Sunday, March 25, 2018

अभिजित पंचभाईंच्या गीतरामायणाची तपपूर्ती






भावभक्तिच्या शक्तिचे आजच्या काळातले एक वेगळे उदाहरण

रविवारची सकाळ रामजन्माचा दिवस..निवारा सभागृह  रसिकांच्या साक्षीने बारा वर्षे पूर्ण झालेल्या अभिजित पंचभाई प्रस्तुत  गीतरामायण ऐकण्यासाठी आतुर झालेला.  राजेंद्र गलगले आणि अभिजित पंचभाई …`स्वये श्री रामायण गाती…..`हे गीत सादर करते झाले आणि त्या तपपूर्ती कार्यक्रमाची  सुरवात झाली.

प्रमोद रानडे, श्रीपाद भावे आणि संगीतकार- व्हायोलीनवादक सचिन इंगळे तसेच सरहद्दचे संजय नहार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा गीतरामायणाचा स्वर महोत्सव सुरु झाला..



यामागचा इतिहास सांगताना निवेदिका सौ. मीरा ठकार सांगत होत्या..
तेरा वर्षापूर्वी संतदर्शन मंडळाच्या श्रीराम साठे यांनी गीतरामायण गाण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यात अनेक तरूण महाराष्ट्रातून स्पर्धक आले होते. यात अभिजित पंचभाई आणि राजेंद्र गलगले ह्या धुळ्यातून आलेल्या मुलांनी  पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवून त्यात ते यशस्वी ठरले होते..
त्यातून प्रेरणा घेऊन त्या दोघांनी श्रीराम साठे यांच्या मार्गदर्शनानी आपण यापुढे दरवर्षी रामनवमीला गीतरामायण सादर करायचे हा संकल्प केला..त्यासाठी गीतरामाणाचा अभ्यास केला..विविध मान्यवरांकडून त्यातले शब्द आणि बाबुजींच्या सोप्या वाटणा-या आणि लोकप्रिय असणा-या चाली आत्मसात केल्या . त्यातूनच  गीतरामायण ते श्रध्देने, निष्ठेने आणि एकलव्याच्या चिकाटीने अभिजित पंचभाईच्या पुढाकाराने प्रतिवर्षी पुण्यात रसिक, भक्तांच्या श्रवणार्थ त्याचे आयोजन विनामूल्य होत आहे. आपण त्यांच्या या कार्याला जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद देऊ...

त्यासाठी अभिजीत आणि राजेंद्र स्वतःच्या मिळकतीतील काही रक्कम रिकरिंगद्वारे जमा करुन रामनवमिच्या दिवशी ते गीत रामायण अतिशय सुरेल आणि तन्मयतेने सादर करुन रसिकांनाही त्यात सहभागी करुन घेतात.



गीतरामायण ..गदिमा़डगूळकर यांनी प्रत्य़ेक गीतातून रामायणकाल तुमच्यासमोर शब्दादातून रचले आणि ते तेवढ्याच भावनोत्कट सुरावटीतून सुधीर फडके यांनी चालीचून जनतेच्या दरबारात सादर केले... गीतरामायणायणाला ६३ वर्षे उलटून गेली.. पण ती मोहिनी मराठी मनावर राज्य करुन आहे.. वाल्मिकींचे रामायण आपल्या जनमासात रुजविले ते गदिमांनी..तेच अधुनिक काळातले वाल्मिकी मानले जातात... गीतरामायण आपण सादर करावे असे प्रत्येक गायकाला वाटते..ते त्याच्यासाठी आव्हान असते..जो तो आपापल्यापरिने ते शिवधनुष्य पेलण्याचा, नटविण्याचा यत्न मराठी येत असलेल्या प्रत्येक रसिकांना या गीतातून भुलविण्याचा तो संकल्प करतो..


रामाची शक्ति आणि हनुमानाची भक्ति...आणि लक्ष्मण भरताचे महानपण..कैकयीचा संताप..रावणाची ताकद..आणि आणि अखेरीस होणारे रावणवधाचे वर्णन सारेच यात दिसते..जणू काही तो प्रसंग आपल्यासमोरच घडतो..इतके समर्थपणे ते  सादर होते.



यंदाचे वैषिष्ठ्य म्हणजे सोनल पेंडसे आणि त्यांच्या सहकलाकालरांनी काही गीतरामायणातल्या गाण्यावर नृत्याविष्कार सादर केला. भक्तिभावाने आणि आपल्या दमदार आवाजाने  अभिजित पंचभाई आणि  राजेंद्र गलगले ( खास इंदौर वरून यासाठी येतो) यांनी गीतरामायणातली भावपुर्ण गीते अतिशय प्रभावीपणे सादर करुन रसिाकांची शाबासकी टाळ्यांच्या गजरात मिळविली.

या कार्यक्रमात स्वरप्रिया बेहरे, माधवी तळणीकर, अमिता घुगरी आणि देवयानी सहस्त्रबुद्धे यांनी उत्तम सादरीकरण करून आपल्या तयारीची चुणूक दाखवून दिली.


शुभदा आठवले ( हार्मोनियम), आभिजित जायदे ( तबला) चारुशीला गोसावी( व्हायोलीन) ,उध्दव कुंभार (तालवाद्ये) ...या सा-याच साथसंगत करणा-या कलावंताची नावे मुद्दाम सांगायला हवी..कारण उत्तम साथीशिवाय हा कार्यक्रम रसिकाच्या ह्दयात आपले स्थान निर्माण करू शकत नाही.



आधि जाहिर झाल्याप्रमाणे प्रा. सच्चीदानंद कानेटकर निरूपणासाठी येणार होते. पण तब्येतीच्या कारणाने ये आले नाहीत.तेव्हा ही जबाबदारी मीरा ठकार यांनी स्विकारली भक्तिमय गीतरामायणातले प्रसंग आपल्या भावनेच्या ओलाव्यांतून त्यानी रसिकांसमोर मांडले. त्यांचा खास उल्लेख केला पाहिजे..त्याच्या निवेदनात आपलेपणा आणि अभिजित, राजेंद्र आणि इतक कलावांताची तळमळ सतत जाणवत होती.
यासगळ्यांच्या मागे तेवढ्याच आपुलकीने दिप्ती कुलकर्णी यांचे पाठबळ होते हेही खास सांगावेच लागेल.



गीतरामायण सादर करताना सोवळे नेसून अभिजित पंचभाई ते भक्तिभावाने सादर करतात याचे कौतूक प्रमोद रानडे यांना वाटले. बाबुजींच्या स्वरांवर आणि गदिमांच्या शब्दांवर आपण सारे प्रेम करताय. हे विलक्षण प्रतिभेचे देणे आहे. ते गीतरामायणाची सेवा करणारा अभिजित सारखा गायक आजही ते करतो आहे हे पाहून आनंद होतो.

बाबुजींनी ज्या रागांची निवड करून ह्या गीतांना अजरामर करून सोडले..त्या त्यांच्या कर्तृत्वाला तोड नाही, असे सचिन इंगळे यांना वाटते.


बारा वर्षांच्या प्रवासात अनेक टप्प्यावर यात सहभागी जालेल्या आणि आज कार्यक्रमात असलेल्या कलाकारांचा, ध्वनिव्यवस्था पाहणारे हेमंत उत्तेकर यांचाही सन्मान पाहुण्यांच्या हस्ते भेटवस्तु देऊन केला गेला

 

स्वत्ः  कसलाही अभिनिवेश आणता निष्ठेने अभिजित तो दरवर्षा रंगतदारपणे आणि तेवढेच भावीकतेने सादर करीत असतात याला दाद ही दिलीच पाहिजे  त्यांच्या या गीतरामायणाचा रौप्यमहोत्सव होवो हिच अपेक्षा.










- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com


Monday, March 19, 2018

सूरांशी शरणांगती घ्या..मग गाणं सोपे होईल






डॉ. भरत बलवल्ली




रियाज डोळसपणे केला पाहिजे. गाणं सतत आतमध्ये चालू असते. मी झोपतो तेव्हाही ते आत चालू असतं. भीमसेनजी रियाज का करायचे कारण त्यांनी त्यांचा गळा ओळखला होता. अभिषेकी बुवा भिमसेन जोशींसारखा रियाज करत नसत. त्यांची रियाजाची पध्दत वेगळी होती.  आपण रियाजाची कॉपी करू शकत नाही.  आपली ओळख आपल्याला होणं फार गरजेचे आहे. कुठल्याही कलाकाराला कुठल्याही पध्दतीची गायकी सादर करायची झाली तर त्याला आपली स्वतची ओळख होण फार गरजेची आहे. ती ओळख झाल्याने माध्यम स्पष्ट होतं. ते स्पष्ट झालं की तुम्हाला साधन मिळतं. तुमची कला मांडायची. ते साधन जेव्हा परिपक्व असतं तेव्हा त्याला अधिक रियाज करून त्रास देऊ नये.


मला वाटते मला काळी चारवर गायचे..जेव्हा मला जेव्हा असं समजेल की माझा तो सूर लागणार नाही. त्या दिवशी तो सूर कसा लागेल यासाठी मी रियाज करतो. रियाजाची प्रत्येकाची पध्दत वेगळी असतो..कुणाला अठरा तास तो रियाज प्रसन्न होतो. कुणाला तो एक तास पुरेसा होतो. कुणाला कार्यक्रमा आधी एक तास पुरेसा होतो. हे होण्यासाठी जर सतत ते सूर आणि ती श्रुति सतत आपल्या अंगावर खेळत असेल तर त्याचा अंदाज आपल्याला घेता येतो.. पंडित कुमार गंधर्व यांच्या घरी सतत तंबोरा सुरु असायाचा. ते सतत त्या सुरातच रहात असत.
सूर हा एक बिंदू आहे. अवकाशातला तो बिंदू कुणी माणूस पकडू शकत नाही. ती आस पकडायाला जातो. माझे गाणं माझ्या सुरात यावे यासाठी मी हा ऑर्गन बांधून घेतला आहे. पांढरी चार पासून पुढे पाच सप्तकाचा माझा ऑर्गन आहे.

तेव्हा माझे माध्यम स्पष्ट असल्याने मी शाररिक मर्यादा विसरुन जातो. तुम्ही घरी असताना काळी चारचा षडज् लावा म्हणालात तर ते शक्य होत नाही. तेो दिसतो तेव्हा  गळा पटकन त्या सूराला स्पर्श करून परत येतो. मग मी विचार करत नाही माझा गळा तिथपर्य़त जाईल की नाही. मग तो सूर बेसुर होईल का नाही याचा विचार करायचा नाही..तो दिसतो..तेव्हा तिथे जाऊन त्याला स्पर्श करून परत यायाचं.  जर माध्यम स्पष्ट असेल तर गाणं होऊ शकतं. हा माझा अनुभव आहे. मी जे अनुभवलं ते तुम्हाला सांगतो आहे..प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो..

सूर तुमच्यावर प्रसन्न झाले पाहिजेत. सुरांंशी मैत्री असली पाहिजे. माझी कधी कधी अशी परिस्थिती येते तो सूर सांगतो हे शक्य नाही त्याला हात लावणं. स्वराला  स्वत्व सोडून तुम्हा शरणागती घेता तेव्हा तो आपणहून तुमच्याजवळ येतो. तो जेव्हा जवळ येतो..तेव्हा आपली मेहनत असते की आपण त्याला हात लावून परत येणे. हा माझा प्रवास सोप्या शब्दात मांडला..हे माझ्या बाबतीत प्रत्येक सूर लावताना माझ्या बाबतीत घडत असतं..

मास्टर दिनानाथ मंगेशकांचे दैवी गाणे गाणारा गायक म्हणून संबोधला जाणारा गायक भरत बलवल्ली आपले आणि सूरांचे नाते सांगताना सारं काही मनमोकळेपणाने रसिकांना सांगत होता.
निमित्त होते..मैत्र फाउंडेशनच्या स्वरयज्ञ या मैफलीचे. रविवारची संध्याकाळ टिळक स्मारक मंदिर प्रेक्षागृहातले रसिक त्यांचे दैवी गाणे ऐकताना..त्यांचे रियाज आणि सुरांचे नाते याविषयी तल्लीतेने ऐकत होता.. तेव्हा लक्षात येते की ह्या तरूण गायकाने किती उंची गाठली आहे याचा.

सुमारे दिडशे मित्रांनी चालविलेली ही मैत्र फाउंडेशन गुढी पाडव्याच्या दिवशी माधव थत्ते या रंगभूषाकाराला दहा हजाराची मदत दिली. दर  मैफलीचे आयोजन करताना एका वयोवृध्द कलावंताला आर्थिक मदत ते आपणहून देतात.
भरत यांच्या मते त्यांचा हा पुर्नजन्म नसून गुणजन्म आहे. आपण य़शवंतबुवा जोशी यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले .ते वयाच्या आठव्या वर्षापासून..मात्र अकरावी नंतर आपली कंठ फुटला तेव्हा आपल्याला आपल्या गळ्याची जात उमगली..मग अभ्यासून आपण गाण तयार केले आणि लोकांना ते दिनानाथांसारखे भासते. मास्टर दिनानाथांना समोर अवकाशात  स्वर मला घ्या म्हणून विनवित असतात..तेव्हा त्या स्वरांची मजा घेत तडफेने ते गाणं सादर करत. आपणही त्या स्वरांशी खेळत, कधी स्पर्श करत गाणं गातो..इतकेच.. असा विनम्रपणा त्यांच्या गाण्यात आणि बोलण्यात जाणविला.




कार्यक्रमाची सुरवात त्यांनी पं. बलवंतराय भट रचित रागमालेने केली. सतरा रागंची ही रचना गाताना त्यांनी श्रोत्यांना आपल्या सोबत कधी नेले ते कळलेच नाही.
नंतर दिनानाथांच्या आकेक नाट्यपदांची बरसात करत त्यांचा दैवी स्वर टिपत दिव्य स्वातंत्र्य रवी, मर्मबंधातली ठेव ही, युवती मना, शूरा मी वंदीले अशी पदे गाऊन आपल्या आक्रमक शैलीत ती रसिकांच्या मनात उतरवली.
श्रीनिवास खळे यांची कबीरांची रचलेली रचना.. किवा हरी म्हणा, अशा लोकप्रिय अभंगातून  त्यांनी आपण किती सहजपण सारे प्रत्ययी देउ शकतो..ते सहजसाध्य अशा स्वरांची बरसात  करत चकित करून सोडले.
सुकताची जगी या या सावरकरांच्या पदांने त्यांनी मैफलीची सांगता करताना ते सूर आठवत रसिक घरी परततील याची काळजी घेतली.
अतिशय नेटके आणि नेमके निवेदन करत मोहन कान्हेरे यांनी ही मैफल आपल्या शब्दांनी जिंकली. तर प्रसाद करंबेळकर यांचा तबला आपल्या आर्विभावात बोलत होता. तर दादा परब यांचा पखवाज तेवढाच ऊत्तम साथ देत होता. सुनील अवचट
 यांची मधुनच सुरीली बासरी निनादत होती. तर मकरंद कुंडले यांचा ऑर्गन सतत भरतच्या सुरांची सांगड घालत आपल्या वादनाचे कौशल्य पणाला लावत रसिकांच्या पसंतीला उतरत होता..
या मैफलीचे आणखी एक वेगळेपण म्हणजे..गायक सारा आपला गायकीचा थाट माट तालाकडे न बघता तो सूरांशी थेट संवाद साधत प्रसन्नपणे करित होता. ताल त्यांच्या अंगात भिनलेला होता जणू.



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Monday, March 5, 2018

गंगालहरीतला दुर्गा आजही आठवतो आहे..

‘गंगालहरी’



 आज ५ मार्च २०१८. आजच्या त्यांच्या १०५ व्या जन्मदिन
पद्मविभूषण डॉ. श्रीमती गंगुबाई हनगळ यांच्या अनेक मैफ़लीत मी त्यांच्या भावमुद्रा टिपल्या. प्रत्येक वेळी त्यांचा मृदू स्वभाव, त्याचं आतिथ्य हे आठवत राहिलं. डावा हात कानावर, उजवा हात पुढे आलेला व डोळे मिटलेल्या स्वरमग्न गंगुबाईंची भावमुद्रा माझ्या मनावर कायमची कोरली गेलेली आहे.  

- सतीश पाकणीकर




हुबळीच्या देशपांडेनगर येथील ‘गंगालहरी’ या बंगलीच्या अंगणात मी फोटो काढत होतो. समोर माझे मॉडेल होते पद्मभूषण श्रीमती गंगुबाई हनगळ ! पुण्यातील ‘सवाई गंधर्व’ या तीन दिवसांच्या महोत्सवात एका सत्राचा समारोप त्यांच्या गाण्यानं होत असे. त्या प्रत्येकवेळी त्यांच्या गातानाच्या भावमुद्रा मी आतापर्यंत टिपल्या होत्या. पण आज माझ्यावर एक वेगळीच जबाबदारी आलेली होती. श्रीमती गंगुबाई या पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करणार होत्या. त्यानिमित्ताने एक मोठा कार्यक्रम हुबळी मुक्कामी होणार होता. त्या कार्यक्रमाचा एक भाग असणार होता तो म्हणजे ‘किराणा घराणे’ हे माझे प्रकाशचित्र प्रदर्शन. या प्रदर्शनामध्येच श्रीमती गंगुबाईंच्या प्रकाशचित्रांचे एक दालन असणार होते.

माझ्या प्रकाशचित्रणाच्या व्यवसायाला सुरुवात होऊन फक्त तीन वर्षे झाली होती. जून १९८६ मध्ये माझे भारतीय अभिजात संगीतातील कलावंतांच्या भावमुद्रा असलेले ‘स्वरचित्रांच्या काठावरती ’ हे प्रदर्शन पुण्यात झाले. संगीत रसिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर काहीच दिवसात मला हुबळीहून एक पत्र आले. हुबळी येथील सुप्रसिद्ध अशा डॉ. एस.एस. गोरे यांच्याकडून आलेले ते पत्र ‘ अॅकेडमी ऑफ परफोर्मिंग आर्ट्स , हुबळी’ च्या लेटरहेडवर होते. गंगुबाईंची पंच्याहत्तरी, त्यानिमित्त असणारे विविध सांगीतिक कार्यक्रम व प्रकाशचित्र प्रदर्शन याविषयी त्यात माहिती होती. व प्रकाशचित्र प्रदर्शन मी करावे असे त्यात सुचवलेले होते. मी लगेचच माझा होकार कळवला व त्या प्रदर्शनाच्या कामाला लागलो. सहा महिन्यात मला ‘किराणा घराणे’ व त्यातीलच एक भाग ‘गंगुबाई- भावमुद्रा’ असे प्रदर्शन साकारायचे होते. त्याचाच भाग म्हणून मी ‘गंगालहरी’ बंगलीत पोहोचलो होतो.

माझ्या समोर असलेल्या मॉडेलचा उत्साह पाहून त्यांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे अशी शंका पण मनात येत नव्हती . इतक्या नामांकित व मोठ्या कलाकार असूनही त्यांचा साधेपणा मनाला भावणारा तर होताच पण माझे तेथे वावरण्याचे दडपण नाहीसे करणाराही होता. मी फ्लॅश वापरत नसल्याने मला उपलब्ध प्रकाशात फोटो टिपणे आवश्यक होते. मनावरचे दडपण नाहीसे झाल्यावर त्या अंगणात म्हणा किंवा त्यांच्या त्या बंगल्यात, वेगवेगळ्या ठिकाणी श्रीमती गंगुबाईंना मला पाहिजे तशा कोनात उभे करणे किंवा बसवणे व हवी तशी ‘पोझ’ सांगणे मला फारसे अवघड गेले नाही. जणू काही मी माझ्या आजीचेच फोटो काढत आहे. अतिशय सहजसुंदर, अनुभव समृद्ध व प्रसन्न भावमुद्रा ! कुटुंबीयांबरोबरही त्यांचे फोटो काढून झाले. मग भरपेट आदरातिथ्य ! किराणा घराण्याच्या मी जमवलेल्या जुन्या फोटोमधील कलाकारांची नावे जाणून घेण्याचा कार्यक्रम संध्याकाळी पार पडला. कलाकारांची नुसती नावेच नाही तर त्यांच्या दुर्मिळ अशा आठवणी सांगताना हळुवार व भावुक झालेला गंगुबाईंचा चेहरा पहाताना तेथे असलेले आम्ही सर्वच जण जणू त्या काळाची सफर करून आलो. माझ्या तीन दिवसांच्या हुबळीच्या मुक्कामात मी डॉ. गोरे यांच्याच घरी राहिलो असल्याने त्यांच्याही कुटुंबीयांशी माझी छान ओळख झाली.


