Thursday, February 4, 2010

खॉंसाहेबांच्या एंट्रीलाच टाळ्या ---







कट्यारची तालीम सुरु असतानाचे हे छायाचित्र



तो गातो तेव्हा डोळे मिटून ऐकले की जणू वसंतराव देशपांडेच गातात.



त्याच गायकीची नजाकत राहूल देशपांडेंच्या गळ्यातून निघते. पण..आज आजोबांनी गाजविलेल्या कट्यार मधल्या खॉंसाहेव आफताफ हुसेन यांच्या भूमिकेत तो कसा दिसतो हे पाहण्यासाठी पुणेकरांची नजर एकवटली होती.



रंगमंचावर एंट्री झाली आणि टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी या नव्या रुपातल्या खॉंसाहेबांच्या प्रवेशाचे स्वागत केले.
राजस्थानी हवेलीचे दर्शन देणारा जयपूरच्या फिकट तपकीरी रंगाचा भव्य सेट नांदी नंतर डोळ्यांना सुखावतो. आणि कट्यार नाटकाच्या जुन्या आठवणी दूर निघून जातात. कै. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर करुन ठेवलेल्या नाटकाला तब्बल 28 वर्षानंतर साकारण्याचे राहूल देशपांडे यांनी मनात आणले आणि ते सिध्दीस नेले. याचे कौतूक करावे तेवढेच थोडेच आहे. आजोबांचा वारसा नातवाने अशा पध्दतीने पुढे न्यावा ही खरी संस्कृतीची ओळख आहे. साकारताना आजोबांच्या भूमिकेत राहूल बसले पण ती साकारली आपल्या स्वतःच्या गायकी ढेंगाने. अगदी टेचात.


या निमित्ताने कट्यारच्या रुपाने गेले कांही वर्षे अस्तंगत पावत असलेल्या अभिजात संगीत नाटकाला नवसंजीवनी मिळाली असे म्हटले तरच ते वावगे ठरणार नाही.वंसतराव देशपांडे संगीत सभा निर्मित वंतराव देशपांडे प्रतिष्ठान प्रकाशित संगीत कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकाबद्दल रसिकांमध्ये उत्सुकता होती.


त्यामुळेच चार फेब्रुवारीची गुरुवार संध्याकाऴ संगीत रसिकांसाठी एक आनंददायी पर्वणीच होती. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हाऊसपुल्लची पाटी झळकत होती.नाट्यसंपदेचे प्रभाकर पणशीकर ज्यांनी वसंतराव देशपांडें यांचे कट्यार आपल्या संस्थेमार्फत सादर केले ते ही प्रयोगाला हजर होते.


विद्याताई अभिषेकी, पं. हृदयनाथ मंगेशकर, रघुनंदन पणशीकर असे संगीत आणि नाटक अनुभवलेले अनेक रसिक सारेच नाटक पाहण्यासाठी अधिर झाले होते. नाटकाला पारंपारिक संगीत नाटकापेक्षा वेगळी ट्रीटमेंट देताना दिग्दर्शक सुबोध भावे यांनी मूळ संहितेला धक्का न देता वंगळ्या पध्दतीने रंगमंचावर मांडले आहे. पं. भानुशंकराचे पात्र नाटकाच केवळ संवादातून प्रकटते. कांही वेळा वेगळे संवादही अभिराम भडकमकरींनी दारव्हेकरांच्या संवादाला साजेसे लिहले आहेत. घराणेदार गायकीची परंपरा आणि त्यातल्या अनिष्ट वृत्तीवरही नाटकात अखेरीस टिका करुन संगीत साधकांना दिशा देण्यासाठी नवा संवाद शेवटी नाटकातून भरत वाक्य या न्यायाने दिले आहे. तेही वेगळपण.


हेच वेगऴेपण काय आणि नाटक कसे उभे केलेय हे पाहण्यसाठी कट्यारचा प्रयोग पहायला हवा. रसिकांच्या चेहर्‍यावर याबद्दची उत्सुकता दिसत होती.



पुरुषोत्तम दारव्हेकरांचे दर्जेदार लेखन आणि पं. जितेंद्र अभिषेकींनी संगीत दिग्दर्शनाच्या रुपाने चढविलेली रुपेरी झालर या दोन्हींचा मिलाफ या नव्या नाटकातून कसा होतो आहे ते पाहण्यासाठी पुणेकर मोकळ्या मनाने आले होते.



एकेकाळी शंकर घाणेकरांना गाजविलेल्या कविराजाच्या भूमिकेत सुबोध भावे कसा शोभतो तेही पाहणे आकर्षणाचा भाग होता.अखेरीस खॉंसाहेबांच्या रुपात राहूल देशपांडे यांची एंट्री झाली आणि..... उत्स्फूर्त टाऴ्यांनी प्रक्षागृह निनादले गेले. कट्यार मधल्या संवादाची पकड आणि स्वरांचे मधाळ पण धारदार घुसळत जाणारे स्वर प्रेक्षागृहात घुमु लागले. तेव्हाच ही कट्यार रसिकांच्या काळपर्यंत थेट पोचल्याची पावती मिळाली. घेई छंद मकरंदनंतर टाळ्यांनी दिलेली दाद अणि राहूलच्या रुपात नटलेल्या खॉंसाहेबांची उर्दू मिश्रीत भाषा सारेच ऐकण्यासाठी आतूर झालेले रसिक तृप्त होत गेले. तोच पण नवा पेहराव. वाक्यातली ती खास शैली. संयमीत पण संवादातले वेगळेपण टिपत रंगमंचावर फिरलेली व्यक्तिरेखा पाहताना मन मोहरुन जात होते. यातली नाट्यपदे तो इतरही वेळा गाजवत असे पण आज भूमिकेच्या आकृतीबंधात राहून इतरांना बरोबर घेऊन साकारली जाणारी व्यक्तिरेखा पाहण्यात नाविन्य होते.



राहूल देशपांडे भूमिकेत दिसले छान आणि रंगलेही उत्तम. संगीत रंगमंचावर अशी ताकदीची तीही आजोबांनी गाजविलेली साकारण्याचे शिवधनुष्य त्यांनी सहजी पेलले. तो सूर त्यांनी नेमका पकडून ठेवला होता. नाटक चढत जाताना दारव्हेकरांच्या संवादातली ताकद पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने बाहेर येत होती.


राहूलच्या दमदार गायकीचा अनुभव घेतानाच महेश काळे यांनी सदाशिवाच्या रुपाने साकारलेली भुमिका ठसत गेली ती त्याच्या संथ पण तळपत्या गायन शैलीने. दुसर्‍या अंकात शेवटी सूतर पियाकी नाट्यपदातून दोन गायकींची सुरेल मैफल ऐकताना येणारा आनंद शब्दापलिकडचा होता.



कविराजाच्या भुमिकेत संयमी आणि मोकळ्या संवादाची किनार सुबोध भावेंच्या सहजी अभिनयातून उलगडत गेली. वाक्यांचा तोल संवादातला पोत सांभाळत ते वावरले.दिप्ती माटे( राहूलची बहिण) अणि सौरभ काडगावकर,अमेय वाघ यांनी नटविले चांद-उस्मान हवेलीतल्या सूरांना सांभाळत रसिकांना आपल्याबरोबर घेउन जातात.वेदश्री ओक (उमा)यांच्या लडीवाळ सुरेल पदांनी नाटकाची उंची गाठली .



दिग्दर्शक म्हणून सुबोध भावे यांनी नाटकात जिवंतपणा आणला. नेपथ्य, प्रकाशातून साकारलेला हे चार तासांचे हे नाटक कविराच्या रागमालिकेत गुरफटत नाही. स्वतःच्या रागांची मैफल मांडताना प्रकाशाच्या आणि हालचालीच्या सहाय्याने रागमालिका वेगळीच संगीत अनुभूती देते.संगीताची तोच बाज आणि नाटकाची गती अणि संवादफेकीतली गंमत यातून कट्यारचा प्रयोग एक नवा आनंद देउन जातो यात शंका नाही.राहूल देशपांडेंबराबरच महेश काळेया अमेरिकास्थित अभिषेकींच्या शिष्याने गायनात सादर केलेले कौशल्य पाहण्यासाठी ही नवी कट्यार आपल्या काळजात घुसवून घ्यायलाच हवी.



संगीत नाटकाचे हे वैभव , ती भव्यता, ते देखणेपण आणि नाट्यपदातली करामत पाहताना चार तास कसे जातात ते कळतच नाही.






सुभाष इनामदार, पुणे.


subhashinamdar@gmail.com(9552596276)

Monday, February 1, 2010

व्हायोलिनचा सूरेल प्रवास


जानेवारी 29 हा दिवस व्हायोलिनचे सूर साठविण्याचा होता.

सूरांची संगत आणि साथीला तबल्याचा ठेका असा संगमच जणू भरत नाट्य मंदिराच्या

रंगमंचावर सादर होत होता.

हातातून सूर काढायला मला सांगा. पण बोलायला सांगू नका आसाच त्यांचा ठेका असायचा.

मी मात्र त्यांना घोडयावर बसविले आणि मुलाखतींचा कार्यक्रम करण्याचे सूचविले. मात्र ती जबाबदारी माझ्यावर येईल असे वाटले नव्हते. पण अखेरीस तेच घडले.

मग मात्र हिय्या केला आणि सूरांच्या संगतीचा ,तिच्या साधनेच्या प्रवासाची माहिती घेतली आणि

सज्ज झालो. मग तयार झालेला हा कार्यक्रम कसा वाटला ते अनेकांच्या शब्दातून जाणवले.

मी मात्र तो कसा झाला याविषयीचा पुरावाच तुम्हासमोर ठेवीत आहे.

खालील दोन्ही लिंक वरुन तुम्हीच ठरवा तो कसा झाला ते...



Friday, January 29, 2010

व्हायोलिनच्या सुरांत रसिक मंत्रमुग्ध


पुण्याच्या सौ. चारुशीला गोसावी यांच्या व्हायोलिन वादनाच्या शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमातून व्हायोलिन गाते म्हणजे नेमके काय होते याचा प्रत्यय आला.
आम्ही दस्तुरखुद्दंनी तिच्या कारकीर्दीला रसिकांरसमोर उलघडण्यासाठी चार प्रश्र विचारुन बोलते ठेवण्याचा प्रयत्न केला.
नोकरीच्या चक्रातही आपली वादन साधना त्यांनी अढळपणे कायम ठेवली. संसाराची घडी व्यवस्थित मांडताना सुरांशी नाते कायम नव्हे वाढवत ठेवले.
मध्यंतरी साम टीव्हीवरच्या मधुरा कार्यक्रमातून व्हायोलिन वादनाचे कौशल्य जाणवले. काही दिवसातच म्हणचे फेब्रुवारीत दूरदर्शनच्या एम टू-झी टू या वर्षा उसगावकरांच्या मुलाखतीमधून चारुशीला गोसावी छोट्या पडद्यावर दिसतील.
संगीत क्षेत्रात असे अनेक कलावंत सततची साधना करीत असतात. मला वाटते की, यांच्या साधनेला असा ब्लॉग मधून वाचकांपर्यंत आणि रसिकांपर्यत पोचवावे. हा वृत्तांत शनिवारच्या इ.सकाळच्या पुण्यतल्या लिंकमध्ये आपण वाचू शकाल.http://72.78.249.124/esakal/20100130/5379017872426454580.htm

पुणे - व्हायोलिनच्या सुरांतून "चांदणे शिंपीत जाशी', "ऐन दुपारी यमुना तीरी' या मराठीबरोबरच "आईऐं मेहरबॉं', "ये रातें ये मौसम नदी का किनारा' अशी लोकप्रिय हिंदी गीते सादर होत असताना हा श्रवणानंद लुटणाऱ्या रसिकांनी नकळत त्यात आपले स्वर मिसळले. चारुशीला गोसावी यांच्या गायकी अंगाच्या वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले आणि तीन दशकांची कारकीर्द उलगडताना "आम्ही चालवू हा पुढे वारसा' या काव्यपंक्तींची प्रचिती शुक्रवारी आली.
हिंदी, मराठी गीतांबरोबरच गोसावी यांनी सादर केलेल्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विविध रचनांनाही रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निमित्त होते, भरत नाट्य संशोधन मंदिर सांस्कृतिक मंचातर्फे आयोजिण्यात आलेल्या "स्वरसाधना' या पं. भालचंद्र देव यांच्या कन्या आणि शिष्या चारुशीला गोसावी यांच्या व्हायोलिन वादन मैफलीचे. संगीत साधनेचा तीस वर्षांचा प्रवास त्यांनी व्हायोलिन वादन आणि गायनातून उलगडला.
गोसावी यांनी राग मारुबिहागने मैफलीला सुरवात केली. यानंतर पं. गजाननबुवा जोशी यांच्या वादन शैलीनुसार श्री रागातील रचना, पं. श्रीधर पारसकर यांची गोरख कल्याण रागातील आणि पं. व्ही. जी. जोग यांच्या वादन शैलीतील देस रागातील गत सादर करून रसिकांची दाद मिळविली.
मैफलीच्या दुसऱ्या भागात त्यांनी सादर केलेली लोकप्रिय मराठी आणि हिंदी गीते, लावणी, भावगीते आणि नाट्यगीतांना वन्समोअरची फर्माईश मिळाली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात त्यांनी गजानन वाटवे आणि मंदाकिनी चाफळकर यांनी संगीतबद्ध केलेली निवडक गीते सादर केली.
रविराज गोसावी यांनी तबल्यावर आणि दीप्ती कुलकर्णी यांनी संवादिनीवर साथसंगत केली.
सुभाष इनामदार यांनी चारुशीला गोसावी यांच्या साधनेच्या कारकीर्दीतल्या अनेक घटनांना आपल्या मुलाखतीमधून बोलते केले.
http://www.youtube.com/user/subinamdar#p/u/19/WDPXMpN0lLg

Wednesday, January 13, 2010

स्नेह द्यावा स्नेह घ्यावा !

तिळागूळाच्या स्नेहासारखे बांधले जावू
एकमेकांच्या नात्यांतले बंध द्रुढावत नेवू
माणसातली नाती विरघळताना दिसताहेत
रक्ताचेच आपले दुरावताना दिसताहेत
बंधात नांदायचे आहे खरे
धुंदीत नाचायचे आहे खरे
जगण्यासाठी आज लढाई आहे
नेत्यांच्या वागण्यात काय अर्थ आहे ?
रक्ताचा रंग सर्वांचाच जर सारखा आहे ?
तर माणसातले नाते दुरावत का चालले आहे?

करू संकल्प,
घेऊ शपथ,
नात्यांमधली वीण अधीक दृढ करू......

Thursday, November 19, 2009

सुनिताबाईंच्या प्रतिभेचे देणे

पुलोत्सवाच्या सातव्या महोत्सवात रसिकांनी अनुभवली सुनीताबाई देशपांडे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू.
पुलं ऊर्फ भाईंनी लिहिते राहावे. त्यांच्या अंगच्या गुणांनी विविधरंगी बनावे यासाठी सुनिताबाईंनी कित्येकांचा रोष ओढवून घेतला. पुलंजवळ जायचे असेल तर सुनिताबाईंच्या मर्जीत आधी उतरा मग पुलदर्शन घडेल असा संकेतच जणू बनला होता.मात्र स्वतःमधील कला, लेखनाची ताकद, अभिनयाचे पैलू दडवून ठेवून त्यांनी पुलंसाठी एका अर्थाने आपल्या गुणांचा होम करून भाईंचा लेखन कुंड सतत प्रज्वलित ठेवला.
त्या स्वतः कवी नाहीत. पण कवींबद्दल विलक्षण आदर. त्यातूनच मर्ढेकर, बोरकर आणि आरती प्रभूंच्या कवितांचा कार्यक्रम ज्या ताकदीने त्यांनी सादर केला त्याला तोड नाही. पुलोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आशय संस्थेच्या संयोजकांनी सुनिताबाईंच्या प्रतिभेला रसिकांजवळ उलगडण्याचा प्रयत्न केला.ज्यांनी तो अनुभवला त्यांना धन्य वाटले. आणि सुनिताबाईंच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा मान मिळाला.
त्यांच्या ध्वनिचित्रफितीतून जे विलक्षण उलगडले ते थोडक्‍यात दाखविण्याचा प्रयत्न इथे केला आहे, इतकेच.त्यांच्या कवीतेतल्या सादरीकरणातपण त्यांच्या अंगचे विविधअंगी पैलू स्पष्टपणे दिसून येत होते. पण स्वतःला जाळत पुलंना उजळविण्याचा यज्ञ केवढा महान होता याची दखल घेण्यासाठी हा शब्दप्रपंच.

सुभाष इनामदार,पुणे

सुनिताबाईंच्या आठवणीला समर्पित सातवा पुलोत्सव

आताशा मी नसतेच इथं.... सुनिताबाईंच्या आवाजातल्या या कवितेने सातव्या पुलोत्सवाची सांगता झाली खरी पण ती दुखाःचे सावट घेऊनच.
पुलोत्सव रविवारी आणि सुनीताबाई शनिवारी रात्री निर्वतल्या. शो मस्ट गो ऑन ह्या सुनिताबाईंच्या शिस्तीनुसार ८ ते १८ नोव्हेंबरचा पुलोत्सव रद्द न करता ठरल्यावेळी पार पडला. सर्वच कार्यक्रम पार पडले. पण तरुणाईला पुरस्कार देण्याचा कार्यक्रम जो शेवटच्या दिवशी होतो तो पुढे-मागे करावा लागला इतकेच.समारोप समारंभ सुनितार्बांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या स्मृतींना अर्पण केला गेला.
मंगला गोडबोले यांनी या खास त्यासाठी लेखन आणि निवेदन करून स्मिता तळवलकर, डॉ. गिरीश ओक यांनी सुनिताबाईंच्या पुस्तकातील उतारे वाचून गृहिणी-सखी आणि सचिव म्हणून पु लंच्या आयुष्याला कसे वळण दिले याचे भान रसिकांना आले. डॉ. जयंत नारळीकरांनी लंडन ते आयुकातल्या प्रवासात पु ल आणि सुनिताबाईंनी कशी आस्थेवाईक चौकशी करून आयुकाला देणगी दिली याच्या आठवणी सांगितल्या. प्राध्यापिका रेखा इनामदार-साने यांनी सुनिताबाईंच्या शिस्तीच्या कल्पनांची महती सांगून आहे मनोहर तरी..या पुस्तकाने संसार काटेकोरपणाने सांभाळून पु लं सारख्या लेखकाला कशा पद्धतीने सांभाळल्याचे चित्र तर आहेच पण ते करतानाच स्वतःच्या कवितांची आवड, आणि वाचनाची सवय कायम ठेवली हेच दिसून येते.
सातव्या पुलोत्सवाने सुनिताबाईंचे मोठेपण अधिक व्यापक प्रमाणात रसिकता पोचविले. त्यांच्या कविता सादर करण्याची पद्धती इतकी विलक्षण होती की समीक्षकांनी जे चारशे पानी पुस्तक लिहून सांगता येत नाही ते त्यांच्या स्वाभाविक आणि उत्कट वाचन सामर्थ्याने सहजी कळून येते.त्यांच्या कविता वाचनाची महती आणखी एक की त्याची कुणी नक्कल म्हणूनही सादर करू शकत नाही.
"फलाटदादा" ऐकताना आपण भान हरपून जातो. एवढी शक्ती त्यांच्या कवीता वाचनात असते हे इथे सिध्द झाले.
सुनिताबाईंच्या आयुष्याचा पटच जणू पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात साकार होत होता.कधी शब्दातून तर कधी चित्रफीतीतून सुनिताबाईचे आयुष्य इथे उलगडले होते. ते पाहताना एकच जाणवले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला स्वतंत्र प्रतिभा तर आहेच. पण पुलंमुळे त्यांचे जीवन अधिक समृद्ध झाले हे नक्की.
आहे "मनोहर" तरी....
या पुस्तकाला नाव काय द्यायचे याची चर्चा सुरू होती. वेगळी नावे समोर येत होती. गाडी चालवत दोघे चालवत असताना इतका बेकरीसमोर थांबली होती. बेकरीचे नाव होते मनोहर बेकरी. पुलंनी सुनतीबाईंना विचारले आहे मनोहर तरी... हे नाव कसे वाटेल. आणि पुस्तकाचे नाव नक्की झाले. आहे मनांहर तरी.कधीतरी आम्हालाही गृहीत धरा... असा टोलाही त्यांनी मारला.

सुभाष इनामदार, पुणे.

Tuesday, November 17, 2009

ध्येय्यवेडा ,तत्त्वनिष्ठ कलासाधक राजदत्त


धोतर, पांढरा अर्ध्या बाहिचा हाफ नेहरू शर्ट. डोक्‍यावर जन्मजात टेंगुळ. चेहऱ्यावर मिस्कील भावार्थ हसण्याचे भाव. धीरगंभीर प्रकृतीचा आविर्भाव. कलासक्त. विचारतात सतत बुडालेले. मात्र कलेत कुठेही तडजोड न करता स्पष्ट बोलणारा काळे सावळे व्यक्तिमत्त्व म्हणजे दिग्दर्शक राजदत्त.


त्यांचे संपूर्ण नाव दत्तात्रेय अंबादास मायाळू.संघाच्या शिस्तीत वाढलेला ध्येय्यवादी कलासक्त व्यक्तिमत्त्व . राजदत्त.राजा परांजपेंच्या पठडीत वाढलेल्या राजदत्तांचे चित्रपटही समाजातल्या संस्कारांना आकार देणारे, भावभावनांचे प्रकटीकरण करणारे आणि व्यवसायापेक्षाही कलेला अधिक उठाव देणारे.


त्यांचा आठवणीतला पहिला चित्रपट म्हणजे संत गाडगे महाजांवरचा " देवकीनंदन गोपाला "हा चित्रपट. नंतर शापित आणि अलीकडला लक्षात राहणारा म्हणजे पुढचं पाऊल. त्यांच्या अजिंक्‍य देवने नायकाची भूमिका केलेला म्हणजे सर्जाही आठवतो.कलेशी प्रामाणिक राहणाऱ्या या दिग्दर्शकाने दूरदर्शनवर केलेली मालिका गोट्या आजही आठवते ती त्यांच्या दिग्दर्शमामुळे आणि संगीतकार अशोक पत्की यांनी मालिकेच्या दिलेल्या शीर्षक गीताने.संस्करभारतीचे अध्यक्षपद भूषविणारे राजदत्त यांचे विचारही प्रभावीपणे सतत रसिकांच्या कानी पडत असतात. चित्रभूषण पारितोषिकाचा सन्मानही त्यांना प्राप्त झाला आहे.


मनोरंजन हा कलेचा प्रमुख हेतू न राहता, समाजप्रबोधन हाही कलेचा विषय असावा. आणि कलेशी संबंधित प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासावी अशी त्यांचा आग्रही मागणी असते. ते स्वतःही ते कटाक्षाने पाळतात. म्हणूनच आजच्या मनोरंजन जमान्यात राजदत्तांसारखे अनेकजण मागे पडल्याचे चित्र दिसते.


सावरकर हे त्यांचे दैवत. हिंदुत्व हा धर्म. आणि कला हे जीवनाचे धेय्य. अशा कलासेवेत अविरत कार्य करणाऱ्या धेय्यवादी दिग्दर्शकाला गदिमांच्या नावाने दिला जाणार गदिमा पुरस्कार जाहीर झाला याचा माझ्यासारख्या त्यांच्यावर प्रेमकरणाऱ्या अनेकविध रसिकांना आनंद झाला आहे.

राजदत्तांना तमाम मराठी जनांचा प्रणाम.

आम्हाला तुमचा अभिमान आहे.


सुभाष इनामदार, पुणे

Thursday, November 12, 2009

प्रगतीची वाट


शिकण्याची इच्छा हाच मुळात प्रगतीचा पहिला टप्पा. यासाठी वयाची अट नाही. सध्याच्या युगात घर बसल्याही शिक्षण मिळू शकते. यासाठी तुम्ही संगणक साक्षर व्हायला हवे.पूर्वी असे म्हणत बापाची चप्पल मुलाच्या पायात येऊ लागली की समजावे तो आता मोठा झालाय. त्याला बरोबरीच्या नात्याने वागवा. लहानपणी थोडा राग आला तर मुलावर हात उगारला जायचा.

आता तोच मुलगा तुमचा मार्गदर्शक होऊ शकतो. मीही काही संगणकावर काम करीत असलो तरी त्याच्या इतके संगणक ज्ञान मला नाही. आजच मी त्याचेकडून पहिला धडा गिरवला. आणि काय सांगू असा गुरू माझ्या घरी असावा आणि मला त्याची ओळख नसावी. हे थोडे विचित्र वाटले.


आजची पिढी काळाला ओळखून आहे. त्यांच्यात धाडस. जिज्ञासू वृत्ती आणि मेहनत करायची तयारी आहे. लाथ मारू तिथे पाणी काढू अशी त्यांची जिद्द आहे. फक्त ती वाया जात नाही ना ? याची काळजी घ्या. बस्स.हा अनुभव सांगावा म्हणूनच हे चार शब्द नोंदविले. इतकेच.


सुभाष इनामदार, पुणे

Sunday, November 1, 2009

व्हायोलिन वादनात तरबेज- चारूशिला गोसावी


कार्तिकी एकादशीच्या दिवशीचा प्रसंग. श्रीराम साठेंच्या संतदर्शनच्या वतीने सादर झालेल्या नामाचा गजर कार्यक्रमानंतर व्हायोलिनची साथ करणाऱ्या चारुशीला गोसावी यांच्या कडे तुमच्याकडून एक अभंग व्हायोलिनवर ऐकायचा होता. किती सुरेल साथ करता हो तुम्ही.वयोवृद्ध गृहस्थ प्रेमाची इच्छा व्यक्‍त करताना तेवढ्याच प्रामाणिकपणे बोलत होते. साथीदाराला असे काही ऐकले की मूठभर मास चढते. का चढू नये?

गेली तीस वर्षे त्या एकनिष्ठेने व्हायोलिन वादनाची साधना करीत आहेत. गाण्यातला असा एकही प्रकार नाही की ज्याली त्यांनी साथ केली नाही.
पुण्यात आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या चाहत्यांचे जाळ ेनिर्माण झाले आहे ते त्यांच्या वादनातील कौशल्याने.वयाच्या नवव्या वर्षी वडिलांकडून वारसा घेऊन व्हायोलिन वादनातले धडे घ्यायला सुरवात केली.
वयाच्या सोळव्यावर्षी व्हायोलिन वादनातील संगीत विशारद पदवी मिळविली. या वादनातले त्यांचे गुरू म्हणजे ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. गजाननराव जोशी यांचे शिष्य भालचंद्र देव. घरी वडील्यांच्या संगतीत या कठीण वाद्याची गोडी लागली . नकळत बो हातात घेतला गेला आणि वाद्यावर बोटे फिरून स्वर आकाराला आले. त्याच स्वरांनी घर भारले गेले आनंद निर्माण होतोय ही जाणीव झाली आणि वडलांनी कन्येला वादनाचे धडे द्यायला सुरवात केली. आजही ती त्यांच्या सोबत व्हायोलिन वादनाची जुगलबंदी रंगवताना "बापसे बेटी बेहतर" आहे अशी जाणीव रसिकांना करून देते.
गुरूपौर्णिेमेच्या एका संध्याकाळी भारत गायन समाजच चारुशीला देव यांनी एकटीने स्वतंत वादन केले. तेव्हाच त्यांच्यातल्या वादन कौशल्याची तयारी दिसली. मग त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. सुगम संगीतापासून स्वतंत्र शास्त्रीय वादनापर्यंतचे सारे टप्पे पार करीत. स्वतंत्र शैलीदार व्हायोलिन वादक म्हणून चारुशीला गोसावी आज उणी पुरी तीस वर्षे महाराष्टाला परिचित झाल्या आहेत.
स्वरानंदच्या आपली आवडमधून गाण्यांच्या कार्यक्रमाला त्यांचे साथीदार म्हणून जोडले गेले. पु.लं कडून कौतुक झाले.
वाजवताना स्वतःला सुगमसंगीत गाता आले पाहिजे असा अट्टाहास मनी घेऊन मंदाकिनी चाफळकर आणि गजाननराव वाटवे यांचेकडे रीतसर शिक्षण घेतले. त्यांनी मनावर घेतले तर त्याही उत्तम गाणे म्हणू शकतात .

स्वरानंद, झलक, त्रिमूर्ती (महिला ग्रुप),संतदर्शन अशा संस्थांतून व्हायोलिनची साथ केलेल्या चारुशीला देव यांना लग्नानंतरही ही कला जोपासता नव्हे वाढविता आली . याचा अधिक आनंद आहे. पती राजय गोसावी निवेदक तर मुलगा रविराज तबला साथ अशी संगत जमली. स्वरबहार तर्फे पहिला गाणारे व्हायोलिनची तयारी केली. आजही त्यांचे वादन ऐकण्यासाठी गावोगावची विचारणा होत आहे.कुंदगोळच्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवासकट अनेक ठिकाणी त्याच्या स्वतंत्र वादनाने रसिक तृप्त झाले आहेत. आकाशवाणीच्या बी हाय दर्जाच्या त्या कलावंत आहेत. मुंबई दूरदर्शनच्या युवदर्शन मधूनही त्या झळकल्या आहेत. शास्त्रीय संगीताच्या दोन सीडीही प्रकाशित झाल्या आहेत.

पुण्यात बीएसएनएलमध्ये नोकरी करून त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत २१ वेळा व्हायोलिन वादनात सुवर्णपदक मिळविण्याची किमया केलेल्या या कलावंताचे वादन ऐकण्याचा योग अनेकांना आला आहे. आपल्याला कुणासारखे तरी व्हायचे आहे यापेक्षा नावाजलेल्या व्हायोलिन वादनात स्वतःला दर्जा मिळावा अशी त्यांची साधना आजही सुरू आहे.
घर, नोकरी सांभाळून वादनातले बारकावे त्या आजही शिकताहेत. विद्यार्थी दशा असली तर चांगले ते सारे टिपून आपल्या वादनात ते कसे आणता येईल याचा अट्टाहास सतत सुरू असतो.

सुभाष इनामदार,पुणे