Wednesday, September 27, 2017

भारताकडे लता मंगेशकर आहे..

 काही क्षण.. लता मंगेशकर यांच्या सोबत


माझ्या वैयक्तिक आवडीतून सुरु झालेला एक उपक्रम म्हणजे मी गेली पंधरा वर्षे ‘थीम कॅलेंडर’ प्रसिद्ध करतोय. भारतीय अभिजात संगीताबरोबरच विविध प्रकारचे संगीत आवडत असल्याने जवळपास सर्वच कॅलेंडर्सचे विषय संगीतातील ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्ती व त्यांचे सांगीतिक कार्य या भोवती गुंफलेले असे आहेत. स्वाभाविकपणे यात मंगेशकर हा विषय येणे अपरिहार्यच होतं. योग्य संधीची मी वाट पाहत होतो. अशी संधी मला चालून आली २०१० च्या ‘स्वर-मंगेश या कॅलेंडरमुळे.

मंगेशकर कुटुंब हे एक असे कुटुंब आहे की त्याच्या तीन पिढ्या संगीतात आहेत. आणि ही पाच भावंडे तर भारतीय सिनेसंगीतावर सहा दशकांहून अधिक काळ राज्य करीत आहेत. अजूनही त्यांच्या सुरेल गळ्यातून येणाऱ्या स्वरांनी रसिकांचे कान तृप्त होत आहेत.  थीम ठरली. साठ वर्षांची वाटचाल दाखवायची तर एक जुना व एक आत्त्ताचा असे फोटो लागणार. लतादीदी व मीनाताई यांचे रेकॉर्डिंगच्या वेळचे फोटो माझ्या संग्रही नव्हते. ते काढणे आवश्यक होते. आशाताई, उषाताई व पंडितजी यांचे फोटो विविध कार्यक्रमात मी टिपले होते. जुने फोटो मिळवायला लागणार होते. मी मनातल्या थीमवर कामही सुरू केले. नाव ठरले – ‘ स्वर मंगेश ’.


मी  पंडितजींना मनातील कल्पना सांगितली. त्यांना ती आवडली. अडचण एकच होती ती म्हणजे दीदींचा आताचा फोटो लागणार होता. मी पंडितजींना म्हणालो की जेव्हा कधी दीदींचे  रेकॉर्डिंग असेल त्यावेळी मला सांगा. मी तेथे येईन. पंडितजी म्हणाले – “ पाकणीकर, तुम्ही फारच अवघड काम मला सांगताय.”
मी त्यांना लगेचच म्हणालो – “ दीदींना सांगू शकेल अशी या जगात एकच व्यक्ती आहे. आणि ती म्हणजे तुम्ही!”. यावर “ मी विचारतो दीदीला” असे म्हणून तो विषय थांबला.

मध्ये बराच काळ गेला. ते जेव्हा जेव्हा भेटत तेव्हा मला म्हणत “ पाकणीकर, तुम्ही फारच अवघड काम मला सांगताय. मी तुम्हाला नंतर फोन करतो”. पण ती गोष्ट त्यांच्या लक्षात मात्र असेच.

१० ऑक्टोबर २००९. वेळ संध्याकाळी ७.०० ची. मी परत एकदा आठवण करण्याच्या उद्देशाने पं. हृदयनाथ यांना फोन केला. ते मुंबईतच होते. त्यांच्या लक्षातही होतेच. मला म्हणाले मी फोन करतो तुम्हाला.



रात्री पावणे अकरा वाजता त्यांचा फोन आला. “ मी दीदींशी बोललोय. तिला कल्पना आवडलीयं. तिने तुम्हाला १४ ऑक्टोबरला रेकॉर्डिंगला बोलावलंय.” माझे एक फार मोठे काम पंडितजींनी केले होते.

‘स्वर मंगेश २०१० ‘ लवकरच रसिकांच्या भेटीस येणार होते.

१४ ऑक्टोबरच्या संध्याकाळी जुहूचा ‘स्वर लता’ स्टुडिओ. आदरणीय दिदी रेकॉर्डिंग करायला येणार होत्या. व्यंकटेश स्तोत्र रेकॉर्ड होणार होतं. मी माझे दोघेही बंधू हेमंत व हरिष व माझा सहाय्यक जितेंद्र असे स्वरलता स्टुडिओत पोहोचलो. मी जितेंद्रला सांगितले की दीदींचा मूड कसा आहे ते पाहून मी तुला इशारा करीन. तो जर उत्तम असेल तर मग तू - मी त्यांचे फोटो घेत आहे असे काही फोटो काढ. मला ते हवे आहेत. फोटोसेशनचे फोटो!  आम्ही आधीच पोहोचलो असल्याने स्टुडिओत जावून लायटिंग करून तयार होतो.