अमृत महोत्सावाचाच एक भाग म्हणून श्रीमती गंगुबाईंवर एक गौरव ग्रंथ व पाच दशकातील त्यांच्या गायनाच्या पाच कॅसेट्सचा एक संचही प्रकाशित होणार होता. त्याच्या डिझाईनसकट सर्व काम मुंबईच्या आय आय टी मधील कीर्ती त्रिवेदी हे गृहस्थ करणार होते. मी डॉ. गोरे यांच्या घरी असताना तिसऱ्या दिवशी मुंबईहून कीर्ती त्रिवेदी यांचा फोन आला. पाच कॅसेट्सपैकी एका कॅसेटच्या रेकॉर्डिंगमध्ये काही दोष निर्माण झाला होता. सर्व कॅसेट्सची कव्हर्स छापून तयार होती. आता काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. डॉ. गोरे यांनी त्रिवेदींकडे चौकशी केली –
“ कोणत्या रागाच्या रेकॉर्डिंग मध्ये दोष आहे?”
त्रिवेदींचे उत्तर आले – “ राग दुर्गा. ”
पुढच्याच क्षणी डॉ. गोरे यांनी त्यांना उत्तर दिले –
“ ठीक आहे. मी गंगुबाईंना सांगतो. आजच आम्ही दुर्गा राग रेकॉर्ड करतो व तो स्पूल तुम्हाला उद्या मिळेल. ” किती सहज व आत्मविश्वास असणारे उत्तर !
डॉ. गोरे यांनी पुढचाच फोन गंगुबाईंना लावला व म्हणाले “ मुंबईला पाठवलेल्या एका रेकॉर्डिंगमध्ये काहीतरी गडबड आहे. आपण दुपारी तीन वाजता रेकॉर्डिंग करू. मी सर्व व्यवस्था करतो. तुम्ही सवाई गंधर्व कला मंदिरात या.”
आपल्या पुण्यात जसे बालगंधर्व रंग मंदिर आहे तसे हुबळीत सवाई गंधर्व कला मंदिर आहे.
दुपारी अडीच वाजता डॉ. गोरे व मी त्यांच्या स्पूल रेकॉर्डरसह सवाई गंधर्व कला मंदिर येथे पोहोचलो. रेकॉर्डिंगची तयारी करण्यात थोडा वेळ गेला. ठरलेल्या वेळी तीन वाजता श्रीमती गंगुबाई, त्यांच्या कन्या कृष्णाबाई , तबलजी असलेले बंधू शेषगिरी हनगळ , शिष्य नागनाथ व्होडेयार व एक हार्मोनिम वादक हे पोहोचले. स्टेजवरील तयारी झाली. गंगुबाईंनी तानपुरे जुळवले. तबला व हार्मोनियमचीही जुळवाजुळव झाली. मी सर्व उत्सुकतेनी अनुभवत होतो. इतक्यात श्रीमती गंगुबाई मला म्हणाल्या -

“ तू माझे एक काम करशील का?”
त्यांचे माझ्याकडे काय काम असणार असा विचार क्षणभर मनात चमकला. त्या मला फोटो काढायला सांगणार.... पण ते तर मी काढणारच होतो की ! माझ्या त्या क्षणभराच्या विचाराला भेद देत गंगुबाई म्हणाल्या – “ मोजून फक्त अर्धा तासाचे रेकॉर्डिंग करायचे आहे असे मला डॉक्टरांनी सांगितले आहे. एरवी रेकॉर्डिंगला समोर घड्याळ असते. आज समोर ऑडिटोरीयम आहे. तेंव्हा मला वेळ सांगण्यासाठी ऑडिटोरीयममध्ये माझ्या बरोबर समोरच्या खुर्चीत तू बैस. पंचवीस मिनिटे झाल्यावर हात वर करून मला तशी खूण कर. शेवटी हाताच्या पाच बोटांनी एक एक बोट बंद करत मला खूण कर म्हणजे बरोबर तिसाव्या मिनिटाला मी गाणे थांबवेन.”
मी हो म्हणण्यासाठी लगेचच मान हलवली. आणि मला साक्षात्कार झाला की त्या भव्य अशा सवाई गंधर्व कला मंदिरातील खुर्च्यांमध्ये मी एकटाच श्रोता असणार आहे. अंगावर सरसरून काटा आला. मी माझ्याही नकळत समोरच्या खुर्चीत जावून बसलो. आता माझ्यावर एक वेगळीच जबाबदारी असल्याने कॅमेरा बॅगबाहेर काढण्याचा प्रश्नच नव्हता. काम अवघड नव्हते पण मनात धडधड होत होती.


थोड्य्याच वेळात डॉ. गोरे यांनी सूचना दिली. विंगेत बसून व कानाला हेडफोन लावून डॉ. गोरे यांनी रेकॉर्डिंगचे काम सुरू केले. पद्मभूषण श्रीमती गंगुबाई हनगळ यांच्या भारदस्त आवाजात दुर्गा रागाच्या स्वरांनी सवाई गंधर्व कला मंदिर ही वास्तू भरून गेली. समोर एकमेव श्रोता असलेला मी एका दिव्य अनुभवाचा साक्षीदार होत होतो. बरोबर तीस मिनिटात त्या थोर विदुषीने दुर्गा रागाचे जे दर्शन घडवले ते केवळ अवर्णनीयच ! माझ्या आयुष्यातील एक कधीही न विसरता येईल असा प्रसंग.

रेकार्डिंग संपल्यावर ते कसे झाले आहे याची उत्सुकता सर्वांनाच होती. तशीच ती गंगुबाईंनाही होती. लगेचच डॉ. गोरे यांनी त्यांना हेडफोन दिले. गंगुबाईंनीही ते ऐकत आनंद घेतला. मग चहापान.

दुसऱ्या दिवशी पहाटेच ते स्पूल घेवून मी हुबळीहून थेट मुंबईला आय आय टी त पोहोचलो. डॉ. गोरेंनी दिलेला शब्द काटेकोरपणे पाळल्याने खुश होण्याची पाळी होती कीर्ती त्रिवेदी यांची.

अर्थात नंतर ५, ६ व ७ फेब्रुवारी १९८८ या तीन दिवसात जो स्वरोत्सव साजरा झाला तो ही असाच अविस्मरणीय होता. माझ्या त्यातील प्रदर्शनाचे उद्घाटन केले ते सुप्रसिद्ध कन्नड लेखक शिवराम कारंथ व पंडित भीमसेन जोशी यांनी. श्रीमती गंगुबाईंनी वैयक्तिकरित्या माझे कौतुक केले ते एक सुंदरसा डिनर सेट मला भेट देऊन.
मला शास्त्रीय संगीत कळते असे धाडसाचे विधान मी आज तीस वर्षांनीही करणार नाही. पण कधीतरी दुर्गा रागाचे स्वर कानावर पडले तर मात्र एका क्षणात मी ही तीस वर्षे विसरून थेट सवाई गंधर्व कला मंदिरातील पहिल्या रांगेतील मधल्या खुर्चीवर बसल्याचा अनुभव घेतो हे त्या स्वरांची ताकद !


नंतरच्या काळात पद्मविभूषण डॉ. श्रीमती गंगुबाई हनगळ यांच्या अनेक मैफ़लीत मी त्यांच्या भावमुद्रा टिपल्या. प्रत्येक वेळी त्यांचा मृदू स्वभाव, त्याचं आतिथ्य हे आठवत राहिलं. डावा हात कानावर, उजवा हात पुढे आलेला व डोळे मिटलेल्या स्वरमग्न गंगुबाईंची भावमुद्रा माझ्या मनावर कायमची कोरली गेलेली आहे. गंगुबाईंची मी टिपलेली ही भावमुद्रा भारतीय टपाल खात्याने त्यांच्या सन्मानार्थ प्रकाशित केलेल्या टपाल तिकिटावर जेंव्हा अवतरली तेंव्हा समस्त गानरसिकांच्या मनांवरही ती कोरली गेली असणार हे नक्की !

गंगुबाईंसारख्या कलाकाराला माझ्या कलेच्या माध्यमातून ही छोटीशी आदरांजली मला वाहता आली हेच आयुष्याचं संचित !! 
आज ५ मार्च २०१८. आजच्या त्यांच्या १०५ व्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन!!



( आमचे मित्र आणि उत्तम छायाचित्रकार आणि लेखक सतीश पाकणीकर यांनी आजच फेसबुकवर प्रकाशित केलेला हा लेख मी त्यांच्या सौजन्याने इथे पुन्हा आपल्यासाठी देत आहे.)




- सतीश पाकणीकर , 
पुणे
९८२३० ३०३२०