Tuesday, March 18, 2025

अजिंठा या नाट्यानुभवाचे रसिक नक्कीच स्वागत करतील..!



चित्रकलेच्या माध्यमातून तत्कालीन परिस्थितीत अजिंठा लेणी जगासमोर मांडणारा चित्रकार म्हणजेच रॉबर्ट गिल. बौध्द लेणी जगाच्या पटलावर आणली तो हा जगविख्यात प्रतिभावंत चित्रकार राबर्ट. गिल १८४३ पर्यंत रॉबर्टने आर्मीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम केले. ईस्ट इंडिया कंपनीने त्याच्यातील सुप्त कलाकाराला ओळखून १८४४ ला अजिंठ्यातील चित्र-शिल्पांच्या आरेखनासाठी अजिंठा येथे नियुक्ती दिली.

रॉबर्ट गिल मे १८४५ ला सुरक्षा जवानांसह तो अजिंठ्याला आला. अजिंठा येथील सैन्य प्रशिक्षण केंद्राच्या स्थानिक वैद्यकीय उपचार केंद्रात तो राहात होता.
अजिंठा येथील स्थानिक आदिवासी जमातीच्या पारो या भारतीय तरुणीशी पारोशीओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. आज हीच प्रेम कथा जगभरात प्रसिद्ध पावली आहे.
यावर “अजिंठा नावाचा एक मराठी चित्रपट ही येऊन गेला आहे. चित्रनिर्मितीच्या कामात पारो ही देश, धर्म, भाषा, सामाजिक बंधने झिडकारून रॉबर्ट गिलला चित्रकामात मदत करायची. ११ वर्षांच्या सहवासानंतर पारो हिचा २३ मे १८५६ रोजी अजिंठा येथे आकस्मित मृत्यू झाला.
आपल्या प्रियसीबद्दल असलेल्या अत्यंत प्रेमापोटी रॉबर्टने तिची कबर अजिंठा येथील पोलिस ठाण्याच्या परिसरात बनविली. त्यावर ‘‘टू द मेमरी ऑफ माय बिलव्हड पारो हू डाईड २३ मे १८५६’’ अशा ओळी तिच्या कबरीवर लिहिल्या.
रॉबर्ट गिलने अजिंठा, वेरूळ, खान्देशातील, पश्चिम विदर्भातील लोणार सरोवर, मुक्तगिरी, अजिंठा परिसरातील मंदिरे, मुघल वास्तुकला यांची छायाचित्रे काढून भारतातील हा विशाल सांस्कृतिक वारसा जगासमोर आणला. ब्रिटीश शासनाकडून रॉबर्ट गिलवर अजिंठ्याच्या फोटोग्राफीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. अथक परिश्रमाने त्याने मार्च १८७० ला हे काम पूर्ण केले आणि १८७३ ला हा ठेवा त्याने तत्कालीन ब्रिटिश सरकारला सुपूर्द केला होता.
खान्देशच्या कडक उन्हाळ्यात भुसावळच्या रेल्वे हॉस्पिटलला रॉबर्ट गिलचे उष्माघाताने १० एप्रिल १८७९ ला निधन झाले. एक प्रज्ञावंत अष्टपैलू कलाकार खानदेशच्या मातीत विलीन झाला. कधी काळी कुंचल्याच्या प्रेमात गुंतलेला व सुरक्षा रक्षकांच्या गारुडात असलेला रॉबर्ट गिलच्या थडग्याभोवती आज गवताचा अन अस्वच्छतेचा वेढा असतो.




हे सारे सांगण्याचे कारण म्हणजे याच कथावर ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी लिहिलेल्या अजिंठा या दीर्घकाव्यावर आधारित एक परिणामकारक अभिवाचन ऐकण्याची संधी पुण्यातल्या लपझप या संस्थेने
कलाछाया कल्चरल सेंटर, पत्रकार नगर पुणे येथे दिली..
लख्ख अंधारात ..मंद प्रकाश योजनेच्या साथीने, संगीत.. आणि तेव्हढेच कथेला न्याय देण्यासाठी उपयुक्त असे पार्श्वसंगीत..पुरेसा मेकअप आणि वेशभूषा करून हा अभिमान वाटावा प्रयोग मोकळ्या वातावरणात सादर केला..
त्याचा परिणाम रसिकांच्या मनात कायम राहून जातो..


यासाठी १६ मार्चची संध्याकाळ अक्षय वाटवे,



माधवी तोडकर






आणि उदय रामदास





यांनी उजळ करून गिलसाब आणि पारो यांच्या प्रेमाची अजिंठा येथे साकार झालेली कहाणी आपल्या अभ्यासपूर्ण शब्दांच्या माध्यमातून या कलाकारांनी उपस्थित रसिकांच्या मनात थेट रुजविली असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही..
ना. धों. महानोर यांच्या प्रतिभेचे हे लेणे यानिमित्ताने पुन्हा उजळ झाले ..
माफक आणि सुंदर परिणाम साधणाऱ्या या अजिंठा या नाट्यानुभवाचे रसिक सर्वत्र स्वागत करतील अशी अपेक्षा आहे..याचा कालावधी मात्र कमी आहे..याची नोंद घ्यावी..






यातली गायनाची आणि संगीताची बाजू शब्दांच्या साथीने उदय रामदास आणि माधवी तोडकर यांनी तर केवळ वाचनातून समृध्द करण्याची किमया अक्षय वाटवे यांनी केली. तिन्ही कलावंतांचे त्यासाठी कौतुक करायला हवे.. आणि मुख्य म्हणजे दिग्दर्शक अक्षय प्रभाकर वाटावे यांचे सर्वाधिक श्रेय आहे.
यापाठीमागे ज्याचे हाथ लागले आहेत त्यात चेतन पंडित, राघवेंद्र जेरे, रवी मेघावत, कौस्तुभ केणी यांचे.



- Subhash Inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com

No comments: