Sunday, March 15, 2009

रागरससिध्दांत साकारताना किशोरी आमेणकर..




गुरूने दिला ज्ञानरूपी

वसाआम्ही चालवू तो पुढे वारासाः

या प्रार्थना गीताचे
शब्द पुरेपुर सार्थ करणारा सोहळा नुकताच पुण्यात अनुभवला. पद्मविभूषण गानसरस्वती
श्रीमती किशोरी आमोणकरांनी सिध्द केलेल्या "स्वरार्थरमणी "या पुस्तक प्रकाशन
सोहळ्याचे वेळी. त्यांची गायिका म्हणून किर्ति आहेच .पण या सोहळ्याच्या निमित्ताने
त्या गायन शास्त्राचे स्वरूप किती सहजपणे शब्दातून कसे स्पष्ट करू शकतात याचा
जाहिरपणे प्रत्यय आला.

स्वरांची, रागांची मांडणी करताना त्यामागचा विचार ऐकणारा बालगधर्व
रंगमंदिरातला रसिक ते ऐकताना गाण्याइतकाच तल्लीनपणे ते मनात साठविताना अनुभवित
होतो. रागरससिध्दांत मांडताना किती विचार करून शास्त्रिय संगीताच्या रागांचे विवेचन
करणारा ग्रंथ साकारला त्याची तेव्हा कल्पना येते. रागाचा विस्तार करताना त्याच्या
स्वरांमधून तयार होणारा रस (म्हणजे आनंद ) अणि त्याची विविध रूपे साकारताना
होणाऱ्या स्वरांचे दर्शन त्यांच्या या अभ्यासपूर्ण विचारातून सार्थपणे बाहेर येते.
गायक गाताना रागांचा . त्यातल्या प्रत्येक सूराचा विचार कसा करत असतो याची जाणिव
त्यांची मुलाखत ऐकताना झाली.

एका अर्थाने "अभ्यासोनी प्रकटावे" म्हणजे काय याचे
दर्शन इथे झाले. जमलेले सर्वच चाहते शास्त्रिय संगीत जाणणारे नव्हते. पण तरीही
किशोरीताई जे विवेचन करीत होत्या ते एकाग्रतेने ऐकताना तोही त्यांच्या पुस्तकासाठी
केलेल्या विचाराने भारावून जात होता.हे पुस्तक साकारताना त्यांनी भरताच्या
नाट्यशास्त्राचाही अभ्यास करून राग मांडताना तोही एक नाट्यासारखा परिणाम करू शकतो
हेही त्यांनी पुस्तकातून उदाहरणातून दाखवून दिले.

गाताना त्यातले नाट्य कसे साकारले जात आहे ते
पाहण्याचा आपल्याला ध्यास लागल्याचे त्या सांगतात.राग साकारताना त्यातल्या भावालाही
किती महत्व आहे याचेही वर्णन त्या करतात.रंगमंचावर आपण स्वरातून राग साकारतो म्हणजे
स्वर बोलतो. तो गातो. तो जिवंत असतो. स्वरांची साधना केल्याशिवाय हे कळत नाही असे
किशोरीताई सांगतात. स्वरांचा समूह आळवताना रंगमंचावर स्वराभिनयच साकारत असतो
म्हणूनच गायन ही कला जशी आहे तसाच तो रंगमंचावरचा आविष्कारही आहे. जो श्रोत्यांच्या चेहऱ्यातूनही दिसतो. इथे श्रोताही तेवढाच महत्वाचा.

राग साकारताना किशोरीताई तल्लीन होतात तेवढ्याच
च्या स्वरांविषयी, रागांविषयी बोलतानाही होतात. म्हणूनच हा पुस्तक सोहळा अनुभवताना
त्यांच्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या वाक्‍यांनाही वाहवाची दाद मिळते.
सुभाष इनामदार, पुणे

email-subhashinamdar@gmail.com

Tuesday, February 10, 2009

इंद्रायणी काठी जाहला आनंद


पुण्यात वाहणारे नद्यांचे पाणीही आज आनंदाने गाऊ लागले. पाण्याचा प्रवाह जरी आज खळाळत नसला तरी जेव्हा केव्हा तो बरसत होता तेव्हाची आठवण आज नक्की होणार आहे.

किराणा घराण्याची गायकी आपल्या मेहनतीने गळ्यावर चढविली. सवाई गंधर्वांच्या घरात पहाटे पाण्याच्या घागरी वाहिल्या आणि त्याच मनोभावे ते स्वरही कानात साठविले. त्या स्वरांचा सुगंध गदग पासूनच दरवळू लागला. पुढे तो गावोगावी पसरत गेला. शास्त्रीय संगीताच्या मैफलीतल्या गायनाने त्यांच्या स्वरांना पंख लाभले. पंखांत बळ निर्माण झाले आणि असे एकही शहर नसेल जीथे पंडीतजींच्या गायनाची मैफल झाली नाही.


आपल्या गुरूंच्या नावाने पुण्यात सवाई गंधर्व महोत्सव सुरू करून हा स्वरोत्सव आजही अव्याहत सुरू आहे. शास्त्रीय संगीताबरोबर नाट्यसंगीत आणि अभंगाना पंडीतजींनी सुस्वर बनविले. अजरामर केले.आज त्यांची तब्येत साथ देत नाही. तरीही ते मनात सुरांची सेवाच करताहेत. भीमसेन जोशी नावाचा सन्मान पुण्यात स्थिरावला आणि पुणेही धन्य झाले. आज पंडीतजींबरोबर पुणेही या महान गायकाच्या सहवासाने स्वतःला धन्य समजते. पुणेकरांना त्यांची नावलौकिक मिळवून दिला.

एक गोष्ट मात्र मोकळेपणाने सांगावीशी वाटते. त्यांची गायकी भारतातच नव्हे तर जगात आपली शैली प्रस्थपित करीत होते तेव्हाच जर हा सन्मान मिळाला असता तर त्याचे मोल अधिक वाढले असते. पंडीत जसराज म्हणतात त्याप्रमाणे हा सन्मान मिळायला उशीर झाला खरा. पण तो मिळाला हे विसरून चालणार नाही. आज सारेच संगीत प्रेमी आनंदाने अभंगवाणीचे सूर आळवतील.

कलाश्रीतला तो "स्वरदेव" तृप्तपणे भारतरत्न हा सन्मान घेताना धन्य पावला असेल. त्या स्वरदेवाच्या स्वरांना आणि त्याच्या प्रतीभेला तमाम भारतीयांचा मानाचा मुजरा!स्वर आज थंडावलाय पण तो एकेकाळी बरसत होता. महासागरासारखा खळाळत होता याची आठवण होते आहे.


सुभाष इनामदार,पुणे.

subhashinamdar@gmail.com

Friday, January 30, 2009

पुण्यातल्या कलावंतांना हे कळणार तरी कधी?

दिवसभरात पुण्यात दोन-तीन सांस्कृतिक कार्यक्रम होतच असतात.कुठे अरंगेत्रम तर गाण्याची मैफल. आठवणीतली गाणी, ओठावरची गाणी नाही तर जुन्या संगीतकारांच्या गीतांचा बहारदार नजराणा.
खरे म्हणजे (आणि ते खरही आहे) इथ गल्ली-बोळात ( अणि आता तर पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरातही) कलावंतांची खाण आहे. प्रत्येकालाच मोठे नाव मिळेल अशी शक्‍यताही नाही (ती त्याची अपेक्षाही नसते) तरीही त्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो.
आज सारे कलावंत कलेसाठी कला करत नाहीत. पोटासाठी नोकरी किंवा व्यवसाय असतोच. हौसेला ही आवड जोपासत असतो.
बहुधा संस्था कार्यक्रम करते. कधी कॅसेटच्या निमित्ताने तो होत असतो तर कधी स्वतःची कमाई टाकून तो स्वतःच सादर करीत असतो.
कार्यक्रम करण्यात गैर काहीच नाही. ते व्हायलाच हवे. नाहीतर त्याची तालीम आणि तीही रसिकांसमोर गायची- वाजवायची सवय कशी होणार?
होते इतकच त्यात जे सहजी शक्‍य आहे ते व्यावसायिक पध्दतीचे सादरीकरण मात्र होत नाही.
यासाठी पैसा जादा लागतो असे आजिबात नाही .इथे लागते ती सादरीकरणातील सफाई. निवेदक आरामात मांडी घालून आपले तेच ते विनोद वा किस्से लोकांवर आदळत असतो. वादकही रंगमंचावरच्या चौकोनी मंचावर बसून वाजवताहेत. त्यांच्या वादनात खोड काढत नाही पण त्यामुळे त्यातली जोश, उत्साह उणावतो आणि दिसतोही. गायक वही घेऊन गाण्यातले बोल आळवित असतो तेही बसून. (सगळेच जण असे करतात हा दावा मुळीच नाही)कार्यक्रम पाहताना स्वरांचा रवंथ केल्याचे फिलिंग येते.
ऐकणाऱ्याला आणि सादर करण्यालाही उभारी येईल अशी ती मैफल असावी. संख्या कमी असली तरी हरकत नाही. पण जे कराल ते पुन्हा-पुन्हा पहायला आवडेल असेच हवे.
रंगमंचावर कार्यक्रम करताना तो "सादर" होत असतो याची जाणिव ठेऊन जर केला तर तो अधिक मनपसंद होईल.
अशोक हांडेंचे कार्यक्रम त्यासाठी पहा. ती सफाई हवी. प्रकाशाची, ध्वनीची इवढी गरज नाही. पण प्रेक्षकांसमोर कार्यक्रम मांडावा कसा ते त्यातून समजेल.
एक नक्की. कलावंतात खोट काढण्यासाठी हे सांगत नाही. तर पुण्याचा तुरा मानाच्या पगडीतला शिरपेच म्हणून मिरवावा,हिच इच्छा!

सुभाष इनामदार, पुणे
subhshinamdar@gmil.com

Friday, January 23, 2009

मधूप मुदगल यांचे श्रवणीय गायन

सवाई गंधर्व संगीत महोत्सवातील तिसरा दिवस

मधूप मुदगल यांच्या गायनाने आरंभापासून रंगत गेला.

स्वरास्वराचा बारकाईने केलेला विचार. गमकयुक्त ताना.

आर्वतनातील शिस्त यामुळे त्यांचे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय झाले. हार्मोनियची साथ डॉ. अरविंद थत्ते यांची तर भरत कामत यांनी तबल्याची साथ केली.

- सुभाष इनामदार, पुणे

Thursday, January 22, 2009

रसिकांना रसिकांना भेटण्यासाठी "भारतरत्न" महोत्सवात "

शनिवारी संध्याकाळी मधुप मुद्‌गल यांचे गायन रंगत होते.
अचानक व्यासपीठाच्या उजव्या बाजूला धावपळ दिसली.
\एक पांढरी गाडी मंचाजवळ थांबली. कॅमेऱ्यांचे फ्लॅश उडायला लागले.
संगीत श्रोत्यांमधूनही चुळबुळ सुरू झाली.
सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी
"भारतरत्न' पं. भीमसेन जोशी रसिकांना भेटण्यासाठी दाखल झाले होते.
कांही काळ गाणे थांबविण्यात आले.
सर्वांचे लक्ष लागले होते गाडीत बसलेल्या पंडितजींकडे.
पंडितजी आल्याची घोषणा निवेदकाने केल्याबरोबर संपूर्ण सभागृह
त्यांना मानवंदना देण्यासाठी उठून उभे राहिले.पंडितजींना बोलवत नव्हते.
तरीही खास सुरक्षा व्यवस्था असलेल्या गाडीत बसलेल्या पंडितजींच्या हातात,
निवेदकाने माईक थोपविला.
अनेक वर्षांपासून आपल्या गायकीने रसिकांचे कान तृप्त करणारे पंडितजी म्हणाले,
""माझी पकृती बरी नसतानाही मी श्रोत्यांना भेटण्यासाठी येथे येण्याचा प्रयत्न केला'.
संपूर्ण श्रोतृवर्ग त्यांच्या या शब्दांनी धन्य झाला.
टाळ्यांच्या गगनभेदी गजरानेच त्याची जाणीव करून दिली.
कांही काळ पंडितजी गाडीतच बसले होते.
गायनाचा काही काळ आस्वाद घेतला.
कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मंचाजवळची ती पांढरी गाडी दिसेनाशी झाली.

Monday, January 19, 2009

पुण्यात दहशतवादी

सशस्त्र अतिरेकी पुण्यात आल्याची ही खबर आज तरी प्रत्यक्षात आलेली नाही.
पोलिसांचा शोध सुरू आहे.
बंदाबस्त चोख दिसतो आहे. खबरदारी चहुबाजुंनी घेतली आहे.
पुणेकर जागरूक पुण्यात दहशतवादी आल्याची खबर पोचली आणि पुणेकर जागृत झाले.
नागरीकांनी सतर्क रहावे यासाठी पोलिसांनी यंत्रणा मजबूत केल्याचे दिसले.
काल एक हवा निर्माण झाली होती. पोलिसांनी शहराची नाकाबंदी केली.
तातडीने शहरात वाहनांचे चेकिंग सुरू झाले.
मराठी चॅनेलवर काल सारखे तेच प्रामुख्याने दाखवत होते.
चौका चौकात बंदोवस्त वाढविला गेला होता.
काल रात्री तर तो अधिकच दिसत होता. पण रविवार तर शांतपणे गेला.
कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

आज सोमवार. कालची परिस्थीती आज नाही. तो आज बिनदिक्कत बाहेर पडलाय.
कुठलिही भितीची खूण न ठेवता.परिस्थतीला सामोरे जाण्यासाठी तो सतत तयार असतो.
आजही आहे. पुढेही राहिल.वरवर वाटणारा चिकित्सक पुणेकर देखील वेळी किती शूर
बनू शकतो याचा प्रत्यय लवकरच कृतीतून येईल.
काळजी नको .
संकट येणारच नाही.
आले तरी पुणेकर सामन्यासाठी तयार झालाय.
सशस्त्र अतिरेकी पुण्यात आल्याची ही खबर आज तरी प्रत्यक्षात आलेली नाही.
पोलिसांचा शोध सुरू आहे.बंदाबस्त चोख दिसतो आहे.
खबरदारी चहुबाजुंनी घेतली आहे. पुणेकर जागरूक आहे.
तो अधिक जागरूक होणाराय नक्की

Sunday, January 18, 2009

गच्चीवरील बागेतून स्वप्नं साकार...








छान सुंदर घर असावं. घराभोवती बाग असावी. बागेत रंगीबेरंगी फुले फुलवीत. एक कोपरा असा आसावा, की नव्या रचना इथे घडाव्यात. नवे प्रयोग इथे दिसावेत. घराला लागणारा भाजीपाला. काही प्रमाणात फळेही यावीत. घराच्या बगीच्यात बसून मस्त गप्पा छाटाव्यात. सहचारिणी सोबत असावी. मुलांनीही खेळून धुडगूस घालावा.

असे स्वप्नातले घर दिसणे आता कठीण. घरांच्या किमती परवडेनाशा झाल्यात. बंगला आता विसरा, चांगला फ्लॅटही चालेल. जमलीच तर बाल्कनी असावी. मिळालीच जर टेरेस तर उत्तमच. कुठेही राहिलात तरी निसर्गाला जवळ करण्यासाठी चार-पाच कुंड्यांतली झाडे तरी हवीतच. अशाच स्वप्नांचा पाठपुरावा करताना भेटले एक रो-हाऊस. पुढे-मागे जागा. तीन टेरेस आणि वर झेड आकाराची का असेना स्वतःच्या मालकीची गच्ची.

अशी फुलवली
-बागेसाठीजागा मिळाली याच्या आनंदात ती फुलविण्याचे कसबही आपणच करावेत, अशा निश्‍चयातून माती आणली. रोपे निवडली. कुंड्यांची रचना सर्व बाजूंनी चांगली दिसावी म्हणून तिरक्‍या विटाही लावल्या. गुलाब, पारिजात, तगर, नारळ, मोगरा, जाई लावली. वर्षभरात फुले दिसू लागली. ती किती येतात, यापेक्षा "आपल्या बागेतली' याचा आनंद अधिक मिळाला.कुठलेही खत न घालता पाण्याच्या योग्य नियोजनातून बागेतली हिरवळ वाढू लागली. नारळ, चिकू यांनी अजून दर्शन दिले नसले तरी रामफळाच्या आगमनाने छान वाटले.आडनाव इनामदार पण कुळ कायद्याने शेतीच्या सात-बारात नाव राहिले. एकरात शेती करण्याची संधी स्क्‍वे.फुटात घेतोय, असो. रो-हाऊसची संकल्पित सोसायटी काळाला मान्य नव्हती. शेजारी आणि मागे फ्लॅट आले. परिणामी बागेला मिळणारे ऊन गायब झाले. आजही झाडे आहेत, पण ती सकाळच्या वा दुपारच्या उन्हामुळे नाहीत, तर संध्याकाळी येणाऱ्या उन्हाच्या प्रकाशाने. बागेच्या नियोजनानुसार घराच्या परिसरातील राडारोडा काढून त्यावर पोयटा माती टाकून रोपे लावली. सिमेंटच्या जंगलात हिरवळ साकारली. पहिला उत्साह इतका होता, की रोपांमध्ये अंतर कमी झाले. त्यामुळे झाडांना उसासा घेण्यासही जागा उरली नाही; मात्र रोपांच्यासाठी लागणाऱ्या खताचे उत्पादन स्वतःच करायचे ठरविले होते. यासाठी चार वर्षे घरातल्या निवडलेल्या भाज्यांची देठे, पालापाचोळा, देवाचे निर्माल्य सारेच जिरविण्यासाठी बाजूच्या मातीचा उपयोग केला. त्यातले सिमेंटचे-विटांचे तुकडे, साराच भार कमी करून मातीचा अंश वाढवला. त्यावर पाण्याचा फवारा देऊन खताची निर्मिती केली. गांडुळे न सोडता खत तयार झाले. बागेतल्या झाडांना ते घातले. त्यातून रोपांची वाढ जोमाने झाली. इतकी की मधुमालतीचा, जाईचा वेल घरावर चढला. तीस-पस्तीस फुटांवर बहरत राहिला आहे. गुलाबी जास्वंद आणि पारिजातकाने इतके बहरणे, वाढणे थांबवावे असे वाटले. अखेरीस छाटणीचा मार्ग निवडावा लागला. वारंवार रोपांभावती आळे करणे चालूच होते. बागेतल्या पानांतून निर्माण होणाऱ्या नैसर्गिक खतानेही झाडांचा बहर वाढविला. काही झाडे काढून सोसायटीच्या बागेत हलवली. काही कुणाला देऊन टाकली.

आता दर्शनी भागातली हिरवळच सांगते की आता पुरे. मग काय गच्चीवर कुंड्यांतून रोपे लावायची कल्पना आली. यासंदर्भात माहितीसाठी "ऍग्रोवन'मधील लेख मार्गदर्शक ठरले.





सुभाष इनामदार, पुणे-५१
संपर्कः ९८८१८९९०५६

Tuesday, January 13, 2009

आयुष्य वाट पहाण्याचे


शाळे पासून वाट पहाणे सुरू असते.

लहानपणी रिक्षेची.

शाळेत बाईंची.

परिक्षेत पेपरची.

वार्षिक परिक्षेनंतर निकालाची.

शाळा सुरू होण्याची.

शाळा सुटल्याची घंटा होण्याची.

बाबा घरी येण्याची.

मित्र घरी येण्याची.

मैत्रीणीचा फोन येण्याची.

तिच्या भेटीसाठी वाट पहाण्याची.

लग्न पाहून केले तर तिचा होकार येण्याची.

पुढे संसारवेलीवर फुल उमलण्याची.

मुल रडायचे थांबून शांत झोपण्याची.

मुले माठी होण्याची.

डॉक्‍टरकडे नंबर लागण्याची.

प्रवासात असलो तर गाडी इच्छीत स्थळी पोचण्याची.

गाडीत जागा मिळण्याची.

आयुष्याचा प्रवास वाट पहाण्यात केव्हा निघुन जातो ते कळतही नाही.

हा प्रवास संपतो केव्हा याची वाट पहात जगणे एवढेच आपल्या हाती.


सुभाष इनामदार, pune

Tuesday, January 6, 2009

तरूणांच्या संवेदना कळत नाहीत

तरूण पिढीच्या संवेदना कळायला जरा अवघड जाते. त्यांच्या भावना सांगण्याची पध्दतही वेगळी आहे. एखादी गोष्ट हवी म्हणजे हवीच असते. ती मिळविल्याशिवाय ते शांत होत नाहीत.
मागणी करताना आजूबाजुच्या परिस्थितीचा विचार केला जात नसावा. यामुळे हाते काय?
ते मागत नाहीत तर आग्रह धरतात. ते विचारत नसतात. थेट सांगतात.

पालक म्हणून पाहिले तर, आपल्या काळात काय होते, कसे होते, ते सांगण्याची सोयच ऊरली नाही. पालकांचे उत्पन्न त्यांना माहित असते. त्यामुळे पालक मागेल ते देणार ही मुलांना खात्रीच असते.

यातुन निर्माण होतो. वाद. इथे संवादाला फार वाव उरत नाही.तो कदाचित एका बाजूनेही होऊ शकतो. कारण जे सांगू ते ऐकायची मनस्थिती त्यांची असेलच असे सांगता येत नाही.

एकूणच पूर्वी असलेला पिढीचा फरक काळ बदलला तरी तसाच पुढे सुरू आहे.
फरक इतकाच पात्रे बदलली. भुमिका बदलेले. संदर्भ बदलला.

काय हे तुम्हालाही पटतय ना?

सुभाष इनामदार, पुणे

Friday, December 26, 2008

सवाई गंधर्व संगीत महोत्सव- 2008

पं. अजय चक्रवर्ती यांचे लालित्यपूर्ण सादरीकरण आणि पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूरवर अतिशय मोजक्‍या वेळात छेडलेला "दुर्गा', ही सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या पहिल्या सत्राची वैशिष्ट्ये ठरली.
पहिल्या सत्राचा प्रारंभ तुकाराम दैठणकर यांच्या सनईवरील "भीमपलास'ने झाला. सनईवादनाच्या सलग चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे तुकाराम दैठणकर यांनी सनईच्या मंगल सुरांनी महोत्सवावरील सावट दूर तर केलेच; पण सुंदर लयकारीचे दर्शन घडवत रागमांडणी केली. विलंबित एकतालातील त्यांचे वादन "अब तो बडी बेर' या रचनेशी साम्य दर्शवणारे होते, तर त्रितालातील रचना "नैना रसीले जादूभरे' या रचनेसारखी वाटली. त्यांना मंगेश करमरकर यांनी तबल्याची उत्तम साथ केली. सीतलाप्रसाद (सनई), गणेश व अशोक दैठणकर (स्वरपेटी), नितीन दैठणकर (सुंद्री) हे त्यांचे अन्य साथीदार होते.
आश्‍वासक गायन युवा गायक कृष्णेंद्र वाडीकर यांनी या महोत्सवात प्रथमच गायन सादर केले. त्यांचे गुरू श्रीपती पाडेगार हे पं. भीमसेनजींचे ज्येष्ठ शिष्य होते. त्यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना आदरांजली म्हणून वाडीकर यांच्या गायनाचे आयोजन केल्याचे या प्रसंगी श्रीनिवास जोशी म्हणाले. वाडीकर यांना अर्जुनसा नाकोड यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याचे, तर पाडेगार यांच्याकडून किराणा गायकीचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांनी "राग पटदीप'मध्ये "धन धन घडी' हा विलंबित एकतालातील ख्याल मांडला. त्यांचा आवाज उत्तम आहे; पण परिपक्वता आणि वजन येण्याची गरज आहे, असे जाणवले. "पटदीप'मध्ये शुद्ध निषादावर अपेक्षित असणारा न्यास, या गायनात दिसला नाही. मात्र लयकारी आणि बोलताना उत्तम होत्या. विशेषतः एक आवर्तन-अर्ध्या आवर्तनातील बंदिशीचे शब्द घेऊन आलेल्या बोलताना खास ग्वाल्हेर घराण्याच्या होत्या. त्यांनी "पिया नाही आये' ही बंदिश मांडली. ताना जोरकस असूनही वैविध्य कमी वाटले. "स्मरता नित्य हरी, मग ते माया काय करी' हे भजन आणि रसिकाग्रहास्तव एक कानडी भजनही त्यांनी ऐकवले. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) तसेच शिरीष कुलकर्णी आणि प्रशांत यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
तालमीचे गाणे ज्येष्ठ गायक, गुरू आणि रचनाकार पं. सी. आर. व्यास यांचे पुत्र आणि शिष्य सुहास व्यास यांनी पूर्वी रागाची मांडणी केली. त्यांनी निवडलेला राग अलीकडे फारसा गायला जात नाही, तसेच त्यांनी हा राग तिलवाड्यात (१६ मात्रा) मांडला. सुरवातीला तालाचे वजन लक्षात येण्यासही रसिकांना जरा वेळ लागला; पण ते लक्षात येताच गायनात रंग भरला. व्यास यांना वडिलांप्रमाणेच पं. के. जी. गिंडे यांचेही मार्गदर्शन मिळाले आहे. "तालमीचे गाणे' असेच त्यांच्या सादरीकरणाचे वर्णन करावे लागेल. विशेषतः तार सप्तकातील गंधारावरचे काम त्यांनी चांगले केले. "बनत बनाओ बन नहीं आये' या द्रुत बंदिशीत ताना, लयकारीही उल्लेखनीय वाटली. व्यास यांचे स्वरलगाव, ठेहेराव त्यांच्या वडिलांची आठवण करून देत होते. याच रागातील एक तराणा त्यांनी एकतालात सादर केला आणि "एक सूर चराचर छायो' या भजनाने सांगता केली. त्यांना भरत कामत (तबला), सुयोग कुंडलकर (हार्मोनिअम) आणि आदित्य व्यास व अनुजा देशपांडे यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
रंगतदार वादन पं. शिवकुमार शर्मा यांनी मोजक्‍या वेळेचे महत्त्व जाणून पाच स्वरांच्या "दुर्गा' रागाची निवड केली असावी. ते सिद्धहस्त कलाकार असल्याने थोड्या वेळातही त्यांच्या वादनाने रंग भरला. मोजक्‍या आलापात "दुर्गा'रूप दर्शवून अतिशय नेटके तरीही प्रभावी रागचित्र त्यांनी निर्माण केले. "झाला' मात्र त्यांनी आटोपता घेतला, असे वाटले. "दुर्गा' रागातील १३ मात्रांतील "जय' तालात (४-४-५ अशी मात्रा विभागणी) त्यांनी अप्रतिम सादरीकरण केले. तबलावादक योगेश सम्सी यांच्यासह द्रुत वादनातील रंगतही रसिकांची दाद मिळवून गेली. त्रितालातील एक रचना ऐकवून त्यांनी "पहाडी'मधील नवी रचना ऐकवली. डॉ. धनंजय दैठणकर यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
लालित्यपूर्ण गायन पतियाळा घराण्याचे प्रसिद्ध गायक पं. अजय चक्रवर्ती यांच्या अत्यंत लालित्यपूर्ण गायनाने पहिल्या सत्राचा समारोप झाला. त्यांना योगेश सम्सी (तबला), अजय जोगळेकर (हार्मोनिअम) यांनी साथ केली. पं. ग्यानप्रकाश घोष यांचे मार्गदर्शन लाभलेल्या चक्रवर्ती यांच्या गायनात वैविध्य आणि भावपूर्णतेचा दुर्मिळ संगम होता. "खमाज'मधील "आय आयो पाहुना' ही पं. घोष यांचीच रचना त्यांनी मांडली. "खमाज' हा मांडणीचा राग म्हणून सहसा गायला जात नाही. बहुधा उपशास्त्रीय रचना त्यात सादर केल्या जातात; पण चक्रवर्ती यांनी शुद्ध खमाज मांडला आणि अन्य "मिश्रपणा'पासून खमाज अलिप्त ठेवला, हे आवर्जून नोंदवायला हवे. "काहे करत मोसे बरजोरी' ही त्यांची स्वतःची बंदिश झपतालात बांधली होती. बडे गुलाम अली खॉं यांची "मनमोहन शाम रसिया' ही त्रितालातील रचना, "कोयलियॉं कूँक सुनावे' (यातील कूँक या शब्दावरील नि सा या स्वरांचा न्यास अप्रतिम) "आज मोरी कलाई मुरकतली' ही रचना...असे वैविध्य त्यांच्या गायनात होते. मंद्र सप्तकापासून अतितार सप्तकातील स्वरांचे काम, आकारयुक्त गायन, दमसांस, भावपूर्णता, तिन्ही सप्तकांत फिरणारा आवाज, अप्रतिम सरगम, गमकी ताना, स्वरांचे लगाव, ठेहेराव आणि आंदोलने...अशा अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असणारे हे गायन त्यातील विलक्षण सहजता आणि प्रसन्नतेमुळे रसिकप्रिय ठरले. "आवो भगवान' या भैरवीने चक्रवर्ती यांनी गायनाची सांगता केली.