Monday, April 19, 2010

फाळकेंच्या 'फॅक्टरी'तील फोलपणा....


भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेव फाळके. त्यांच्या कामगिरीचा आढावा घेणार चित्रपट परेश मोकाळी यांनी मराठी चित्रपटाच्या निर्मितीमधून नेमकेपणाने घेतला आहे. पण त्यातल्या कांही गोष्टी अजून तपशीलाने चित्रपटात यायला हव्या होत्या. याविषयी फाळके यांची नात..सौ. वैजयंती शाम देशपांडे यांनी लिहलेले वाचनात आले. ते तुमच्यापर्यंत सांगावे म्हणून हा प्रपंच......
श्री. मोकाशी यांनी हा चित्रपट काढण्यासाठी, त्या वेळच्या वातावरणनिर्मितीसाठी खूप कष्ट घेतले आहेत हे जाणवते. त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे, परंतु मुख्य पात्र असलेल्या व्यक्तिरेखा दादा व काकी (दादासाहेब फाळके व त्यांच्या पत्नी सरस्वती फाळके) यांचे व्यक्तिमत्व म्हणजे दिसणे/ असणे दाखवण्यात तडजोड व घाई झाली आहे असे खेदाने म्हणावे लागते. कामे चांगली वठवूनही ते व्यक्तिमत्त्व प्रभावी झालेले नाही. (दादा अत्यंत गोरेपान, घारे, देखणे, ठेंगणी मूर्ती, करारी मुद्रा असलेले कोकणस्थी व्यक्तिमत्त्व होते. तशाच साजेशा काकीही होत्या.)

इतर सर्व माहिती, बारीक-सारीक तपशील निर्माता दिग्दर्शक यांनी मेहनतीने गोळा करताना वरील अपेक्षित पात्र योजनेसाठी खास शोध घेण्यास तडजोड केलेली जाणवते. अन्यथा वरील व्यक्तिमत्त्वात थोडे-फार जरी साम्य आढळले असते तर चित्रपटाचा दर्जा नक्कीच वाढला असता. अधिक प्रभावी झाला असता. या निर्मितीचे वेळी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले असेल याची जाणीव आहे, पण तरीसुद्धा ज्या प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वावर आपण सिनेमा काढतो आहोत ती व्यक्ती साधीसुधी नसल्यामुळे तिचा आभास निर्माण करताना वरील बाबींचा गंभीरपणे विचार व्हायला हवा होता.

या चित्रपटाला फक्त विनोदाची झालर लावल्यामुळे दादांच्या यशस्वी पण क्‍लेशकारक प्रवासाचे गांभीर्य लक्षात येत नाही. तसेही दादांनी केलेल्या कार्यावरील जीवनपट दाखवताना श्री. मोकाशींनी बापू वाटवे व गंगाधर महांबरे यांच्या पुस्तकाचा आधार घेतला असे कळते. त्याचबरोबर आमच्या पिढीतील कोणा एकाशी नव्हे तर सर्वांशी संपर्क साधण्याच्या प्रयत्नाने कितीतरी गोष्टी कळून त्याचा त्यांना भरपूर उपयोग करून घेता आला असता.

अजून एका गोष्टीचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो- अनेक कलांमध्ये पारंगत असलेल्या दादासाहेबांचे इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व होते. एवढेच नव्हे तर "ब्रिटिश' धाटणीचे अस्खलित इंग्रजी ते बोलायचे. प्रत्यक्षात सदर सिनेमात विनोदाच्या माध्यमातून त्यांच्यातल्या "मराठी' माणसाची खिल्ली उडवलेली दिसते.

दादासाहेब फाळके यांच्या अखेरच्या प्रवासाविषयी....
अतोनात कष्ट करून यशाच्या, प्रसिद्धीच्या उत्तुंग शिखरावर सर्वार्थाने ऐश्‍वर्य उपभोगल्यावर अचानक बोलपटाच्या आगमनामुळे स्वाभाविकच मूकपटाची जादू संपुष्टात आल्यामुळे विमनस्क मनःस्थिती, मनःस्ताप व उपचाराअभावी वाढलेला मधुमेह त्यामुळे अकाली आलेल्या वृद्धत्वामुळे त्यांचा दुःखद अंत झाला. अतिशय प्रतिभासंपन्न, अनेक कला अवगत असलेले दादा स्वभावाने अतिशय तापट, हट्टी होते. आपलं नाणं खणखणीत असताना कोणाशीही कुठल्याही बाबतीत तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळे बोलपटाच्या व्यवहारी जगात अनेक गुणांचा महासागर असलेल्या परंतु अव्यवहारी दादांना पराभव पत्करावा लागला. तरीसुद्धा जिद्द न सोडता पुन्हा नव्याने काही करावे म्हणून भारत सरकारकडे या व्यवसायासाठी परवाना मागितला परंतु तो नाकारला गेला, (अनेक कष्ट घेऊन लाडाने मुलासमान वाढवलेल्या चित्रपटसृष्टीने "बापाचे' अस्तित्वच नाकारले). भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादांना हा मोठा आघात होता. तो असह्य झाल्यामुळे त्यांचा दारुण शेवट झाला. या कर्मयोग्याला मनःशाती फक्त ते करत असलेल्या अफाट कार्यातूनच मिळत असे. अनेक बाजूंनी दैवाची असलेली साथ संपली तेव्हाच मनःशांतीही ढासळली....! कुटुंबाची वाताहात झाली.

दांदाच्या मुलांपैकी व पुढील पिढीत कोणीही या धंद्यात काहीच कर्तृत्व केले नाही असा आक्षेप केला- घेतला जातो. पण दादा व काही प्रमाणात त्यांचा मोठा मुलगा भालचंद्र या व्यवसायात राहिल्याने त्यांचे सगळे आयुष्य बरबाद झालेले सगळ्यांनी पाहिले होते. वडिलांचे हाल व भावाची परवड बघितल्याने इतर सर्व मुलांनी सिनेमा या विषयावर कायमचा पडदा टाकला. पर्यायाने आम्हा मुलांनाही चित्रपटसृष्टीपासून अनेक योजने दूर ठेवले गेले होते. दांदांनी हे अफाट कार्य करताना सर्वस्व पणाला लावले. प्रसंगी पत्नी (सरस्वती ऊर्फ काकी फाळके, जिने खांद्याला खांदा लावून यांना अनमोल साथ दिली.) आणि मुले यांच्या सुखाची आहुती दिली; अशा त्यांच्या जीवनपटावर सखोल अभ्यास करून चित्रनिर्मिती व्हायला हवी होती. दादा आणि काकी यांच्याबद्दल आमच्या मनात अत्यंत आदर, ओतप्रत प्रेम आहे आम्ही त्यांची नातवडे आहोत याबद्दल आम्हाला अभिमान आहे.

अजून दोन वर्षांनी चित्रपटसृष्टीचे शतक पूर्ण होईल पण ज्या माऊलीने आपल्या सुखाचे पाणी करून हे बीज जोपासले तिची आठवण किती जणांना असेल? त्या दोघांचे कर्तृत्व आणि त्याद, यावर जोपासलेल्या या चंदेरी दुनियेने हे कधीही विसरू नये.


No comments: