Tuesday, September 16, 2014

मन एक पाखरू..नवा मराठी अल्बम


मनाचे विविध भावरंग घेऊन लवकरच मराठी भावगीतांचा एक नवाकोरा रोमँटिक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, बेल शेंडे, राहुल सक्सेना अशा प्रथितयश गायक-गायिकांबरोबरच गोव्याच्या प्रसिद्ध गायिका रचला अमोणकर यांनी या अल्बममधील गीते गायली आहेत. 

पुण्याच्या "मायक्रो क्रिएशन्स" प्रस्तुत राजेश पवार निर्मित अल्बम "मन एक पाखरू", 'युनिव्हर्सल म्युझिक ग्रुप' या संगीत क्षेत्रातील नामवंत कंपनीद्वारे हा अल्बम रसिकांसमोर येत आहे. कवी प्रमोद कोयंडे यांनी या अल्बमसाठी गीतलेखन केले असून मनाचे विविध रंग उलगडून दाखविणाऱ्या या गीतांना गोव्याच्या तरुण संगीतकार सुनील केरकर यांनी संगीत दिले आहे. तर आजवर अनेक अल्बम्सना संगीत संयोजन केलेल्या निरंजन जामखेडकर यांनी "मन एक पाखरू" चे संगीत संयोजन केले आहे. 

मन या विषयावर आधारित या अल्बम मध्ये एकूण नऊ गाणी असून प्रत्येक गीतामध्ये मनाचा एकेक कप्पा उलगडण्यात आला आहे. प्रेम, आनंद, दुःख, मनस्वीपणा अशा मनाच्या विविध छटा असलेली गाणी रसिकांच्या मनाचा नक्कीच ठाव घेतील, विशेषतः तरुणाईला भावतील. "मन एक पाखरू" हे या अल्बममधील शीर्षकगीत शंकर महादेवन यांनी गायले असून गीतातील शब्द आणि त्याला दिलेले संगीत याचे त्यांनी भरभरून कौतुक केले. बेल शेंडे, महालक्ष्मी अय्यर, प्रचला अमोणकर, आणि राहुल सक्सेना यांनीही उत्तम गाणी गायला मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आहे. 

पाऊसधार कोसळत असताना आणि त्यात चिंब भिजावेसे वाटत असतानाच "मन एक पाखरू"द्वारे स्वरधारांमध्ये चिंब होण्याचा योग रसिकांना मिळणार आहे. 

Saturday, August 30, 2014

कलोपासनेकडे ध्येय्यवादाने पहायला हवे

डॉक्टर श्रीराम लागू...

ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांच्या कुशलमार्गदर्शनाखाली १९७८ साली मुंबईत रविंद्र नाटय् मंदिरात नाट्य प्रशिक्षण शिबीरासाठी गेलो असताना..प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती केली.. एका रविवारी डॉ. श्रीराम लागूं सोबत शुटिंगलाही गेलो.
..ते विचार लेख स्वरुपात पुण्याच्या दैनिक तरुण भारत मध्ये जून १९७८ मध्ये प्रसिध्द झाले होते...या जुन्या मुलाखतीचे हे दर्शन या इथे देत आहे..अगदी तेच शब्द...यातून डॉक्टरांचे विचारदर्शन उलगडत जाईल..एवढीच अपेक्षा..ही आठवण आयुष्याची साठवण ठरली आहे..

------------------------------------------------------------------------------------------------------------------------


चला आपण चांदिवलीच्या स्टुडिओत जाऊ, तिथे निवांत गप्पा मारता येतील, पांढरा शुभ्र लेंगा, तांबडा गुरु शर्ट, डोळ्यावर चष्मा अशा वेशातले हे तरतरीत व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. श्रीराम लागू. ते मला सांगत होते. वरळीच्या हिंगोरानी हाऊसच्या डॉक्टरांच्या फ्लॅटवर मी त्यांची मुलाखत घेण्य़ास गेलो होतो..पण डॉक्टर साहेब निघाले होते `दोस्त दुश्मन`च्या सेटवर.
एका जंगलाप्रमाणे भासणा-या आवारात फाटकातून गाडी बैठ्या घरापाशी थांबते. हीच आमची मुलाखतीची जागा आणि इथेच आज राज कोहलींच्या दिग्दर्शनाखाली रॉय फिल्मच्या `दोस्त दुश्मन` सेटवर डॉक्टरांचे आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे शॉटस् घेतले जाणार होते. शत्रुसाब अजुन आले नव्हते.
प्रत्यक्ष प्रमाणाचा फायदा घेऊन मी विचारतो, हे श्रेष्ठ समजले जाणारे नट वेळ पाळण्याबाबत असे गहाळ का ?
“ तुम्ही आम्ही प्रेक्षक मंडळी त्यांना डोक्यावर चढवून ठेवतो. त्यामुळे हे लोक स्वतःविषयी मोठेपणाच्या काही कल्पना करून बसतात. लहरीपणा,वेळ न पाळता इतरांना ताटकळात लावणं यातच ते मोठेपणा मानतात”, बोलण्याच्या ओघात एक अजबच बात समजला. डॉक्टरसाहेबांना चष्म्याशिवाय़ जवळचेही फारसे नीट दिसत नाही आणि डॉक्टर स्टेजवर तर या अवस्थेत काही नाटकात त्यांचे काम अप्रतिम झालेले आपण पाहिले आहे..मग हे कसे काय?  मी विचारले.
“त्यांचं असे आहे मी तालमी मी चष्मा लावूनच करतो. सरावाने सारे काही पक्के होते. मग प्रत्यक्ष स्टेजवर चष्मा न लावता काहीच अडचण वाटत नाही.”
पण प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून नटाला हुरुप येतो. त्यांच्या अभिनय कौशल्याला उत्तेजन मिळते ..असे म्हणतात ना? मी आपली शंका प्रदर्शित केली.

“माझ्या बाबतीत नेमके उलटे आहे. प्रेक्षकांना मी पाहूच शकत नाही त्यामुळे त्यांच्या भल्याबु-या नजरांचा माझ्यावर परिणाम होण्याचा प्रश्नच येत नाही. उलट प्रेक्षक चार असले काय किंवा चार हजार असले काय. माझा अभिनय तोच रहातो. नूर पालटण्याची वेळ येत नाही कधी!”
दृष्टीदोष हा कधीकधी वरदान ठरू शकतो, त्याचेच हे बोलके प्रतीक.
असेच काही विषय चर्चमध्य़े य़ेतात. दरम्यान शत्रू साब हाजीर झालेले. शॉटस,सुरु, ओ.के. अनपेक्षित असा तोही आनंद मिळून गेल्याने मन उल्हसित झालेलं.
याच ओघात बोलताना डॉक्टरांनी जी मोलाची माहिती दिली त्यावरुन.. १८८५ ते १९२० हा मराठी रंगभूमिचा सुवर्णकाळ असे त्यांचे मत दिसले. त्याआधी रामलीला, भारूड, लळीत यातूनच नाट्याविष्कार होत होता, उसनवारीच्या आरोपाचा परामर्श घेताना त्यांनी म्हटले की, इंग्रज, मुस्लीम यांच्या संपर्काने परकीयांचे अनुकरण अपरिहार्य होते. भाषा, विचार, रहाणी, सवयी यांचा परिणाम घडणे स्वाभाविकच होते. पण विष्णूदास भावे यांनी मराठी रंगभूमिला कलाटणी दिली. विशिष्ष्ट वळण दिले आणि नवी शक्तीही दिली. जे चांगले आहे ते परकीयांचे असले तरीही स्वीकारायस हरकत नाही.
आजच्या मराठी रंगभूमिचा विचार करताना अन्यभाषिक रंगभूमिचे रंगरूप विचारात घेणे योग्य वाटते.. त्यासंदर्भात लागू म्हणाले, मुंबईत सादर होणारी गजराथी नाटके मराठी नाटकांची भाषांतरेच असतात. मूळ गुजराथी नाटके येत नाहीत. मराठीइतका प्रेक्षकवर्ग गुजराथी रंगभूमीशी निगडीत नाही. मराठी प्रेक्षकांपेक्षा बंगाली लोकांची नाटकांची आवड जास्त असावी. तसेच आपल्या आत्ताच्या प्रायोगिक नाटकांपेक्षा उडीया रंगभूमीवर धाडसी प्रयोग होत आहेत. लेखन, दिग्दर्शन, कलावंत व तांत्रिक या सर्वच बाबतीत मराठी रंगभूमी आघाडीवर आहे. जाणकार प्रेक्षक ही मराठी रंगभूमीवर असलेली कायम ठेव असल्याचे ते अभिमानाने सांगतात.

रंगभूमीवर आपण अनुकरण करतो व ते दिसते शिस्तीचे. काळानुसार समस्या बदलत असतात. नाटक, कविता, कादंब-या, ललित लेखन यांचेही असेच. जे वरवरचे होते ते टिकून राहणार नाही. काळाबरोबर वाहून जाईल व जे चांगले आहे ते टिकून आहे व राहीलेही , हे गडकरी देवल यांच्याक़डे पाहता लक्षात येईल. एखादे नाटक वाईट अथवा चांगले हे काळच ठरवितो. आपल्यापुरता आपण विचार करावा. मात्र उत्तेजन देऊन जे त्यातले चांगले आहे ते वाढविले पाहिजे. थांबवता किंवा आडवता कामा नये..असा विचार पूर्वीची व आत्ताची नाटके या संदर्भात बोलताना त्यांनी मांडला.
याच अनुषंगाने आजच्या प्रायोगिक रंगभूमीकडे चर्चेचा ओघ वळला. १९३२ सालापासून या प्रायोगिक या प्रकाराला सुरवात झाली. `आंधळ्यांची शाळा` पहिला यशस्वी प्रयत्न होता. `घाशीराम कोतवाल` व `अजब न्याय वर्तुळाचा` ही नाटके मला जास्त प्रिय वाटतात.
आजची प्रायोगिक म्हणविणारी नाटके एकमेकांचे अनुकरण करणारी आहेत. ते नविन प्रयोग नाहीत. असेच जर पुढे चालू राहिले तर नाटक त्याच अजब वर्तुळात फिरून मरून जाईल अशी भिती डॉक्टरांनी व्यक्त केली.
ठराविक साचा मोडून केलेले ते सर्व प्रायोगिक अशी सुटसुटीत व योग्य व्याख्या त्यांच्या मते हवी. अमूक तेच प्रायोगिक समजले पाहिजे. असे लेबल आपण लावू शकत नाही. प्रत्येक काळात प्रायगिक ची व्याख्य़ा बदलत जाईल. कालचे चे प्रायोगिक ते आजचे व्यावसायिक असले तरी आजचे व्यावसायिक उद्याचे प्रायोगिक राहणार नाही, असे विचार त्यांनी मांडले.

नाटकाचा आशय व तो सादर करण्याची पध्दत या दोन्हीबद्दल त्यानी चिंता दर्शविली. १९६० ते १९७० च्या दरम्यान हा प्रवाह मंदावला,. तेंडूलकर, कानिटकर यांच्यासारखे विशिष्ट वळणाचे लेखक आहेत. खानोलकरांप्रमाणे गूढ लेखन करणारेही आहेत. पण सतीश आळेकर, महेश एलकुंचवार यासारखे लेखक आज निर्माण व्हायला पाहिजेत. तसे झाले नाही तर ह्या प्रायोगिकतेला खिळे बसेल.
आजच्या संगीत रंगभूमीवर नवीन प्रयोग होत नाहीत याबद्दल खेद व्यक्त करुन ते म्हणाले, गाण्याकरीता गाणे हाच प्रकार आजच्या संगीत नाटकात पहायला लागतो. `घाशीराम कोतवाल`ची जात संगीत नाटकाची आहे. संगीत हा यातील अविभाज्य भाग आहे. सबंध समाजावर संगीत नाटकांचा परिणाम घडवायला गाणारे नटच राहिलेले नाहीत. संगीत नाटकाची परंपरा टिकविणे हा संगीत नाटककारांचा उद्देश असावा. केवळ नाटक संगीत असावे म्हणूनच गाणी त्यात टाकायची अशा स्वरुपाच्या विद्याधर गोखले यांच्या मंदारमाला, सुवर्णतुला इत्यदि नाटकांवरुन दिसून येते, असे परखड मत डॉक्टरांनी मांडले. संगीत नटांची उणीव निर्माण झाल्यामुळे जे आत्ता आहे तेच चांगले होत आहे असे मानावे लागते, याचा खेद त्यांच्या बोलण्यात आढळला.

दिग्दर्शक हा नाटकात भूमिका करणारा नसेल तर नाटकाचा पहिला प्रयोग हाच केवळ दिग्दर्शकाचा असतो. नाटकात दिग्दर्शक काम करत असेल तरच व नाटक दिग्दर्शकाचे मानले जावे..नाटक अयशस्वी झाले तर  दिग्दर्शकाच्या माथ्यावरच  याचे खापर फोडले जाते व त्याला जबाबदार धरले जाते..याबद्दल त्यांना खेद वाटतो.
संस्था-संस्थामध्ये सामंजस्याची भावना हवी. त्यामुळे नटावर एकाच प्रकारचे संस्कार न होता निरनिराळे चांगले संस्कार होतील, अशीही एक मार्मिक सूचना त्यांनी केली. प्रत्येक कलाकाराला स्वतःचे व्यक्तिमत्व घडविण्यात पूर्ण स्वातंत्र्य कुठल्याही संस्थेत आवश्यक असते, अशी भुमिका त्यांनी मांडली.

स्वतः डॉक्टर असूनही आपल्याला कलेसाठी पूर्ण वेळ द्यायला हवा म्हणून डॉक्टरांनी तो व्यवसाय सोडून ते नाट्य-चित्रपटाच्या क्षेत्रात आले. तिथे ते अभ्यासू वृत्तीने सर्वस्व ओतत आहेत. कुठलीही कला पूर्णवेळ देऊनच केल्यास तिचा खरा आविष्कार होतो व भूमिकेला योग्य न्य़ाय मिळतो. केवळ हौस म्हणून या कलेकडे पहाणारेही आहेत. पण ही अभ्यासाची कला आहे,असे त्यांचे प्रांजल मत आहे.
आजच्या नाट्य व्यवसायातील ९५ टक्के कलाकार अन्य ठिकाणी नोकरी करणारे आहेत. अन्य व्यवसायिकांच्या खांद्यावर उभी राहिलेली आजची व्यावसायिक रंगभूमी आहे . हे डॉक्टरांचे निरिक्षण आहे.
अस्सल कलावंताना उतेजन मिळत नाही. कलोपासनेकडे धेय्यवादाने कोणी पहात नाही याची कारणमिमांसा करताना डॉ. श्रीराम लागूंनी एक वेगळीच भूमिका मांडली. ते म्हणाले, `सिनेमा व नाटक  यामध्ये  सिनेमाकडे आज जास्त प्रेक्षकवर्ग ओढला गेलेला आहे. हा प्रेक्षक कलेकडे कला या दृष्टीकोनातून पहात नाही. करमणूक व आनंद इतक्या मर्यादित हेतूनेच आजचा प्रेक्षक अभिनयाकडे पहातो. आणि त्यातूनच सिनेमाकडे त्याचा ओढा वाढतो आहे. यामुळे आवश्यक तेवढ्या गांभिर्याने कलोपासनेकडे पाहिले जात नाही, त्याला उत्तेजन मिळत नाही.

स्वतः इंग्रजी दुसरीत असताना स्टेजवर पहिला अभिनय करमारे आणि आजवर अनेकविध नाटकातून आणि असंख्य चित्रपटातून आपल्या अंगच्या अभिनय कोशल्याने विविधपैलू चमकदारपणे दाखविणारे डॉक्टर श्रीराम लागू यांचे वरील विचार `आधी केले आणि मग सांगितले` या उक्तिप्रमाणे अधिकारवाणीने बोलले गेलेल आहेत म्हणूनच त्यांना तपश्चर्येचे आणि कर्तृत्वाचे नैतिक पाठबळ आहे.






















सुभाष इनामदार,पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276




Monday, August 18, 2014

नगरच्या क्षीरसागर मठात रंगला भक्तिसंगीताचा सोहळा



अहमदनगरच्या क्षीरसागर महाराजांच्या मठातल्या श्री दत्त देवस्थान ट्रस्टच्या दत्तमंदिरातल्या भव्य मंडपात काल रविवारी पुण्याच्या राजेंद्र दिक्षित आणि सौ. जयश्री कुलकर्णी यांच्या भक्तिस्वरांनी भाविकांच्या मनात संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ , संत भानुदास महारांच्या रचना सादर झाल्या. काल तिथे होता रात्री १२ वाजता..श्रीकृष्ण जन्मोत्सव..त्यानिमित्त ही सेवा दत्तात्रयांच्या मूर्तिसमोर सादर करताना वेगळ्याच वातावरणाने सारेच भारून गेलो होतो..

नगरच्या त्या सुमारे चार एकराच्या परिसरात विस्तारलेल्या मठात क्षिरसागर महाराजांच्या पावन स्पर्शामुळे मनात एक वेगळीच चेतना जाणवते. पुण्यातले आम्ही कलाकार तिथे अभंग, गवळण सादर करीत वातावरणात आनंद निर्माण करीत होतो.
भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्याकडे गाण्याची रितसर रियाज केल्यानंतर राजेंद्र दीक्षित आपले स्वतंत्र अभंगवाणीचे आणि भक्तिगीतांचे कार्यक्रम सादर करतात.राम कृष्ण हरी च्या सुरवातीच्या गजरा पासून कान्होबा तुझी घोंगडी पर्य़त मोजके पण नेमके अभंगरचना सादर करून  त्यांनी आपले कसब सिध्दज करुन भक्तांकडून शाबासकी मिळविली..

बार्शीच्या व्यंकटेश बुरली यांचेकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेल्या जयश्री कुलकर्णी यांनी काही गवळणी गाऊन आपली सेवा सादर केली.

संगीताला योग्य असा भक्तिरसाची आवड असणारा भाविक मिळाला की गाणा-या कलावंताला उत्साह येतो..काल तसेच झाले होते. या रचनातून देवाला शोधण्याचे,त्याच्याशी संवाद साधायचे माध्यम उपलब्ध झाले.. काल सारेच जण त्या मोहमयी सामाधानी वातावरणात भावभक्तिची उपासना करत होते.







श्री दत्त देवस्थानचे शिस्तशीर कार्य आणि तिथल्या पदाधिका-यांची वागणूक यामुळे पहिल्यांदाच मठात गेलेले आम्ही सारे समाधानी होऊन परतलो. मुख्य असलेले प्रधान काकांनी सर्वांचा प्रसाद देऊन सत्कारही केला.. 

सुयश बलकवडे (पखवाज), विनित तिकोनकर (तबला), मंदार गोडसे (हार्मोनियम), आनंद टाकळकर (टाळ) आणि सौ. चारुशीला गोसावी (व्हायोलीन) याच्या सुविद्य साथीने गाण्याला ताल.लय आणि नादमयता लाभली..ती इतकी की सारे तन्मय होऊन..अभंगरचनेला टाळ्यांनी दाद देत आस्वाद घेत राहिले. कार्यक्रमाच्या निवेदनाची बाजू यावेळी सुभाष इनामदार यांनी सांभाळली..



अशा वातावरणात अभंगवाणीचे संस्कार त्यापरिसरात वेगळीच भावीकता निर्माण करत होते हे नक्की.

Monday, August 11, 2014

`दिल की बात` ला.. बहुत अच्छे..ची दाद...


पुण्यात गजल गायनाचे विविध कार्यक्रम होतात. त्या गायनाची गजलचे अर्थ उलगडून स्वरांच्या सुरील्या मैफलीतून उमटविणा-य़ा अशाच एका संस्थेने `साज`ने `दिल की बात` द्वारे स्त्री गजल गायिकांचे पुनःस्मरण केले..श्रुति करंदीकर आणि गायत्री सप्रे ढवळे या दोन गायिकांनी त्या सादर केल्य़ा आणि रसिकांकडून तोंडभरुन कौतूक करुन घेतले. हे सांगायला तसा बराच उशीर झालाय कारण तो कार्यक्रम २ ऑगस्टला पुण्यात पत्रकार संघात होऊन गेला..परंतू देरसे आये ..दुरुस्त आये,,असच काहीसे म्हणतात ना त्याप्रमाणे.
ये इश्क नही आसॉं, दूर है मंजिल, गुलोंमे रंग भरे, आणि नुकताच झालेला तसव्वूर..असे गजलांचे कार्यक्रम करून त्यात आपली मुशाफिरी जगजाहिर करणा-या `साज` या संस्थेने मागच्या पीढीतल्या पाच नामवंत गजलगायिकांना या कार्यक्रमातून मानाचा कुर्निसात केला..तोही जाहिरपणे..

सुरवात झाली फरिदा खानम यांनी गायलेल्या गालिब च्या इब्ते मरियम हुआ करे कोई..या गजलने. रागेश्री रागावर आधारित गजलचा डौल पूर्णपणे शास्त्रीय ढंगाचा होता. इथूनच मैफलीत रंग भरायला सुरवात झाली. श्रुततति करंदीकर यांनी तेवढ्याच समरसतेने ही गजल सादर केली.
सर्वांना परिचित अशी मेहदी हसन यांनी गायलेली मुहबत करनेवाले कम न होंगे.. ही गजल सुरु होताच श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. गायत्री सप्रे-ढवळे यांनी ती गजल सादर केलीही उत्तम..त्यातल्या सा-या अर्थाला समजून ती गायली गेल्याने प्रेक्षकांनी नंतरही टाळ्यांनी कलावंतांना प्रोत्साहन दिले..
मधुरानी यांच्या दोन गजला श्रुति कंरदीकर आणि गायत्री सप्रे-ढवळे यांनी एकामागोमाग एक पेश केल्या. न वो बात कर मेरे हमनावा आणि वो जो हममे तुममे करार था..या गजलनी वातावरण तयार झाले. रुपक तालातल्या वेगळ्या वजनाच्या या दोन गजलांचा रसिकांना भरभरुन आनंद घेतला.

सर्वांत शेवटी आबिदा बेगम यांनी गायलेल्या जबसे तूने मुझे दिवाना बन रखा है या भैरवीतल्या गजलला पेश केले ते दोन्ही गायिकांनी एकसुरात  यामुळे हा सहगजल गाण्याचा वेगळा प्रयोगही आकर्षक होता.
दोन गायिकांनी एकाच बैठकीत गजल गायन करण्याचा पुण्यातला हा एक दुर्मिळ योग होता...हे नक्की..








कार्यक्रमात हार्मानियमची साथ केली ती कुमार करंदीकर यांनी..ती नुसती साथ नव्हती तर या वाद्यातून ते गातही होते..इतके ते तंतोतंत बरोबर संगत करीत गायनाला रंगत चढवित होते. ताल म्हणजे तबल्यातून बोलत आपल्या बोटांनी ते अरुण गवई..हिंदी आणि उर्दुची जाण ज्यांच्या निवेदनातून क्षणोक्षणी दिसत होती..त्या नीरजा आपटे...


एकूणच ही दिलकी बात अशीच चालू रहावी आणि श्रोत्यांनी बहुत अच्छे..म्हणून दाद देत रहावी अशी ही मैफल होती ..

Monday, July 28, 2014

संगीतातले अस्सल हिरे-अजय-अतुल


-अजय-अतुल यांच्याबद्दल भास्कर चंदावरकरांचे मत
ज्येष्ठ संगीतकार , ज्येष्ठ सतारवादक आणि संगीताचे अभ्यासक पं. भास्कर चंदावरकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनामित्ताने आजचे आघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांची मुलाखत होती..त्या प्रसंगी त्यांच्या पत्नी मीना चंदावरकरांनी आपल्या कलाकार पतीबद्दलचे मनोगत व्यक्त केले..त्यातून काही प्रमाणात चंदावरकर आणि त्यांचे कर्तृत्व कळेल..म्हणून मुद्दाम तेच त्यांचे विचार तुमच्यापर्य़त थेट पोचविण्याचा हा प्रयत्न...

ही पाचवी आणि शेवटची स्मृतीमाला आहे. हे वाचून काहीजणांना आश्चर्य आणि वाईट वाटेल. त्यांनी तसं मला पत्रानं किवा फोन करुन कळवलही. संगीताशी संबंधित असलेल्या आणि विशेषतः चंदावरकर यांना ज्यांचे संगीत फार प्रिय होत असा व्यक्तिंना बोलावण्याची ही संधी आम्हाला घालवायची नव्हती. त्यांना काही संगीतरचनाकार फार प्रिय होते. ते म्हणायचे संगीतरचनाकर आणि चाली पाडणारी माणसं यात जमीन आसमानचा फरक असते. कंपोजर आणि ट्यूनमेकर हे निराळेच असतात.
त्यांना अजय-अतुल यांच्या रचना अतिमनःपूर्वक आवडायच्या. त्या दोघांच्या सांगितिक प्रतिभेबद्दल आणि सर्जनशीलतेबद्दल त्यांना खूप कौतूक आणि आदर वाटत असे. ते आम्हाला माहित होतच. चंदावरकरांना आवडणारे संगीतकार म्हणजे सलील चौधरी, मदन मोहन, सी.रामचंद्र, पं. रवीशंकर, एस.डी.बर्मन, आर.डी.बर्मन तसेच मराठीतले वसंत पवार आणि राम कदम . संगीत सागरात अवगाहन करून सांगितिक विचारांची रत्न आपल्यापर्यंत पोचविणारे संगीतरचनाकार हा त्यांचा मानसिक, वैचारिक विसावा होता. एस. डी बर्मन आणि अजय-अतुल यांच्यामध्ये चंदावरकरांना एक साम्य आढळत असे. सहा वर्षाच्या मुलापासून ते साठी-सत्तरीच्या वृध्दांपर्यत सर्वांना बर्मनदांचं आणि अलीकडे अजय-अतुल यांचे संगीत त्यांच्या तालावर आणि नादावर डोलायला लावत असे.
याचा प्रत्यक्ष अनुभव मला आणि माझ्या सहकारी शिक्षकांनी चांगलाच आला. शेकोटीसाठी रात्रीच्या वेळी सहा वर्षांची दोनएकशे मुले शाळेत बोलावली होती. शेकोटी झाली. खाणं झालं. खेळ झाले. थोडसं झोपाळलेला एक मुलगा साधारण साडेदहा अकराच्या सुमारास अगदी ताला-सुरात म्हणाला...` टिचर, जाऊ द्या ना घरी, आता वाजले की बारा...` मग काय इतरांनीही त्याच ठेक्यात सुरु केले....वाजले की बारा..  चंदावरकर जे म्हणत असत, त्याची प्रत्यक्ष प्रचिती आम्हा सर्वांना इथे आली.
अजय-अतुल यांच्या रचना ऐकल्यानंतर त्यातली सौदर्यस्थळं, पार्श्वसंगीतात वापरलेल्या साजांमधून, त्या रचनेला लाभलेलं वेगळं अस्तित्व आणि पुन्हा त्याचं त्या रचनेत मिसळून जाणं. काही खास जागा, काही अनवट संगीतक्षण. वाद्यांचा अचूक आणि परिणामकारक वापर आणि विशिष्ठ प्रकारे लावलेल्या स्वरांमधली जादू.. यातील संगीतसौदर्य़ चंदावरकर आम्हाला विश्लेषण करुन सांगत.त्यानं आमचही सांगितिक उन्नयन होत असे.
इथल्या मातीतला गंध..संगीतात आलाय..
ते म्हणायचं, ही पोरं संगीतातले खरे आणि अस्सल हिरे आहेत. इथल्या मातीतला गंध, मूलतत्वं आणि बाज त्यांच्या लोकसंगीतात मुरलेली आहेत. असं संगीत बांधणारे पहिले लोकसंगीतकार वसंत पवार. दुसरे आमचे रामभाऊ कदम. त्यांनंतरचे तिसरे म्हणजे अजय-अतुल. आपल्या ह्दयातून, भावभावनांमधून, जोशामधून, आवाजामधून आणि रचनाकौशल्यामनधून रसिकांच्या मनात शिरणारे आणि थेट ह्दयात घुसणारे आजय-अतुल. त्यांच्या संबंधात चंदावरकर म्हणत असत..बंदो मे है दम..!
रचनाकार हा बुध्दिमानच असतो अशी चंदावरकरांची खात्री होती. आपल्या देशात कित्येक वर्षे लोकसंगीत हे गावकुसाबाहेर, देवळा बाहेरच राहिलं आणि त्यामुळे हे साधक, शैक्षणिक परिघाबाहेर राहिले. दुर्दवाने त्यांची क्षमता इतर कुणाला फारशी लाभलीच नाही आणि या संगीतकारांना सामाजिक प्रतिष्ठाही लाभली नाही. त्यामुळे संगीतकार बुध्दिमान असतो, त्याचा सांगितिक स्वतंत्र विचार शब्दांनी नसेल, तर त्याच्या स्वरातून, रचनातून मांडू शकतो हे कळण्याची क्षमताच आपल्यातल्या असांगेतिकतेमुळे नष्ट झाली. पं. भीमसेन जोशी म्हणायचे, `गाणं हे माझे काम. ते विचार बिचार काय असेल ते तुम्ही बघून घ्या.`........ ते बुध्दीमान आणि विचारवंत नव्हते असं कोणी म्हणू तरी धजेल काय?

एकांडे शिलेदार
चंदावरकर जरा एकांडे शिलेदारच होते. त्यांनी लोकसंग्रह कधी केलाच नाही. ते त्यांना जास्त आवडतही नव्हतं किंवा जमलही नसेल. त्यांच्यात तो एक चांगला गुणच नसेल असं मी म्हणते. त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची गूढता, व्यासंगी वृत्ती आणि प्रखर बुध्दिवाद होता. त्यांचा गुरुबाजीवर आजिबात विश्वास नव्हता. लोकांनी त्यांच्या फार जवळ येणे त्यांना आवडत नसावं. त्यात दोन अपवाद... अरुण खोपकर आणि ऋषीतुल्य रामकृष्णबाब नाईक.
ब-याच लोकांनी तुम्ही आम्हाला..मला तुमच्याजवळ का येऊ देत नाही अशी तक्रार त्यांच्याजवळ किंवा कधी माझ्याकडेही केली होती. माझ्या मते त्यांचं कारण असं आपण किती संवेदनाशील आहोत ते कुणाला..म्हणजे कधीकधी आम्हालासुध्दा.. कळू नये अशी त्यांची तीव्र इच्छा असे.
आपलं  शारीरिक आणि मानसिक दुःख कोणाजवळ बोलावं हे त्यांना मानवतच नसे. त्यांची तीव्र संवेदनशीलता emotionality लोकांपर्य़त पोचावी, त्यांना ती कळावी असं वाटणे म्हणजेच एक प्रकारचं मानसिक दौर्बल्य आहे असं त्यांना वाटे. मी काही त्याचं psychologsis   करु मागत नाही . परंतु अशा वागण्यामुळे लोकांना ते शिष्ट, तुसडे किंवा अहंकारीसुध्दा वाटत. अर्थात ती सगळी मानसिकता, त्यांची सर्जनशीलता, आंतरिक तळमळ त्यांच्या कलेमधून रसिकांपर्य़त, निदान ब-याच रसिकांपर्य़ंत पोचली असे मला वाटतं.
एका बाजुला चंदावरकर, उत्तम रसिक, खूप आनंदी, सतत खळखळाची हास्य करणारे, इतरांना हसवणारे, स्वच्छंदी आणि तीक्ष्ण विनोदबुध्दीचे होते. परंतु त्यांचा गाभा सखोल बुध्दिमत्तेचा, सर्जनशीलतेचा, सतत वैचारिक सत्य धुंडाळण्याचा होता.
ते खेळकर होते. वाडीया कॉलेजच्या विजयी टीमचे कप्तान आणि Fast pace opening बोलर होते. टेबलटेनिसचे triple crown winner होते. ते नखचित्रं काढत. Paintings  करीत आणि रोज रात्री सतारिचा रियाज करीत. त्यांनी सितारीते ४०  दिवसांचे दोन चिल्ले केले होते.  त्यांना केलेली दगडी आणि इतर शिल्पं आमच्या घरी आहेत
आमच्या घरासमोरचा शंभऱ फुटी रस्ता वयाची ७१ वर्ष पूर्ण होईपर्यंत रोज ते झाडत असत. ६५ वयापर्य़ंत घरातलं सगळ प्लबींग तेच करत. झाडांना रोज पाणी घालणं हा पुण्यात असताना त्यांचा सकाळचा उद्योग होता. आमच्या घरच्या चित्रासाठीच्या जवळजवळ सगळ्या लाकडी फ्रेम त्यांनी लाकूड विकत आणून स्वतःच्या हाताने बनविलेल्या आहेत. मणीपूर, केरळ, किरगीस्तान पर्य़ंत खाल्लेले पदार्थ घरी बनवून घरच्यांना किंवा खास पाहुण्यांना खाऊ घालायचा छंद त्यांना होता., या सगळ्यांच्यावर त्यांना गप्पा मारायची मोठी हौस होती. एकीकडे मी त्यांना एकांडा शिलेदार म्हणते आणि गप्पा मारण्याची होस होती असही म्हणते. माणसं अशीच असतात, विरोधाभासापूर्ण, या गप्पांमुळेच त्यांच्या हातून एकच ( आणि माझ्या हातूनही एकच)  पुस्तक ( वाद्यवेध) लिहलं गेले. आमच्या गप्पांची गोष्ट तर अविश्वसनीय आहे..
त्यांच्या मोठ्या सांगितिक कामाबद्दल त्यांना recongnition मिळालं नाही किंवा ज्यांनवा opus work म्हणावं असा त्यांच्या संगीतरचना लोकांना ऐकायला मिळाल्या नाहीत याची मला खंत आहे. अर्थात सगळ्या लहान किंवा मोठ्या कलाकारांच्या बायकांना तशी ती असतेच. विशेष म्हणजे ती खंत त्यांना मुळीच नव्हती. त्यांचे संगीत कुणी उचलून वापरलं तर त्यांना काहीही वाटत नसे,  म्हणायचे `ते चांगलें आहे असं वाटलं म्हणून ते आपल्या नावावर खपवतात, म्हणजे बरचं आहे ना.. निदान स्वतःच्या मनात तरी ते उचले तसं कबूल करत असतील.`
चंदावरकरांना आतून, मनातून स्वतःच्या रचनांबद्दल एक कलातम्क आत्मविश्वास वाटायचा. त्यांच्या काही उत्तमोत्तम रचना, मोठी कामं लोकांपर्य़त पोचली नाहीत किंवा पोचूनही कळली नाहीत याची खंत आम्हाला वाटायची. तेव्हा शांतपणे ते आम्हला म्हणायचे, `लोकांना आवडो न आवडो. तुम्हाला आवडली ना? मग झालं!` अशी कलंदर वृत्ती त्यांच्यात होती . ` यावेळी नाही माझ्या हातून चांगलं संगीत झालं..`असं म्हणायचा प्रांजळपणाही होता..

-मीना चंदावरकर, पुणे

Wednesday, July 16, 2014

घरच्या गुरुची आगळी पूजा...


संगीताचा वारसा जपणारी परंपरा आता पुढे जाणार याची खात्री पटविणारा एका कलावंत आजींचा डॉ. ज्योती ढमढेरे  यांया कार्यक्रम अनुभवला आणि खरोखरीच भारावलेल्या अवस्थेत बाहेर पडलो.. खरं तर मी त्यांना पुण्यातल्या भरत नाट्य मंदिराच्या समोरच्या डॉ. ढमढेरे वाड्यात शास्त्रीय संगीत, गझल शिकणा-या आणि कायाकल्प मधून स्त्रीयांवर उपचार करणारे क्लिनिक चालविणा-या कलावंत राहतात हे ओळखत होतो.. कट्यार मध्ये छोटा सदाशिव असलेला जयदीपची आई..हे ही ओळखत होतो..हो आणखी एक सुमारे दोन वर्षापूर्वी त्यांच्या मुलीने अनुपमाने `नेसली निळी पैठणी.`.ह्या आईच्या लावण्यांवर कार्यक्रम करुन त्यांच्या काही लावण्यांची झलक दाखविली..सीडीही प्रकाशित केली..तीही सुलोचना चव्हाण यांच्या हसते. हे ही स्मरते.



पण आज परंपरा..या रंगमंचावरील कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. ज्योती ढमढेरे यांच्यातल्या कवीला..गीतकाराला , संगीतकाराला,गुरुला आणि प्रसंगी स्वरचित बंदिशींतून जेव्हा १३ जुलैला रविवारी संध्याकाळी पडदा वर गेल्यावर ज्या रुपात त्या भेटल्या त्यातून त्यांच्याविषयी आदर वाढला..आपोआपच अरे आपल्याला हे सारे का नाही आजपर्य़त कळाले याचे वाईट वाटले..आणि आपल्यालाही असे जमेल काय..यासाठी आशीर्वाद मिळावा असी प्रतिभा त्यांच्यामध्ये आहे याची खात्री पटली...आणि म्हणूनच या नव्या रुपाची ओळख करुन घेतली.


 

खरं तर १२ जुलैला गुरुपौर्णिमा होती..हा कार्यक्रम १३ जुलैला होता..म्हणजे घरच्या गुरुची ही पूजाच होती जणू... रवींद्र खरे यांनी त्यांच्यातल्या अनेक पैलूंची ओळख पटवून दिली..खरं तर आपल्या घरातली अशीच एकादी व्यक्ति असते..जिच्यापाशी अनेक गुण असतात..तीही गुरुच असते..पण आपण तिचे ऋण असे जाहिरपणे फारसे मानत नसतो...घरच्या जबाबदा-या सांभाळून केलेली ही गुणांची पूजा या निमित्ताने बांधली गेली आणि आपल्यासारख्या असंख्य मातांना..त्यांच्या कर्तुत्वाला ती समर्पित केली गेली..

स्वतःबरोबर घरातल्यांना मोठं करणारी ही कर्तुत्ववान महिला महिला म्हणूनही त्यांची ओळख नव्याने करुन द्यावी लागणार आहे..आज त्यांचे वय ७० आहे..पण बालपणीचा श्रीरामपुरातला गावचा संस्कार..पुण्यात आल्यावर झालेला नवा परिचय..यातून स्वतःची संगीताशी वेगळी ओळख करुन..खॉंसाहेब महोम्मद हुसेन..यांचेकडे घेतलेले शास्त्रीय संगीताचे धडे..काही काळ संजीव शेंडे नंतर असिफ खान आणि मग बाळ माटे यांचेकड़ून भजनाचे घेतलेली तालिम सा-यांची मोट बांधून आपल्या मुलीला जी `सप्तक` नावाची संगीताची संस्था काढून त्याव्दारे संगीताचे शिक्षण अमेरिकेत देते आहे..आपल्या मुलाला जयदिपला आणि पुढे ते सई, आनंद आणि सायली दलाल या मुले आणि नातवांपर्यंत पोहचविले..आणि संगीताची परंपरा...साकारली..


सहजपणे त्यांना काव्य स्फूरते..ते मनात साठते..मग कागदावर उमटते...तसेच काहीसे..यातून गझल..रागांच्या बंदिशी, भावगीत, भजन, भक्तिगीत, लावणी..सारेच शब्दांचेबंध त्यांच्याकडून होत गेले..आणि मग काय हा नाजूक मोग-याचा फुलांचा निट गुंफलेला हार त्यांनी मुलांच्या नातवांच्या मुखातून रसिकांसमोर सुगंधित केला...


अगदी मनोगतातून व्यक्त झालेल्या त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे...दर दहा वर्षींनी माझ्या आयुष्यातल्या रंगाची छटा बदलत गेली..त्यात नवे रंग मिसळत गेले. ह्या स-या रंगंछटांचा एक सुंदर गोफ तयार झाला..तेव्हा प्रथम या सप्त रंगाचा मला साक्षात्कार झाला. या रंगातील एक रंग सुरांचा, लयींचा, तालाचा, उपज आणि बंदिशींची. मला आठवत तसं. मी सुरांच्या संगतीत आहे. ती संगत आई-वडीलांनी स्वतः पाणी घालून सशक्त केली. शब्द उशीरा साथीला आहे..पण साहित्यकला आणि संगीत हे माझ्या प्रेमाचे..


आज हे मोग-याचे इवलेसे रोपटे मी न लावताच माझ्या दारात सजले, वाढले आणि घमघमले..या गगनावेरी गेले..माझी तिन्ही मुले आणि नातवंडं गानप्रमी आहेत...केवळ प्रेमीच नव्हे तर गानवेडी आहेत..हे तुम्हाला समजेलच..




जसजसा कार्यक्रम फुलत गेला..


तसतसा कन्या..तीची मुलगी यांनी सादर केलेली रागदारी..नातीचा..सुरेल स्वराविष्कार...जयदिपचा लागलेला आवाज..त्याचे हळुवार सादरीकरण...मुलीची ठसकेबाज लावणी...सईने सादर केलेले गीत..आणि नातू आनंदने गीटारीच्या संगतीत म्हटलेले भावगीत...सारेच मग अनमोल संगीत पचविलेल्या आजीच्या बटव्यातून बाहेर येत येत..उपस्थित रसिकांच्या टाळ्यांनी पसंतीस उतरत होते...


खरं तर..त्यांनी एक गीतात सांगितल्या प्रमाणे..


कठीण कठीण मार्ग तरी रमत गमत चालले

मिटुनि सुख नेत्र मी हसत हसत चालले...


अशी अवस्था होत गेली..



पती डॉ. दिनकर ढमढेरे यांची ८०व्या वर्षींची साथ..सून उज्वला हिची घरातली मदत..अनुपमाने संगीताची सेवा करण्यासाठी निवडलेली स्वरमयी वाट...आणि जयदिपच्या सोज्वळ,निर्मळ स्वरातून फुलविलेला हा संगीताचा पिसारा...इथे फुलत..नव्हे डुलत होता..



घरातल्या सा-यांचे हे कौटुंबिक नाते...संगीताच्या बंधनात एका धाग्यात गुंतलेले पाहताना..मन भरून येते..आणि तृप्त पावते..



तिनपिढ्यांची ही संगीत परंपरा राजेंद्र साळुंके, नरेंद्र चिपळूणकरआणि राजू जावळकर यांच्या साथिने उपस्थितापर्यंत पोहोचली आणि आवडीलीही 


हा नेहमीचा पारंपारिक कार्यक्रम नाही...पण परंपरेची किंमत सांगणारा आणि इतरांना परंपरेचे महत्व पटविणारा नक्कीच होता.म्हणूनच..वेगळा...आगळा.





-सुभाष इनामदार,पुणे
 subhashinamdar@gmail.com
9552596276 

Tuesday, July 8, 2014

`तसव्वूर`..पुन्हा पुन्हा अनुभवावा असाच




संगीत क्षेत्रातली आणि गझल क्षेत्रातली मंडळी कान देऊन ऐकणार हे तर नक्की होते..पण एक  शास्त्रीय संगीतात अनेक दिग्गज कलावंतांना हार्मोनियमच्या साथीने रंगत आणणारा हा गायक गझल कशी काय सादर करणार..या प्रश्नाने आणि उत्सुकतेनेही शनिवारी १४ जूनला पत्रकार संघाचे सभागृह हाऊसफुल्ल झाले...काही कारणारे निवेदिका निरजा आपटे उशीरा आल्या पण सुरवात करुन दिली ती कुमार करंदीकरांच्या गुरु शशिकला शिरगोपीकर यांनी...आणि मेहदी हसन यांची देख तो दिल के जॅां से उठता हे धुऑंसा कहॉं से उठता है...कुमार करंदीकरांनी जो आवाज लावला...आणि टाळ्यांनी दिलेल्या प्रतिसादाने प्रेक्षागृहातली रसिक या कार्यक्रमाला दाद देणार हे पक्के ठरुन गेले...तसेच झाले...ती संध्याकाळ आजही कालच झाल्यासारखे वाटले...आणि कुमार करंदीकर यांची गझल गायक म्हणून नव्याने ओळख पटली..
खरं तर ते हार्मानियम वादक..आणि  काही गीतांना चाल दिलेले म्हणून संगीतकारही पण आज ते मेहदी हसनच्या गझलांचा अभ्यास करुन त्यावर स्वतःची मोहर लावून त्यांनी जी मैफल सादर केली..वा क्या बात है..


व्यासपीठावरच्या  मोजक्या साथीदारांसह एकेक गझल सादर होत होती..आणि कुमार करंदीकरांचा आवाज तापत गेली..गझल गायकाला लाभलेला पातळ आवाज..शब्दांचे वजन..मतल्यातला अर्थ सारेच एकेका गझलच्या शब्दांनी रसिकांच्या मनात घर करुन बसले..आणि मग ती मैफल त्यांचीच होत गेली..मग सभागृहातील मंडळींची दादही तेवढी मिळाली नाही तरच नवल. आजकाल आपण सारेच अनेक वाद्यांच्या गोगाटात शब्द-स्वर, भाव हरवलेले गाणे ऐकतो..पण इथे या कार्यक्रमात दोनच वाद्यांच्या साथीने कुमार करंदीकर अतिशय ताकदीने, उटावदारपणे श्रोत्यांना गजला अस्सल आनंद देत होते.

बात करनी मुझे मुश्किल, आब के हम बिछडे, रंजीश ही सही, मुहोब्ब्त करनेवाले ,जब उस जुल्फकी ...या आणि अशा अनेक गजलांनी रसिक गजल गायन ऐकण्यात तल्लीन झाले होते.आणि कुमार करंदीकरांची हार्मोनियमवर फिरणारी बोटे, उत्कृष्ट स्पर्शकृती आणि तितकीच भावपूर्ण आवाजातील गजल, स्पष्ट शब्दोच्चार आणि तालाच्या  संगतीत फिरणारा तो मुलायम.पातळ आवाज...बहरत जात होता..आणि वजनदार दर्दी रसिकांकडून पसंतीस उतरत होता..

दिलमे अब यू, वो जरासी बातपर खुली जो ऑंख या गजला श्रोत्यांनी मनात साठवून ठेवल्या. गजल गायनाबरोबरच निरजा आपटे यांच्या प्रश्नांना उत्तरे देत कार्यक्रम रंगतदार होत होत...आपण गायक आहोत..आत्ता कुठे भाषा आणि त्यातली खुबी शिकतो आहे..असे सांगत..मला गजलकडे जाऊ द्या..असे सांगत पुढच्या टप्प्यावर ते नेत होते..
निरजा आपटे यांचे निवेदन म्हणजे उत्तम शेर, मेहदी हसनजींच्या आठवणी सा-यातून फुलत रसिकांशी संवाद करत पुढे जात होते.

तबला वादक अरुण गवई याची साथही हवी तशी मृदू तरीही आक्रमक न होता...शब्दांना दाद देत होत होती.
एकूणच गजल गायनात बहरलेले मेहदी हसन यांचे कर्तृत्व कुमार करंदीकरांच्या गजल मधून इथे पुरेपुर साकारले गेले आणि कुमार करंदीकरांच्या साज संस्थेच्या पुढच्या कार्यक्रमाची अपेक्षा अधिक काही नवे देऊन जाईल याची खात्री पटविणारे ठरले..



अशा अनेक कार्यक्रमांसाठी ज्यांच्याकडे पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल असे..
-कुमार करंदीकर (९८२२२५१४५५ Email- kumarkrandikar@gmail.com)
-सौ. श्रुती कुमार करंदीकर..(9420322796 Email-shrutikumark@gmail.com)