Wednesday, March 9, 2011

जगण्याचं आत्मभान

------------------------------------

अनेक गोष्टींचं वाईट वाटतं….एखादा असा का वागला?…..दुसरा असा का वागला नाही?…..हे मिळालं नाही…ते असच का मिळालं?…सर्वत्र सांसर्गिक असमाधान!!…दुसर्‍याच्या वागणुकिने द्विगुणित झालेलं…

पण काही सल असे काही असे जन्माला येतात…जे फ़क्त स्वत:लाच छळतात….पुन्हा पुन्हा मनाच्या दारावर थाप देत रहातात…आणि आत आत खोल एक “अपराधीपणा” लपून कोडगा झालेला असतो त्याला साद घालत रहातात….

ज्या ज्या वेळी मी भल्या मोठ्या मॉल मधे किंवा मार्केट मधे यथेच्छ खरेदी करुन निघते आणि गाडी सिग्नल पाशी येउन थांबते…तेव्हाच हा सल असा जागृत होतो..रस्त्यावरच्या भिकार्‍यांच्या पोरांच्या रुपाने!!….त्यांचे भुकेले चेहेरे….फाटके कपडे…हाताताली लाल फुलं विकायची धड्पड अतिशय अस्वस्थ करून सोडते…एक कळ उमटते आतमधे….मी त्यांच्या या अवस्थेला कारणीभूत नसते…आणि मी परिस्थिती बदलू ही शकणार नसते…मग हा सल नक्की कसला?…गरज नसताना भरमसाठ खरेदी केल्याचा?…की कितिही वस्तू आणा….काहीतरी राहिलचं..असं दामटून मनाला सांगणार्‍या असमाधानाचा?…नक्की त्या क्षणी काहीही कळत नाही….पण खोलवर कुठेतरी मन ओरड्तच…अरे, हे काय चाललय?….सगळं आहे…गाडी आहे,पैसा आहे,घर आहे,ए.सी आहे,..भौतिक सगळ्या सुखसोयी आहेत….या पलीकडे मी खरचं विचार करते का?

…..माझी कामवाली बाई रोज १० घरी कामं करते..जी घरं ५-६ खोल्यांची आहे…तरीही ती आनंदात असते…संध्याकाळी छान जमेल तसा मेकप करून आवरून परत भांड्यांसाठी येऊन जाते…तिचं समाधान मला कधितरी मिळेल का?….तिची कामातली नियमितता तरी माझ्यांत आहे का?

इथे एक मुलगा विद्यार्थी आहे….जो दोन पायांवर उभाच राहू शकत नाही…प्राण्यांसारखं त्याला दोन हात आणि पाय वापरून सर्व शरीर वाकवून चालावं लागत..दोन पायांत आणि दोन हातांत चपला घालून….तो ज्या झपाट्यानं शिकताना,चालताना दिसतो….स्वत:ची अक्षरश: लाज वाटते….कसा आला असेल तो इथपर्यंत…किती झटला असेल..आणि अशी अनेक अनेक उदाहरणं….मग आपण केवढा वेळ नको त्या विषयांवर वाया घालवतो याची बोच सतत पाठलग करते….आणि तो तिथे व्यवस्थित लेक्चर्स,ए़क्झाम्स देत असतो…जिद्दिनं!!

असे अनेक सल घेऊन जगताना…नुसतच काव्यमय लेखन करणही कधी कधी बोचतं….रिऍलिटी नावाची गोष्ट खरचं माझ्या वयाच्या सुखवस्तू पिढिला कधी खरचं कळते का?…..मुलांची ऍड्मिशन, अभ्यासाची काळजी, बॅंक बॅलन्स,घराचे लोन चे हफ़्ते ह्यालाच फ़क्त रिऍलिटी समजणारे आम्ही त्या पलिकडच्या सुन्न करून टाकणार्‍या एका क्रुएल जगासाठी कधी वेळ काढू शकतो का?….मिळमिळीत शब्दांचे चार शाब्दिक फवारे मारून भरल्या पोटी ”कसं झालं पाहिजे या जगात” हे बोलणारे स्वत: त्या दलदलीत उतरू शकतात का?..मी उतरू शकते का?…खूप प्रश्न आहेत…अनेक सल आहेत…एकटी असतानाचे मनाचे असंख्य कंगोरे मलाच चकित करणारे आहेत..सर्व संवेदना बोथट होत नाहीयेत ना अशी भिती वाटते कधी….आपलं व्यवस्थित चालू आहे ना मग बस्स!…हा विचार जिथे तिथे दिसतो आणि आतला सद्सदविवेकबुद्धी चा सल मनाला कुरतडत राहतो..”नुसतं लिहून कशाला शब्दांचे खेळ मांडायचे?” असं म्हणणारे खूप सापड्तील….पण हा सर्व उहापोहच अतिशय व्यक्तिसापेक्ष आहे.

त्या सर्वांसकट जगण्याचं आत्मभान आणि स्व विसरून समाधानाने आला क्षण जगता यावा एवढा प्रयत्न घडला तरी सध्या पुरे…..

सुचेता
Sucheta Joshi Abhyankar
http://blogs.bigadda.com/suc4061538/2010/08/02/%E0%A4%B8%E0%A4%B2/

------------------------------
जे भावते ते लिहिले ....माला वाटते इथे ..केवल मलाच व्यक्त करण्या शिवाय जे कही चांगले लेखन वाचनात आले तर तेहि तुम्हाला सांगावे ... सुचेता जोशी-अभ्यंकर यांचा ब्लॉग वचनात आला...हा त्यापैकीच एक
ते लेखिकेच्या संमतीने तुमच्यापर्यंत पोचवित आहे..
सुभाष इनामदार,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: