Sunday, March 6, 2011
भावनांशी प्रामाणिक राहून सादर केलेला नवा काव्य-संगीताविष्कार...अमलताश..
हे निमित्त आहे ते कांही वर्षापूर्वी पुण्यात भावसंगीताच्या क्षेत्रात गाजत असलेल्या सुचेता आणि प्राजक्ता जोशी या दोन सुरेल गायिकेंच्या पुर्नप्रवासाचे... एक संसारानंतर पुन्हा व्यासपीठावर गातेय..त्याच भावूकतेने...हळूवार संवेदनाक्षम सूरात...तर दुसरी सुचेता पुणे सोडून बाहेर पडली..मुंबई नंतर दिल्लीत स्थिरावली.. फिरोदिया करंडकाच्या स्पर्धसाठी तात्काळ रचना करून ह्षीकेश रानडेला गायनाचे प्राईझ देणारी..आणि आता तीच सुचेता आता पुण्यात साकारत होती स्वतः लिहलेल्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या समारंभात...आणि तीने संगीत दिलेल्या गाण्यांनाही पुण्यात या निमित्ताने चालीला दाद दिली..पुणेकरांनी आणि संगीत क्षेत्रातल्या मान्य़वरांनी..म्हणून तीच्या कार्यक्रमाची ही दखल..
सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276
www.culturalpune.blogspot.com
------------------------------------------
अभिजात..आश्वासक..अमलताश !
शिशिर प्राक्तन घेऊन बनती
आयुष्याची वळणे दुर्गम,
अशाच वेळी सतेज कांती
घेऊन येतो हा वृक्षोत्तम
देखुन त्याची रूपझळाळी
भविष्यात रे पहा..
सदेव नूतन वेष लपेटी
अमलताश हा पहा !
दुःख, वेदना, निराशा असा नकारत्मक दैवभोगांवर मात करत भविष्याकडे पाहण्याचा आशावादी दृष्टीकोन सूचित करणारा ` अमलताश... ` एक दुर्मीळ वृक्ष .. अभिव्यक्त झाला अमलताश या कविता-संग्रहातून आणि काव्यप्रेमी पुणेकर रसिकांना एका अभिजीत काव्यनिर्मितीची आश्वासक चाहुल या निमित्ताने लागली.. काव्य आणि संगीत या दोन्ही दृष्टीने एक आगळा कार्यक्रम ऐकण्याची संधी लाभली.
सुचेता जोशी-अभ्यंकर या नवोदित कवयित्रीच्या अमलताश या पहिल्या काविता संग्रहाचे प्रकाशन २ मार्चला पुण्यात कविवर्य सुधीर मोघे यांचे हस्ते झाले..आणि कवितांवर आधारित सात गीतांचाही कार्यक्रम रंगला आणि थेट पोचला रसिकांच्या ह्दयात.
मूळचा गोड गळा आणि त्यावर झालेले अभिजात संगीताचे संस्कार यातून सुचेता जोशी प्रथमतः एक गुणी गायिका म्हणून रसिकांना भावली. अमृताची गोडी, मी निरांजनातील वात..अशा अनेक रंगमंचीय आविष्कारातून. त्यानंतर विवाहानंतर सुमारे आठ वर्षांच्या कालखंडात संगीताशी जुळलेले हे नाते कसोशिने जपताना . तसेच मुंबई, दिल्लीत वास्तव्य असताना कविमनाच्या सुचेताला एक अनामिक अस्वस्थता बेचैन करून गेली. याच भावविश्वात ती कवितेच्या रूपाने व्यक्त होत गेली. आणि अखेर साकार झाला पुस्तकस्वरूपातला उत्तम आविष्कार स्वानंद प्रकाशनाने साकारले पुस्तकरूपी ` अमलताश`.
`तरीही वसंत फुलतो` अशा आशावादी शब्दातून व्यक्त होणारे कवी सुधीर मोघे यांनी आपल्या प्रस्तावनेत सुचेता बद्दल लिहितात `..वाट्याला आलेलं आयुष्य..त्यातील सगळ्या चढ-उतारासकट जगत राहिली..स्वतःच्या मनाच्या आंदोलनांना धीटपणे सामोरी जात राहिली.. आणि मग आपसुकच कवियत्री झाली.... स्वतःची कवितांची वही घेऊन इतक्या वर्षांनंतर भेटायला आली. ,,तेव्हा मी नवलाईने आणि कौतुकाने न्याहळत राहिलो. अरे ही तर तिच. आपण बारा-तेरा वर्षापूर्वी पाहिलेली..ऐकलेली गुडिया...आज हलके फुलके परिपक्व होत चाललेल्या एका नव्या रूपात आपल्यासमोर बसली आहे... ही गात रहाणार. .ही लिहित राहणार...` आपल्या मनोगतातून त्यांचं भारावलेपण अक्षरशः अनेक वेळा व्यक्त झाले आहे.
कार्यक्रमातही सुधीर मोघे हे न रहावता शेवटच्या गाण्याच्या सादरीकरणाच्या आधी रंगमंचावर आले..आणि सुचेता मध्ये केवळ आश्वासक नव्हे तर संजीवनी मराठे, पद्मा गोळे आणि इंदिरा संत काव्याची परंपरा आसल्याची भावना व्यक्त करून तिच्या भावी आयुष्य़ाला आशिर्वाद देऊन गेले. इतकेच नव्हे..तर तिने असेच लिहित रहावेच पण असे संगीताविष्कार आपल्या कवितांचा सादर करण्याची वाट स्विकारण्याची विनंती केली...हा कार्यक्रम ही त्याची सुरवात आहे.....
सुचेता जोशी-अभ्यंकर हिने आपल्या मनोगतातून बोलताना संगीताला प्रथम प्राधान्य होते.. तरीही नकळत अनेक विषयांचे पडसाद शब्दातून उमटत राहिले. कधी भावनांचा कोंडमारा म्हणून तर कधी भावनांचा विस्फोट म्हणून . असा निर्मितीमधल्या प्रेरणा स्त्रोतांचा धावता आढावा घेतला.
जोशी कुटुंबीयांचे जवळचे स्नेही संजय पंडित यांनी सुचेता जोशी यांच्या संवेदनाशिल व्यक्तित्वाचा उल्लेख करून त्यांचे संजीवनी मराठे या ज्येष्ठ कवयित्रीशी असणारे साम्यही नमूद केले.
उत्तरार्धात या काव्यसंग्रहातील निवडक सात कविता प्राजक्ता रानडे ( सुचेताची बहीण ) , ह्षीकेश रानडे, अपर्णा केळकर आणि स्वतः सुचेता जोशी यांनी आपल्या स्वराविष्कारातून सादर केल्या. या सर्व संगीतरचना सुचेता जोशी यांच्या होत्या. त्याला संगीत संयोजन लाभले होते ते केदार परांजपे यांचे.. तेवढेच समर्पक.
कौतुकाने जमलेली पुणेकर रसिकमंडळी नकळत या सुंदर, मोहक आणि अभिजात आविष्कारात रंगून गेली होती. घरी जाताना एक काव्य-संगीताना आश्वस्त करणारा कार्यक्रम दिल्याबद्दल सुचेताचे आभिनंदन करीत पुन्हा असा कार्यक्रम कर..आणि आम्ही नक्की तिकीट काढून येऊ असा आश्वासक आशीर्वाद देउन परतली.
ब-याच कालावधीनंतर काहीतरी शुभ्र, नवे, टवटवीत आणि अभिजीत असे उगवू पहात आहे. त्याची जाणीव ठेऊन दिल्लीवरून सुचेताने येऊन वारंवार आपल्या कवीतांचा संगतमय आविष्कार करावा यासाठी हट्ट करून बसणार आहेत.
घोर काननी गर्द त्या वनी
शीळ घालीत मंजूळ वारा
स्तब्ध तरूंवर हळूच चढतो
गूढ अनामिक एक शहारा
गवसत नाही गरी मला तो
मोह बावरा चित्र देखणे
कधी बहरतो कधी आकसतो
चंद्र मनीचा कलेकलेने....
अशा कलेकलेने फुलत जाणा-या काव्यप्रवासाला आमच्या रसिकांच्या खूप खूप शुभेच्छा.
आणि त्याची गीतेही ऐकण्याची संधी मिळावी हिच इच्छा.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment