सकाळी साडेनऊची वेळ. आठ ते बारा वर्षांची मुले सिग्नल असूनही न थांबणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी गेले पंधरा दिवस प्रयत्न करत आहेत. सिंहगड रस्त्यावरच्या बिग बझार चौकात हे दृश्य सकाळी आठ ते साडेदहा आणि संध्याकाळी सहा ते आठ या वेळांत दिसते.
याची व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
पुण्यात अनेक ठिकाणी सिग्नल सुरू असतात. पण पोलिसमामा नसल्याने ते सर्रास तोडले जातात. आदित्य नाकोडा, सरिता नगरी, सरिता वैभव या परिसरातल्या काही ज्येष्ठांनी वाहतुकीला शिस्त लावायला सुरवात केली. पुढे काकांना मदत म्हणून लहान मुले, काही दादा पुढे आले.
गेल्या महिनाभरापासून सकाळ-संध्याकाळ सिग्नल पाळण्याचे आवाहन हे वाहतूक रक्षक करीत आहेत. जे नियम तोडतात त्यांच्या गाडीचे क्रमांक घेतले जातात. ते वाहतूक शाखेला दिले जाणार आहेत. त्यांच्यावर रीतसर कारवाई व्हावी अशी, अपेक्षा आहे. या चौकात आठवड्यातून तीन दिवस तरी वाहतूक पोलिस असावा, अशी या परिसरातल्या नागरिकांची अपेक्षा आहे.
स्वयंस्फूर्तीने वाहतुकीला शिस्त लावण्याचा हा उपक्रम वाहनचालकांनी "सिग्नल' पाहून तरी थांबावे असा संदेश देतो. बरेच जण या मुलांच्या शिट्ट्यांना चांगला प्रतिसाद देऊन थांबतात. मात्र काही न जुमानता सटकतात. या चौकात जरी वाहनचालकांनी सिग्नल पाळले तरी आमचा हा वेळ सार्थकी लागेल, असेच या मुलांना वाटते. अशा चौका-चौकांत उभारलेल्या सिग्नलचा मान राखून वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळतील, अशी आशा आहे.
वाहनांची संख्या आणि वाहतूक पोलिसांचे बळ हे प्रमाण व्यस्त आहे. सिंहगड रस्त्यावर दहा सिग्नल आहेत आणि वाहतूक पोलिस आहेत अवघे चार. आपापल्या परिसरातल्या चौकात स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांनी जर असा उपक्रम हाती घेतला, तर नक्कीच वाहतुकीला शिस्त लागेल. वेगावर नियंत्रण येईल आणि अपघात कमी होतील.
No comments:
Post a Comment