Sunday, September 24, 2017

कर्नाटक पहावा केवळ `अनुभव`सोबत..



ती परंपरा कायम



कर्नाटकातल्या सागरी किनारीची सफर म्हणजे  कोस्टल कर्नाटक करून पुण्यात आम्ही दहाजण परतलो..पण खरंच आजही त्या सहलीत लुटलेल्या आनंदी क्षणांची पुर्नभेट सतत व्हावी. त्यातले काही तुमच्यापर्य़त सांगावेत असे मनापासून वाटते.


याची कराणे अनेक. एकतर  अनुभवचे यश ज्यांच्या मुळे गेली बारा वर्ष वाढत गेले..त्याचा मूऴ पाया रचला तो अरूण भट यांनी..खरच अवलिया माणूस. निसर्गवेडा. पुन्हा गावाकडे चला सांगतात , बोलतात अनेक जण..पण भटांनी मुंबईतल्या अनेकांना कर्नाटकातल्या सिरसीत निसर्ग उभा करून कर्नाटकातली इतरांना दिसलेली स्थळे शोधली.. 

त्या रस्त्यावरून जेव्हा अनुभवच्या मंडळींना डोळे उघडून निसर्गातल्या आनंदाकडे पहायला शिकविले..निसर्ग वाचायला शिकविला. बरोबर स्वदिष्ट महाराष्ट्रीयन आणि कर्नाटकीय पदार्थांचा आस्वाद दिला. आणि पुन्हा येवो अशी हाक दिली..


आज त्यांच्यामागे ती परंपरा कायम राखत त्यांच्या सुविद्य पत्नी, जावई, मुलगी आणि सारा अनुभवचा सहकारी वर्ग. तिच वाट त्याच जिद्दीने आणि चिकाटीने पुढे नेली आहे..त्यांचे स्वागत करून त्यांच्या या यशाचे साक्षिदार बनण्याचे ठरवून ते अनुभवून परत येताना त्यावर काही शब्दात सांगावे यासाठी हा प्रपंच केला..








चार वर्षापूर्वी आम्ही बारा जण अनुभवच्या पुण्यातल्या कार्यालयात मुकुंद चौगुले यांना भेटून कर्नाटकातल्या नविन पर्यटन स्थळांची सफर करण्यासाठी नावे नोंदली..तेव्हा अरूण भट कोण..त्यांची व्यवस्था काय काहिच माहित नव्हती..मात्र इतरांचे अनुभव ऐकून त्यांच्या डिस्कव्हर कर्नाटक सहलीसाठी तयार झालो.. त्याचा अनुभव http://subhashinamdar.blogspot.in/2014/01/blog-post_22.html

या ब्लॉगवर आहेच..



यांच्या सहलीचे वैशिष्ठ आणखी एक..त्या शनिवारी सुरू होतात आणि पुढच्या रविवारीच संपतात..आठवड्याच्या कालावधीत पहिले दोन दिवस ओळखीत जातात..पुढचे दिवस भटकण्यात आनंद घेत कधी निघून जातात..आणि आपण त्या परिवारात कधी एकरूप होऊन जाता..ते कळत नाही .तोपर्य़तच हा सुखद अनुभव संपतो.. पुन्हा जाण्याच्या ओढीने..


कोस्टल कर्नाटका या सहलीला तयार झालो याचे अधिक मोठे कारण अरूण भट यांनी उभारलेल्या पाच एकरावरच्या सिरसितल्या जंगलातल्या जागेवर उभे केलेले `ग्रीन वर्ल्ड` मध्ये चार रात्र मुक्काम.. तिथे राहून आलेल्या कुणालाही विचारा की तुम्ही निसर्गात राहूनही या राहिणीमानात किती छान रमता ते.




दोन दिवस रहातो ते..मुर्डेश्वरच्या अतिभव्य अशा शंकराच्या शिल्पाच्या परिसरात आर एन शेट्टी यांनी उभारलेल्या समुद्राच्या काठावरच्या गेस्ट हाउस मध्ये..म्हणायला ते गेस्ट हाऊस पण ते रहाण्यासाठी खूपच सुरेख आहे.. इथल्या प्रत्येक खोलीतून समुद्राचा नजारा दिसतो..आणि दुसरीकडे मुर्डेश्वर मंदिराचे धार्मिक दर्शन घडते.

https://www.ghumakkar.com/murudeshwar-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0/





आम्ही काही पुणेकर मंडळी पुण्याहून पनवेलला गेलो तिथून मत्स्यगंधा ने कुमठाला उतरलो..तिथून अनुभवचे जगदिश पाटील आणि सहकारी  सिरसितल्या ग्रीन वर्ल्ड कडे मुक्कासाठी घेऊन गेले..




अदरातिथ्यात लपेटलेल्या तिथल्या अनिरुध्द शेट्ये आणि प्राची भट यांच्या अनुभवाचे साक्षिदार बनलो.. तोच आपलेपणा..तोच आग्रह.. आणि जातिने विचारपूस..

आमच्याबरोबरच्या काही महिलांना अगदी माहेरपणाचा आनंद देणारा..हा विसावा..मायेचा आणि ममत्वाचा वाटला..


मग काय दोन बावीस  आणि दोन बारा सिटच्या मोटांरींतून बनवासीचे मधुकेश्वर मंदिर..ज्याला कर्नाटकातले दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते..


तिथे जाताना पाहिलेली लसणाची लागवड, काही प्रमाणात उस आणि सुपारी, नारळाची शेती..



भव्य प्राचिन अशा मधुकेश्वर मंदिराच्या प्रवेशव्दारी उभा असलेला भव्य रथ.. 







मंदिरातला नंदी..जो ऐका डोळ्याने शंकारकडे एका डोल्याने पार्वतीकडे पहातो..





जोग फॉल.. 
जो गिरसप्पाचा धबधवा म्हणून पुस्तकातून वाचलेला आहे..सिरसीपासून एकशेवीस कि.मि. दूर.. कारवार जिल्यातला हा जोग फॉल..शरावती नदीचे उगमस्थान शिमोगातल्या तिर्थहळ्ळे आहे. चार धारांमधून पाणी खाली कोसळते..राजा, रोरर, रॉकेट आणी राणी अशी त्यांची नावे ठेवली आहेत..देशातला दुसरा नंबराचा हा धबधबा आहे.. हवा चांगली होती..प्रवासही सुखकर..आणि वातावरणही उत्तम.


उंचेलीचा धबधवा 
जो. 80 कि.मि.वर सिरसीपासून आहे..


तिथे वाटेत..सहस्त्रलिंगम दिसते..शाल्मला नदिच्या पात्रात हजार शिवलिंगे कोरलेले हे ठिकाण सोंडा गावात आहे.



तिथून पुढचा प्रवास होतो तो..खाली खोल खोल जात उंचेलीकडे. खळाळणारे पाणी सभोवताल्या डोंगरावरून खाली कोसळते..ते पहाण्यासाठी आधी अर्धा कि.मि.. उतरत जाणे..मग सुमारे पाचशे पायरी खाली उतरणे..मग दिसतो..तो कोसणारा पाण्याचा प्रवाह.. आम्ही गेलो..तेव्हा पावासाचा शिडकावा..मध्येच उन.. अशातच दिसते..ते इंदर्धनुष्य..मन प्रसन्नतेने भरते..पण वर चढताना होणारी दमणुकही सहन करावी लागते.


याणाचा भस्माचा डोंगर.  


जो सिरसीपासून साठ कि.मि. वर आहे. .अतिप्राचिन ..पुराणकालिन.. भस्मासूराचा वध करून शंकराने पार्वतीला तिथे पाठविले..म्हणून तिथे भस्मासूराची राख होते..म्हणून त्याला भस्माचा डोंगरही म्हणता.. 


तिथे.भव्य अशी प्रदिक्षणा गुफा आहे. खाली.शंकराचे भैरवेश्वर मंदिरही आहे..


सिरशीतल्या मनकर्णिका मंदिरातल्या मुकांबिका देविचे दर्शन आणि थोडी खरेदी करून..सिरसीतून मुक्काम हलवून निसर्गाचे वारे खाते आपण कुमठा मार्गे होनावरला येतो.


.सुखद गारवा अंगावर घेत..आता शरावती नदीच्या पात्रातले बोटिंग करतो.. आणि पुढे गाकर्ण महाबलेश्वरच्या दर्शनासाठी उतरतो..



शंकराचे आत्मलिंग तिथे आहे असे मानले जाते. रावणाने शंकराला प्रसन्न करून  शिवलिंग लंकेला नेताना  वाटेत गणपतीच्या हातून ते कसे इते स्थापन झाले याची आख्यायिका आपणाला माहित आहेच.







तिथल्या महावलेश्वराचे दर्शन घेऊ..श्री गणपतीच्याही भाविकतेने पाया पडून पुढे मुर्डश्वराकडे मुक्कामाला निघतो..  


पनवेल कन्याकुमारी महामार्गावर धावणारी आमची गाडी जेव्हा मुर्डेश्वराच्या जवळ येऊन पोहोचते..तेव्हा दिसणारी भव्य शंकराचे शिल्प मनात साठून रहाते..




समुद्राकाठच्या गेस्ट हाउसवर विश्राम करून भगवान शंकराच्या मंदिरात संध्याकाळच्या आरतीला आणि नंतरच्या प्रदिक्षेणाला हजर राहण्याचे भाग्य लाभते.  


एकशे तेवीस फूट शंकराचे भव्य शिल्प आणि  दोनशे सदतीस फूट उंच सोळा मजली असेलेले मंदिराचे गोपूर अरबी महासागराच्या विशाल पाण्यावरही आपली सत्ता कायम कोरले गेले आहे..



काही प्रकाशचित्रातून तेच रूप साकारताना पाहण्याचा मनस्वी आनंद आम्ही घेतला..  



 शंकराच्या शिल्पाखालील गुहेत साकारलेले गाकर्ण महाबलेश्वराचे..म्हणजे शंकराची हु पुराणकाथाही चित्रमय स्वरूपात अनुभवणे हाही आनंद घेतला..  






मुर्डेश्वरच्या मुक्कामात एडगुंजीचा महागणपती..बेंदूरचा  सूर्यास्तचा देखावा.. 


पण आम्हाला ढगाळ हवामानामुळे  तो दिसला नाही.पण नदीचे सागरातले समर्पित होणे..या उंचावरच्या परिसरामुळे शक्य झाले..वाटेवर मोरांचेही दर्शन घडले..


आणि उपुंदा नदी  अरबी समुद्रात मिळते तो देखावा मात्र अगदी स्पष्ट दिसू शकाला..


मग अखेरीस झाले ते सोमेश्वर सागर तिरावरचे समुद्र दर्शन..कांहींनी त्यात स्नाहनही केले..तर काहींनी सागर लाटांचा आनंद घेतला.






शिरालीचा गणेश आणि महामाया मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर आमच्या गाड्यांचा ताफा चालला  चित्रापूरच्या सारस्वत मठाकडे.. 

मठातली धार्मिकता मुलांचे वेदपठण आणि श्री शंकराच्या पिंडींचे होम हवन पाहतान मन प्रसन्न होते.. मठाशेजारच्या तलावाकडेही आमची नजर गेली..

तिथली निरव शांतता आणि स्वच्छता पाहून मनाचा मुक्काम इतेच कायमचा असावा असे वाटत राहिले..  मठा शेजारी. साकरलेले प्राचिन मूर्ति आणि शिल्प कलेचे नमुने पहातच राहिलो.तिथला भव्य रथ..जा केवळ हनुमान जयंतीला बाहेर काढला जातो..त्याची कालकुसर केवळ अप्रतिम होती..पण केवळ पाहण्यापुरते..त्याची प्रतिमा साठनूव ठेऊ शकत नव्हतो..ते एका स्वांमिंचे एकट्याचे संग्रहालय होते..




सगळ्या प्रवासाच्या आठवणी काढत सारेजण...मुर्डेश्वराच्या शंकराच्या प्रतिमेला मनोमन नमस्कार करून पुन्हा कोकण रेल्वेच्या मंगलोर ते कुर्ला..मस्त्यगंधाने पनवेलकडे निघालो..


प्रत्येकाची एकमेकांशी ओळख होणेही महत्वाचे होते..तेही झाले..आणि सगळ्यांसाठी अनिरूध्द शेट्ये यांनी सादर केलेला जुन्या हिंदी गाण्यांंचा चित्रमय कार्यक्रमही सर्वांना आवडला..
विशेष करून सिरसिचे गायक श्रीधर हेगडे यांचे अभंग  आणि संतरचनाही सगळ्यांनाच आनंद देत होत्या


विशेष करून अनिरुध्द शेट्ये, प्राची भट..जगदीश पाटील, राम पटकुरे, अभिषेक जमादार, सागरसह सारे रथाचे सारथी..जे केवळ सारथी नसतात..तेच पुढे सामानाची नेआण करून तुम्हाला सुंदर भोजनही आग्रहाने वाढतात.. गाडीतून उतरपल्यापासून ते गाडीत सामान चढवेपर्य़त..त्यांच्यामुळेच ही सफर सगळ्यांचा मनात कायमची कोरली गेली.


पुन्हा एकदा कर्नाटकात लपलेल्या नयनरम्य  निसर्गाचे रुप अनुभवण्यासाठी तिथले प्राचिन जीवन आणि परंपरा पाहण्याचे वचन मनोमन घेऊन.



-सुभाष इनामदार, पुणे
9552596276

Saturday, August 19, 2017

कट्यारच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने



प्रसिद्ध नाटककार कै . पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे विक्रमी नाटक कट्यार काळजात घुसली! मास्तरांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केेलेल्या ह्या नाटकाच्या पहिल्या, शुभारंभाच्या प्रयोगाला गेल्या २४ डिसेंबरला ५० वर्षे पूर्ण झालीत. गेल्या तीन पिढ्यांना आकर्षित करणारे हे नाटक सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.


मास्तरांच्या ह्या नाटकाने वैदर्भीय रंगभूमीची शान उंचावली. त्यानिमित्त हा आठवणींचा मागोवा.
कट्यार हे थोडंसं आत्मचरित्रात्मक नाटक आहे आणि त्यात, मी जो आहे तो, कविराज बांकेबिहारीच्या स्वरूपात आहे. माझी स्वतःची एक वेदना आहे की, जे गळ्यातून निघत नाही; ते डोक्यातून काढावं लागतं. मग मला म्हणावं लागतं की, हा माझा शास्त्राचा एक हात तयार आहे. कलेचा हात तुम्ही द्या म्हणजे माझा नमस्कार तयार होईल. लहानपणी गाणं शिकायची अतिशय इच्छा होती. त्यावेळी दीड रुपया फी होती. नागपुरातल्या सगळ्या क्लासेसमध्ये जाऊन आलो. सगळीकडे शिकवणीचा दर सारखाच होता. अट अशी की, पेटी शिकली पाहिजे, तबला शिकला पाहिजे आणि गाणंही शिकलं पाहिजे. माझा अडाणी हिशेब असा की, माझ्याजवळ फक्त आठ आणे आहेत. मला फक्त गाणं शिकायचं आहे. वडिलांकडून फक्त दरमहा आठ आणेच मिळू शकत. पण आठ आण्यात गाणं शिकवायला कुणीही गुरुजी तयार होईनात. बांकेबिहारी या पात्रातून या व्यथेचं मूर्तीकरण झालं आहे. हे शब्द आहेत कै . पुरुषोत्तम व्यंकटेश दारव्हेकर या मराठी नाट्यसृष्टीतील अत्यंत प्रतिभावान आणि सव्यसाची लेखक -दिग्दर्शकाचे. होय, हे शब्द आहेत आपल्या दारव्हेकर मास्तरांचे. ज्या मास्तरांच्या एकेका शब्दाने वैदर्भीय रंगकर्मींच्या तीन पिढ्या घडविल्या, त्या संजयमामांचे!…..




आज हे शब्द आठवण्याचे कारण म्हणजे मास्तरांचे विश्‍वप्रसिद्ध नाटक कट्यार काळजात घुसली! मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. भालेराव नाट्यगृहात २४ डिसेम्बर १९६७ रोजी कट्यारचा पहिला, शुभारंभाचा प्रयोग दणक्यात सादर झाला होता. निमित्त होते ललितकलादर्शचा हीरक महोत्सव. शुक्रवारी या घटनेला ५० वर्षे पूर्ण झालीत. मास्तरांची आजही लखलखणारी ही कट्यार सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करेल. संगीत नाटकांच्या अलीकडील काळात ही घटना सोन्याच्या अक्षरांनी लिहिली जाईल. मास्तरांसारखा सव्यसाची-सिद्धहस्त लेखक -दिग्दर्शक, प्रभाकर पणशीकरांसारखा दूरदृष्टीचा आणि धडाडीचा निर्माता, पंडित जितेंद्र अभिषेकींसारखा नवनवोन्मेषी प्रतिभेचा संगीतकार आणि पंडित वसंतराव देशपांडे यांच्यासारखा तपस्वी गायक अभिनेता! सगळे योग कसे अमृतसिद्धी योगासारखे जुळून आले. कट्यारमध्ये हे सर्व एकजीव झाले आणि एक अमर, अजर, अक्षर कलाकृती जन्माला आली. कोणत्याही कलाकृतीची निर्मिती, ही वेदनेतून होते. मास्तरांच्या मनातील वेदनेला एका अक्षय्य नाटकाने रंगमंचावर आणले. मास्तरांच्या मनातील व्यथा वर त्यांच्या शब्दात आलीच आहे.


कट्यारमधील सर्वच गाणी अत्यंत लोकप्रिय झाली. हे नाटक पारंपरिक संगीत नाटकांपेक्षा वेगळे आहे, इथपासून ते, हे ‘संगीत नाटक’ या व्याख्येत बसतच नाही, इथपर्यंत चर्चा आणि वादविवादही झडले. नाट्यसंपदाचे हाऊसफुल्ल नाटक म्हणजे तो मी नव्हेच! या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्लीला झाला. सर्व मंडळी परतीच्या वाटेवर नागपुरात थांबली. त्यावेळी कट्यारची संकल्पना मास्तरांनी पंतांना सांगितली. कच्चे हस्तलिखितही तयार होते. ते पंतांनी वाचले आणि मी हे नाटक काढणार असे मास्तरांना आश्‍वासन दिले. ही घटना १९६२ सालची आहे. व्यावसायिकतेच्या दृष्टीने नाटकाची अनेक वेळा चर्चा झाली. पुनर्लेखनेही झाली . नाटकात तांत्रिक करामती करणे आवश्यक होते. यासंबंधाने पंत एका ठिकाणी लिहितात, विशेषतः यातला एक दृश्यबदल मला विशेष आव्हानात्मक वाटला. खांसाहेबांसमोर आलेला नवागत सदाशिव, बारा वर्षांपूर्वी शिकलेलं गाऊन दाखवत असतानाच त्या गाण्याच्या आवर्तांतच बारा वर्षे मागे जातात. आणि भानूशंकरांच्या पायाशी बसलेला छोटा सदाशिव गाताना दिसतो. पूर्ण दृश्यबदल होऊन त्या ठिकाणी मिरजेतील देऊळ दिसतं… मास्तर म्हणाले, मोठा सदाशिव गाता गाता अंधुक प्रकाशात पं. भानूशंकर गाताना दिसले आणि भानूशंकरांचं गाणं ऐकतानाच खांसाहेब दिसेनासे झाले, तर या नाटकातील एक कडवा परिणाम मला साधता येईल. या वाक्यातूनच पंतांना तीन फिरत्या रंगमंचांची कल्पना सुचली. श्याम आडारकर यांनी, एकाच वेळी तीन फिरत्या रंगमंचाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. मराठी नाट्यसृष्टीत तो एक चमत्कारच होता.


दि गोवा हिंदू असोसिएशनच्या १९६४ साली रंगमंचावर आलेल्या मत्स्यगंधा नाटकातील संगीताने पंडित जितेंद्र अभिषेकींचे नाव सर्वतोमुखी झाले होते. ताज्या दमाचा आणि नव्या युगाचा संगीतकार म्हणून रसिकांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेच होते. पंडितजींना कट्यारचे संगीत दिग्दर्शन करण्याची विनंती पंतांनी केली. कट्यार काळजात घुसली ह्या नाटकाच्या संगीतासोबतच पंडितजींचा संगीतानुषंगाने लेखन प्रक्रियेतही सहभाग होता. साठोत्तरी संगीत नाटकांच्या एकूणच संरचनांमध्ये पंडितजींचा फार मोठा वाटा आहे. नवता आणि प्रयोगशीलता ही त्यांची वैशिष्ट्ये. साहित्य, संगीत आणि नाट्य यांचा एक दुर्मिळ योग त्यांच्या व्यक्तित्वात होता. पारंपरिक नाट्यसंगीताला त्यांनी आधुनिक व कालसापेक्ष परिमाण मिळवून दिले.

कट्यारबद्दल स्वतः पंडितजी एका मुलाखतीत म्हणतात, दारव्हेकर हे संगीताचे उत्तम जाणकार आहेत. रंगमंचावर नाटक कसं यशस्वी होईल याची त्यांना पुरेपूर कल्पना असते. नाटकात संगीताची योजना नेमकी कुठं आणि कशी हवी याचा आराखडा त्यांच्या मनात आधीच तयार असतो. कट्यारची रचना त्यांच्या मनात बर्‍याच वर्षांपासून रुजली होती. त्यात कुठं काय करायचंय् याची बरीचशी कल्पना ठरलेली होती. ‘बीत गये दिन भजन बिना’ हे कबीराचं भजन पंडितजींच्या तोंडी टाकावं असं मी सुचवलं. त्याचं त्यांनी सुंदर मराठी रूपांतर करून दिलं. राग बिलावल मधील ते गीतही लोकप्रिय झालं. सर्व प्रमुख आणि अन्य अभिनेते यांच्यासोबत आम्ही तीन महिने एकत्र तालीम केली.

या नाटकाची तालीम म्हणजे आम्हा सर्वांनाच एक दिव्य सांगीतिक आणि नाट्यात्मक आनंद देणारा विषय होता. निश्‍चितच ह्या नाटकाचे संगीत म्हणजे स्वतंत्र लिखाणाचाच विषय आहे. या नाटकातील पदांसाठी चिजांची निवड पंडितजींनी केली. परंतु त्यांचा विस्तार वसंतरावांनी आपल्या शैलीने केला. पंडितजी आणि उस्तादी गायनातील फरक सामान्य रसिकालाही जाणवेल असाच यामागे प्रयत्न होता. या भवनातील गीत आणि तेजोनिधी लोहगोल ही पदे हा फरक दाखवणारी आहेत.


कट्यारचे संगीत यमन, भूप, मांड या रागांनी तयार होणारे नव्हते. तिथे पतियाळा शैलीच हवी. बडे गुलाम अली, सलामत-नजाकत यांनी जे वेगवान संगीत आणले त्याचा उपयोग अभिषेकींनी केला. पटबिहागमधील या भवनातील गीत किंवा धानीमधील ‘घेई छंद’ आठवून बघा! ‘करात उरली केवळ मुरली’ हे या नाटकातील पहिले पद! पडदा वर जाताच सुरू होणारे. ते भैरवीत मांडून अभिषेकींनी सर्व रूढ संकेत व परंपरांना छेद दिला. यातील रागमाला म्हणजे मास्तर आणि पंडितजी यांच्या अनोख्या प्रतिभेचा आविष्कार आहे. अशा कितीतरी गुणांनी हे नाटक सजलेले होते. ‘कट्यार’ म्हणजे संगीत नाटकांच्या पीछेहाटीला दिलेले चोख उत्तर आहे, असे मत गदिमांनी व्यक्त केले आहे. नाटकाचा शतकमहोत्सव ८ एप्रिल १९६९ ला साजरा झाला. एस. डी. बर्मन, हेमंतकुमार, मदन मोहन यांच्या सारखे दिग्गज संगीतकार, हृषीकेश मुखर्जी सारखा दिग्दर्शक यांनी अनेकदा हा प्रयोग पाहिला. चरित्र अभनेता कन्हय्यालाल तर अनेकदा येत. सितार नवाझ पं. रविशंकर यांचेसाठी पुण्याच्या बालगंधर्वमध्ये नाटकाचा खास प्रयोग झाला होता. ही होती मास्तरांच्या लेखणीची आणि दिग्दर्शनाची जादू!


नागपूरच्या रंजन कला मंदिरपासून सुरू झालेला मास्तरांचा प्रवास या नाटकाने खूप उंचीवर नेला. चंद्र नभीचा ढळला, चार कथा एक व्यथा, अबोल झाली सतार, वेदनेचा वेद झाला, वर्‍हाडी माणसं, नयन तुझे जादूगार ही मास्तरांची नाटके चटकन आठवतात. पण कट्यार म्हणजे त्यांच्या मुगुटातील शिरपेच! त्यांच्या लेखणीत प्रसंगांची आखणी आणि पात्रांचे स्वभाव रेखाटन यांचा नेमकेपणा असे. त्याच नेमकेपणाने आणि नेटकेपणाने मास्तरांनी कट्यारचे लेखन केले आणि दिग्दर्शनही केले.

जुन्या संगीत नाटकांच्या परंपरेत न बसणारे तरीही, रसिकांनी कौतुकाने डोक्यावर घेतलेले हे अर्वाचीन काळातील विक्रमी नाटक. नव्या पिढीतील अनेक नटांनी हे नाटक ताकदीने पुढे नेले आहे. या नाटकाचे निर्माते पंत पणशीकर लिहितात, कट्यार म्हणजे अर्वाचीन काळातील आणि पुढच्या अनेक पिढ्यांना आकर्षित करणारं असं एक संगीतप्रधान (म्युझिकल एक्स्ट्राव्हागांझा )अद्वितीय नाटक आहे. नाटककार दारव्हेकरांनी हे एकच नाटक लिहिलं असतं तरीही, त्यांचं नाव मराठी नाट्यविश्‍वात सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं असतं. अशा नाटकाची निर्मिती करण्याचं अहोभाग्य मला लाभलं, हे मी माझं पूर्वजन्मीचं सुकृतच समजतो. …आणि मास्तरांच्या कट्यारचे हे देवदुर्लभ यश आमच्या पिढीला बघायला मिळाले, हे आमचेही पूर्वसुकृतच!





 
– प्रकाश एदलाबादकर
नागपूर.
९८२२२२२११५



(बेळगावच्या तरूण भारतच्या २५ डिसेंबर १६ च्या अंकातून साभार हा लेख घेतला आहे.. )