बरोबर सहा वाजता  भारतरत्न लता मंगेशकर स्वरलता स्टुडिओत पोहोचल्या. मध्यंतरीच्या दिड-दोन वर्षात त्यांना भेटलो नव्हतो. त्याच काळात त्यांच्या गुडघ्यांचे ऑपरेशन झाले होते. पण तेव्हा कोणाला  त्यांना भेटायची परवानगी नव्हती. पण आज त्या अत्यंत प्रसन्न मूडमध्ये होत्या. मला म्हणाल्या “ किती दिवसांनी भेटत आहात?” त्यांचा तो मूड पाहून मी जितेंद्रला इशारा केला. त्याने त्याचे काम सुरू केले. दिदी सर्व पाहत होत्या. त्यांच्या समोर कागद होते. रेकॉर्डिंगच्या आधीची तयारी. हेडफोन लावलेला.... मला हे सर्व टिपायचं होतं.

“ आपण रेकॉर्डिंगच्या आधीच फोटो काढू !“ भारतातला सर्वात सुरेल आवाज सांगत होता. मायक्रोफोन समोर साक्षात भारतरत्न लता मंगेशकर उभ्या होत्या. मी फोटो काढण्यास सुरुवात केली. मला त्यांचे गातानाचे भाव टिपायचे होते. पण समोरील लिहिलेल्या कागदाकडे बघून त्या तो मनातल्या मनात वाचत होत्या. मी काही फोटो टिपले पण त्यात ‘एक्स्प्रेशन‘ नव्हते. मी नम्रपणे त्यांना तसे सांगितले व डिजिटल कॅमेरा  असल्याने त्यांना ते फोटो दाखवलेही. त्या स्वतः एक उत्तम प्रकाशचित्रकार असल्याने त्यांना माझी अडचण लगेचच समजली. पुढच्याच क्षणी त्यांच्या दिव्य स्वरात व्यंकटेश स्तोत्राच्या शब्दांनी स्टुडिओ भरून गेला. कानात स्वर साठवावे का चित्र कॅमेऱ्यात पकडावे या द्विधा अवस्थेत मी.

पुढच्याच ‘फ्रेमने’ माझे काम झाले होते. आम्ही सर्व त्या अलौकिक क्षणाचे साक्षीदार आहोत का स्वप्नात आहोत हे मनाला समजत नव्हते.    

त्या दिवशी विविध कोनातून विविध भाव असलेली अनेक प्रकाशचित्रं मला टिपता आली. डिजिटल असल्याने ते फोटोही त्यांना दाखवता आले. बरोबरच त्यांच्या जुन्या रेकॉर्डिंगचे फोटोही त्यांनी दिले. एक कधीही न विसरता येणारा अनुभव घेऊन आम्ही पुण्याला परतलो.



३० डिसेंबर २००९ रोजी ‘प्रभुकुंज’ सोसायटीच्या हॉल मध्ये सर्व मंगेशकरांच्या उपस्थितीत लतादीदींच्या हस्ते ‘स्वर मंगेश २०१० ‘ कॅलेंडरचे प्रकाशन झाले. या कॅलेंडरच्या निमित्ताने त्यांनी पत्रकारांना सुमारे पन्नास मिनिटांची मुलाखतही दिली. पुन्हा एकदा अवर्णनीय असा अनुभव. मला तेव्हा काय माहित होतं की हे कॅलेंडर सर्व मंगेशकरांना आवडणार असून मला पुढील तीन वर्षे त्यांच्यासाठी तीन थीम्सवर कॅलेंडर करायची संधी मिळणार आहे? प्रकाशनाच्या कार्यक्रमातच दिदींनी जाहीर केले की पुढच्या वर्षीही आम्ही कॅलेंडर प्रसिद्ध करणार आहोत.

आणि पुढे गानसम्राज्ञीची तीन कॅलेंडर्स ‘ तेरे सूर और मेरे गीत -२०११ ’ , ‘एक मै और एक तू-२०१२  ‘ व ‘हमसफर-२०१३‘  रसिकांच्या  भेटीस आली. प्रत्येक वेळचा त्यांच्या सहवासाचा अनुभव काळजाच्या कुपीत जपून ठेवावा असा.

माझी, माझ्या आधीची व त्याही आधीची अशा तीन पिढ्या अतिशय भाग्यवान! या कलावंतांची कला प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या पिढ्यांना मिळाली. गेली साडे सहा दशके मंगेशकर कुटुंबीयांनी संगीत रसिकांना आपल्या अलौकिक, दिव्य स्वरांनी मोहून टाकलंय. दीदींच्या एका कार्यक्रमात वर्णन करताना महानायक अमिताभ बच्चन असे म्हणाले होते की “ भारतीयांना कोणी विचारले की तुमच्याकडे सर्वोत्तम असे काय आहे ? तर त्याचे उत्तर असेल भारताकडे ‘लता मंगेशकर’ आहे.”
असा हा सर्वोत्तम, सुरेल व दैवी स्वर आज वयाची ८८ वर्षे पूर्ण करतोय.
लतादीदी .... आपल्याला उदंड आयुष्य व आरोग्य लाभो ही मनःपूर्वक शुभेच्छा !  






- सतीश पाकणीकर
- sapaknikar@gmail.com
- www.sateeshpaknikar.com
- M: 98230 30320

No comments: