Tuesday, June 7, 2011

करुणा देव ---आनंदी झरा





आता पुण्याचा सकाळ करुणा एक लेख आपल्या संपादकीय पानावर बुधवारी प्रकाशित केला आहे तोही इथे देत आहे .

करुणेचा आवाज

हिंदीच्या वर्तुळात अमीन सयानींना जे स्थान आहे, तेच मराठी कानसेनांच्या दुनियेत नीलम प्रभूंना होते म्हटले तर ते अयोग्य ठरणार नाही. हातातला रिमोट चॅनेलची मोहमयी दुनिया दिवाणखान्यात हजर करत नव्हता तेव्हा घराघरांत ऐकला जायचा तो रेडिओ. दृश्‍याची जोड नसताना केवळ आवाजाच्या माध्यमातून श्रोत्यांना नादावून ठेवणे महाकठीण. ही किमया नीलम प्रभूंना म्हणजेच करुणा देवांना भलतीच साधली होती.

घराघरांत भल्या पहाटे आकाशवाणीवरचे सूर दिवसाची सुरवात करायचे. नीलमताईंचा मधाळ आवाज या घरगुतीपणाचीच ओळख द्यायचा. रविवारी सकाळी एका जोडप्याच्या टेकाडेभावजींशी रंगणाऱ्या गप्पा त्या काळी रेडिओवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम होता. बाळ कुरतडकर, प्रभाकर जोशी यांच्यासमवेत नीलमताई त्यात कुटुंबवत्सल, वेंधळ्या मध्यमवर्गीय मराठी महिलेचे संवाद अशा काही खुबीने फेकायच्या की त्या जणू शेजारच्याच घरी राहणाऱ्या वहिनी वाटायच्या. पुलंच्या "वाऱ्यावरची वरात'मध्ये ताई सहजसुंदर अभिनय करीत काही दिवस वावरल्या. रेडिओच्या नोकरीतच बाईंची कलंदर कलाकार बबन प्रभूंशी गाठ पडली. प्रेमाच्या तारा झंकारल्या आणि आवाजाच्या दुनियेची ही अनभिषिक्‍त राणी उंबरठा ओलांडून नव्या घरी प्रवेशली. बबन प्रभूही रंगभूमीवर "पळा पळा कोण पुढे पळे तो'सारखी विनोदी नाटके लिहीत स्वत:ची छाप उमटवत होते. नीलमताईंनी स्वतःच्या "प्रपंचा'तील वेदनांचा कधी उच्चारही केला नाही, असे त्यांचे सहकारी सांगतात. बबन प्रभूंच्या अकाली निधनानंतर नीलमताई एकट्या झाल्या. संगीतकार यशवंत देवांची सहचारिणीही संसार असाच अर्ध्यावर टाकून निघून गेली होती. दोन समदु:खी जीव एकत्र आले. दोन कलाकारांची ही अर्धांगिनी सहजीवनात वेणूत नाद सामावून जावा तशी मिसळून गेली. नीलमताई त्यामुळेच देवांच्या घरात जाताना करुणा झाल्या. मात्र दोन वेगळ्या कलंदरांशी संसार करताना नीलमताईंनी स्वत्व उत्तमरीत्या टिकवले होते.

प्रसिद्ध नाटककार पुरुषोत्तम दारव्हेकरांनी तीन पिढ्यातला संघर्ष दाखवणारी श्रुतिका नभोवाणीसाठी लिहिली आणि त्यात नीलमताईंचाच आवाज तिन्ही भूमिकांसाठी वापरला. पिढीप्रमाणे आवाज बदलणारी आवर्तने घेत नीलमताईंनी वठवलेल्या त्या भूमिका म्हणजे मराठी आकाशवाणीच्या इतिहासातला बहुमोल ऐवज आहेत. आवाजाचे शास्त्र हे तसे आपल्याकडचे दुर्लक्षित प्रकरण. फार फार तर शास्त्रीय गायक ही साधना करत असावेत. मात्र मोरपंखी आवाजाच्या धनी नीलमताईंनी त्याचा कुठेही बडेजाव केला नाही. शालीनता, मार्दव, वात्सल्य हे भारतीय स्त्रीचे सारे गुण त्यांच्या आवाजातून अभिव्यक्‍त होत असत. किंबहुना करुणा, नादमयता, अनाग्रह ही त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्येच त्यांच्या आवाजात उतरली होती.

