Thursday, January 5, 2017

माणसांची श्रीमंती असणारी..गोडबोले आळी...


दापोलीतुन हर्णै रोड वरून जाताना डाव्या बाजूलागोडबोले आळीकडेअस लिहिलेला एक लहानसा बोर्ड तुम्हाला दिसेल.. साधारण ३०-३५ कुटुंब ह्या आळीत सामावलेली आहेत.. काही पिढ्यानपिढ्या इथेच राहतात.. काही बाहेरच्या गावातून व्यवसाय-नोकरी निमित्त इथे आले आणि इथलेच रहिवासी झाले.. सर्व आमचीच वस्ती आहे.. काही मुंबई-पुण्यात रहात असले तरीहि ते गोडबोले आळीतलेच आहेत आणि बाहेरच्या लोकांना ३०-३५ कुटुंब दिसत असली तरी आम्ही एकाच कुटुंबात राहतो.. आमच्यासाठी आम्ही सगळे फक्तगोडबोले आळीकरआहोत आणि ह्या सगळ्या कुटुंबाना एकत्र बांधून ठेवणारी गोष्ट म्हणजे आमचगणपतीच देऊळ’.. हा हा!

किती सहज म्हणून गेले मी कि आमच देऊळ.! खरतर ह्या देऊळाचे खरे मालक गोडबोलेच.. पण आम्ही मालक आहोत किंवा आमच्या देऊळात अस करा अस करू नका अस सांगत अधिकार गाजवण वगैरे त्यांनी कधी केलच नाही. त्यामुळेत्याचंदेऊळआमचकधी झाल हे कळलच नाही..! साधारण २५० वार्षांपुर्वी ह्या देउळाची स्थापना झालेली आहे..



- वर्षांपूर्वीच देऊळ नवीन बांधण्यात आल.. गणपतीची मूर्ती संगमरवराची असून, उजव्या सोंडेचा गणपती आहे.. गणपतीच्या देऊळाला लागुनच हनुमानाचे मंदिर आहे.. माघ महिन्यातगणेश जयंतीलादेऊळात उत्सव साजरा करतो.. 


साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरु होणाऱ्या नाटकाच्या तालमे पासून उत्सवाच्या तयारीला सुरवात होते.. सुरवातीचे काही दिवस नाटक कोणत करायचं हे ठरवण्यात जातात.. एकदा नाटक ठरलं कि नाटकातील पात्रांची निवड.. आणि मग नाटकाच वाचन वगैरे सुरु होऊन हळू हळू नाटक उभ राहत.. सगळे आळीतलेच हौशी कलाकार.. पण उत्सवी नाटक म्हणून काहीतरी सादर करायच अस कधीच कोणी केलेलं नाही.. दिवसभर आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून रात्री च्या ठोक्याला सगळे देऊळाशी तालमेसाठी हजर होतात आणि तन,मन,धन, अर्पून काम करतात.. प्रोफेशनल कलाकारांना लाजवतील असे एकसो एक नाटकांचे प्रयोग आळीतल्या कलाकारांनी सादर केले आहेत.. जस आळीतल्या मोठ्या लोकांच नाटक उत्सवात सादर होत तसच लहान मुलांचं नाटक, नृत्य, गाण्याचे कार्यक्रम देखील तितक्याच हौशीने सादर होतात.. 

जशी नाटकाची तयारी जोरदार सुरु असते तसच एकीकडे देऊळ देऊळाच्या परिसराची साफसफाई सुरु होते.. उत्सव पाच दिवसांवर येऊन ठेपला कि देऊळाच्या सजावटीला सुरुवात होते.. छत बांधणे, देव सजवणे, रंगीबेरंगी लाईटच्या माळा लावणे, रांगोळ्या काढणे स्टेजवर नाटकाचा सेट उभारणे तसच प्रत्येक घरी उत्सवात पाहुणी येतात त्यामुळे घराची साफसफाई पण सुरवात होते.. मी मगाशी म्हणाले त्या प्रमाणे आळी एक कुटुंब आहे त्यामुळे आम्ही स्वतःच्या घरात ज्या हक्काने वावरतो तितक्याच हक्काने आळीतील सगळ्या घरातून फिरत असतो.. उत्सवात सगळ्या घरातून सगळे येऊन-जाऊन असतात त्यामुळे प्रत्येकाच्या घरातून विविध पदार्थांचे वास येत असतात.. चिवडा,लाडू, वड्या असे विविध पदार्थ घरोघरी बनवले जातात.. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे साखर,चहापुड आणि दुध घरात मुबलक प्रमाणात आहे कि नाही हे बघणे.. एकवेळ चिवडा वगैरे नसला तरी चालेल पण चहा हवाच!!


चहाहा गोडबोले आळीकरांसाठीअमृतआहे. कोणत्याही प्रहरी, कितीही वेळा चहा पिऊ शकतो आणि ठिकाण? चहा प्यावा अस मनात येताच समोर जे घर दिसेल त्या घरी चहा प्यायला जायचं.. आळीत फिरायला वेळेच बंधन नाही. दुपारचे १२ असुदेत किंवा रात्रीचे वाजुदेत तितक्याच हक्काने आम्ही एकमेकांच्या घरात वावरतो.. आणि हो अत्यंत महत्वाचा मुद्दाआम्हीम्हणजे फक्त आम्ही मुली मैत्रिणीकडे जातो अस नसत.. आमच्या आळीतलेमुलगेआणि मुली आम्ही एकत्र असतो.. आम्ही रात्रभर देऊळाशी गप्पा मारत बसतो.. सर्व मुलींच्या आई-बाबांना खात्री असते कि माझी मुलगी देऊळाशी ह्या मुलग्यांच्या बरोबर आहे म्हणजे ती सुरक्षित आहे. आणि पहाटेचे वाजले तरीही माझ्या मुलीला व्यवस्थित घरी सोडल्या शिवाय आळीतला एकही मुलगा घरी जाणार नाही हा विश्वास पालकांना असतो... 

कस असत बघा ना एखादी वाईट गोष्ट पटकन समोर येते आणि त्यावर चर्चा होते.. आणि चांगुलपणावर अलगद पडदा टाकला जातो.. पण मी अभिमानाने सांगेन कि आळीतला माझ्या बरोबरीचा मुलगा असुदे किंवा कोणी काका असुदेत कोणाहीबरोबर असलो तरी आम्ही मुली सुरक्षित आहोत.. सध्याच्या काळात स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारांमुळे समाजातील प्रत्येक पुरुषाकडे एकाच चौकटीतून पाहिलं जातंय.. ती चौकट मोडण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी हा मुद्दा इथे मांडला. असो! पुन्हा आपण उत्सवाकडे वळुयात.. 


बघता बघता उत्सवाचा पहिला दिवस उजाडतो.. देऊळामध्ये सनई-चौघडा वाजतो आणि खऱ्या अर्थी उत्सव सुरु होतो.. उत्सवातील लहान मुलांपासून सर्व आजी-आजोबां पर्यंत सगळ्यांचा आवडीचा कार्यक्रम म्हणजे रात्री देऊळात होणारीआरती”.... टाळ, तबला घेऊन विविध आरत्या देऊळात म्हंटल्या जातात.. ज्यांना सगळ्या आरत्या व्यवस्थित पाठ आहेत ते माईक समोर उभे राहतात.. आरतीच्या ओळी गुणगुणल्या सारखे म्हणार्यांचा आवाजजय देव जय देवम्हणताना वरच्यासापर्यंत पोहोचतो.. आरती नंतर मोरया हो बप्पा मोरया हो अस म्हणत सभामंडपामध्ये फेर धरला जातो.. ते १० वाजेपर्यंत आरती झाल्यावर १० वाजता कीर्तनाला सुरवात होते.. मग सगळे वर्षभर ज्या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतो तो दिवस उजाडतोगणेश जयंतीम्हणजेच जन्माचा दिवस..

सकाळी १० वाजता कीर्तन उभ रहात.. सर्व गणेशभक्त देऊळाच्या सभामंडपात जमलेले असतात.. देऊळाच्या बाजूच्या घरी भालदार-चोपदार यांना तयार करायला सुरवात होते.. भालदार-चोपदार म्हणजे आमच्याच इथली लहान मुल असतात.. त्यांचा मेकअप, फेटा बांधणे वगैरे तयारी जोरदार सुरु असते.. जन्माची वेळ जवळ येताच. “दौलत जादा मेहरबान नजर रखो महाराजअस ओरडत भालदार-चोपदाराना मानाने देऊळा पर्यंत आणल जात.. त्यांनतर भालदार-चोपदारदोहेम्हणतात. मग नटून आलेल्या इटुकल्याशा मुली एका रांगेत पाळणा ओढायला उभ्या राहतात.. पाळणा म्हंटला जातो.. जन्म होताच पाळण्यावर फुल उधळली जातात .. फटाक्यांची माळ लावली जाते आणि अतिशय जल्लोषात गणेश जन्म पार पडतो..








जन्मा इतकाच महत्वाचा प्रोग्राम म्हणजेजेवणावळ’.. जिलबी हे पक्वान्न असत.. जेवणावळीला सर्व मुलगे कमीत कमी २५/३० जिलब्या खातातच.. जास्तीत जास्त किती हे सांगू शकत नाही.. एक मेकांना जिलब्यांचा आग्रह करत जेवणावळ पार पडते.. मग रात्री नाटक सादर होत.. आणि नाटकानंतरलळीताचकीर्तन होऊन उत्सवाची सांगता होते.. पुढचा उत्सव लवकर येउदे अस म्हणत सर्वजण आपापल्या कामाला लागतात..

 
अशी ही सुंदर उत्सवाची परंपरा असलेली आमची आळी.. आळी बद्दलच्या आठवणी इतक्या आहेत कि त्या एका लेखात लिहीण अशक्यच होत. पण तरी सगळ्या आठवणी एकत्र बांधायचा मी प्रयत्न केला..

सुखी राहण्यासाठी काय गरजेच असत? पैसे? धान्य? नाही.. पैसे आणि धान्य आपण केव्हाही कमवू शकतो.. पण माणसांची श्रीमंती ही नशिबातच असावी लागते अस मला वाटत.. धन-धान्या बरोबरच आमची आळी माणसांनी श्रीमंत आहे. म्हणून आम्ही सगळे सुखी आहोत.. 

सुखात हक्काने चहा प्यायला येणारे आणि दुःखात आपल्या पाठीशी उभी राहणारी सोन्यासारखी माणस मला देवाच्या कृपेने मिळाली त्या बद्दल मी मनापासून देवाची आभारी आहे.. 




-
अदिती वैशंपायन ,
दापोली (कोकण)



1 comment:

अमोल केळकर said...

गणपतीची सुरेख मूर्ती
मोरया