आनंद जो स्वतःला होतो तोच सर्व रसिकांना द्यावा याच उद्देशाने हा गंधर्वगायकीचा मागोवा घेण्याचा हा नम्र प्रयत्न आहे.

तो राजहंस एक.. हा दृकश्राव्य कार्यक्रम २१ ऑगस्ट रोजी संध्या. ५ वाजता पुण्याच्या कर्नाटक हायस्कूलच्या सभागृहात आयोजित केला आहे. बालगंधर्वांच्या परंपरेतील काही कलाकारांच्या मुलाखती, त्यांची छायाचित्रे, आणि बालगंधर्वांचे ध्वनिमुद्रण यांचा या कार्यक्रमात समावेश असेल. ही सर्व तांत्रिक बाब अमोघ रानडे सांभाळत असून गायनाचा सारा भार अतुल खांडेकर यांच्यावर आहे. लोकप्रिय पदांबरोबरच काही दुर्मिळ पदांची झलक दाखविण्याचाही त्यांचा प्रयत्न इथे राहणार आहे.
त्यांना संजय़ गोगटे (ऑर्गन), विद्यानंद देशपांडे (तबला), रवि शिधये (व्हायोलिन), अभय माटे (पखवाज) या कलावंतांची संगीत साथ असणार आहे. डॉ.मंदार परांजपे आणि सौ. वर्षा जोगळेकर
यांचे निवेदन असून सर्वांसाठी तो खुला आहे.
श्रीमती जयमालाबाई शिलेदार, कीर्ती शिलेदार आणि बालगंधर्व चित्रपटात गंधर्वांची पदे म्हटलेला आनंद भाटे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार आहेत.
गुरूंचे मार्गदर्शन, उपजत बुध्दी आणि मेहनत या बळावर अतुल खांडेकर यांनी आजवरची संगीत क्षेत्रातली वाटचाल केली आहे.
गाण्यात गुरफटलेला मुलगा अशीच त्याची लहानपणापासून ओळख असली तरीही व्यवसायाने सिव्हील इंजीनीयर असलेल्य़ा अतुलने हा संगीताचा ध्यास मोठ्या प्रेमाने जोपासला आहे..
गंधर्व गायकीला मानाचा मुजरा करणारा हा कार्यक्रम ज्या निष्ठेने आणि तळमळीने करीत आहे. ते कौतुकास्पद आहे.


वर्षा जोगळेकर, पुणे


http://www.facebook.com/event.php?eid=171470582926679&view=wall