-मृणालिनी नानिवडेकर
http://www.esakal.com/esakal/20110608/5172912869889917379.htm

------------------------------------------


करुणा देव गेल्याचे वाचले आणि बबन प्रभु गेल्याचा काळ डोळ्यासमोर आला ..
पुण्यात राज्य नाट्य स्पर्धेला त्या परिक्षंक म्हणून आल्या होत्या ..
नुकतच एक दुख्ख दूर होत होते.
तो त्यांचा सहवास आजही ....मनात येतो ...
त्यांच्या तसा सहवास नाही मिळाला..पण प्रेम लाभले ...
यानिमित्ताने .....महाराष्ट्र times मधील नोंद ...देत आहे ...

यशवंताच्या घरी करुणा झाली
काही वर्षे राहिली ..
सुखी झाली
आमच्या मनात त्यांचे कायम वास्तव्य आहे
------------------------------------

आकाशवाणीच्या मुंबई ब केंदाने एकेकाळी मराठी माणसांचे भावविश्व व्यापले होते. कामगार सभा, गंमत जंमत, आपली आवड, श्रुतिका ह्यांच्या वेळांवर माणसे आपली घड्याळे लावत. घरात बायका काम करीत असल्या तरी त्यांचे कान रेडिओकडे लागलेले असत.

चाकरमानी माणसे रात्री झोपताना अर्ध्या तासाच्या श्रुतिका कधी चुकवत नसत. या माध्यमाने दिलेल्या दजेर्दार कार्यक्रमांमुळे काही नावे सर्वसामान्यांच्या मनावर कोरली गेली होती. त्यातलेच एक नाव होते करुणा देव यांचे. आकाशवाणीतून निवृत्त होऊन त्यांना अनेक वर्ष झाली तरी त्यांचा आवाज कानात साठवून ठेवलेली असंख्य माणसे आजही आहेत.

'पुन्हा प्रपंच' ह्या चालू घडामोडींवर हसत खेळत टिप्पणी करणाऱ्या कौटुंबिक नभोनाट्याने तर त्यांना पस्तीस वर्षांपूवीर् अमाप लोकप्रियता मिळवून दिली होती. यातील प्रभाकरपंत, मीना वहिनी आणि टेकाडे भावोजी ह्या व्यक्तिरेखा प्रभाकर जोशी, करुणा देव म्हणजे तेव्हाच्या नीलम प्रभू आणि बाळ कुरतडकर ह्यांच्या आवाजातून घराघरात पोहोचल्या होत्या. यातील वेंधळ्या, बडबड्या, चिकित्सक मीना वहिनीत प्रत्येक मध्यमवगीर्य मराठी गृहिणी आपले रूप पाही.

करुणा देव यांच्या आवाजात एक वेगळाच तजेला होता. तो मधुर तर होताच पण नितळ आणि निरागसही होता. अनेक श्रीतिकांमधून त्यांचा आवाज लगेच ओळखू येई, पण त्या आपल्या आवाजातून आपल्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेला असा काही चेहरा प्राप्त करून देत की श्रीत्यांच्या मनोमंचावर ती जिवंत होऊन जाई.

त्या निवृत्त झाल्यानंतरच्या काळात पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी 'नाट्यदर्पण' रजनीच्या कार्यक्रमात नभोनाट्याचे प्रात्यक्षिक घडवले, तेव्हा त्यातील लहान मुलाची भूमिका वठवताना करुणा देव यांनी आवाजाचा इतका प्रभावी व प्रत्ययकारक वापर केला की श्रीत्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. वडील हिरामण देसाई हे नाट्यदिग्दर्शक. त्यामुळे नाट्यकलेच्या वातावरणातच त्यांची वाढ झाली. पुलंच्या 'वाऱ्यावरची वरात'मधील 'रविवारची सकाळ' या भागातील त्यांची भूमिका छान रंगे. त्यांच्या आवाजाप्रमाणेच त्यांचा स्वभावही नितळ व प्रसन्न होता. या स्वभावामुळेच त्यांनी इतरांच्या आयुष्यातही आनंद निर्माण केला.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8755000.cms
http://www.youtube.com/watch?v=_U6WXkTsX7Q&feature=related

घराचा स्वर!

प्रवीण दवणे
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=164435:2011-06-17-07-52-07&catid=194:2009-08-14-02-31-30&Itemid=194

No comments: