Wednesday, April 2, 2025

आजच्या काळासाठी गीतरामायण महत्त्वाचे का आहे याचे दर्शन



राम तत्वाची मांडणी करून आजच्या काळासाठी गीतरामायण महत्त्वाचे का आहे याचे दर्शन शब्द आणि स्वरांच्या स्वरूपात साकार होते ते अवघ्या आशा श्रीरामार्पण.. या कार्यक्रमात ..!

गीतरामायणाचा आधार घेत राम कथेचा आधार न घेता रामाच्या आयुष्यात घडलेल्या घटनेच्या आधारे राम तत्व मांडण्याची भूमिका घेऊन आजच्या काळातही रामाने आपल्या जगण्यातून जी मूल्ये जपली त्याच्याशी सुसंगत विचार मांडून त्याला योग्य अशी गाणी सादर करून एक वेगळा कार्यक्रम पुण्यात केला तो त्रिदल निर्मिती असलेला ..अवघ्या आशा श्रीरामार्पण ! 

गुढी पाडव्या पाडून रामनवमी पर्यंत अनेकविध गीतरामायणाचे कार्यक्रम सर्वत्र साजरे होत आहेत.. गीतरामायणाचे ही ७० वे वर्ष. म्हणूनच स्नेहल दामले, श्रुती देवस्थळी आणि प्रसन्न बाम यांनी गीतरामायणाचे कोणते वेगळे रूप मनात योजून हा सादर केलेला असेल याची उत्सुकता होती..

आनंद माडगूळकर आणि प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते शुभारंभाच्या प्रयोगाचे दीपप्रज्वलन झाले आणि इथे नेहमीपेक्षा आगळे दर्शन होणार असल्याचे दिसून आले..
गीतरामायणाचे विचार नव्याने समाजापुढे आणण्याची प्रेरणा मिळेल असे आनंद माडगुळकर यांनी बोलून दाखविली.
आज बाहेरचा गोंगाट इतका वाढला आहे..की ज्या आत्मस्तानाला समर्थांनी साथ घातली होती त्या आत्मरामाचा आवाजच आपल्याला ऐकू येत नाही . म्हणून आज राम तत्वाची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे..असे मौलिक विचार प्रा. मिलिंद जोशी यांनी या प्रसंगी मांडले.

सोमवारी ३१ मार्च २०२५ रोजी गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल ..टिळक रोड इथे गीतरामायणाचे स्वर ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी करून आलेल्या रसिकांच्या समोर नेहमी इतर कलावंतांच्या गाण्यांना निवेदन करून व्यक्त होणाऱ्या स्नेहल दामले या मंचाच्या मध्यभागी..श्रीरामाच्या छायेत दिसल्या आणि त्यांनी ही राम कथा नसून इथे तुम्हाला राम तत्व लक्षात घेऊन त्यानुसार गीतरामायण ऐकता येईल असे सांगितल्यावर उद्देश नक्की झाला..आणि खरोखरच या कार्यक्रमात आपल्याला राम नक्की वाटेल याची खात्री पटली..


पाचशे वर्षांनी श्रीराम मंदिर अयोध्येत उभे राहिले आणि ज्याच्या नावाने भारताला ओळखले जाते त्या अयोध्या नगरीचे वर्णन करणारे गाणे घेऊन कार्यक्रम सुरू होतो..अभिजीत पंचभाई यांनी अयोध्या नगरीचे गुणगान पुण्यनगरीत माडगूळकरांनी आपल्या शब्दातून प्रसूत केलेल्या गीतातून झाले..हा शुभ योग..!

इथे राम जन्मापासून सुरू होते ती राम तत्वाची मांडणी.. इथेही २०२४ मध्ये अयोध्येत राममंदिरात उभी केलेली दिपवून टाकणारी रामाची मूर्ती..निरूपणकर्त्या स्नेहल दामले यांच्या डोळ्यासमोर उभी राहते..

 


जगण्यात राम केव्हा येईल जेव्हा तुम्ही रामाप्रमाणे सत्वशील..नियम पाळून वागाल..स्नेहल दामले यांनी यातल्या निवडलेल्या प्रत्येक गाण्याला काळाच्या ओघात प्रवेश करत आत्ता कसे तुम्ही आम्ही वागायला हवे याचे बारीक चिमटे काढत पुणेरी पद्धतीने ही रामतत्वे उपस्थित रसिकांच्या मनात ठेवण्याचा प्रयत्न करतात..

कैकयी ही एक वृत्ती आहे.. म्हणून त्यांचे नाव आपण कुणी ठेवत नाही.. रामाचे धैर्य आणि त्यावर ठामपणे व्यक्त होणे..हे ही पाहण्यासारखे आहे..म्हणून इथे " मोडू नका वचनास .." हे गाणे निवडले.. 

रामाला या अयोध्येतून दुसऱ्या तीरावर नेणारे नावाडी करतात त्यात कर्म आहे..तुम्ही आम्ही तुमचे काम मनापासून करीत रहा.. बाकी सरकार पाहून घेईल..आणि मग यात गाणे येते.. जयगंगे जय भागीरथी..

काव्य म्हणून श्रेष्ठ असणारे ..पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा ... हे वैश्विक गाणे आहे..प्रत्येक माणसाला लागू होईल असे हे गीत म्हणजे गदिमांचे अजरामर काव्य आहे. जगण्याचे बळ देणारे गीत.

एका हातात सारी दु:ख आणि दुसऱ्या हातात हे सांत्वन गीत ठेवलं तर तराजू बरोबर होईल असे स्नेहल दामले इथे सांगतात..राम तत्व मूल्ये सांगताना इथे गदिमांनी रचलेल्या गीतरामायणातून त्यांचे सिद्धहस्त म्हणून असलेले मोठे काम आपल्या निरूपणात भावपूर्ण रित्या मांडले जाते.

रामाला मानणारे भक्त भुकेजले हवेत..आणि ते चकोर हवेत..आज चकोरा घरी पातली भुकेजली पौर्णिमा..हे सांगण्यासाठीचे धाडस वाल्मिकी आणि गदिमा यांनी केले आहे..असे सांगून इथे धन्य मी शबरी श्रीरामा.. हे शबरीचे गीत येते.

संवादाचे दालन वर्षानुवर्षे न मिळालेल्या अहिल्याचे माणूस बनणे कथा काल्पनिक असू शकते.. पण उद्या ज्याची गरज पडेल त्याला मदत करणे ही भूमिका घेतली गेली असावी असे सांगत त्यांनी पुढचे गीत सुरू केले.. आज मी शाप मुक्त झाले..


सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांनी आपल्या आयुष्यात काही मूल्ये जपणे आवश्यक आहे..आजच्या रामांना ,आपली पत्नी सीता असावी असे वाटते पण त्यांची मात्र राम होण्याची तयारी नसते ..असे असंख्य दाखले देत हा कार्यक्रम आपल्याला यातून जगण्याचे विचार देतो.

रामकथेचे बीज वाल्मिकी यांनी पेरले पण त्याला मराठी भाषेत अधिक रुजवले ते गदिमा आणि बाबूजी या जोडीने.. इथे त्याच गीतरामायणातील वेगळा विचार स्नेहल दामले यांनी अधिक प्रभावी पद्धतीने समजावून दिला.. त्यासाठी वाचक आणि वेधक गाणी त्यांनी इथे घेतली  ..त्याला  आपला असा वेगळा आयाम दिला..त्याबद्दल त्यांचे खरोखर कौतुक केले पाहिजे.

अभिजीत पंचभाईसारखा भावपूर्ण गायक, श्रुती देवस्थळी सारखी मेहनती गायिका..यांनी गाण्यांची केलेली उत्तम तयारी . सुधीर फडके यांनी गदिमांच्या रचनेला दिलेला न्याय..इथे त्याच स्वरभावनेतून ती गाणी साकारून गायकांनी ती अधिक उठावदार सादर करून रसिकांना मोहात पाडले.उद्धव कुंभार सारखा ताल वादक, अमित कुंटे यांच्यासारखा तबला वादक आणि प्रसन्न बाम सारखा अप्रतिम हार्मोनियम वादक साथीला असेल तर कार्यक्रम उंचीवर जाणार हे नक्की असते.

असा वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम सादर करून केलेले हे धाडस गीतरामायणावर प्रेम करणारे कोट्यावधी रसिक प्रेक्षक भारावल्या स्थितीत ऐकतील आणि प्रतिसाद देतील याची खात्री आहे.


-- सुभाष इनामदार, पुणे

subhashinamdar@gmail.com 

Sunday, March 30, 2025

गोष्ट एका कॅलेंडरची..

 स्वर लतेच्या प्रकाश छायेत..


त्यामागच्या घडून गेलेल्या आठवणींची..आणि त्यायोगे भारतरत्न लता मंगेशकर या ५० वर्षाहून अधिक काळ हिंदी चित्रपटात आपल्या आवाजाने गाजविलेल्या गाण्यांची कहाणी..!
यातला पहिलाभाग होता.. स्वरमंगेश या थीम कॅलेंडरची..यात ६० वर्षे ज्या मंगेशकर कुटुंबीयांनी योगदान दिले त्यांची..
त्यासाठी दीदींची छायाचित्रे काढण्यासाठी विशेष भेट प्राप्त झाली..त्याची आठवण ..या क्षण कसे साकार झाले यांचे सविस्तर वर्णन ऐकताना भारावलेले रसिक दिसत होते..
आणि त्यातूनच स्वरलता लता मंगेशकर यांच्यावरील गीतांची आज त्यांनी ज्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायलेल्या गाण्याची..मेजवानी उपस्थित रसिकांना मिळाली.




ज्या संगीतकारांच्या बरोबर त्यांनी काम केले त्यांच्या आठवणी आणि त्यांचे आवडलेले गाणे..सादर करून पुण्याचे ज्येष्ठ छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी राजलक्ष्मी सभागृहात शनिवारी २९ मार्च २५ संध्याकाळ सुमारे अडीच तास रसिकांना लता मंगेशकर यांच्यासोबत भेट घडवून आणली..
थीम कॅलेंडरची कल्पना सतीश पाकणीकर २००३ पासून आजअखेर राबवित आहेत..त्या लता मंगेशकर यांच्या दोन कॅलेंडर रांना त्यांनी दृष्टीरूप दिले..त्यातून त्यांचा भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशी संवाद निर्माण झाला..
त्यांच्या सोबत सुमारे साडेतीन तास गप्पा होऊन त्यातून सुमारे २८ संगीतकारांच्या आठवणी आणि त्यांच्या आवडीचे त्यांना आवडलेले गाणे समजून घेता आले..आणि तो स्वरमयी आविष्कार कॅलेंडर स्वरूपात साकार झाला.. त्यासाठी पाकणीकर हे दोन महिने ती प्र्कशस्त यावी यासाठी झटत होते.
त्यांच्यासोबत असलेल्या चित्रपट संगीताच्या ..आणि कारकिर्दीच्या अभ्यासक सुलभा तेरणीकर होत्या.. त्यांनी त्या गप्पा टिपून घेतल्या आणि अपर्णा संत यांच्या आवाजात लता दीदी यांच्या मनातील भावनांना शब्द प्राप्त झाले..त्यांनी जे गाणे आवडले ते पाकणीकर यांनी आपल्या या सादरीकरणात एक झलक म्हणून दाखवून चित्र..शब्द आणि स्वरातून लता मंगेशकर रसिकांच्या भेटीला आणल्या.


एका बाजूला त्या त्या संगीतकारा बाबतीत थोडक्यात आठवण आणि लता दीदी यांना त्या संगीतकाराचे आवडलेले एक गाणे.. ते गीत..त्याबद्दलची माहीत असा एकूण ठाचा ठरला. आणि तेच या कार्यक्रमात त्यांनी प्रत्यक्ष दर्शन घडविले. एकूण १७५ संगीतकारांबरोबर दीदी गायल्या आहेत त्यात २८ संगीतकारांना इथे कॅलेंडर मध्ये स्थान मिळाले आहे.
यात गुलाम हैदर
खेमचंद प्रकाश
श्यामसुंदर
अनिल विश्वास
नौशाद
वसंत देसाई
शंकर जयकिशन
रोशन
मदन मोहन
सज्जाद हुसेन
हेमंत कुमार
सलील चौधरी...
सचिन दा बर्मन..
सुधीर फडके..
खय्याम..
गुलाम मोहम्मद
पाकिजा
चित्रगुप्त
जयदेव
अल्ला तेरो नाम
कल्याणजी.. आनंदजी
पंडित रविशंकर
अनुराधाचे संगीत अधिक आवडते
आर डी बर्मन
लक्ष्मीकांत प्यारेलाल
सुनो सजना
शिव हरी
सील सिला
हृदयनाथ मंगेशकर
लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम अभ्यास यातून लेकीन चित्रपटाचे संगीत मला अधिक आवडते
भूपेन हजारिका
रुदाली..मधले दिल हुं हुं करे
राम लक्ष्मण
मैंने प्यार किया..दिल दीवाना
ए आर रहेमान
या संगीतकारापर्यंत लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याची ही चित्रमय संगीत मैफल
मधूनच फोटो कसे बनविले याचे तंत्र सतीश पाकणीकर यांनी उलगडून सांगितल्याने.. कार्यक्रमात वेगळेपण टिकून राहिले..यात लता मंगेशकर यांचे उत्तम आणि निवडक..दुर्मिळ छायाचित्रे पाकणीकर यांच्या हातातून खास थीम कॅलेंडर मध्ये पाहायला मिळाली.
एकाच गायकाची ५० वर्षाची गाणी..
आणि अखेरीस सी. रामचंद्र
ए मेरे वतन के लोगो..



ऐकताना भारावलेल्या वातावरणात रसिक सतीश पाकणीकर यांना धन्यवाद देत..एक वेगळा अनुभव दिल्याने इथे सभागृहात त्यांना कार्यक्रमाने आपण किती आनंदित झालो हे सांगण्यासाठी एकेक रसिक पाकणीकर यांच्या जवळ जाण्यासाठी आणि त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी थांबून राहिले होते..

- subhash inamdar. Pune
subhashinamdar@gmail.com

Tuesday, March 18, 2025

इनामदारी.. मुळे लाभली रसिकांच्या मनात संगीताची संगत ..



संगीतकार कौशल इनामदार यांनी आपले आजोबा शंकरराव बिनीवाले यांच्या संगीत संस्कारातून तयार झालेले संगीताचे मनावरचे गारूड कसे पुढे वाढत गेले..

आणि जुन्या चालीत बांधलेल्या गाण्याच्या सुरावटी आणि त्यांचे ताल यातून १२ स्वरांचा हा संगीताचा प्रवास आपल्या आयुष्यात कसे नवे वळण घेत अवतरला याचे सोदाहरण स्वरकिर्तन आपल्या थोड्या स्पष्ट शब्दात वर्णन करून दोन तासाचा इनामदारी हा कार्यक्रम पुण्यात रंगवला..
निमित्त होते कलासक्त फाउंडेशन यांचे वृत्ती आयोजित केलेल्या कौशल इनामदाराच्या संगीत कारकिर्दीचे मर्म जाणून देणारा अनुभव ऐकण्याचे.
संगीतकार कौशल इनामदार.. यांनी संगीतकार म्हणून केलेले काम आणि त्यांची गाण्यातील ओळख यांचे नाते उलगडणारी ही वाटचाल..


इनामदारी..या कार्यक्रमात त्यांच्यासोबत होते
सोमेश नार्वेकर ( गायन - सिंथ), चैतन्य गाडगीळ ( गिटार) आणि अमेय ठाकुरदेसाई ( तबला) हे साथ देणारे कलावंत मित्र.




दोन तास इनामदार एखाद्या तल्लीन झालेल्या उत्तम पठडीदार कीर्तनकार प्रमाणे आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून रसिकांच्या मनाला शब्दांचा आणि संगीताचा आनंद देत होते..
बारा सुरांची मुशाफिरी कशी केली. आणि ती करताना आपण कसा विचार केला याचा विचार त्यांनी बोलून दाखवून एका चालीत बांधलेली दोन गाणे कशी संगीतकाराने तयार केली ते उदाहरणे देऊन आपल्या इनामदारी मध्ये सादर करून रसिकांची दाद घेतली..



बालगंधर्व चित्रपटातील पर्वतदिगार पर्यंत येऊन ठेपला..आणि शेवट मराठीतील ४६० गायकांनी गायलेले मराठी अभिमान गीत सुरेश भट यांचे लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी याची घडलेली खाणी कथन करून ते गाणे ऐकवून आपल्या इनामदारी या कार्यक्रमाचा त्यांनी शेवट केला..



इथे कौशल इनामदारांचे संवाद कौशल्य आणि कोपरखळ्या मारीत कार्यक्रम पुढे नेण्याचे कसब रसिकांच्या टाळ्यांनी अधिक रंगतदार झाले.

- Subhash Inamdar,
Pune
subhashinamdar@gmail.com

अजिंठा या नाट्यानुभवाचे रसिक नक्कीच स्वागत करतील..!



चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत अजिंठा लेणी जगासमोर मांडणारा चित्रकार म्हणजेच रॉबर्ट गिल. बौध्द लेणी जगाच्या पटलावर आणली तो हा जगविख्यात प्रतिभावंत चित्रकार राबर्ट. गिल १८४३ पर्यंत रॉबर्टने आर्मीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केले. ईस्ट इंडिया कंपनीने त्याच्यातील सुप्त कलाकाराला ओळखून १८४४ ला अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी अजिंठा येथे नियुक्ती दिली.

रॉबर्ट गिल मे १८४५ ला सुरक्षा जवानांसह तो अजिंठ्याला आला. अजिंठा येथील सैन्य प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक वैद्यकीय उपचार केंद्रात तो राहात होता.
अजिंठा येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या पारो या भारतीय तरुणीशी पारोशीओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. आज हीच प्रेम कथा जगभरात प्रसिद्ध पावली आहे.
यावर “अजिंठा नावाचा एक मराठी चित्रपट ही येऊन गेला आहे. चित्रनिर्मितीच्या कामात पारो ही देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने झिडकारून रॉबर्ट गिलला चित्रकामात मदत करायची. ११ वर्षांच्या सहवासानंतर पारो हिचा २३ मे १८५६ रोजी अजिंठा येथे आकस्मित मृत्यू झाला.
आपल्या प्रियसीबद्दल असलेल्या अत्यंत प्रेमापोटी रॉबर्टने तिची कबर अजिंठा येथील पोलिस ठाण्याच्या परिसरात बनविली. त्यावर ‘‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड २३ मे १८५६’’ अशा ओळी तिच्या कबरीवर लिहिल्या.
रॉबर्ट गिलने अजिंठा, वेरूळ, खान्देशातील, पश्चिम विदर्भातील लोणार सरोवर, मुक्तगिरी, अजिंठा परिसरातील मंदिरे, मुघल वास्तुकला यांची छायाचित्रे काढून भारतातील हा विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला. ब्रिटीश शासनाकडून रॉबर्ट गिलवर अजिंठ्याच्या फोटोग्राफीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अथक परिश्रमाने त्याने मार्च १८७० ला हे काम पूर्ण केले आणि १८७३ ला हा ठेवा त्याने तत्कालीन ब्रिटिश सरकारला सुपूर्द केला होता.
खान्देशच्या कडक उन्हाळ्यात भुसावळच्या रेल्वे हॉस्पिटलला रॉबर्ट गिलचे उष्माघाताने १० एप्रिल १८७९ ला निधन झाले. एक प्रज्ञावंत अष्टपैलू कलाकार खानदेशच्या मातीत विलीन झाला. कधी काळी कुंचल्याच्या प्रेमात गुंतलेला व सुरक्षा रक्षकांच्या गारुडात असलेला रॉबर्ट गिलच्या थडग्याभोवती आज गवताचा अन अस्वच्छतेचा वेढा असतो.




हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे याच कथावर ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी लिहिलेल्या अजिंठा या दीर्घकाव्यावर आधारित एक परिणामकारक अभिवाचन ऐकण्याची संधी पुण्यातल्या लपझप या संस्थेने
कलाछाया कल्चरल सेंटर, पत्रकार नगर पुणे येथे दिली..
लख्ख अंधारात ..मंद प्रकाश योजनेच्या साथीने, संगीत.. आणि तेव्हढेच कथेला न्याय देण्यासाठी उपयुक्त असे पार्श्वसंगीत..पुरेसा मेकअप आणि वेशभूषा करून हा अभिमान वाटावा प्रयोग मोकळ्या वातावरणात सादर केला..
त्याचा परिणाम रसिकांच्या मनात कायम राहून जातो..


यासाठी १६ मार्चची संध्याकाळ अक्षय वाटवे,



माधवी तोडकर






आणि उदय रामदास





यांनी उजळ करून गिलसाब आणि पारो यांच्या प्रेमाची अजिंठा येथे साकार झालेली कहाणी आपल्या अभ्यासपूर्ण शब्दांच्या माध्यमातून या कलाकारांनी उपस्थित रसिकांच्या मनात थेट रुजविली असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही..
ना. धों. महानोर यांच्या प्रतिभेचे हे लेणे यानिमित्ताने पुन्हा उजळ झाले ..
माफक आणि सुंदर परिणाम साधणाऱ्या या अजिंठा या नाट्यानुभवाचे रसिक सर्वत्र स्वागत करतील अशी अपेक्षा आहे..याचा कालावधी मात्र कमी आहे..याची नोंद घ्यावी..






यातली गायनाची आणि संगीताची बाजू शब्दांच्या साथीने उदय रामदास आणि माधवी तोडकर यांनी तर केवळ वाचनातून समृध्द करण्याची किमया अक्षय वाटवे यांनी केली. तिन्ही कलावंतांचे त्यासाठी कौतुक करायला हवे.. आणि मुख्य म्हणजे दिग्दर्शक अक्षय प्रभाकर वाटावे यांचे सर्वाधिक श्रेय आहे.
यापाठीमागे ज्याचे हाथ लागले आहेत त्यात चेतन पंडित, राघवेंद्र जेरे, रवी मेघावत, कौस्तुभ केणी यांचे.



- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

Sunday, March 9, 2025

माय लेकरं.. नात्यांची वीण उलगडून दाखविणारी कलाकृती..!


आई आणि मुलाचे नाते
वर्णावे तेव्हढे कमीच
महती याची मोठी
संस्कृती त्यातून झिरपते
त्यागाचे प्रतीक यातून होते सिद्ध
कलांगण निर्मित माय लेकरं..या कार्यक्रमातून ही या नात्यातली वीण कथा..कविता आणि गाणी यातून रसिकांच्या मनात कायम लक्षात राहील ..!
डॉ. अरुणा ढेरे यांनी यासाठी अभ्यासपूर्ण माहिती एकत्र करून माय लेकरं..यात ती अशी काही मांडली की त्यातून हे नातं किती उत्कट..किती निर्मळ आणि सुंदर आहे याची साक्ष अधिक दृढ होते.
निवेदन..निवड ..आणि गुंफण हा त्यासाठी अगदी यथार्थ शब्द त्यांनी संहितेत नोंदला आहे.
आई उन्हाची सावली
आई सुखाचे नगर
निळ्या आभाळा एव्हढा
तिचा मायेचा पदर
आई कुणाचीही असो
तिचा सन्मान करावा
तिने टाकलेला शब्द
फुलासारखा झेलावा..
कवी.. म.भा. चव्हाण
आईचं उदात्त रूप एक प्रतिमा म्हणून आपल्या सर्वांच्या मनात आहेच..पण माय लेकरांने नाते तेव्हढेच वत्सल धाग्यांचे नसते..या नात्यातले कितीतरी रंग..गहिरेपण या कार्यक्रमातून बाहेर येतात..आणि तुमच्या आमच्या डोळ्याच्या कडा नकळत पाणावल्याशिवाय रहात नाहीत..
बहिणाबाई ते अगदी इंटरनेटच्या नव्या युगात देखील अनेक साहित्यिक ... कवींनी ह्या नात्याविषयी केलेलं टिपण इथे तुम्ही ऐकता..



आणि माय लेकरं... हे चिरंतन नाते बरोबर घेऊन तुम्ही सभागृह सोडता..
कलांगण संस्थेच्या वतीने चैत्राली अभ्यंकर यांनी काही कारणाने थांबलेल्या कार्यक्रमाचे पुन्हा एकदा जगातील महिला दिनाच्या पूर्व संध्येला सादरीकरण करून..त्याचे रंगमंचीय रूप जनतेसमोर आणले.. त्यासाठी त्यांच्या सोबत अमित अभ्यंकर यांनी लाभलेली मदत खूपच मोलाची आहे.
खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, जयंत भावे आणि खास करून लेखिका आणि संहिता बांधणाऱ्या डॉ. अरुणा ढेरे यांच्या उपस्थितीत पुण्यात शुक्रवारी ७ मार्च २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माय लेकरं..शुभारंभ केला.
त्याला प्रकाशयोजना.. पार्श्वसंगीत..आणि आधुनिक ध्वनी यंत्रणा बहाल करून तीच उत्तम संहिता मंचावर सादर केली..हे धाडस केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन..



यामुळे मराठी भाषेतील त्या संस्कारक्षम कथा..त्या पारंपारिक कविता नव्या पिढी समोर आल्या.
डॉ. गिरीश ओक..मृणाल कुलकर्णी यांच्यासारख्या जाणकार कलाकारांनी यात सहभागी होऊन आपल्या अभ्यासपूर्ण आणि समर्थ वाचिक अभिनयातून हा फुलोरा नटविला..अधिक समृद्ध केला.
आजी चैत्राली अभ्यंकर यांनी यातल्या लोकप्रिय..उत्तम गाण्यांना सादर करून शब्द..स्वरांची मेजवानी दिली..



चांगले ऐकणे ज्यांना आजही आवडते आणि भाषेतील उत्तमता ज्यांना आपलेसे करते ती ही संहिता प्रत्यक्ष मंचावर अनुभवताना ऐकणे यासारखे समाधान नाही..



माय लेकरं..सारखे प्रयोग अधिकाधिक प्रयोग तुम्हीही तुमच्या सोसायटीत..गावातल्या ग्रंथालयात आयोजित करू शकता..
त्यासाठी तयार केलेले माफक पण आकर्षक नेपथ्य सुटसुटीत आहे..
मराठी साहित्यात लिहिलेल्या असंख्य आई आणि मुलांच्या नात्यातले पदर उलगडून सांगून त्यांना आविष्कृत करणारी ही निर्मिती अवश्य अनुभवावी अशीच आहे..





- Subhash Inamdar
Pune
subhashinamdar@gmail.com


Wednesday, February 19, 2025

शांत राहूनही आनंद लाभतो...!

 


कधी समूहाच्या बरोबर..

मित्रांच्या सहवासात ..
मन वेगळ्या विचाराने शांतपणा मागते..
त्यासाठी कुणी मुद्दाम काहीच करत नाही..पण इतराना ते वेगळे वाटते..
आपण प्रवासात असलो तर शब्दातून..कृतीतून..
आनंद व्यक्त व्हावा..हास्याचे फवारे उडवले जावेत..
ते ते प्रसंग..पुन्हा पुन्हा सांगून..किंवा शब्दातून भोवऱ्यात इतरांनी पडावे यासाठी सांगणाऱ्या मंडळींकडे काना डोळा केला..
तर त्यात काय बिघडते..
प्रत्येक वेळी तुमच्या सारखे खळखळून हसणे
त्याच त्या विनोदाला टाळी देणे..
आणि त्यात जर आपला मूड नसला तरी सामील न होता.. स्वतः च्या
तंद्रीत राहून शांत रहावयाचे असेल तर त्याला दोष देणार..की त्याकडे दुर्लक्ष करत स्वतः चा आनंद घेत रहाणे..
हे योग्य हे प्रत्येकाने ठरवायचे..
समूहांमध्ये असताना आपले वेगळे रूप घेऊन शांत राहण्याचा स्वभाव जपत असेल तर ..
मला मात्र तिकडे दुर्लक्ष करून आपल्या वेगळ्या विश्वात जाऊन मन रमवायला आवडते..
काही मानसिक आंदोलने मनात घडत असतात..तेंव्हा आजुबाजूला चाललेला गोंधळ..ती हासण्यासाठी केलेली धडपड जर नकोशी वाटली तर त्यात त्याचा दोष काय..?
तुमच्या बरोबर राहून.. शांतपण स्वीकारून असणे म्हणजे तुमच्या आनंदाला त्यातून बाधा कशी निर्माण होते.. हेच कळत नाही..
प्रत्येकाचा स्वभाव निराळा..
प्रत्येकाची विचार करण्याची मानसिकता वेगळी ..
समूहात अनेक प्रकारचे..
नाना विचाराचे लोक..एकत्र असतात..
जे ओळखतात..ते गृहीत धरतात..
पण जे अनोळखी असतात..त्यांचा स्वभाव तुम्हाला माहीत होतो..तो नंतर..
पण तुम्हीही त्याच्याशी संबंध ठेवता..किंवा टाळता..
तसेच ही प्रक्रिया सुरू असते..
आपल्याला काही गोष्टी पटल्या नाहीत.तर एक तर तुम्ही प्रत्यक्ष बोलून दाखवून..
किंवा न बोलून शांत राहून सारे सहन करताच ना..अगदी तसेच..
एकदा घरातून बाहेर पडल्यावर..
प्रवासात..सोबत कोण .. कसा असेल..कळत नाही..
तुम्ही कला कलाने..किंवा शब्दातून किंवा संवादातून व्यक्त होऊन ते जाणून घेता..
आणि शेवटी प्रवास पूर्ण होतो..
ते तिकडे..आणि आपण आपल्या मार्गाने जातो..
तसेच..
पण शांत असणे..आणि एकटे राहणे..याला कुणी नावे ठेवतात..
पण तोही एक स्वभाव असतो..
हे विसरून चालत नाही..





- subhash inamdar ,
Pune

subhashinamdar@gmail.com
लाईक
टिप्‍पणी
पाठवा

Saturday, February 15, 2025

नवा अनुभव घेण्यासाठी पुन्हा सज्ज ....!

 


त्याने कधीचे ठरविले होते..की मन घट्ट करायचे.. पण नुसते ठरवून काय होते..ते प्रत्यक्षात यायला हवे. ना..?

रोज आपण नवे संकल्प करतो..पण ते विसरून जातो..किंवा.. सुरवात होते. पण पुढे काहीच होत नाही..
हो ना..अगदी तसेच..
यासाठी आता त्याने आपल्या मनाशी नक्की केले..मनात फार विचार आणायचे नाहीत..अगदी शांत रहायचे.. कुठलाच तसा विचार करायचा नाही..
त्याने मनाला निक्षून सांगितले.. रे मना बन दगड..!
त्यालाही ते कळत होते.. ते सांगणे..किंवा शब्दातून ठरविणे सोपे होते..पण तेच प्रत्यक्षात येणे किती कठीण आहे.ते..
नाही नाही..नाही..
आता बघाच ..मी ठरवितो. आणि ते नक्की अमलात आणतो ते..
त्याने काय होईल..त्याच्या या निर्णयाचा परिणाम..इतरांवर होत राहील.. ते ही थोडे निवांत होतील.. घर शांत होण्यास मदत होईल..
याने मनात काय घेतले ..
एकदा घेतलं म्हणजे..तो ते इतराना ते पटवून देत असे..
कारण त्याच्या मनात विविध गोष्टी येत असत..
त्यात अगदी टोकाचे विचार असत..जर असे प्रत्यक्षात झाले तर..
अरेरे.. किती वाईट ..
मग काय होईल..
बापरे..
मन धास्तावे.. मनात चर्र होई.. एक अनामिक भीती मनात येई.. काही बरे वाईट..झाले तर..
म्हणजे एकच की मन चिंता करत राही..
त्याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर होऊ लागे..
आधीच ब्लड प्रेशर वाढले..आता..त्यात यामुळे अधिक भर..
पण मग करायचे काय..
तर मन घट्ट करायचे..
कसलाही विचार करायचा नाही..
सतत आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी काही उपाय आहे काय..?
वारंवार तो विचार करी..
पण अगदी हात टेकले आहेत याच्यापुढे..
असे घरचे लोक म्हणत असत..
मात्र त्याने ठरविले की आपण कुणाचे ऐकणार नाही..
आपली तब्येत यामुळे बिघडते आहे.
मनात नको ते विचार यायला लागतात..
कधी कधी..रात्रभर झोपही येत नसे..
आली तर मध्यरात्री ३ वाजताच जाग येऊन..पुन्हा त्या निद्राराणीचा विचार करावा लागे..कधी पहाटे
लागला डोळा तर लागे..नाहीतर ती रात्र तशीच निघून जाई..
याला त्याने ठरविले..की आता नको ती चिंता ..अनावश्यक विचार.. करायचे नाही..
जे होणार ते ..होणारच..मग आपले मन त्यात गुंतून ठेवण्यात काय अर्थ आहे..
खूप वेगवेगळी स्वप्ने पाहत असतो..तो..
ज्या स्वप्नांना खरे तर काहीच अर्थ नसतो..
पण ती भयानक..आणि अवास्तव असतात..
जे कधी प्रत्यक्षात घडत नसते..तसली स्वप्ने डोळसपणे पण झोपेतच पाहिली जातात..
त्याची भयानकता त्याला भिवविण्याचे काम करीत..
आता तेही त्याने ..असेच होणार असे मनाशी पक्के केले..ते सत्य नाही..ते कल्पनेत दडलेले डोक्यात ..साठलेले..आणि जे कधीच प्रत्यक्षात होणार नाही..ते दिसत असते...
मन चिंती ते वैरी न चिंती..म्हणतात ना..अगदी तसे..
आता हे सारे घडत असताना.. वास्तव जीवनाकडे सकारात्मकतेने पहाणे हेच खरे. ते आता त्याने गृहीत धरले आहे..
पण आता वास्तव जीवनाकडे अधिक डोळसपणे पहाणे..
आणि आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणे..दिवसा जे घडत आहे..त्याकडे लक्ष देत आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी करत रहाणे..हीच खरी उत्तम सुरवात आहे..असे स्वतः ला सांगत नवे आयुष्य ..
नवी पालवी फुटून..नवा अनुभव घेण्यासाठी पुन्हा
तो सज्ज झाला आहे..
शुभंभवतू..!





- Subhash Inamdar,
Pune

subhashinamdar@gmail.com
लाईक
टिप्‍पणी
पाठवा