Sunday, December 25, 2011

जन्म अपुरा पडावा यापुढे...




जन्म अपुरा पडावा यापुढे...
माझ्या कुशीत विसावलीस तेव्हा
आकाशही ठेंगणे भासले
उरात धडधड, मनात समाधान
सहज सुलभ भावनांचा तो आवेग
अथांग सागराच्या लाटेला
कधी आवर घालता येतो ?

चेह-यातून तुझा भाव ओसंडत होता
एकरूपतेचे सारे निकष धुळीत मिळवत
सारा एकांताचा प्रवास माझ्या कुशीतून
भरधाव वेगाने धावत होता

देहाचे बंधन झुगारुन
समाधानाने डोळे बोलत होते
अबोल प्रित भासमय वाटत होती
याक्षणांसाठी सारे आयुष्य
प्रत्येकजणच वेचत असेल काय़?
माझीही अवस्था कांहीशी तशीच असेल काय ?

सारा प्रत्यय शरीरीतून स्पर्शत होता
आवेगाच्या मिठीतून सुटण्याची धडपड
मीही आता भारावलेपण जपत
अनुभवत, एकांताची पोकळी
भरुन आसमंतातून
तुझ्याकडे एकाग्रतेने ते पहात
सुखाचे ते क्षण वेचत होतो

आयुष्यातले ते क्षण
आसंडून वाहत होते
प्रेमाच्या वाटेत बसून
स्वर्गसुखाचा वर्षाव झेलत होते

भेटायची यापूर्वीही मला
पण ही ओढ आगळी होती
श्र्वासात गुंतूनही
कणन् कण भारावून सोडत होती

असेच एकत्र येउ या
एकांताची ही ओंजळ
तृप्त मनाने पिऊया
जगाचा विसर संपवून
स्वतःसाठी जगूया
शरीरी शिरशिरी सखये
पिऊन मस्त झिंगूया

मदन, मेनकेची जोडी
आज इथे दिसते आहे
तीव्र भावनेला
उरी तुझ्या कवटाळते आहे

बंध ना तुटावे कधीही
ना विरह व्हावा यापुढे
तुझ्या मिठीत विरघळण्यासाठी
जन्म अपुरा पडावा यापुढे


सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: