Saturday, August 2, 2008

वसंतरावांच्या स्वरांचे रसिले स्मरण!

आक्रमक, तडफदार आणि रसिल्या गायकीचे बादशहा असणारे वसंतराव देशपांडे यांच्या आठवणींचे एक दालन त्यांच्याच स्वरांच्या साक्षीने बुधवारी भरत नाट्य मंदीरात उलगडले. सोबत त्यांच्या शिष्यांनी सांगितलेल्या आठवणी आणि त्यांची "याद' जागवणारे स्वरही होते.


व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्‍लिक करा.

वसंतरावांच्या पंचविसाव्या स्मरणदिनी "नादब्रह्म परिवारा'तर्फे वंदना घांगुर्डे यांनी "वसंतराव देशपांडे ः एक स्मरण' हा कार्यक्रम आयोजित केला होता. खुद्द वसंतरावांचे ध्वनिचित्रमुद्रित गायन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. रागसंगीताप्रमाणेच नाट्यसंगीताला वसंतरावांनी आपल्या गायकीतून दिलेले वेगळे रूप, त्यांच्या आवाजातील "रवी मी', "मना तळमळसि' आदींच्या सादरीकरणातून पुनःप्रत्ययास आली.
वसंतरावांचे शिष्य आणि प्रसिद्ध गायक विजय कोपरकर यांनी "सावरे'; तसेच "शतजन्म शोधताना' या रचना सादर करून गुरूंच्या आठवणी जागवल्या.
डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी म्हणाले, ""जबरदस्त साधना आणि अफाट बुद्धिमत्ता असूनही अतिशय साधा आणि नम्र कलाकार म्हणजे वसंतराव! समाजाने त्यांना कर्मठपणाने वागवले, पण वसंतरावांनी त्याविषयी नाराजीचा सूर काढला नाही.''
डॉ. रवींद्र घांगुर्डे यांनी "सावधान होई मनुजा' हे चित्रपटगीत, "बगळ्यांची माळ फुले' हे भावगीत सादर केले. प्रसिद्ध गायिका शैला दातार यांनी "भावबंधन' नाटकातील "सकळ चराचरि या तुझा असे निवास', "दारुणा स्थिती' ही पदे; तसेच "रवी मी', "शूरा मी वंदिले' या नाट्यपदांची झलक ऐकवली. "लावणीतील तान कशी घ्यायची, हे मला त्यांनीच शिकवले. त्यानंतर त्या लावणीला मी प्रत्येक वेळी वन्समोअर घेतला,' अशी आठवण त्यांनी सांगितली.
""वसंतरावांकडे मी बारा वर्षे शिकलो. तालाचा अंदाज कसा घ्यायचा, हे त्यांनी मला शिकवले,'' असे सांगून "तिलककामोद'मधील "सूरसंगत रागविद्या' ही रचना पं. चंद्रकांत लिमये यांनी सादर केली. वसंतरावांच्या कन्या नंदा देशपांडे यांनीही घरेलू आठवणींना उजाळा दिला.


वींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. नाना मुळे (तबला), विश्‍वनाथ कान्हेरे (हार्मोनिअम), गौरी पाध्ये (तानपुरा) यांनी साथ केली. कान्हेरे यांनी "सुरत पिया' हे पद हार्मोनिअमवर पेश केले.

No comments: