प्रसिद्ध नाटककार कै . पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे विक्रमी नाटक कट्यार काळजात घुसली! मास्तरांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केेलेल्या ह्या नाटकाच्या पहिल्या, शुभारंभाच्या प्रयोगाला गेल्या २४ डिसेंबरला ५० वर्षे पूर्ण झालीत. गेल्या तीन पिढ्यांना आकर्षित करणारे हे नाटक सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.
मास्तरांच्या ह्या नाटकाने वैदर्भीय रंगभूमीची शान उंचावली. त्यानिमित्त हा आठवणींचा मागोवा.
कट्यार हे थोडंसं आत्मचरित्रात्मक नाटक आहे आणि त्यात, मी जो आहे तो, कविराज बांकेबिहारीच्या स्वरूपात आहे. माझी स्वतःची एक वेदना आहे की, जे गळ्यातून निघत नाही; ते डोक्यातून काढावं लागतं. मग मला म्हणावं लागतं की, हा माझा शास्त्राचा एक हात तयार आहे. कलेचा हात तुम्ही द्या म्हणजे माझा नमस्कार तयार होईल. लहानपणी गाणं शिकायची अतिशय इच्छा होती. त्यावेळी दीड रुपया फी होती. नागपुरातल्या सगळ्या क्लासेसमध्ये जाऊन आलो. सगळीकडे शिकवणीचा दर सारखाच होता. अट अशी की, पेटी शिकली पाहिजे, तबला शिकला पाहिजे आणि गाणंही शिकलं पाहिजे. माझा अडाणी हिशेब असा की, माझ्याजवळ फक्त आठ आणे आहेत. मला फक्त गाणं शिकायचं आहे. वडिलांकडून फक्त दरमहा आठ आणेच मिळू शकत. पण आठ आण्यात गाणं शिकवायला कुणीही गुरुजी तयार होईनात. बांकेबिहारी या पात्रातून या व्यथेचं मूर्तीकरण झालं आहे. हे शब्द आहेत कै . पुरुषोत्तम व्यंकटेश दारव्हेकर या मराठी नाट्यसृष्टीतील अत्यंत प्रतिभावान आणि सव्यसाची लेखक -दिग्दर्शकाचे. होय, हे शब्द आहेत आपल्या दारव्हेकर मास्तरांचे. ज्या मास्तरांच्या एकेका शब्दाने वैदर्भीय रंगकर्मींच्या तीन पिढ्या घडविल्या, त्या संजयमामांचे!…..
आज हे शब्द आठवण्याचे कारण म्हणजे मास्तरांचे विश्वप्रसिद्ध नाटक कट्यार काळजात घुसली! मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. भालेराव नाट्यगृहात २४ डिसेम्बर १९६७ रोजी कट्यारचा पहिला, शुभारंभाचा प्रयोग दणक्यात सादर झाला होता. निमित्त होते ललितकलादर्शचा हीरक महोत्सव. शुक्रवारी या घटनेला ५० वर्षे पूर्ण झालीत. मास्तरांची आजही लखलखणारी ही कट्यार सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करेल. संगीत नाटकांच्या अलीकडील काळात ही घटना सोन्याच्या अक्षरांनी लिहिली जाईल. मास्तरांसारखा सव्यसाची-सिद्धहस्त लेखक -दिग्दर्शक, प्रभाकर पणशीकरांसारखा दूरदृष्टीचा आणि धडाडीचा निर्माता, पंडित जितेंद्र अभिषेकींसारखा नवनवोन्मेषी प्रतिभेचा संगीतकार आणि पंडित वसंतराव देशपांडे यांच्यासारखा तपस्वी गायक अभिनेता! सगळे योग कसे अमृतसिद्धी योगासारखे जुळून आले. कट्यारमध्ये हे सर्व एकजीव झाले आणि एक अमर, अजर, अक्षर कलाकृती जन्माला आली. कोणत्याही कलाकृतीची निर्मिती, ही वेदनेतून होते. मास्तरांच्या मनातील वेदनेला एका अक्षय्य नाटकाने रंगमंचावर आणले. मास्तरांच्या मनातील व्यथा वर त्यांच्या शब्दात आलीच आहे.
कट्यारमधील सर्वच गाणी अत्यंत लोकप्रिय झाली. हे नाटक पारंपरिक संगीत नाटकांपेक्षा वेगळे आहे, इथपासून ते, हे ‘संगीत नाटक’ या व्याख्येत बसतच नाही, इथपर्यंत चर्चा आणि वादविवादही झडले. नाट्यसंपदाचे हाऊसफुल्ल नाटक म्हणजे तो मी नव्हेच! या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्लीला झाला. सर्व मंडळी परतीच्या वाटेवर नागपुरात थांबली. त्यावेळी कट्यारची संकल्पना मास्तरांनी पंतांना सांगितली. कच्चे हस्तलिखितही तयार होते. ते पंतांनी वाचले आणि मी हे नाटक काढणार असे मास्तरांना आश्वासन दिले. ही घटना १९६२ सालची आहे. व्यावसायिकतेच्या दृष्टीने नाटकाची अनेक वेळा चर्चा झाली. पुनर्लेखनेही झाली . नाटकात तांत्रिक करामती करणे आवश्यक होते. यासंबंधाने पंत एका ठिकाणी लिहितात, विशेषतः यातला एक दृश्यबदल मला विशेष आव्हानात्मक वाटला. खांसाहेबांसमोर आलेला नवागत सदाशिव, बारा वर्षांपूर्वी शिकलेलं गाऊन दाखवत असतानाच त्या गाण्याच्या आवर्तांतच बारा वर्षे मागे जातात. आणि भानूशंकरांच्या पायाशी बसलेला छोटा सदाशिव गाताना दिसतो. पूर्ण दृश्यबदल होऊन त्या ठिकाणी मिरजेतील देऊळ दिसतं… मास्तर म्हणाले, मोठा सदाशिव गाता गाता अंधुक प्रकाशात पं. भानूशंकर गाताना दिसले आणि भानूशंकरांचं गाणं ऐकतानाच खांसाहेब दिसेनासे झाले, तर या नाटकातील एक कडवा परिणाम मला साधता येईल. या वाक्यातूनच पंतांना तीन फिरत्या रंगमंचांची कल्पना सुचली. श्याम आडारकर यांनी, एकाच वेळी तीन फिरत्या रंगमंचाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. मराठी नाट्यसृष्टीत तो एक चमत्कारच होता.
दि गोवा हिंदू असोसिएशनच्या १९६४ साली रंगमंचावर आलेल्या मत्स्यगंधा नाटकातील संगीताने पंडित जितेंद्र अभिषेकींचे नाव सर्वतोमुखी झाले होते. ताज्या दमाचा आणि नव्या युगाचा संगीतकार म्हणून रसिकांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेच होते. पंडितजींना कट्यारचे संगीत दिग्दर्शन करण्याची विनंती पंतांनी केली. कट्यार काळजात घुसली ह्या नाटकाच्या संगीतासोबतच पंडितजींचा संगीतानुषंगाने लेखन प्रक्रियेतही सहभाग होता. साठोत्तरी संगीत नाटकांच्या एकूणच संरचनांमध्ये पंडितजींचा फार मोठा वाटा आहे. नवता आणि प्रयोगशीलता ही त्यांची वैशिष्ट्ये. साहित्य, संगीत आणि नाट्य यांचा एक दुर्मिळ योग त्यांच्या व्यक्तित्वात होता. पारंपरिक नाट्यसंगीताला त्यांनी आधुनिक व कालसापेक्ष परिमाण मिळवून दिले.
कट्यारबद्दल स्वतः पंडितजी एका मुलाखतीत म्हणतात, दारव्हेकर हे संगीताचे उत्तम जाणकार आहेत. रंगमंचावर नाटक कसं यशस्वी होईल याची त्यांना पुरेपूर कल्पना असते. नाटकात संगीताची योजना नेमकी कुठं आणि कशी हवी याचा आराखडा त्यांच्या मनात आधीच तयार असतो. कट्यारची रचना त्यांच्या मनात बर्याच वर्षांपासून रुजली होती. त्यात कुठं काय करायचंय् याची बरीचशी कल्पना ठरलेली होती. ‘बीत गये दिन भजन बिना’ हे कबीराचं भजन पंडितजींच्या तोंडी टाकावं असं मी सुचवलं. त्याचं त्यांनी सुंदर मराठी रूपांतर करून दिलं. राग बिलावल मधील ते गीतही लोकप्रिय झालं. सर्व प्रमुख आणि अन्य अभिनेते यांच्यासोबत आम्ही तीन महिने एकत्र तालीम केली.
या नाटकाची तालीम म्हणजे आम्हा सर्वांनाच एक दिव्य सांगीतिक आणि नाट्यात्मक आनंद देणारा विषय होता. निश्चितच ह्या नाटकाचे संगीत म्हणजे स्वतंत्र लिखाणाचाच विषय आहे. या नाटकातील पदांसाठी चिजांची निवड पंडितजींनी केली. परंतु त्यांचा विस्तार वसंतरावांनी आपल्या शैलीने केला. पंडितजी आणि उस्तादी गायनातील फरक सामान्य रसिकालाही जाणवेल असाच यामागे प्रयत्न होता. या भवनातील गीत आणि तेजोनिधी लोहगोल ही पदे हा फरक दाखवणारी आहेत.
कट्यारचे संगीत यमन, भूप, मांड या रागांनी तयार होणारे नव्हते. तिथे पतियाळा शैलीच हवी. बडे गुलाम अली, सलामत-नजाकत यांनी जे वेगवान संगीत आणले त्याचा उपयोग अभिषेकींनी केला. पटबिहागमधील या भवनातील गीत किंवा धानीमधील ‘घेई छंद’ आठवून बघा! ‘करात उरली केवळ मुरली’ हे या नाटकातील पहिले पद! पडदा वर जाताच सुरू होणारे. ते भैरवीत मांडून अभिषेकींनी सर्व रूढ संकेत व परंपरांना छेद दिला. यातील रागमाला म्हणजे मास्तर आणि पंडितजी यांच्या अनोख्या प्रतिभेचा आविष्कार आहे. अशा कितीतरी गुणांनी हे नाटक सजलेले होते. ‘कट्यार’ म्हणजे संगीत नाटकांच्या पीछेहाटीला दिलेले चोख उत्तर आहे, असे मत गदिमांनी व्यक्त केले आहे. नाटकाचा शतकमहोत्सव ८ एप्रिल १९६९ ला साजरा झाला. एस. डी. बर्मन, हेमंतकुमार, मदन मोहन यांच्या सारखे दिग्गज संगीतकार, हृषीकेश मुखर्जी सारखा दिग्दर्शक यांनी अनेकदा हा प्रयोग पाहिला. चरित्र अभनेता कन्हय्यालाल तर अनेकदा येत. सितार नवाझ पं. रविशंकर यांचेसाठी पुण्याच्या बालगंधर्वमध्ये नाटकाचा खास प्रयोग झाला होता. ही होती मास्तरांच्या लेखणीची आणि दिग्दर्शनाची जादू!
नागपूरच्या रंजन कला मंदिरपासून सुरू झालेला मास्तरांचा प्रवास या नाटकाने खूप उंचीवर नेला. चंद्र नभीचा ढळला, चार कथा एक व्यथा, अबोल झाली सतार, वेदनेचा वेद झाला, वर्हाडी माणसं, नयन तुझे जादूगार ही मास्तरांची नाटके चटकन आठवतात. पण कट्यार म्हणजे त्यांच्या मुगुटातील शिरपेच! त्यांच्या लेखणीत प्रसंगांची आखणी आणि पात्रांचे स्वभाव रेखाटन यांचा नेमकेपणा असे. त्याच नेमकेपणाने आणि नेटकेपणाने मास्तरांनी कट्यारचे लेखन केले आणि दिग्दर्शनही केले.
जुन्या संगीत नाटकांच्या परंपरेत न बसणारे तरीही, रसिकांनी कौतुकाने डोक्यावर घेतलेले हे अर्वाचीन काळातील विक्रमी नाटक. नव्या पिढीतील अनेक नटांनी हे नाटक ताकदीने पुढे नेले आहे. या नाटकाचे निर्माते पंत पणशीकर लिहितात, कट्यार म्हणजे अर्वाचीन काळातील आणि पुढच्या अनेक पिढ्यांना आकर्षित करणारं असं एक संगीतप्रधान (म्युझिकल एक्स्ट्राव्हागांझा )अद्वितीय नाटक आहे. नाटककार दारव्हेकरांनी हे एकच नाटक लिहिलं असतं तरीही, त्यांचं नाव मराठी नाट्यविश्वात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं असतं. अशा नाटकाची निर्मिती करण्याचं अहोभाग्य मला लाभलं, हे मी माझं पूर्वजन्मीचं सुकृतच समजतो. …आणि मास्तरांच्या कट्यारचे हे देवदुर्लभ यश आमच्या पिढीला बघायला मिळाले, हे आमचेही पूर्वसुकृतच!
– प्रकाश एदलाबादकर
नागपूर.
९८२२२२२११५
(बेळगावच्या तरूण भारतच्या २५ डिसेंबर १६ च्या अंकातून साभार हा लेख घेतला आहे.. )
1 comment:
छान...!!!
ब्लॉगिंग, तंत्रज्ञान, ई-कॉमर्स याविषयी सविस्तर माहिती आता मराठी मधून
भेट द्या http://bit.ly/2x3ka4p
Post a Comment