Sunday, July 12, 2020

गच्चीवरील बागेतून स्वप्नं साकार...






छान सुंदर घर असावं. घराभोवती बाग असावी. बागेत रंगीबेरंगी फुले फुलवीत.



एक कोपरा असा आसावा, की नव्या रचना इथे घडाव्यात. नवे प्रयोग इथे दिसावेत.



घराला लागणारा भाजीपाला. काही प्रमाणात फळेही यावीत.



घराच्या बगीच्यात बसून मस्त गप्पा छाटाव्यात. सहचारिणी सोबत असावी.



मुलांनीही खेळून धुडगूस घालावा.असे स्वप्नातले घर दिसणे आता कठीण.






घरांच्या किमती परवडेनाशा झाल्यात. बंगला आता विसरा, चांगला फ्लॅटही चालेल. जमलीच तर बाल्कनी असावी. मिळालीच जर टेरेस तर उत्तमच. कुठेही राहिलात तरी निसर्गाला जवळ करण्यासाठी चार-पाच कुंड्यांतली झाडे तरी हवीतच. अशाच स्वप्नांचा पाठपुरावा करताना भेटले एक रो-हाऊस. पुढे-मागे जागा. तीन टेरेस आणि वर झेड आकाराची का असेना स्वतःच्या मालकीची गच्ची.






अशी फुलवली बाग



ःबागेसाठी जागा मिळाली याच्या आनंदात ती फुलविण्याचे कसबही आपणच करावेत, अशा निश्चयातून माती आणली. रोपे निवडली. कुंड्यांची रचना सर्व बाजूंनी चांगली दिसावी म्हणून तिरक्या विटाही लावल्या. गुलाब, पारिजात, तगर, नारळ, मोगरा, जाई लावली. वर्षभरात फुले दिसू लागली. ती किती येतात, यापेक्षा "आपल्या बागेतली' याचा आनंद अधिक मिळाला.कुठलेही खत घालता पाण्याच्या योग्य नियोजनातून बागेतली हिरवळ वाढू लागली.



नारळ, चिकू यांनी अजून दर्शन दिले नसले तरी रामफळाच्या आगमनाने छान वाटले.



आडनाव इनामदार पण कुळ कायद्याने शेतीच्या सात-बारात नाव राहिले. एकरात शेती करण्याची संधी स्क्वे.फुटात घेतोय, असो. रो-हाऊसची संकल्पित सोसायटी काळाला मान्य नव्हती. शेजारी आणि मागे फ्लॅट आले. परिणामी बागेला मिळणारे ऊन गायब झाले. आजही झाडे आहेत, पण ती सकाळच्या वा दुपारच्या उन्हामुळे नाहीत, तर संध्याकाळी येणाऱ्या उन्हाच्या प्रकाशाने. बागेच्या नियोजनानुसार घराच्या परिसरातील राडारोडा काढून त्यावर पोयटा माती टाकून रोपे लावली. सिमेंटच्या जंगलात हिरवळ साकारली. पहिला उत्साह इतका होता, की रोपांमध्ये अंतर कमी झाले. त्यामुळे झाडांना उसासा घेण्यासही जागा उरली नाही; मात्र रोपांच्यासाठी लागणाऱ्या खताचे उत्पादन स्वतःच करायचे ठरविले होते. यासाठी चार वर्षे घरातल्या निवडलेल्या भाज्यांची देठे, पालापाचोळा, देवाचे निर्माल्य सारेच जिरविण्यासाठी बाजूच्या मातीचा उपयोग केला. त्यातले सिमेंटचे-विटांचे तुकडे, साराच भार कमी करून मातीचा अंश वाढवला. त्यावर पाण्याचा फवारा देऊन खताची निर्मिती केली. गांडुळे सोडता खत तयार झाले. बागेतल्या झाडांना ते घातले. त्यातून रोपांची वाढ जोमाने झाली. इतकी की मधुमालतीचा, जाईचा वेल घरावर चढला. तीस-पस्तीस फुटांवर बहरत राहिला आहे. गुलाबी जास्वंद आणि पारिजातकाने इतके बहरणे, वाढणे थांबवावे असे वाटले. अखेरीस छाटणीचा मार्ग निवडावा लागला.












वारंवार रोपांभावती आळे करणे चालूच होते. बागेतल्या पानांतून निर्माण होणाऱ्या नैसर्गिक खतानेही झाडांचा बहर वाढविला. काही झाडे काढून सोसायटीच्या बागेत हलवली. काही कुणाला देऊन टाकली. आता दर्शनी भागातली हिरवळच सांगते की आता पुरे. मग काय गच्चीवर कुंड्यांतून रोपे लावायची कल्पना आली.






गच्चीवरील बाग






ःरो-हाऊसच्या बाजूच्या भागात फरशी घालताना तयार झालेली खताची माती सहा बाय चारच्या जागेवर गच्चीवर टाकली. त्या खाली प्लॅस्टिकचे कापड अंथरले. त्या बेडवर शेतीसारखे भाजीचे बी टोकले. आज कोथिंबीर, पालक आणि मेथी एकत्रित नांदत आहेत. भाज्यांवरोबर लसणाच्या कुड्याही लावल्यात. त्यातूनही हिरवे अंकुर डोकावू लागलेत. सहा मोठ्या सिमेंटच्या कुंड्यांतून गुलाब, लिंबू आणि डाळिंबाची रोपे लावली. कुंडी लावताना खाली थोडा विटांच्या भुग्याचा थर त्यावर माती, मातीवर ओला कचरा असे करत कुंडी भरली. गुलाब फुललाय. मात्र लिंबे आणि डाळिंबाची वाट पाहतोय.निशिगंध, मोगरा, चार-प्रकारची जास्वंद. कोरफड, गुलाब, शेवंती, जाई, बह्मकमळ आणि छोट्या कुंड्यांतून मनी प्लॅंट, पुदिना वाढतोय. कुंड्यांत मात्र वारंवार माती उकरावी लागते नवी माती भरावी लागते. कधी काही कुंड्यांतली माती कमी करून बागेतला पानांचा थर देऊन त्यावर माती पसरली जाते. पाणीही सतत घेता कधी भांडभर तर कधी पूर्णपणे झाडावर पाण्याचा फवारा करतो.मध्यंतरी बायोकल्चर वापरून कुंडी कशी भरावी ते पाहिले. कुंडीमध्ये खाली विटांच्या तुकड्यांचा थर, नंतर भाजीपाल्याचा ओला कचरा, वर बायोकल्चर, परत ओला कचरा अशी कुंडी भरून त्यात रोप लावले. आता त्याला महिना पुरा होतोय. फुले भरभर उमलतात. गुलाबाच्या रोपांची पाने वाढताहेत. जास्वंदीच्या फांदीची वाढ होतेय. सारेच आनंदाचे. वाढत्या बहरलेल्या झाडांचे.






येत्या काही दिवसांत बाकीच्या गच्चीत मातीचे बेड करून त्यात भाजीपाल्याची लागवड करायची आहे. घरची पालेभाजी खाण्यातल्या आनंद काही वेगळाच आहे. हे सर्व करताना एक पथ्य पाळलंय, की रासायनिक खत वापरायचे नाही. लागलेच तर शेण खत घालायचे. हे सारे जपण्याचा छंद लागलाय. त्यात वेळ कसा जातो ते कळत नाही. मातीच्या कुपीतून बाहेर येणाऱ्या या हिरवळीची मजा चाखल्याशिवाय कळणार नाही






सुभाष इनामदार, पुणे-



९८८१८९९०५६

Sunday, June 21, 2020

वडिलांचा कष्टप्रद प्रवास..

माझे वडील..कष्टप्रद आयुष्याचा प्रवास
विश्वनाथ बळवंत इनामदार..




हाफ खाकी चड्डी..अंगात फुल बाह्यांचा पांढरा शर्ट..भरदार केस..चेऱ्यावर समाधान.. कधी अंगात धोतर वर शर्ट आणि निळा कोट..असे वडील आज समोर उभे दिसताहेत..

माझे आजोबा कीर्तनकार.. वरूडकर बुवा..त्यांच्या कीर्तनाला पेटीची साथ वडील करीत..शिक्षण जेमतेम.
मुंबईत काही काळ आजोबांबरोबर..अहमदसेलरमध्ये निवास.. काकाही किर्तनकार.. मुंबई आकाशवाणीवर कीतर्न व्हायचे..
आईला मुंबईच्या दमट हवेचा त्रास.. म्हणून मुंबई सोडून सातारला स्थायिक.. आत्याचे मिस्टर वकील सातारचे एन जी जोशी.. त्यांच्या आर्थिक मदतीने  सोमेवापरात पिठाची गिरणी घातली.
घरची परिस्थिती बेताची..कमावते एकच..तेही पिठाच्या गिरणीतून..असे कितीसे मिळणार आणि साठणार तर किती..
पण सातारच्या सोमवार पेठेत आपली स्वतःची चक्की उभारून..वयाच्या ६५ पर्यंत ते पिठाच्या धुरात आयुष्य घालवले..सतत तोंड नाक पिठाच्या धुराने भरलेले असायचे..
घरी दुपारी जेवायला यायचे तेंव्हा कपडे झाडायला लागायचे..
 दुपारी थोडी डुलकी घेऊन परत गिरणीत जायचे ते साडेसातला भाजी घेऊन घरी दमून यायचे..
अगदीच दम्याचा त्रास आणि त्यातच मिळकत होईना..कमाई कमी आणि वीज बिल अधिक झाले..तेंव्हा गिरणी विकण्याचा निर्णय घेतला..
मग सुपारीच्या पुड्या भरण्याची मदत करून हातभार लावला..
कधी न रागावता खूप काम केले..आईही इतर बाहेरची कामे करून मदत करायची..
रोज कमाईतून पैसे बाजूला ठेवणे शक्य होत नव्हते..मुलांचा खर्च, बहिणीचे आजारपण..सारेच..पैसा नाही..कुणाची फारशी मदत नाही..म्हणून आईने भावे सुपरिवाले यांचेकडे सुपारी करण्याचे काम घेतले..इतरांच्या घरचे स्वयंपाकही ती करे..

