संगीत, नृत्य आणि नेपथ्यातून उलगडत गेलेला "संगीत बकरा' हा रंगभूमीवरचा नवा प्रयोग तुमची निर्भेळ करमणूक करतो. हे घडते एका साध्या विषयाभोवती. रिकामटेकड्या कंपूला लॉकरची किल्ली मिळते. किल्लीवरून लॉकरचा शोध घेण्यासाठी केलेली ही दोन तासांची कसरत.
नाटकातला राही भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
लेखक,दिग्दर्शक-निर्मात्यांशी केलेला संवाद ऐका....
मराठी-हिंदी लोकप्रिय गाण्यांचे विडंबन करून त्यातून एकामागोमाग घडत जाणाऱ्या विनोदी प्रसंगांच्या मालिकेतून हा प्रयोग रंगतदार बनतो. रंगमंचावरचे कलावंत केवळ मूकाभिनयातून अणि विदुषकी हालचालींतून घटना घडवतात. प्रेक्षकांना हा अनुभव नवा आहे. त्यामुळे पहिला काही काळ काय घडतेय याचाच शोध घेत प्रेक्षकही थबकतो. प्रसंग जसे सरकत जातात, तसा प्रयोग आपली पकड घट्ट करीत राहतो.
लॉरेल-हार्डीच्या चित्रपटात "ऍक्शन माईम'मधून शब्देविण संवाद घडतात. त्याचा अनुभव घेत घेत आपण हसत राहतो. तसाच काहीसा परिणाम या नाटकाने साधला आहे. इथली पात्रे सर्कससारखा पोशाख आणि कपडे करून गंमत करीत राहतात. कथानकाची सलगता न पाहता तुम्ही घडणाऱ्या घटनेचा अनुभव घेत राहायचा. विदुषकी हावभाव आणि हालचाली करण्याची कथानकाची गरज आहे.
नाटकाची तिसरी घंटा होते तेव्हापासूनच पडद्याआडून होणाऱ्या घोषणेपासूनच "संगीत बकरा'चे वेगळेपण जाणवत राहते. मिलिंद शिंत्रे यांनी हा प्रयोग रचला आहे. याचे लेखन-दिग्दर्शन अणि संगीत रचनाही त्यांच्याच. केवळ अभिनयातून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा धाडसी प्रयोग करून मराठी रंगभूमीवर असा वेगळा प्रयोग करण्याचे ठरविले शेखर लोहोकरे आणि प्रवीण बर्वे यांनी.
संगीताने नाटक फुलत गेले. गमतीदार रचनेतून आनंद दिला. विडंबनातून पुढे निघाले किल्लीला शोधणाऱ्या टोळीचे काम. ओंकार प्रसाद यांनी चालीतील ठेका आणि डौल ठेवून नव्या शब्दांना चपखल स्वरात भिजवून सोडले आहे. नाटकाला रंगत येते ती त्यांच्याच संगीताने.
बाबा पार्सेकरांच्या नेपथ्यात कलावंताना वावरायला पुरेशी जागा तर मिळतेच; पण हालचालीतील गतीला ते बाधकही ठरक नाही. अतुल सिधये यांनी रंगभूषेद्वारे नटाला पात्रांचे सोंग दिले आहे. ऍक्शन सुरू असताना पियूष कुलकर्णीने केलेली सिंथेसायझरवरची साथ ही विशेष नोंदविण्यासारखी बाब आहे. अमित कल्याणकरांची नृत्ये आणि हर्षवर्धन पाठक यांची प्रकाश योजना नाटकाला दिव्य दृष्टी देते.
कलावंतांची फौज इथे आहे. विजय पटवर्धन वगळता अन्य कलावंत नवखे आहेत. तरीही जमलेली भट्टी रसिकांना हसवायला पुरेशी सक्षम आहे.
- सुभाष इनामदार
E-Mail_ subhashinamdar@gmail.com
No comments:
Post a Comment