Wednesday, November 11, 2015

सण आला दिवाळीचा..उजळू दिवा अंतरीचा



दिवाळीच्या आठवणी अजून ताज्या आहेत मनात ! पहाटेची शांतता, पेंगलेल्या डोळ्याना जागं करणारा थंडीचा सुखद गारवा.. अंगणातल्या चुलीवर उकळणारा पाण्याचा हंडा..आसमंतातल्या फुलांचा उटण्याच्या सुगंधात मिसळून गेलेला तो दर्वळ..उष्णोद्काच्या अभ्यन्ग स्नानाची शरीराला वेढून राहिलेली ऊब.. तुळशीपुढे पणत्यांची रांगोळी आणि आकाशात झगमगणारी चांदण्याच्या दिव्यांची आरास! मग तुळशीसमोर बसून नमस्कार करायचा आणि म्हणायचं ,

दिवा लावला तुळशीपाशी | उजेड पडला विष्णूपाशी ||

वसुवारस म्हणजे दानाचा दिवस.. नरक चतुर्दशी म्हणजे अभ्यंग स्नानाचा दिवस. लक्ष्मीपूजन म्हणजे आल्या लक्ष्मीला नमस्कार करून दाखवण्याच्या कृतज्ञतेचा दिवस.. बलिप्रतिपदा हा घरच्या लक्ष्मीचा म्हणजे पतीने पत्नीचा सत्कार करण्याचा दिवस.. भाऊबीज हा भावाबहिणीच्या प्रेमळ बंधाचा दिवस ! घरच्या गाईगुरांपासून आप्तेष्ट आणि सगेसोयरे अशा सर्वांचे ऋणानुबंध जपणारी, सर्वाना एकत्र गुंफून रांगोळी बनवणारी दिवाळी! ‘अस्तु दीपावली तुष्टये पुष्टये |’ म्हणजे ‘ही दीपावली सर्वाना सुखसमृद्धीची जावो’ अश्या शुभेच्छांचे प्रसन्न रंग भरणारी दिवाळी!वर्षे सरली . दिवाळी बदलली. जुने अंघोळ, उटणे,उब शब्द गेले. त्यांचे संदर्भ हरवले. त्या जागी फटके, फराळ ,फन आले. आता ईफन आणि ईफराळ ईफोन वरून बागडू लागले. जगाच्या एका टोकाच्या ईफोनवर दिवा लावला की त्याचा उजेडच नव्हे तर तो दिवा दुसऱ्या टोकाच्या ईफोनवर उमटू लागला. दिव्यांच्या झगमगाटी दुनियेत पणतीचा प्रकाश लोपून गेला... सगळं जग आता एकाच आकाशाखालचं अंगण झालं आहे....

.........सगळं जग आता एकाच आकाशाखालचं अंगण झालं आहे! येईल का त्याचा फायदा घेता? येईल का लावता परंपरेचा नवा अर्थ आता ? जुने संदर्भ नव्या कल्पनांशी येतील का जोडता ? आपले सगे सोयरे आणि मित्र यांच्या पलीकडे जाऊन आणखी चार जणांच्या घरात सुखसमृद्धीचा दिवा येईल का लावता?....
त्यासाठी आपल्या अंतरातला दिवा उजळावा.. स्नेहाचा आणि समवेदनेचा !

वसुवारसाच्या दिवशी दानाचे संकल्प सोडावेत. दान पैशांचं, वेळाचं, बुद्धीचं! आपल्याला जमेल आणि सुचेल तसं काही तरी काम हाती घ्यावं.
धनत्रयोदशी हा धन्वंतरीपूजेचा दिवस. आपले आरोग्य हे आपले सर्वात मोठे धन. ‘आरोग्य सलामत तो पगडी पचास!’ तेव्हा मिळालेल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. ते कसे टिकवावे याचा विचार करावा.
नरक चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराच्या तावडील्या स्त्रियांची मुक्तता केली. त्यांची आठवण म्हणून आपण अडलेल्या, गांजलेल्या महिलांसाठी काही कामाचे संकल्प करावे.
लक्ष्मीपूजन करावे दीपलक्ष्मींचे ! कोण या दीपलक्ष्मी ? मला भेटल्या काही महाराष्ट्रात! ‘नाही मी एकटी मला मिळाल्या सख्या’ अशा प्रकारचे महिलाना एकत्र आणणारे महिला बचत गट महाराष्ट्रात अनेक आहेत. त्यांच्यासाठी काही काम करणे हे लक्ष्मीपूजन !

बलिप्रतिपदा ही बळीराजाची.. येईल का काही करता आपल्याला महाराष्ट्रातल्या बळीराजा शेतकरी लोकांसाठी ?..

भाऊबीजेला आमच्या लहानपणी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची भाऊबीज फंडाची पेटी फिरत असे. ती संस्था अजूनही काम करत आहे. अशा आणखी पुष्कळ संस्था आहेत. आपल्या मुलाना आपण नको तितकी वाढदिवस आणि नाताळची ‘गिफ्ट्स’ देत असतो. त्यातले एखादे कमी करून भाऊबीज भेट पाठवण्यासाठी आपण त्याना समजून सांगावे..त्याने नवे मैत्र मिळते.. समृद्धी नुसती पैशाची नसते. ती मनाची, समाधानाची, आणि मैत्राचीही असते.

तर असा दिवाळीचा महोत्सव करावा. मजा करावी.. आनंद लुटावा. दानाचाही आनंद घ्यावा. समृद्धीच्या शुभेचछा द्याव्या घ्याव्यात. अंतरीचा दिवा उजळावा आणि कोणतीही अपेक्षा न करता इतराना प्रकाश देण्याचा प्रयत्न करावा.

सर्वाना दिवाळीच्या शुभेछा ! ....











- विद्या हर्डीकर-सप्रे.

Friday, October 2, 2015

नृत्यनिष्णात कन्यकांचा उत्तम आविष्कार




मध्यंतरी तीन युवतींची नृत्यकला पाहण्याची संधी मिळाली..खरचं किती छान तयारी होती त्यांची.. आपल्या गुरुकडून भरतनाट्यमच्या सा-या प्राथमिक शिक्षणाच्या कला शिकल्यावर  गुरुंच्या म्हणजे नृत्यांजली संस्थेच्या प्रमुख सौ. अंजली गोखले-भाटवडेकर यांच्या परवानगीने  प्राजक्ता विवेक कुलकर्णी,चैतन्या चंद्रकांत जाधव आणि मुग्धा विजयकुमार पाध्ये यांनी पुण्याच्या बालशिक्षण मंदीरात आपला पहिला जाहिर कार्यक्रम म्हणजे अरंगेत्रम..सादर केले

आणि खरोखरीच रसिकांना नृत्यकलेतील निपुणतेचे दर्शन घडविले.

मलरी, अलारिपू, जातीस्वरम, दशावतार..आणि मध्यतरांनंतर पदम्, तिल्लीना, अभंग आणि मंगलम्..अशी एकापेक्षा एक तयार रचनेतून केलेले सादरीकरण पाहताना या कलेत किती एकाग्रचित्त झाल्या आहेत हेच स्पष्ट होत होते.

यातले तांत्रिकपण जरी फारसे समजले नाही तरी जे काही त्या सादर करीत होत्या त्याला ताल, लय आणि त्पातल्या पदन्यासाचे ते एकचित्त स्वरूप पाहताना त्यांचा अभिमान वाटतो..
अशा कला पारंपारिक पध्दतीने आजही सादर केल्या जातात..आणि या अधुनिक काळाचे आवरण असलेल्या
जमान्यातही पालक आपल्या कन्यकांना ती सादर करण्यासाठी परवानगी देतात याचे अधिक बरे वाटते.
तसे पाहिले तर ह्या सर्वच कला शिकण्यासाठी असणारी जिद्द आणि पराकाष्ठ्येची भक्ती यातून दिसून येते..
आपल्या गुरूवर असलेला अढळ विश्वासही याला कारणाभूत ठरतो..

यासर्वांना साथसंगत करणारी मंडळीही उत्तम होती...गायक मयुर महाजन, मृदंगवर शंकर नारायणन्, पखवाज- राजू जावळकर, व्हायोलिन- रमाकांत परांजपे, सिंथेसायझर- केदार परांजपे आणि निवेदनाची यथायोग्य बाजू सांभाळणारे रवीन्द्र खरे यांचाही उल्लेख नक्कीच करावा लागेल.

यासाठी सौ. निलिमा व विवेक कुलकर्णी, सौ. उमा व चंद्रकांत जाधव आणि सौ. सषमा व विजयकुमार पाध्ये या माता-पित्यांनाही धन्यवाद द्यावासा वाटतो..
यासाठी आर्थिक झीज तर होतेच..पण कलेतले प्राविण्य मिळविल्यावर ते अद्भूत  सादरीकरण पाहण्यातला अभिमान तिनही माता-पित्यांना धन्यतेकडे घेऊन जातो..

अतिशय मृदु आणि निगर्वी अशा गुरु सौ. अंजली भाटवडेकर यांचे गोडवे गावे तितके कमी पडतील..
त्यांनी या तीनही कलावतींना देखणे रुप प्राप्त करुन कलेतील साधना एकाग्रतेने शिकण्याची जिद्द निर्माण केली...

पुढील काळात  त्या तीनही कलावती उत्तम नृत्यकलानिपूण होतील आणि आपल्या गुरूंचे, आई-वडीलांचे आणि भारतीय संस्कृतीची महती पुढे उत्तमरित्या जपतील यात शंका नाही..त्यांना खूप सा-या शुभेच्छा.



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276


Monday, August 10, 2015

बाबुजींची आजही मोहिनी रसिकमनावर ..

मराठी मनावर अधिराज्य गाजविणारे युगकर्ते ..राष्ट्रभक्त..शास्त्रीय संगीताचे जाणकार..मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या संगीताने सुवर्णाचे पान निर्माण करणारे संगीतकार..ज्येष्ठ गायक..गीतरामायण भावपूर्णतेने आणि तन्मयतेने सादर करणारे थोर गायक..सुधीर फडके  .. उर्फ बाबुजी...त्यांची एकलव्याप्रमाणे भक्ती करून त्यांच्या गायकीचे टप्पे आपल्यापरिने रसिकांच्या मनात रुजविणारे त्यांच्या संगीताचे अभ्यासक आणि एके काळी बाबुजींच्या गाण्यानी चैत्रबन मंतरून टाकणारे गायक श्रीपाद उब्रेंकर यांनी ९ ऑगस्टला पुण्यात एस एम जोशी रंगमंचावर पुन्हा एकदा संगीतकार सुधीर फडके यांच्या चित्रफितीतून आणि त्यांच्या गाण्यांच्या पुनश्च दर्शनाने श्रोत्यांना तीन तास खिळवून ठेवले.. हा त्यांचा कार्यक्रम कदाचित पंचवीसावा तरी असावा..


गुरूंचे स्मरण करून त्यांच्यातल्या गुणांना आणि व्यक्तित्वाला मनोभावे वंदन करण्यासाटी श्रीपाद उब्रेंकर यांनी स्मरण बाबुजींचे केवळ ध्वनिचित्रफितीतूनच नव्हे तर दोन तयारीच्या गायकांकडून म्हणजे पुण्याचे राजेश दातार आणि कोल्हापूरच्या..डॉ. भाग्यश्री मुळे ...( ज्यांनी सुधीर फडके यांचे सुगम संगीतातील योगदान या विषयावर पीएच डी करून एस एन डी ची विद्यापिठाची डॉक्चरेट मिळविली)..यांच्याकडून काही गाण्याचे प्रत्यक्ष सादरीकरण करुन संगीतकार सुधीर फडके यांच्या अविट गीतांचे गायन एकविले.


सर्वात्कर्ष पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी आर्थिक मदत केली आणि तो सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला..पुणेकर रसिकांना म्हणून तर पुन्हा सुधीर फडके यांच्या संगीताची मोहिनी अनुभवयाला मिळाली..या कार्यक्रमाच्या साथिदार कलाकारांनाही त्याचे योगय्ते श्रेय देणे आवश्यक आहे..यात संगीतकार आणि हार्मोनियम वादक मिलिंद गुणे, तबलावादक अभिजित जायदे आणि तालवाद्यातून यथायोग्य साथ करणारे प्रसाद जोशी यांचा समावेश होतो..
आपल्या गायकीच्या सुरेल स्वरातून जेव्हा भाग्यश्री मुळे या सुखांनो या...या गीतांच्या आरंभीची आलापी करतात..तेव्हाच आजचा कार्यक्रम रंगणार हे नक्की होते...पुढे राजेश दातार स्वर आले दुरुनी..आणि प्रथम तुज पाहता..या दोन गाण्याची फर्माईश सादर करतात..तेव्हा तर रसिक पुन्हा एकदाचा ( वन्स मोअर) नारा देऊन..मुंबईचा जावई चित्रपटातील रामदास कामत यांच्या गायकीला अजुनही किती छान दाद देतात  ते कळते.. त्यातच उपेंद्र भट यांनी रामदास कामत यांना दोन डिग्री ताप असूनही बाबुजींनी हे गाणे कसे रकॉर्ड केले त्याची कहाणी एकविली.
बैठकिची लावणी..काहो धरिला मजवरी राग...तेवढ्यात ठसक्यात आणि लयदार पध्दतीने भाग्यश्री मुळे य़ांनी सादर केले..तर नविन आज चंद्रमा..हे युगलगीतही दोघांनी गायले.. झाला महार पंढरीनाथ..हा प्रासादिक अभंग.आणि गीतरामायणातील..तोडीता फुले ही...माणिक वर्मांचे गीत गायले भाग्यश्री मुळे यांनी..आणि अखेरीस देशभक्तिने ओतप्रोत रसरसलेले साने गुरुजी यांचे बलसागर भारत होवो..राजेश दातार जेव्हा भावपूर्ण आणि जोशपूर्ण म्हणतात..तेव्हा रसिक तन्मय होऊन..त्यांच्या सूरात आपला सूर मिसळून एकतानता घडवू आणतात..

पूर्वाधाचा हा तास श्रीपाद उब्रंकरांनी आपल्या पुणेरी..स्पष्टतेच्या फटक्यांनी घेतला..त्यात आजचे गाय़क पुरेसे तालिम करुन गाणी गात नाहीत..वगैरे शेरे मारून घेतले. सुधीर फडके एक व्यक्ति..एक कलाकार आणि श्रेष्ट संगीतकार म्हणून किती थोर होते..ते आजच्या पिढीला कळावे यासाठी हा ध्यास घेऊन कार्यक्रम सादर केल्याचे ते सांगतात..तेव्हा रसिक त्यांच्याही परिश्रमातून सादर झालेल्या कार्यक्रमाला टाळ्यांनी दाद देतात..
उत्तरार्धात जेव्हा बाबुजी ध्वनिचित्रफितीतून ऐकता येतात..तेव्हा त्यांच्या बॉडिलॅंग्वेज मधून त्यांच्या सहजी पण भावपूर्ण गायकीचे पुरेपुर दर्शन घडत रहाते..
एका क्षणी हिदी चित्रपटसृष्टीत काही मोजक्या चित्रपटांना संगीत देणारे बाबुजी मराठीत पुन्हा आले..ते बरे झाले..म्हणून तर मराठी चित्रपट सृष्टीला सुवर्णकाळ लाभला...गीतरामायण..सिध्द झाले....श्रीपाद आपल्या ओघवत्या निवेदनात सांगत होते..

पुलंच्या घरी पं. कुमार गंधर्व यांना काही गाणी ऐकविल्यानंतर ते म्हणाले ..तुम्ही गाता चांगले..पण त्यात आत्मा नाही...मग इंदूरच्या आपल्या गणेशोत्साव आपले गाणे घरी ठेऊन जेव्हा ते मिठी मारून फडके यांच्या गाण्यावर खूष होऊन..आपल्या शिष्यांना सांगतात..की गाण्यात आत्मा कसा असतो..ते पहायचे असेल तर सुधीर फडके  यांचे गाणे ऐका..हे सांगतात..तेव्हा कलावंतांची एकमेकांवर असणारी श्रध्दा आणि भक्ति यांचे पुरेपूर दर्शन होऊन...ते ऐकताना आपलेही डोळे पाणावतात..
पावणेदोन तासांच्या ध्वनिचित्रफितीचा हा कार्यक्रम इतका श्रवणीय आणि पाहण्याजोगा आहे...की असे कलावंत मराठीत निर्माण झाले  यांचा सार्थ अभिमान वाटल्याशिवाय रहात नाही..तो पुन्हा पुन्हा पाहावा यासाठी उब्रेंकरांनी तो सादर करावा यासाठी रसिक आणि तमाम मराठी लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतील यात शंका नाही..

बाबुजींचे सारे पैलू पाहण्यासाठी जी श्रीपाद उब्रेंकर यांनी जी एकलव्याच्या भक्तिने जी मेहनत घेतली त्याला सालाम करावासा वाटतो..


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, July 16, 2015

हे आकाशात विहणा-या पावसाच्या ढगांनो..



हे आकाशात विहरणा-या पावसाच्या ढगांनो
तुझ्या थोड्याश्या पृथ्वीवरच्या बरसण्याने
उल्हसित झालेली ही प्राणीमात्रे..तुझी आभारी आहेत..
खरयं, आम्ही तझ्या आगमनाकडे डोळे लख्ख उघडे ठेऊन वाट पहातो
पण तो बरसावा यासाठी पर्यावरणाचे नियम पाळत नाही
झाडे तोडून उंच सिमेटच्या इमारती बांधतो
त्यावर आपली स्वप्ने साकारावी म्हणून कुंड्यातून छोटी रोपे लावतो
पण तुझा निसर्ग नष्ट करत..स्वतःचे महत्व सिध्द करतो..
खेड्यातही काहीसे असेच चित्र तुला दिसेल..
शेतीची जमीन कमी होत चालली आहे..
पिढ्या-पिढ्यांची जमीन राखण्यापेक्षा त्यातून पैसा अधिक येईल
लौकिक अर्थाने सुख अधिक कसे मिळेल
कमी श्रमात अधिक दाम
हेच आमचे सूत्र बनले आहे...
डोंगरही नष्ट होऊन तिथे वाहनांसाठी रस्ते बनताहेत
तुकडे करुन त्यावर आपली छपरे उभारण्याचे बळ वाढते आहे
तू दिलेले निसर्गाचे वरदान नष्ट होत चालले पाहून तू रुसला असशील
कदाचित शहरांकडे वाढणारी प्रचंड गर्दीही तुला सतत दिसत असेल
पण अधिच मेटाकुटीला आलेला हा देह क्षमविण्यासाठी आम्हालाही दुसरा मार्ग नाही
पण तू मात्र सारे पहातो आहेस..
आमच्या शहरी भागाकडे..थोडे दुर्लक्ष केलेस तरी चालेल
जिथे शेती आहे..आणि जे तुझ्या प्रतिक्षेत बीजरोपण करून तुझ्या आगमनाची
डोळ्यात प्राण आणून वाट पहात आहेत
तिथे मात्र आवश्य बरस
तुझा आर्शीर्वाद त्या बिचा-या लेकरांवर नक्की असू देत..
आता थोडा तू दिसतोसस.भासतोस..अस्तित्वाच्या खूणा धरतीवर दाखवितोस
म्हणून तर अस्तित्वाच्या आनंदाने ..तुझे स्वागत करतानाही मन भरून येते
थोडा सूर्य झाकला गेला तरी चालेल..
आभाळ भरलेले हवे
नवे अंकूर फुललेली नवी बीजे जमीनीतून वर डोकवायलाच हवीत..
हे आकाशस्थ ढगांने तुझी महती महान आहे
तुझ्या छायेत राहण्यातही आनंद समाधान आहे
पुन्हा एकदा तुझी प्रार्थना करतो
तुला साकडे घालतो
तू ये..आणि आमच्यावर वर्षाव कर


- subhash inamdar, Pune
subhashinamdar@gmail.com





Wednesday, July 15, 2015

ओळख रविंद्र गुर्जर यांची...

उभट चेहरा. मानेवर रुळणारे पांढरे केस. अंगात नेहरु शर्ट. एका हातात शबनम आणि झपाझप पावले टाकत येणारे ते मवाळ व्यक्तिमत्व.....नमस्कारातही मृदुता आणि हसण्यात खळाळता..सारे कांही एकाच ठिकाणी आढळणारे ते व्यक्तिमत्व म्हणजे पॅपिलॉनचे अनुवादक रविंद्र वसंत गुर्जर...


कुठल्याही गोष्टीला वेळ यावी लागते..ती काल आली..स.प.महाविद्यालयाच्या शताब्दीनिमित्ताने साहित्यातरुची असणा-या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या अनुवादकाचा सत्कार केला आणि त्यांना बोलते केलल..खरं म्हटले तर त्यांना आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख पटवली..
वयाची सत्तरी गाठलेला हा उत्साही तरूण ..आपल्या जुन्या आठवांना उजाळा देत या नवीन साहित्याची रुची असणा-या मुलांशी आपले मन मोकळे करत दिलखुलासपणे बोलत होता..नव्हे त्यांच्याशी गप्पाच मारत होता...एकूणात रवींद्र गुर्जर यांचा सारा आविर्भाव आपण काहीच फार वेगळे केले नाही..केवळ शब्दांना योग्य रित्या एकमेकांसमोर ऊभे करत इंग्रजीतले आपल्याला आवडलेले पुस्तक मराठी वाचकांपर्यत पोहोचविण्याचा यथाशक्ति प्रयत्न केला इतकेच....



खंत एवढीच की या अनुवादकाची..त्याच्या या खटाटोपाची दखल म्हणावी तशी घेतली गेली नाही..त्याला योग्य तो मान मिळाला नाही...आता मात्र ती उणीव स.प.मधल्या या सत्कारातून ....या मुलांशी...बोलून...काही अंशीतरी कमी झाली...याचे समाधान त्यांनी उघडपणे बोलून...त्याबद्दल आनंद व्यक्त केला...अनेक महाराष्टातल्या ग्रंथालयांची माहिती गोळा करण्यासाठी धावपळ करून मिळविलेल्या संख्यावारीतून पॅपिलॉनचे वाचक दहा लाखांहुन अधिक असतानाही..त्यांच्यापर्यत आपणास पोहोचता आले याचे समाधान त्यांच्या बोलण्यात येत होते..
विज्ञानाकडे वळलेला हा विद्यार्थी पुढे बीए..मग एम ए करून पत्रकारिता पदी घेऊन विशाल सह्याद्रि या देनिकांत रविवारच्या आवृत्तीकेडे पहात साहित्यांच्या विविध अंगांचा अभ्यास करीत होता. लहानपणापासूनच चित्रपटाचे वेड विलक्षण...अगदी त्यावेळच्या अकरावीच्या मॅट्रिकच्या वर्षीही १५ चित्रपट पाहून हा छंद जोपासत ठेवला..वाचन ,चित्रपट पहाणे आणि प्रवास या आवडीच्या गोष्टीतून पॅपिलॉन पुस्तक वाचून प्रभावित झाले..मग झपाटून त्या कादंबरीचा अनुवाद करुन राजहंसला दाखविला..इंग्रजी भाषेतल्या कथा..प्रसंगाला..साजेशी मराठी भाषा सहजपणे कागदावर उतरत गेली आणि ती वाचकांना आवडत गेली. त्यातूनच अनुवाद करण्याचा उद्योग सुरु झाला...

गेल्या चाळीस वर्षात उणीपुरी चाळीस पुस्तके म्हणजे काही फार नाही...पण विजय देवधर, वि. ग. कानिटकर. वि. स. वाळींबे असे मोजके अनुवादक मराठी भाषेत इंग्रजी साहित्य आणत होते...आज मात्र प्रतिथयश लेखक बोटावर मोजण्याइतके आहेत...पण अनुवादक भरपूर आहेत...कथा कादंबरी मागे पडून त्याची जागा जीवनात रोजच्या जगण्यात आवश्यक अशी माहिती देणा-या ..आणि चिकन सूप सारख्या पुस्तकांना मराठी भाषेत स्थान मिळून..विषय आणि जगण्याची नवी प्रेरणा देणारे साहित्य या अनुवादातून मराठीत येत आहे..याचा विषेश आनंद गुर्जर यांना होत आहे..


आता स्वतःचे अनुभव लिहण्याचे काम सुरु आहे...अनुवाद करण्यापेक्षा स्वतःचे लेखन करत पुढचा काळ घालविण्याचा त्यांचा मानस आहे....काही वर्षे ..म्हणजे आठ वर्ष नोकरी केली पण बाकी वर्ष केवळ लेखनावर  उदरनिर्वाह केला...पत्नी डॉ. सौ. आशा गुर्जर यांची मोलाची साथ मिळाली..त्या संस्कृत पंडीत..तर मी असा साहित्यात स्वतःला बिलगुन गेलेला..त्यातूनच गायत्री प्रकाशन  सुरु केले..साहित्याची निर्मिती..त्याचे वितरण आणि वसुली..याचा अनुभव गाठीशी आला..


आता अनुवादक म्हणून पुस्तके येताहेत..पण वय थोडेच थांबणार आहे..राहिलेल्या काळा. काही नवे संकल्प पुरे करायचे आहेत...त्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे...अजुनही घरच्यांच्या नकळत चित्रपट पहातो...जवळ जवळ सगळेच...सध्याच्या मालिका पाहिल्या की त्यातला फोलपणा अधिक लक्षात येतो..आता चित्रपटाची कथा..पटकथा..संबाद  लिहावेत असे मनात आहे..एखादी मालिकाही लिहिन असे वाटते...पण वेळ थोडी सोंगे फार  अशी अवस्था झाल्यासारखे त्यांना जाणविते आहे...

स्वतःमधला साधेपणा या संवादातही डोकावत होता...एक वाचक आणि उत्तम अनुवादक..आपली मते सांगत होता..आपल्या प्रश्नांच्या उत्तरातून काही मोजके पण बोचरी उत्तरे  देत आजच्या काळावरही आपली मते बिनधास्तपणे   मांडत होता...एकूणातच परकीय भाषेतले उत्तम साहित्य मराठी यावे यासाठी वेगळे विषय कसे सुचतात याची माहिती देताना सिंगापूरमधल्या कॅन्सर झालेल्या महिलेला पुन्हा मिळालेले जगण्याचे बळ..आणि त्यांच्या अचेतन देहाला पुन्हा चेतना कशी मिळाली..यासारखी कथा कशी मिळाली यांचे सोदाहरण स्पष्टीकरण त्यांच्या या संवादातून कळत गेले..

पॅपिलॉन, गॉडफादर आणि सत्तर दिवस या पुस्तकातील मूळ इंग्रजी उतारे आणि त्याचा समर्थ असा अनुवाद विद्यार्थ्यांनी याप्रसंगी अभिवाचनातून सादर केला..स.प.चे प्राचार्य डॉ. दिलिप शोठ यांनी आरंभी रवींद्र आणि डॉ. आशा गुर्जर यांचा सत्कार करुन या संवादाची सुरवात करुन दिली...फारा दिवसांनी का असेन एका अनुवादकाची...एका साहित्यिकाची अशी दखल घेतली गेली याचे समाधान मानत जमलेले पुस्तकप्रेमी टिळक रस्त्यावरच्या महाविद्यालयातल्या ऐतिहासिक वास्तुतून बाहेर पडले..





-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276 

Monday, April 20, 2015

मी माझा..ऐन पंचवीशीत..



मी माझा या माझ्या (धाडस करून ) छापलेल्या पुस्तकाला पंचवीस वर्ष पूर्ण होतायत... 


पंचवीस वर्ष कशी गेली कळलं सुद्धा नाही... अशी म्हणायची पद्धत आहे
पण खरं सांगायचं तर.. कशी गेली ते कळतं.. आपण आपल्याला नव्याने समजत जातो
नशिबाने यश पदरात पडलं तर आपली आपली म्हणणार्या माणसांची तोंडाची कडवट झालेली चव आपल्याला विदारून जाते कोणी अकल्पीत पणे दुरावतं कोणी अवचीत येऊन जोडलं जातं...शालेत असताना भरपूर मार्क मिळवणार्‍या मुलाला हुशार म्हणून गणलं जातं मोठेपणी भरपूर पैसा मिळवणार्‍या मुलाला यशस्वी म्हणून वाखणलं जातं..
त्याच न्यायाने पुस्तकाच्या खपावर पुस्तकाचा दर्जा धरला जातो...तेंव्हा माई मला धीर देत म्हणाली होती पुस्तक नाही खपलं तर आपण पुस्तकं संपेपर्यंत लग्न मुंज बारसं वाढदिवस वास्तूशांत उदक शांत सहस्त्र चंद्रदर्शन प्रत्येक ठिकाणी आवर्जून हजेरी लावायची आणि हे पुस्तक गिफ्ट करायचं पण साईकृपेने खरच अशी वेळ आली नाही ... त्यावेळी विलेपार्ल्याचं जवाहर बूक डेपो विलेपार्ल्याचच आनंद बूक सेंटर , दादरच आय्डियल यानी अक्षरश: मी माझा वारेमाप खप केला.. चर्नीरोडचा लखानी बूक स्टालही विसरून चालणार नाही...जसा खप वाढला तशी प्रसिद्धी वाढली आणि एक अनामिक पोकळी नातेसंबंधात डोकावायला लागली... ती कशामुळे याचं उत्तर मला अजूनही मिळालेल नाही.


पण काही माणसं अवचीत जवळ येतात म्हंटलं त्यात इंद्रायणी प्रकाशनाचे कोपर्डेकर काका आणि अक्षर धाराचे राठिवरेकर दंपत्य जन्माचे जोडले गेले..
घरातून बाहेर पडल्यावर सुरुवातीला व्यवहाराचा अंदाजच येत नव्हता मिळक्तीचे साधन फक्त मी माझा आणि पून्हा मी माझाचा खप होता छापायीची जबाब्दारी कोपर्डेकर काकानी घेतली होती आणि हसत मुखाने विना तक्रार आम्हला धीर देत ते निभवत होते..
असं करता करता एक दिवस त्यांच्या माणसाने निरोप दिला साठ हजार भरा नाहीतर पुढे पुस्तक छापणं कठीण आहे... पायाखालची जमीन सरकली.. जेंव्हा आई पुस्तकाचा व्यवहार बघायची तेंव्हा पैसे आले की सगळ्यात आधी प्रिंटरचे पैसे बाजूला काढायची त्या बाबत ती फार आग्रही असायची त्यातील अर्थ तेंव्हा माझ्या लक्षात आला ... पैसे एक रकमी यायचे नाहीत आणि जे यायचे ते घरभाडं आणि इतर खर्चात ते कामी यायचे...

साठ हजार भरणं शक्यच नव्हतं...आणि तेंव्हा एकाने सुचवलं की मी माझाचे हक्क देऊन टाक म्हणजे साठ हजार द्यायची गरज नाही आणि तेंव्हा गोकुळधाम मधे आम्ही छोटसं घर घ्यायच्या प्रयत्नात होतो घर छोटं होतं पण त्यासाठी तीन लाख भरावे लागणार होते... सगळा विचार करून मी काकांजवळ धीर करून हा विषय काढला म्हंटल मी माझाचे हक्क तुम्ही घ्या मला पैशांची खूप गरज आहे... एखादा असता तर हाट केक सारख्या विकल्या जाणार्‍या पुस्तकाचे हक्क हवरेपणाने ताब्यात घेतले असते.. पण ते आमचे काका होते... ते ओरडलेच असा वेडेपणा कधीच करू नकोस.. ती तुझी जन्मभराची कमाई आहे.. परिस्तिथी काय अत्ता बदलेल... आणि पैशांचं टेंशन घेऊ नकोस..तू छान छान लिहित रहा...कोपर्डेकर काका आणि त्यांची पत्नी जिला मी मनापासून ताई अशी हाक मारतो या दोघानी कायम आधाराचा हात पुढे केला
आणि खरच सुरुवातीची दोन तीन वर्ष थोडी डळमळीत गेली पण नंतर छान घडी बसली... आमच्या वर चित्रपटांचे संस्कार, दर दहा वर्षाने घर एक मंदीर, स्वर्गसे सूंदर, घर हो तो ऐसा असे टिपिकल चित्रपट येणार आणि गल्ला भरून जाणर आई वडिलांशीपटत नाही म्हणून घराबाहेर पडलात की तुमचा बट्याबोळ झालाच समजा त्या मुलाचा बट्याबोळ दाखवला की चित्रपट हीट



... मी उमाला म्हणायचो आपलं खरच वाईट झालं तर आपण अजिबात त्यांच्याकडे जायचं नाही
पण खरच चांगलं झालं तर मग वाटलं तर पाया पडायला जाऊ पण तसा योग कधी आला नाही ना त्यांचं आमच्या वाचून अडलंना आमचं त्यांच्या वाचून
ज्यांच्याशी ऋणानुबंध ठरलेले असतात त्यांच्याशी तुम्ही जन्माचे जोडले जाता.. तसं झालं कसा योग बघा या सोळा जुनला कोपर्डेकर काका अचानक हे जग सोडून गेले.. 



हल्ली चेक पाठवताना ते कधी फोन करायचे नाहीत पण जायच्या आदल्या दिवशी त्यानी मला फोन केला चेक पाठवत असल्याचं सांगितलं जुजबी चौकशी केली आणि फोन ठेवला तो आमचा शेवटचा संवाद होता या वर माझा अजून विश्वास बसत नाही पण शेवटचा फोनही पैसे पाठवत असल्याचाच होता..
राठिवरेकर पण तसेच खूप आधीची गोष्ट आहे एकदा पुस्तकाना मागणी कमी होती तर मागवलेली नसताना मी अक्षर धाराकडे पुस्तकं पाठवून दिली आणि रमेशनी ती ठेऊनही घेतलीआणि त्या बद्दल नाकधी तो बोलला ना रसिका बोलली
मला जाहीर कार्यक्रमाची सवय राहिली नव्हती तर या ना त्या निमित्ताने अक्षर धारा मला रसिकांसमोर उभं करत राहयचं अजूनही हा सिलसिला चालू आहे.... खास सांगायचं म्हणजे रसिकाच्या हातचं गरमागरम रुचकर जेवण.त्यातही झटपट सगळे व्याप सांभाळून ती ताटात वाढते ते गरम गरम रुचकर उकडीचे मोदक.. गेल्या पंचवीस वर्षात यात बदल झालेला नाही... सध्याच्या काळात फक्त लिखाणावर आपली सुखात गुजराण करणारा मी एकमेव लेखक असावा.. नाहीतर आपल्या भारतात लिखाण हौसेखातर करावं लागतं पोट्भरीचा वेगळा व्यवसाय शोधावाच लागतो... उमाची समर्थ साथ, उमाच्या माहेरचा भक्कम आधार आणि मालिकांच समृद्ध माध्यम यातीन गोष्टिनी आमची पंचवीस वर्ष तोलून धरली


म्हणूनच पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याच्या मुहुर्तावर काकांचा आशीर्वाद घेऊन पून्हा नवी सुरुवात करतोय मी माझा२५ या पुस्तकाने ...
. काकांची देखरेख अजूनही असेलच पण तरी मुग्धा त्यांची सून आणि सागर काकांचा मुलगा जो मला मामा म्हणतो आणि मानतो सुद्धा त्यांनी जबाब्दारी घेतली आणि एक देखणं पुस्तक आज हाती आलं जे मी समस्त रसीक जनाना समर्पीत केलय कारण तुम्हीसांभळलत जपलत राखलत
या पंचवीस वर्षात कोण कोण भेटत गेलं आमचा शेखर पदे आमची मेधा पदेत्यांची गूणी मुलं,आमचे पाटकर बंधू सचीन मोरे ऋचा मोरे सारखे जिवलग


फेस्बूक मुळे भेटलेले असंख्य स्वकिय सोयरे प्रसाद मिळ्ये रचना मुळ्ये, सुब्बू, अरुंधती, तुषार जोशी सीमा जोशी बीना, मंजुषा,सुरज,मनोबा,साईनाथ,विद्या... अ ब ब ब किती नावं घेऊ

पण उद्या परत तुम्हा सर्वांच्या सोबतीनेच.. नव्या सुरुवातीची उत्कंठा मी आज पून्हा तशीच नव्याने अनुभवतोय.. पंचवीस वर्ष कशी गेली कळलच नाही असं म्हणायचा मोह मलाही होतोय..
खरच एकदाचं म्हणून टाकतो
पंचवीस वर्ष कशी गेली कळलच नाही......




-चंद्रशेखर गोखले
(चंदॅशेखर गोखले यांनी फेसबुकवर ळू्दातून मांडलेला हा पंचवीस वर्षांनंतरचा इतिहास..केवळ त्यांच्या सौजन्याने)

Sunday, April 19, 2015

मिलिंद रथकंठीवार यांच्या ई-बुकचे प्रकाशन

....त्या फुलांच्या गंधकोषी


अक्षरधाराच्या कुसुमाग्रज कट्ट्यावर रविवारी  १८ एप्रिलला...एका नव्या लेखकाच्या नव्या कादंबरीचे ईबुक आनंदाचे पासबुक लिहिणारे साहित्यिक श्याम भुर्के यांच्या हस्ते प्रकाशन केले गेले..त्यानिमित्ताने लेखकाशी संवादाचा खास कार्यक्रम विनया देसाई यांच्या प्रश्नातून उलगडत गेला..

महाराष्ट्र बॅंकेच्या पर्वती शाखेत पैशाची देवाण घेवाण करणारा हा लेखक म्हणजे मिलिंद रथकंठीवार...अभिवाचक, गायक, चित्रकार..आणि कादंबरीकार..म्हणजे साहित्यिाकाच्या कोषात मोडणारा आसा हा हरहुन्नरी माणूस...

शब्दांचे व्यसन लागले की ते तुम्हाला त्यातच गुंगवून ठेवते..तसे त्यांचे झाले..या फुलांच्या गंधकोषी..या पुस्तकातून एक निरागस ..प्रेमाची उदबोधक कहाणी लेखकाने मांडली आहे...त्या व्यक्तिरेखेतले प्रेम खोलवर माणुसकीचा झरा दाखविणारे उक्तट ..नितांत सुंदर आमि सात्विक आहे..निर्मळतेतून ती कादंबरी फुलत जोते..अखेरीस नायिकेला आपले मरण समोर दिसत असतानाही ती आपल्यातला हा प्रमाचा झरा पाझरू देत नाही..
अशी काहिशी या कादंबरीचा कथा आहे..

या कादंबरीवरुन मालिकाही बनण्याच्या मार्गावर आहे..त्यातली गीते कवी जयंत भिडे यांनी लिहली आहेत..भिडे यांच्या मते अतिशय तरल अशी ही प्रेमकहाणी लेखकाने यातून मांडली आहे..त्यातले प्रसंग अगदी खरे घडलेत असे वाटतात...म्हणूमन मला भावगीताच्या धर्तीवर आधारित गीते सुचली..






नव्याने प्रेरणा घेऊन लिहलेल्या या कादंबरीच्या प्रकाशनाकरीता  तेजल प्रकाशनाने आपले दार उघडे करुन त्यात  रथकंठीवार यांच्यासारख्या नविन लेखकाला प्रोत्साहित केले..


या निमित्ताने पुस्तकातील काही भागाचे आणि गीतांचे सादरीकरण केले गेले..हे पुस्तक वाटण्याची उस्तुकता तुमच्या प्रमाणेच मलाही आहे..हे निश्चित..



- सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Thursday, December 25, 2014

प्रभातचा पडदा काळाआड गेला...हळहळले पुणे




आजच्या सा-याच वृत्तपत्रात  प्रभात..चित्रपटगृहाचा अखेरचा पडदा पडला..असे ठळकपणे प्रसिध्द झाले..आणि पुण्याच्या सास्कृतील क्षेत्रातले हे महत्वाचे केंद्रही नामशेष होणार याची खात्री पटली..आज यावर कितीही तोडगे दिसत असले तरी प्रभात ची परंपरा खंडीत झाली हा वस्तुस्थिती मानय करावी लागले.
आप्पा बळवंत चौक म्हटले की प्रभात..हे समिकरण होऊन बसले होते..मराठी चित्रपटसॉष्टीचा इतिहास रचणारी चित्रपट कंपनी प्रभात आणि एकेकाळी महाराष्ट्रातील यच्चयावत निर्माते प्रभातमध्ये आपला चित्रपट प्रथम प्रदर्शित व्हावा यासाठी धडपजत असत.
आज तो रुपेरी पडदा काळाने हिरावून घेतला आहे..
एखाद्या माणसासारखे या प्रभातचे अस्तित्व हेच मोलाचे होते..आजही हमखास मराठी चित्रपटांना इथे अग्रक्रम होता..इथे रौप्यमहोस्तव केलेले अनेक चित्रपट आपले भागय् घेऊन आले होते..आज काही प्रमाणात अनेक माध्यमातून चित्रपट घरोघर पाहिले जातात..तेव्हा थिएटरकडे ओढा कमी झाला आसला तरी..पूर्वा थिएटर हा एकच पर्य़ाय होता...

सारे दिग्गज निर्माते आपला चित्रपट या रुपेरी पडद्यावर दिसावा यासाठी आग्रही असत...आज जसे मुंबईत आणि एकाचे वेळी सा-या महाराष्ट्रात चित्रपट एकाचवेळी दिसतात.तेस तेव्हा नव्हते..
केवळ महाराष्ट्रातील पुण्या आमि तेही प्रभातमध्ये चित्रपट झळकत होते..
आता हे सारे इतिहास जमा झाले...आता उरल्या केवळ आठवणी..
किती कलावंतांना प्रभात आपले माहेरघर वाटायचे..आता माहेरपण संपले..आता उरली आहगे  ती केवळ वास्तु..त्यातल्या स्मृती आणि आठवणीत रहाती तिथे अनुभवलेले प्रसंग...


प्रभात थिएटर यापुढे डोळ्यांना दिसणार का, मराठी सिनेमे तिथे लागणार का, प्रभातचे काय होणार, असे असंख्य प्रश्न घेऊन रसिकांनी गुरुवारी प्रभातमध्ये पाऊल ठेवले. दामले यांच्या व्यवस्थापनाच्या प्रभातमधील शेवटचा 'शो' पाहण्यापूर्वी अनेकांनी सेल्फी आणि प्रभातच्या छबी टिपत मराठी सिनेमाच्या या पंढरीला सलाम ठोकला. 

प्रभात थिएटरचा दामले कंपनीशी असणारा करार संपल्याने हे थिएटर मूळ मालकांकडे परत जाणार आहे. नव्या वर्षातल्या दहा तारखेपर्यंत टप्प्याटप्प्याने त्याचा ताबा किबे यांच्याकडे दिला जाणार आहे. 

दोन्हीही सिनेमांचे शो हाऊसफुल नव्हते, पण थिएटरच्या आवारात चर्चा होती ती प्रभात असेच सुरू राहावे, याचीच. अनेकांनी साशंक मनाने प्रभात थिएटरचे, त्यासमोर स्वतःचे फोटो काढून घेण्यात धन्यता मानली. 

Friday, November 7, 2014

रंगशारदेच्या दरबारात गोखले आण्णांची पदे आजही दाद घेतात



आजही संगीत नाटकातली पदे ऐकायला रसिक उत्सुक असतात..आणि तेही नाटककार-पत्रकार आणि साहिंत्यिक विद्याधर गोखले यांच्या लेखणीतून साकार झालेल्या बहारदार पंदांची बरसात होत असेल..तर निवारा वृद्दाश्रमाचे पुण्यातले सभागृह गुरुवारी ६ नोव्हेंबर २०१४ ला टाळ्यांच्या आनंदात त्या पदांचे स्वागत करते..वन्समोअरचा गलाकाही करते... आणि त्यातही आपल्या आवडीच्या लेखकांची स्मृती जपताना नव्या-जुन्यांच्या या संगमातून नव्याने काही कलावंत आजही ती पदे शिकतात आणि उत्तमरित्या सादर करताहेत..हा एक नजाराही इथे पहायला मिळाला.

पूर्णब्रम्ह...या किल्लेदारांच्या परिवाराच्यावतीने विद्याधर गोखले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन आपल्या २२ व्या वर्षातल्या पदार्पणाचे निमित्ताने नीला किल्लेदार यांनी लोकसत्ताचे माजी संपादक आणि संगीत नाटकातून संस्कृती आणि संस्काराची उत्तम पेरणी करणारे नाटकाकार विद्याधर गोखले यांच्या पदांची निवड केली...गोखले यांच्या कन्यका सौ. सुनंदा दातार यांचा सन्मानाने सत्कार करून ही मैफल रसिली करुन सोडली. स्वतः किलेलेदारांनीही  (पुणेकरांच्या पोटापाण्यासाठी सुग्रास अन्न पुरविले आहे).. सुरगंगा मंगला हे जय जय गौरीशंकर नाटकातले पदही सादर केले.
त्यांच्या अभ्यासू लेखणीच्या स्पर्शाने आपल्या आयुष्यात अनमोल असे क्षण आल्याचे त्यांच्या सर्वच नाटकात भूमिका केलेल्या मधुवंती दांडेकर यांनी आवर्जुन सांगितले..आणि आपली नाट्यपदेही रंगविली..शैली मुकूंद यां अभ्यासू निवेदिकेने त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट झाली नसतानाही..
त्यांच्या साहित्याचा नाटकांचा अभ्यास करुन  शैलीदार शब्दातून .गोखले आण्णांचे पैलू उलगडत नेत बहारदार असा पदांना खुमासदार वाणीत गायकांना गाते केले..
स्वतः मधुवंती दांडेकर या तर गोखले यांच्या नाटकातून भूमिकाही करीत होत्या...रविंद्र कुलकर्णी यांनीही त्यांच्या काही नाटकातून भुमिका करुन त्या पदांची ओळख आधीच करुन घेतली आहे..

पण मंगला चितळे यां भजनांचे..भक्तीगीतांचे संस्करण करतात...पण त्यांनीही या वयात गोखलेंच्या नाटकातली काही पदे इतकी सुंरेल आणि ओघवती सादर केली की खरे तर त्यांच्याबद्दल खूप काही सांगावेसे वाटेल..आजही त्यांच्यासारख्या गायकांनीही ती म्हणाविशी वाटतात..आणि पेलता येतात..यातच त्यांचा मोठेपणा सामावलेला आहे..पदातले शब्द आणि नाटय्रदांना आवश्यक असणारी लयदार तानही त्यांनी उत्तमप्रकारे आपल्या गळ्यातून रसिकांसमोर सादर करुन स्वतःबरोबरच त्यांनाही आनंद दिला..

जय जय गोरीशंकर, सुवर्णतुला, मंदारमाला, स्वरसम्राज्ञी, मदनाची मंजीरी अशा लोकप्रिय झालेल्या विद्याधर गोखले यांच्या नाटकांची तसेच वसंत देसाई, छोटा गंधर्व, प. राम मराठे यांच्या संगीताने संपन्न झालेल्या पदांची पुन्हा आठवण नाट्यसंगीत जाणणा-या रसिकांना करुन दिली.  खरं तर काळाच्या ओघात ही संगीत नाटके केवळ होशी संच कधीमधी सादर करतो..काही प्रमाणात. स्वरसम्राज्ञी..शिलेदार सादर करतात..पण बाकी नाटके काळाच्या या गतीमान संगीताच्या युगात विसरुन जाऊ लागली आहेत..अशा कार्यक्रमांमुळे पुन्हा एकदा ही संगीत नाटके ज्यांना किर्लोस्कर..देवल..खाडीलकर..यांच्या परंपरेचे पंख आहेत..ती पाहण्याची उस्तुकता निर्माण होते...मधुवंती दांडकर, रविंदर् कुलकर्णी आणि मंगला चितळे यांनी ती सारी पदे रसरसून गायली...त्यातली सूरभाषा आणि शब्दातले सोंदर्य जसेच्यातसे  नव्हे काकणभर जास्त सुंदर नटविले...ही सारी पदे रसिकांना आवडण्याचे आणखी एक कारण म्हणजे या कार्यक्रमाला लाभलेले साथीदार,.,. निलिमा राडकर (व्हायोलीन)..माधव मोडक (तबला) आणि संजय गोगटे यांची ऑर्गनवरची साथसंगत..त्यांच्यामुळे पदांना साग्रसंगीत आणि तालसंगत सूर लाभले..


विद्याधर गोखले यांच्यावरच्या नाट्यपदांच्या अशा कार्यक्रमांना इतर शहरातही दाद मिळेल..हाच संच तिथल्या रसिकांनीही आवडेल..याचे पुन्हा पुन्हा कार्यक्रम व्हावेत...आणि गोखले यांच्या नाटकांचे पुनरूज्जीवन होऊन..एखादी सुनिल बर्वे ( ज्याने हार्बेरियमच्या माध्यमातून जुन्या नाटकांचे संदर प्रयोग सादर केले) इथेही पुढे यावा आणि अशा नाटकांची वेळेच्या मर्यादा ओळखून रंगावृत्ती करुन ही नाटके पुन्हा प्रेक्षकांना सुंदर नेपथ्यातून दाखविल  अशी अपेक्षा करतो..


पुन्हा एकदा किल्लेदार परिवारला गोखले यांच्या नाटकातली पदांची रंगत आणि त्यानाटकाल्या उत्तम नाट्यगीतांना रसिकांसमोर आणले याबद्दल मनापासून धन्य़वाद देतो...त्याबद्दल आनंद व्यक्त करतो..आणि इतरत्रही अशीच दाद मिळेल असा विश्वास देतो. 



-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276

Sunday, September 21, 2014

आनंदाच्या गावी


आनंदाच्या गावी जावे
आयुष्य सारे वेचून घ्यावे

कणा कणाने रिते व्हावे
देता येईल देत फिरावे

धन संचया न रमावे
मनात सा-या उतरून जावे

कधी कुणाला सल्ला द्यावा
पैशापेक्षा नाती जपावी

होता होईल हसत रहावे
चिंतन आपुले करीत जावे

संस्काराचे बीज पेरावे
धन शब्दातून मांडावे

रिक्त मनाने जनी असावे
चिंता सोडून मस्त जगावे

जगणे सारे मोती व्हावे
शुभ्र चांदण्यासम झिरपावे

तृप्त मनाने वास करावा
आनंदाचा ध्यास घ्यावा


-सुभाष इनामदार, पुणे
subhashinamdar@gmail.com
9552596276