सारे आठवले की मन पुन्हा त्या दिवसात जातं.. डोळ्यातून सारे ओघळायला होते..पण त्या दिवसात आईने वडिलांच्या साथीने कसा सारा संसार रेटला हे चित्र मनाला चीर पाडून जाते..

 आज आम्ही स्वतःच्या वास्तुत आहोत..समाधानी आहोत..पण ते सुख समाधान त्यांना कधीच लाभले नाही..याचे वाईट वाटते..

मात्र ते दिवस खरे मार्गदर्शक होते..त्या दिवसांनी खूप काशी शिकविले..नाते आणि मित्र यांच्यातला फरक ओळखून दाखविला..

आई-वडील दोघेही समर्थपणे उभे होते म्हणून आज आम्ही आमच्या पायावर खंबीर आहोत.. दोघेही अलग करता येणे अशक्य आहे..आईत वडील आणि वडीलांमध्ये आई..एकमेकांत मिसळलेली होती..दोघांच्या स्मृतीला नमन!



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail. com


Tuesday, February 4, 2020

चतुरंग मधून अवतरले चार महान संगीतकार



मृदुला दाढे-जोशी यांचा महत्वाचा वाटा


सी रामचंद्र. मदन मोहन. ओ. पी.नय्यर. रोशन.. या चार महान संगीतकारांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेल्या अजरामर गीतांचा आस्वाद देता देता ती गाणी का इतकी वर्षे रसिकांच्या मनावर आजही अधिराज्य का गाजवून आहेत याचा साक्षात्कार देणारा  चतुरंग हा संगीतमय कार्यक्रम आजही आपले वेगळेपण मनात कायम ठेवून आहे.. रविवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अनुभवलेले साडेतीन तास लिहिताना डोळ्यात साठवून राहिले याचे प्रमुख कारण मृदुला दाढे- जोशी यांनी चार संगीतकारांच्या गाण्यांची केलेली बुद्धिनिष्ठ  विचार मांडणी.. कार्यक्रम संगीताचा ..पण लक्षात रहातो मृदुला दाढे -जोशी यांनी त्याविषयी सांगितलेली मर्मस्थाने आणि संगीतकारांनीही केला नसेल असा त्यामागे ठेवलेला विचार.



शरयू दाते, सई टेंभेकर आणि संदीप उबाळे यांनी त्या गाण्यांना  सादर करून जी मौज रसिकांना  आपल्या गायनातून अनुभवायला दिली त्याबद्दल हमलोगचे सुनील देशपांडे यांना मनापासून दाद देणे हे गरजेचे आहे.. चतुरंग.. खरेच चार संगीतकारांवरचा कार्यक्रम पण तो पेलला तो तीन गायक आणि एक अभ्यासपूर्ण भाष्य केलेल्या मृदुला दाढे-जोशी या चार कलावंतांनी..  तो चोखंदळ आणि विचक्षण वाचक तसेच जाणकार श्रोते असलेल्या पुणेकरांना तिकीट काढून  तो मनापासून ऐकवासा वाटला यातच याचे यशस्वीपण सामावलेले आहे.

 त्या संगीतकारांच्या सुवर्णकाळात जेंव्हा मेलडी ही अनभिषिक्त सम्राट होती. चाली छान होत्या. गाणं सुरेल होते. शब्दात ताकद होती. हे सारे मान्य केले तरीही त्यात विलक्षण दैवी गुण होता. त्या भारावलेल्या अवस्थेतून बाहेर आलो की त्यातली सौन्दर्यस्थळे  नव्याने जाणवायला लागतात..या गाण्यांचा एक संगीत अभ्यासक म्हणून मृदुला दाढे यांनी याविषयी केलेले भाष्य  त्या चालीविषयी वेगळी दृष्टी देतात . मग ते गीत रसिकांसमोर गायक गायिका सादर करतात..यातूनच संगीतकारांची त्यामागच्या विचारांची दिशा कळण्यास मदत होते आणि आपण भारावून जातो.
प्रत्येक संगीतकाराचा स्वभाव आणि त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी त्यांच्या चालीतही आढळते असे मृदुला दाढे यांना वाटते आणि ते त्या सोदाहरण मांडतातही.




रोशन यांचा शास्त्रीय संगीतावर विलक्षण प्रेम..त्यांची गाणीही त्यातल्या बंदीशीसारखी ..मन रे तू काहे ना धीर धरे ..संदीप उबाळे यांच्या आवाजात ते दर्द भरे गीत मोहिनी घालते.
काळजात  किनारी दुःख आणि रांगडी मस्ती असणारा संगीतकार म्हणून सी. रामचंद्र यांचा उल्लेख होतो.. त्यांचे  बलमा बडा नादान हे गीत शरयू दाते तेवढ्याच सुरेलतेने गाऊन रसिकांना मोहित करतात.

मदन मोहन हे नाव उच्चारताना काळजात कळ येते..अक्षय कारुण्याचा झरा म्हणजे मदन मोहन..दुःख आणि तेही भरजरी
अनुभवावे ते या संगीतकाराच्या गाण्यातून.. हम प्यार मे  जलनेवलो.. या गण्यातून सईने  ते नेमके स्वरातून उलगडून दाखविले.

ओ. पी.नय्यर यांच्या गाण्यात तुम्हाला ते  भावनेला थेट भिडवतात.  तीव्र भाव, जिद्द, रांगडेपणा सारे त्यांनी आणि आशा भोसले यांनी त्या गाण्यात जपले..त्यांचेच  एलो मै हारी पिया.. हे गीता दत्त यांच्या अवजातले गाणे सईने सादर करीत ते दर्शन घडविले..





असे चार संगीतकांचे सांगेतीक दर्शन चतुरंगच्या मंचावर सतत उलगडत जात होते.. कधी स्वरातून तर कधी शब्दातून ते सारे संगीतकार वेगवेगळ्या भावनातून इथे सिद्ध होतात.. मग ती गाणी कधी बंदीशींवर आधारित तर कधी उत्तम रचनेतून कानी येतात..

लग जा गले.. इशारो इशारोमे..अकेली हूँ मै...तुम आगर मुझको ना चाहो..असेल नाहीतर.. तुम क्या जानो..आप के हसीन रुख पे..ओ चांद जहाँ.. चैन से  हमको कभी..
सारीच हिंदी चित्रपटसृष्टीला आपले चार चांद लावणारे हे चार संगीतकार ऐकताना आपण स्वतःला भाग्यवान समजतो..



ये जिंदगी उसिकी है. जो किसिका हो गया..या गाण्यातून जेंव्हा मृदला दाढे-जोशी समारोपाचे गीत सादर करतात तेंव्हा वतावरणही भारून जाते.. आण्णा म्हणजे सी. रामचंद्र यांच्या या  विलक्षण गाण्याने चतुरंगने अलविदा केले..

हम लोग प्रस्तुत या कार्यक्रमाची सारी भिस्त संगीत संयोजक आणि सिंथवर आपले प्रभुत्व असलेला कलावंत केदार परांजपे यांचेकडे जाते.. प्रसाद गोंदकर-सतार..निलेश देशपांडे-बासरी..  विशाल थेलकर..गीटार..
अजय अत्रे..विक्रम भट..दोघेही रिदम मशीन आणि तबला..यांच्या उत्तम संगीत साथीने हा प्रवास आनंददायी ठरला.. चालीला योग्य असा स्वरांचा भरणा ..गाण्यातील  शब्दांच्या अवकाशात संगीत संयोजकाने आकाराला आणलेली वाद्यांची सुरावट आणि तालातून बहरत गेलेली आनंददायी साथ..सारेच या वादकांनी आपल्या साथीतून रसिकांसमोर पेश केले.

असा कार्यक्रम करणे हे धाडस आहे ते सुनील देशपांडे यांनी ह्या हमलोग संस्थेने केले याबद्दल त्यांचेही आभार मानले पाहिजेत.  रंग चार सांगितकारांचे हा या कार्यक्रमाचा भाग पहिला आहे. म्हणून पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे.



-सुभाष इनामदार, पुणे


Subhashinamdar@gmail. com